राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कथेचे शीर्षक - आभास की वास्तव?
भाग - १३
युग घड्याळाकडे पाहण्याऐवजी आतून बाहेर येणाऱ्या धराकडे एकटक पाहत राहिला. तिला पाहताच तो जणू वेगळ्याच भावविश्वात रमून गेला होता. त्याच्याही नकळत त्याचा हात त्याच्या हृदयावर गेला. तो त्याच्या हृदयाचे वाढलेले स्पंदन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होता.
तिने अगदी साधाच असा लाल रंगाचा सलवार सुट घातला होता. त्यावर गोल्डन रंगाची ओढणी ओढलेली होती. केस क्लचर लावून मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर काहीच मेकअप केलेला नव्हता. साधारण उंची अन् सडपातळ बांध्याची धरा कमाल दिसत होती. विशेष म्हणजे तिच्या गौर वर्णीय चेहऱ्याच्या हनुवटीलगत असलेले काळे तीळ परत एकदा युगचे लक्ष वेधून गेले. तिला पाहून तो तिच्यात पूर्ण हरवून गेला होता.
युग अगदी बेभान होऊन धराकडे एकटक पाहत असताना ती मात्र शांत मुद्रेत पण हलकेच ओढणीच्या काठाशी चुळबुळ करत नजर चोरून युगचे बारीक निरिक्षण करत होती. त्या दोघांचा नजरेचा खेळ सुरू असतानाच संकर्षण बाहेर आला अन् युगदेखील भानावर आला. युग आणि धरा या दोघांनीही एकमेकांवर स्थिरावलेली नजर नंतर फिरवून घेतली.
संकर्षण येताच ते तिघेही अंगणात असलेल्या जिप्सीजवळ गेले. जिप्सीजवळ पोहोचताच त्यांना दिसले की, जिप्सीच्या आरशांना तडा गेलाय. तसेच त्या भेगांमुळे आरशातून काहीच नीट दिसत नसून सगळं धुसर दिसतंय. जिप्सीची ही अवस्था बघून संकर्षण आणि युग दोघेही अगदी आश्चर्यचकित झाले होते. ते गोंधळून आळीपाळीने जिप्सीकडे व धराकडे पाहत होते. कदाचित नजरेनेच जिप्सीच्या अवस्थेबद्दल धराला विचारत असावे. त्यावर धरा त्या दोघांची समजूत काढत बोलली की, कदाचित जिप्सीची ही अवस्था त्यारात्री आलेल्या वादळामुळे झाली असावी.
धराने दिलेल्या उत्तराने युग आणि संकर्षण समाधानी नसले तरीही त्या दोघांनी परत प्रश्न विचारला नाही अन् म्हणून ते तिघेही पायदळच तिथल्या तळ्यावर पोहायला गेले. तळ्यावर पोहोचताच सबंध परिसराला अन् तेथील मोकळ्या वातावरणाला ते दोघे मन भरून पाहत होते. तेथील हिरवाई पाहून ते अगदी उल्हासित झाले होते. शिवाय तळ्यातील पाण्याचा संथ प्रवाह पाहून त्यांना शांत वाटत होतं. काही वेळाने दोघेही तळ्यात शिरून मस्त पोहण्याचा आस्वाद घेऊ लागले. लहान मुलांसारखे एकमेकांच्या खोड्या करत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते.
धरा मात्र त्या दोघांना हसताना आणि इंजॉय करताना पाहत होती. तळ्याच्या एका काठावर बसून सभोवतालच्या परिसराचा आस्वाद घेत होती पण तिच्या डोळ्यात ओलावा होता आणि हे युगच्या नजरेतून सुटले नाही. त्याला वाटले की, कदाचित तिला तिचा भूतकाळ वा तिच्या पतीसोबत घालवलेले क्षण आठवले असावे. तो तिला पाहत असतानाच तिनेही त्याच्याकडे पाहिले. दोघांची परत नजरानजर झाली व दोघांनी परत एकमेकांशी नजर मिळताच नजरेची टाळाटाळ केली.
थोड्या वेळाने युगला एक कॉल आला म्हणून तो तळ्याबाहेर जाऊन कॉलवर बोलू लागला. धरा तिथेच बसून होती पण कुठल्याशा विचारात मग्न होती. संकर्षण मात्र अद्याप त्या तळ्यात इंजॉय करत होता पण अचानक त्या तळ्यातलं पाणी एखाद्या डोहाप्रमाणे त्याला आत ओढून घेऊ लागलं. तो पुरेपूर प्रयत्न करत होता बाहेर निघण्याचा पण त्याचा त्या प्रवाहापुढे निभाव लागत नव्हता आणि तो क्षणाक्षणाला आणखी आत बुडत होता. त्याने त्याच्यातले होते नव्हते तेवढे आत्मबळ एकवटून हातपाय चालविले पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. तो बचावासाठी हातपाय पाण्यात आपटत होता. धरा आणि युगला मदतीची हाक मारण्याचा प्रयत्न करत होता पण त्यातही यश येत नव्हतं. शेवटी त्याने हार मानली नि डोळे मिटून घेतले. तेवढ्यात युगने संकर्षणच्या दोन्ही दंडांना घट्ट पकडून त्याला तळ्यातल्या पाण्यात नीट उभं केलं.
संकर्षणने डोळे उघडले. त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याला ठसका लागला होता म्हणून तो बराच वेळ खोकलत होता. त्यानंतर त्याने युगला घट्ट मिठी मारली. नंतर मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला. संकर्षणच्या अशा वागण्याबद्दल युगने त्याला काय झाले, म्हणून विचारले. त्यावर संकर्षणने घडलेला प्रकार सांगितला.
