आभास की वास्तव? (भाग- १५)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा सुगावा घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - १५


                 संकर्षणने दार उघडण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्याला जमले नाही. म्हणून सिध्दपुरुष महाराजांनी संकर्षणला थोडे बाजूला व्हायला सांगितले व नंतर त्यांनी स्वतःच एक मंत्र ओठातल्या ओठात पुटपुटला व लगेच दार उघडले. 


                दरवाजा उघडताच हॉलमध्ये डोळे मिटून बसलेला युग संकर्षण आणि सिध्दपुरुष महाराजांच्या नजरेस पडला. संकर्षण तडकाफडकी पळतच युगजवळ गेला आणि त्याला गदागदा हलवून उठविण्याचा प्रयत्न करू लागला. संकर्षणची हाक ऐकताच युगला जाग आली होती पण त्याला डोळे उघडायला थोडा वेळ लागत होता. कदाचित तो गाढ झोपेत होता पण काही वेळातच त्याने डोळ्यांची उघडझाप करून डोळे उघडले. 


त्याने संकर्षणला पाहिले व तो मंद हसला पण डोळ्यापुढे एका महाराजाला पाहून युगचे स्मित क्षणार्धात मावळले आणि त्याने संकर्षणवर एक जळजळीत कटाक्ष टाकला. तो संकर्षणला म्हणाला, " संक्या, तू डोक्यावर पडला आहेस का? आज नक्की काय झालंय तुला? कसलं हे खुळ? खरं सांगायचं तर संक्या, आता तू खरंच खूप अति करतोय! कोण तो मघाशी आलेला अवलिया पंडित? ना ओळख ना पाळख... तो या घराबद्दल आणि धराबद्दल काहीही येऊन बरळतो काय आणि तू त्याच्यावर सहज विश्वास ठेवतो काय... सगळं कसं अविश्वसनीय! नाही का! 


                तुला माहीत आहे संक्या, मला काय वाटतंय! मला वाटतंय की, अति ताण माझ्या नव्हे तुझ्या डोक्यावर आहे म्हणून तू अशा फालतूगिरीवर आणि भोंदू माणसावर विश्वास ठेवून एका चांगल्या व्यक्तिच्या चांगुलपणावर संशय घेतोय. इट्स जस्ट रिडीक्युलस! पण मी तुला आधीच बजावतोय, आपण इथे काही दिवस भटकंती करायला म्हणून आलेले आहोत. आपण इंजॉय करायला आलेले होतो तर तेच करुयात! उगाच का आपला वेळ नको त्या भानगडीत वाया घालवायचा? आणि मुळात त्यात काहीच तथ्य नसताना... संक्या, तू मघाशी धरावर अविश्वास दाखवून आधीच तिच्या मनाला खूप दुखावलंय आता परत तिला हर्ट करू नकोस. आधीच तिने कमी खस्ता खाल्ल्या आहेत का प्रारब्धाकडून? मग त्यात का आपण भर घालावी? जर एखाद्याला आनंद आपण देऊ शकत नाही तर मग एखाद्याच्या दुःखाचे कारण तरी आपण का म्हणून व्हावे? 


                राजा, नेमके चार दिवस आपला इथे मुक्काम आहे त्यानंतर आपण परतून आपल्या पुण्यात जाणार आहोतच. मग जाताना अशा आठवणी आपण धराला सप्रेम भेट देऊन जायच्या आहेत का? आणि आपण स्वतःदेखील अशा आठवणींना सोबत घेऊन जायचे का? नाही ना! मग प्लीज माझं ऐक! आणि या व्यक्तीला घराबाहेर जायला सांग. प्लीज! आणि जमलं तर माणुसकी म्हणून धराचीही माफी माग! "


                युगचे शब्द ऐकून संकर्षण निशब्द झाला होता आणि जणू संमोहित देखील झाला होता. तो युगने सांगितल्याप्रमाणे सिद्धपुरुष महाराजांना बाहेर काढणार होता पण सिद्धपुरुष महाराजांनी लगेच थोडा अंगारा घेऊन एक टिळा संकर्षणच्या कपाळावर लावला व संकर्षण लगेच भानावर आला. 


संकर्षण भानावर येताच तो युगशी बोलणार होता पण सिद्धपुरुष महाराजांनी त्याला अडविले व ते स्वतः युगला उद्देशून म्हणाले, " युग तू म्हणालास ते अगदी खरंय! मी सुद्धा तुझ्या मताशी सहमत आहे. आजच्या युगात विज्ञानाने एवढी प्रगती केली असताना अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे गाढवपणाचे लक्षणच आहे ना! पण युग विसरू नकोस काही गोष्टी या विज्ञानाच्या पलिकडे आहेत. जगाविषयी कित्येक रहस्य आहेत. प्रत्येक रहस्याचे उत्तर उघड करता येईल असे नाहीच ना... पण असो! 


                मला फक्त एवढंच म्हणायचंय की, मी फक्त एकदा चोख निरिक्षण करणार. मी स्वतः इथे कोणती नकारात्मक ऊर्जा वावरत आहे की नाही याची शाश्वती करणार आहे. म्हणून मला फक्त तेवढी मोकळीक दे. मला एक संधी हवी आहे. त्या संधीचा वापर करून मला जाणून घ्यायचे आहे येथील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेबद्दल! जर येथे काहीही अनिष्ट आढळले नाही तर मी निमूटपणे स्वतःच निघून जाईल. परत कधीच त्रास देखील देणार नाही. "


" पण... हे सर्व कशासाठी? आणि या सगळ्याची काय गरज आहे? " युग थोडा वैतागून चढ्या आवाजात बोलला. 


