Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? (भाग - १२)

Read Later
आभास की वास्तव? (भाग - १२)

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - १२


                धराचा निर्विकार चेहरा पाहता युग आणि संकर्षणला धराने सांगितलेला तिचा भूतकाळ आठवला. त्यांना तिच्या बोलण्याचा अर्थ उमजून गेला म्हणून ते दोघेही परत कुठलेही प्रश्न न विचारता निमूट मंदिरात गेले. संकर्षण आणि युग मंदिरातून बाहेर येईपर्यंत धरा मंदिरातील मूर्तीकडे जळजळीत कटाक्षाने पाहत मंदिराबाहेर उभी होती. साधारण पाच मिनिटांनंतर ते दोघेही दर्शन घेऊन बाहेर आले.


                मग परत ते तिघे घरी परत आले. घरी आल्यावर धराने स्वयंपाक केला व त्यानंतर तिघांनीही दुपारचं जेवण आटोपून थोडी वामकुक्षी घेतली. सायंकाळी सहाच्या दरम्यान युगला जाग आली. तो फ्रेश होऊन व त्याची खोली आवरून बाहेर गेला. 


                बाहेर येताच त्याला व्हरांड्यातील झोपाळ्यावर हातात डायरी घेऊन धरा बसलेली दिसली. तिने डोळे मिटलेले होते पण तिचा हात त्या बंद डायरीवर होता. युग जवळजवळ दोन मिनिटे तिच्याकडे एकटक पाहत होता पण अचानक त्याची नजर तिच्या हनुवटीलगत असलेल्या काळ्या तीळकडे गेली. त्याचा हात त्याच्याही नकळत तिच्या चेहऱ्याकडे वळू लागला. तो तिच्या गालाला स्पर्श करणारच होता पण तेवढ्यात धराने डोळे उघडले. दोघांच्याही नकळत त्यांच्या हृदयाचे स्पंदन वाढले होते. स्वतःच्या एवढे नजीक युगला पाहून ती दचकून झोपाळ्यावरच मागे सरकली. युगही स्वतःच्या वेडेपणावर ओशाळून हॉलमध्ये तडकाफडकी निघून गेला. 


                काही वेळाने संकर्षणला जाग आली. तो त्याचं आवरून युगशेजारी येऊन बसला. अंबरवाडीत आल्यापासून युग बऱ्याच अंशी पूर्वीसारखाच मूळ रुपात वावरत होता त्यामुळे संकर्षणला अंबरवाडीत भटकंती करायला आल्याचे समाधान वाटले. बराच वेळ ते दोघे गप्पा मारत बसले होते. काही वेळ संकर्षणने डॉ. शुभम माने यांना फोन करून युगच्या तब्येतीत झालेल्या सुधारणेचीही खबर दिली. ते ऐकून डॉ. शुभम माने यांना बरे वाटले. युगही त्यांच्याशी बोलला. डॉ. शुभम सोबत कॉलवर बोलताना त्याच्या आवाजात कमालीची मृदुता होती, हे डॉ. शुभम मानेलाही जाणवले. तरीही कॉल ठेवण्याआधी त्यांनी थोडे इन्स्ट्रक्शन्स दिले. कॉल ठेवल्यानंतर संकर्षण आणि युग हे दोघेही परत थोडे गप्पा करत बसले. 


                  दुसरीकडे सायंकाळची वेळ होताच धराने स्वयंपाक आटोपून घेतला. नंतर तिघांनीही जेवून घेतले आणि नित्यनेमाने तिघेही झोपी गेले. त्या रात्रीही परत घशात कोरड पडल्याने एकाएकी संकर्षणला जाग आली. त्याने उठून एकदा घड्याळाकडे पाहिलं तर एक वाजला होता. त्याने जांभई देत थोडा आळस दिला. नंतर पाणी पिऊन झाल्यावर तो बेडवर आडवा झाला व घड्याळाकडे एकटक पाहू लागला. 