त्यावर युग म्हणाला, " अरे वेड्या... संक्या... तूच तर स्वतःला मुद्दाम बुडवून घेतलंस ना! स्वतःची पाण्यात श्वास रोखून धरण्याची कुवत जाणून घेण्यासाठी! पण पठ्ठ्या पाच मिनिट काय, साधे पाच सेकंद तू श्वास रोखू शकला नाहीस... तू फक्त गोष्टीच मोठमोठ्या कर! प्रत्यक्षात तुझं काही खरं नाही. " असे बोलून युग त्याच्यावर हसू लागला आणि सोबतीला धराही हसत होती.
युगचे शब्द ऐकून संकर्षण मात्र विचारात पडला. तो आणखीच घाबरला पण तो काही बोलला नाही. फक्त तळ्यातून लगेच बाहेर आला आणि घरी जाण्यासाठी युग व धराला फोर्स करू लागला. युगला थोडं आणखी इंजॉय करायचं होतं पण त्याने संकर्षणचा शब्द टाळला नाही. म्हणूनच तिघेही घरी जायला निघाले.
संकर्षण असंख्य विचारांच्या चक्रीवादळात गुंतला होता तर युग आणि धरा मुळातच शांत स्वभावाचे असल्याने घरी जाताना वाटेत कुणीच काही बोलले नाही. ते तिघेही त्या घराजवळ म्हणजे ज्या प्रशस्त वाड्यात ते राहात होते, त्या वाड्यानजीक पोहोचताच एका पंडिताने त्यांचा मार्ग अडवला व त्याने संकर्षण आणि युगला सावधानतेचा इशारा दिला.
तो पंडित म्हणाला, " निघून जा! जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर निघून जा! तुम्ही येथे येऊन चूक केलीत. जिच्यासोबत तुम्ही ओळख निर्माण केलीये तीच तुमचा जीव घेईल... म्हणून तिच्या पाशातून स्वतःची सुटका करून घ्या! साधीभोळी दिसत असली तरी ती प्रतिशोधाच्या दाहात कित्येक वर्षे होरपळतेय. आधीच खूप उशीर झालाय आणखी उशीर करू नका. निघून जा येथून... निघून जा! "
पंडिताची ती गोष्ट ऐकून संकर्षणला धास्तीच भरली. तो थरथरतच म्हणाला, " महाराज! हे काय बोलत आहात तुम्ही? आणि कुणाबद्दल बोलत आहात? "
" हिच्याबद्दल बोलतोय मी! ही एक अतृप्त आत्मा आहे... तिला फक्त सूड घ्यायचा आहे. फक्त आणि फक्त सूड! दूर राहा तिच्यापासून! " पंडित म्हणाला.
पंडिताने धराबद्दल खुलासा करताच संकर्षण अवाक् झाला. त्याने भेदरलेल्या नजरेने एकदा धराकडे तर एकदा पंडिताकडे पाहिले. त्याला काय बोलावे तेच सुचेना. दुसरीकडे युग मात्र पंडिताने दिलेल्या माहितीवर खूप चिडला आणि त्याने तावातावाने पंडिताला तेथून जाण्याचा सल्ला दिला.
संकर्षणने मात्र त्या पंडिताला अडवून धरले होते. हे पाहताच युग संकर्षणवरही चिडला. तो चिडूनच म्हणाला, " व्हॉट इज दिस नॉन्सेन्स? संक्या! अशा भंपक आणि अंधश्रद्धेच्या गोष्टींवर तू विश्वास तरी कसा ठेवू शकतोस? हा कोण कुठला व्यक्ती कुणाबद्दलही काही सांगेल आणि तू ऐकून घेशील? विसरू नकोस ज्या व्यक्तीबद्दल हा तथाकथित अवलिया वाईटसाईट बोलतोय ना, ती तीच व्यक्ती आहे, जिने आपण अडचणीत असताना आपल्याला मदत केली होती. ज्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवला त्याच्याशीच दगा करायचा आहे का तुला? तसं असेल तर तू खुशाल कर पण मी तुझं समर्थन करणार नाही. या पंडिताने सांगितलं म्हणून मी धरावर अविश्वास दाखवून पळवाट काढणार नाही. "
" युग... " संकर्षण अर्धवटच बोलला.
" आणि काय रे? धराचं आपल्याशी काय वैर आहे? ती का म्हणून आपल्याला मारून स्वतःच्या प्रतिशोधाची क्षुधा भागवून घेईल? हे अशी फालतुगिरी करायला धराला वेड लागलंय का? बरं... असो! जर समजा ती सूड घेत असेलही तर काय? जर मला मारून तिचा प्रतिशोध मिटणार असेल तर तिच्या हातून मरायला मी मागेपुढे पाहणार नाही. सो! तथाकथित द ग्रेट पंडित यांच्याबरोबर तुला जायचं असेल तर जा! पण मी इथेच थांबणार! " एवढे बोलून युग अगदी तडकाफडकी तेथून निघाला आणि घराचं फाटक उघडून आत गेला.
युगच्याच मागोमाग धराही गेली पण जाताना एक जळजळीत कटाक्ष तिने त्या पंडितावर टाकला. तिच्याकडे पाहताच तो पंडित एक क्षण स्तब्ध झाला आणि दुसऱ्याच क्षणी त्याला दरदरून घाम फुटला. तो तेथून घाबरून पळत जाऊ लागला. तेवढ्यात संकर्षणने त्या पंडिताला थांबविले आणि त्या घरात काय वाईट आहे, त्याची चौकशी केली. शिवाय धराबद्दलही चौकशी केली.
क्रमशः
_________________________________________
©®
सेजल पुंजे.
१७-०८-२०२२.
टीम नागपूर.