" प्लीज युग! फक्त एकदा मला तपासून पाहायचे आहे. मी प्रार्थना करतो की, इथे कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव नसावा. मला माझी खात्री करून घ्यायची आहे. माझी खात्री झाली की मी जाईल लगेच! अगदी एका क्षणाचाही विलंब न करता! " सिद्धपुरुष महाराज म्हणाले. 


" प्लीज युग! ऍटलीस्ट वी शुल्ड चेक इट आऊट! ही डिझर्व्हस् अ चान्स... " संकर्षण म्हणाला. 


" अं! ओके! " ना ना करत युग शेवटी तयार झालाच. 


                म्हणून लगेच त्या सिद्धपुरुष महाराजांनी युग आणि संकर्षणला त्या घरात असतील तेवढे आरसे हॉलमध्ये आणायला सांगितले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दोघांनीही आरसे आणले. सिध्दपुरुष महाराजांनी त्या आरशांची व्यवस्थितरित्या ठिकठिकाणी मांडणी केली. त्याचबरोबर ऐसपैस जागेत जमिनीवर पांढऱ्या रांगोळीने एक यंत्र आखले. रांगोळीनेच सभोवताली विविध मंत्र लिहिले. नंतर त्या यंत्रात हळदी कुंकू वाहिले. 


                 त्यानंतर त्या सिध्दपुरुष महाराजांनी संकर्षणला एक इशारा केला. महाराजांचा इशारा उमजून संकर्षणने खिशात हात घालून रुद्राक्षमाळ बाहेर काढली आणि ती युगला गळ्यात घालायला सांगितली... पण युगने ती रुद्राक्षमाळ गळ्यात घालायला नकार दिला आणि त्याने ती माळ हातातच पकडून ठेवली. युगच्या हट्टाला पाहून सिध्दपुरुष महाराजांनी नकारार्थी मान हलवली पण लगेच त्याच्याकडे दुर्लक्ष केले व लवकरात लवकर धराला तिच्या खोलीतून बाहेर बोलवायला त्यांनी युगला सांगितले. 


                युगने धराला हाक दिली. युगची हाक ऐकताच ती लगेच तिच्या खोलीबाहेर आली पण नजर झुकलेली होती. युगने तिच्याकडे पाहिले तर तिचे डोळे थोडे सुजलेले होते, चेहरादेखील थोडा उतरलेला होता. तिला पाहताच युगने अंदाज बांधला की, जरूर ती तिच्या खोलीत रडत असावी. युगला तिची कीव आली अन् मनातच थोड्या वेळासाठी संकर्षणचाही राग आला. त्याने संकर्षणकडे रागाने पाहिले. संकर्षण मात्र थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत उभा होता.


                 तेवढ्यात धराने तिची झुकलेली नजर वर केली आणि सगळीकडे पाहिले. सर्वत्र आरसे पाहून ती जरा चक्रावली अन् अचानक बेशुद्ध होऊ लागली. युग तिला सावरण्यासाठी व आधार देण्यासाठी तिच्याजवळ जाऊ लागला पण तेवढ्यात त्याची नजर आरशांकडे गेली.


                आरशांकडे पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण आरशात त्याला धराचं प्रतिबिंब दिसतंच नव्हतं. ते दृश्य पाहून युग नखशिखांत घाबरला अन् आपसूकच हळूहळू त्याचा घसा कोरडा पडू लागला. धराच्या दिशेने जाणारी त्याची पावले जागीच थांबली. संकर्षणचेही एव्हाना आरशांकडे लक्ष गेले होते आणि त्यालाही कळले की, युगला धराचे वास्तविक रुप किंवा तिच्या अस्तित्वाची नक्की खबर झालेली आहे म्हणूनच संकर्षण युगला तिच्यापासून दूर व्हायला खुणावत होता. त्याचे इशारे कळताच युग हळूहळू एकेक पाऊल मागे टाकत चालू लागला. 


                 तो तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या पावलांची गती अगदी संथ झाली होती. दुसरीकडे अचानक धराचा चेहरादेखील विद्रूप होऊ लागला. तिचा चेहरा पांढरा फटक दिसत होता. तिने पांढरा सलवार सुट घातला होता पण तिने घातलेला सलवार हा रक्ताने माखलेला होता तसेच तिचे शरीरही अगदी रक्तबंबाळ होते. 


                 तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं. शरीरावर ठिकठिकाणी तडा गेलेल्या होत्या व त्यातूनही रक्त वाहत होतं. तिचे ते रूप पाहून युगला धडकी भरली. तो लाख प्रयत्न करत होता पळण्याचा पण त्याच्या पायात जणू ना बळ होते ना वेग होता... आणि तेवढ्यातच धरा अगदी पापण्यांची उघडझाप करायला जेवढा अवधी लागतो अगदी तेवढ्याच अवधीत युगजवळ गेली व त्याच्या शरीराला काबीज करण्याचा प्रयत्न करू लागली. हे इतक्या जलद गतीने होत होते की, कुणाला काहीच अंदाज लागेना. शिवाय धराला युगवर आरूढ होण्यात नव्वद टक्के यश आले होते तर दुसरीकडे युग जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता तिच्यापासून पिच्छा सोडविण्याचा पण त्याला काही केल्या यश येत नव्हते. 


                  युगची झुंज पाहून संकर्षणही त्याच्या मदतीला पळतच जाऊ लागला पण तेवढ्यात धराने नजरेनेच संकर्षणला भिंतीवर आपटले. 

                

क्रमशः

__________________________________________


©®

सेजल पुंजे.

२२-०८-२०२२.

टीम नागपूर. 




🎭 Series Post

View all