                बराच वेळ झाला तरी त्याला घड्याळातले काटे हलताना दिसलेच नाही. त्याने बाजूलाच असलेल्या त्याच्या मोबाईलमध्ये बघितलं तर मोबाईलमध्येही अद्याप एकच वाजून होता. त्याला वाटलं की, त्याचा मोबाईल हॅंग झाला असावा म्हणून त्याने युगचा मोबाईल चेक केला. युगच्या मोबाईलमध्येही एकच वाजून होता. आता त्याला काही कळेनासे झाले. हळूहळू तो घामाघूम होऊ लागला. युगला उठवावेसे वाटत असूनही संकर्षणने त्याला उठविले नाही कारण युग अगदी शांत झोपला होता; म्हणून थोडे घाबरून पण मोठ्या निर्धाराने संकर्षण स्वतःच बेडवरून उठून उभा राहिला व सावकाश खोलीबाहेर जाऊ लागला. 

        

                खोलीबाहेर येताच त्याने चौफेर नजर फिरवली तर त्यारात्री अचानक त्याला घराच्या मांडणीत बदल जाणवला. त्या वाड्याला एकच मजला होता पण त्यारात्री जेव्हा संकर्षण खोलीबाहेर आला तर तो दुसऱ्या माळ्यावर उभा असल्याचे त्याला जाणवले. त्याने भीतीने एक आवंढा गिळला अन् तो हळूहळू घाबरतच जिना उतरू लागला पण अचानक कुणीतरी त्याचा पाय खेचला आणि तो घसरून खाली आपटल्या गेला. 


                संकर्षण अगदीच कमरेच्या भारावर आपटला गेला होता म्हणून कमर चोळतच तो उठण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यातच छपरावर लोंबकळणारं काचेचं झुंबर आपोआप एकाएकी तुटून त्याच्या अंगावर पडलं. संकर्षणला बऱ्याच जखमा झाल्या होत्या म्हणून कण्हतच तो सगळीकडे पाहू लागला तर त्याला सर्वत्र काचा पसरलेल्या दिसल्या व तो स्वतः अगदी रक्तबंबाळ झाला असल्याचे त्याला कळले. त्याने स्वतःच्या रक्ताळलेल्या शरीराकडे, शरीरावरील जखमांकडे अगदी भीतीने नजर फिरवली. त्याला गहिवरून आले आणि त्याने टाहो फोडला पण तेवढ्यात संकर्षण घामेजून स्वप्नातून जागा झाला. 


                जाग येताच संकर्षण अगदी मोठमोठ्याने धापा टाकू लागला. तेवढ्यात त्याची नजर त्याच्याच बाजूला झोपून असलेल्या युगकडे गेली. युगला पाहताच संकर्षण त्याचे वाढलेले श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागला, जेणेकरून संकर्षणला असे अस्वस्थ पाहून युग काळजीत पडू नये... पण तेवढ्यात युगने डोळे उघडले.

           

                संकर्षणही युगच्या डोळ्यात पाहत होता पण त्याला युगचे बुबुळ दिसतच नव्हते. फक्त पांढरा द्रव पूर्ण डोळ्यात पसरलेला दिसत होता. युगला असे पाहून संकर्षण खूप जास्त हादरला पण प्रसंगावधान साधून स्वतःचा बचाव करण्याच्या हेतूने तो तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता... पण युगचे हात अचानक लांब झाले. युगच्या त्या लांबलचक हातांनी खोलीचा दरवाजा उघडणाऱ्या संकर्षणला करकचून पकडून घेतले. संकर्षण तरीही स्वतःची सुटका करू पाहत होता. तो जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण काही केल्या त्याच्या कंठातून आवाज निघेना.


                सरतेशेवटी आता जे होईल ते होईल हा विचार करून त्याने घट्ट डोळे मिटून घेतले. तेवढ्यात त्याच्या कानात पुसटसा आवाज ऐकू येऊ लागला. त्याने आवाज नीट ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याला युगची हाक ऐकू येऊ लागली. 


                युगची हाक तीनवेळा कानावर पडल्यावर संकर्षणने डोळे किलकिले करून उघडले. डोळे उघडताच त्याला युग दिसला. विशेषतः त्याचा चेहरा आता संकर्षणला नॉर्मल दिसला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर सकाळ झाली असल्याचे कळले. त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि अलगद युगला घट्ट मिठी मारली. एव्हाना युगलाही कळून चुकले होते की, नक्कीच संकर्षणने वाईट स्वप्न बघितले असावे. म्हणूनच युग बराच वेळ संकर्षणचं सांत्वन करत राहिला. त्यानंतर संकर्षणला थोडं बरं वाटायला लागताच तो न्हाणीघरात त्याचं आवरायला निघून गेला. संकर्षण न्हाणीघरातून बाहेर येताच युगही फ्रेश व्हायला गेला.


                संकर्षण खोलीतून बाहेर येऊन अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ बसला होता. त्याच्या डोक्यात असंख्य विचार सुरू होते. तेवढ्यात मागून युग आला आणि त्याने संकर्षणच्या खांद्यावर हात ठेवला. एकाएकी खांद्यावर भार जाणवताच संकर्षण दचकून मागे सरकला. संकर्षणची अशी प्रतिक्रिया बघून युगने त्याची विचारपूस केली. तेव्हा संकर्षणने त्याला दोन दिवसांपासून आलेले अनुभव तसेच स्वप्नांबद्दलही सांगितले. 


                ते सर्व ऐकून युग जरा शांत झाला अन् जेव्हा बोलला तेव्हा अगदी संकर्षणच्या अपेक्षेविपरित व संकर्षणला आलेल्या अनुभवांविपरित बोलला. युग बोलला की, त्याला तिथे कुठलेच भास वा स्वप्न पडत नाहीत. त्याउलट शांत झोप येत असते. युग जे बोलला त्याबाबत संकर्षणने थोडा विचार केला. त्याला वाटले की, कदाचित युगबद्दल अतिविचार केल्याने त्याला हे भास होत असावे. तरीही त्याने डॉ. शुभम मानेला कॉल करून दिसलेले स्वप्न व भास यांची माहिती दिली. त्यांनीही हेच म्हटले की, अति विचार आणि अति ताणामुळे होत असावे. कॉलवर बोलून होताच त्याने सारे विचार झटकून दिले व व्हरांड्यात बसून राहिला. नंतर धराने नाश्ता आणि चहा बनविला. ते तिघेही नाश्ता करू लागले. 

 

                नाश्ता करतानाच त्यांनी नजीकच्या तळ्याकडे फिरण्याचा बेत आखला. एरवी नकार देणारी धरा त्यादिवशी मात्र आढेवेढे न घेता सहज तयार झाली. कदाचित तिलाही त्या दोघांचा सहवास बरा वाटत असावा, असा साधारण अंदाज संकर्षण आणि युगने बांधला. तिच्यातला हा बदल पाहून दोघेही सुखावले होते. थोड्या वेळाने नाश्ता करून तिघेही त्यांच्या खोलीत आवरायला गेले. 


                काही वेळातच युग बाहेर आला. त्याने पिवळ्या रंगाचे फुल स्लिव्ह्स टी- शर्ट आणि बर्मुडा घातला होता. केस थोडे सेट केले होते आणि पर्फ्युम लावला होता. तो अगदी तयारीनिशी व्हरांड्यात उभा राहून संकर्षण व धराची वाट बघत होता. बराच वेळ झाला धरा किंवा संकर्षणपैकी कुणीच कसे आले नाही, हा विचार करत युगने त्याच्या घड्याळाकडे पाहायला नजर वळवली आणि तेवढ्यातच त्याला आतून धरा येताना दिसली.


क्रमशः

_________________________________________


©®

सेजल पुंजे. 

१६-०८-२०२२.

टीम नागपूर. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//