आभास की वास्तव? (भाग - ११)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा.. सत्य व असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

आभास की वास्तव? 

भाग - ११


                दुसऱ्या दिवशी जरा उशिराच संकर्षणला जाग आली. तो आवरून बाहेर आला तर त्याला युग व्हरांड्यात शांत मुद्रेत बसलेला दिसला. धरा मात्र माजघरात नाश्ता आणि चहाची व्यवस्था करताना दिसली. लगेच युगच्या शेजारी संकर्षण येऊन बसला आणि त्याने युगची विचारपूस करायचा मनोमन विचार केला. 


" युग, तुला इथे कसं वाटतंय रे? " संकर्षण म्हणाला.


" थोडं बरं वाटतंय! डॉ. शुभमने दिलेल्या औषधी घेतल्यामुळे अशक्तपणा देखील जाणवत नाहीये. शिवाय येथील वातावरणही भारी आहे. सभोवताली ही फुलझाडे असल्याने फुलांचा सुगंध डोकं आणि मन दोन्हीही शांत करतो. सकाळी सकाळी जाग आल्यावर जेव्हा अंगणात आलो तेव्हा इथल्या मोकळ्या वातावरणात श्वास घेतानाही अगदी छान वाटत होतं. थोडक्यात, इथले वातावरण भावतंय मला! " युग मंद हसून म्हणाला. 


युगचे समाधानकारक उत्तर ऐकून संकर्षणलाही बरे वाटले, त्याच्या ओठांवरही आपोआप हसू पसरले. तेवढ्यात युग संकर्षणची छेड काढत म्हणाला, " ह्म्म! संक्या मला जसे तू विचारलेस तसे तुला मी इथल्या वातावरणाबद्दल काही विचारावे एवढी माझी बिशाद नाहीच कारण तू तर इथे येऊन जामच खूश आहेस. " 


" का रे? असे का बरं म्हणालास? " संकर्षण न कळून बोलला. 


" इथे बरीच हिरवळ आहे ना म्हणून! " युग गालातल्या गालात हसत म्हणाला व त्याने माजघरातून बाहेर व्हरांड्यात येणाऱ्या धराकडे पाहून नजरेनेच संकर्षणला इशारा केला. 


                पुढे संकर्षण समजायचे ते समजून गेला व लगेच ओशाळला पण अचानक त्याला रात्री झालेला भास आठवला. तो परत थोडा वरमला. क्षणात त्याचा ओशाळलेला चेहरा थोडा गंभीर झाला. तोपर्यंत तिथे धरा देखील आली होती. तिने दोघांनाही नाश्ता आणि चहा प्यायला आत बोलावले. ते दोघे तिच्या मागोमाग गेले. 


                तिघांनी नाश्ता आणि चहा उरकून घेतला. त्यानंतर धराने सगळे आवरून घेतले. तिघेही निवांत बसलेले असतानाच संकर्षणने गावाची भटकंती करण्याचा बेत रचला. युगनेही संकर्षणच्या बेताला हिरवा दिवा दाखविला. त्यानंतर संकर्षणने धराला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली पण ती सातत्याने नकार देत होती. 


धरा ऐकायला तयारच नव्हती म्हणून संकर्षण काकुळतीने म्हणाला, " मिस. धरा, प्लीज आमच्या सोबत चला ना! ऍक्च्युअली आम्ही या गावात नवखे आहोत. दुसरे असे की, तुम्ही याच गावाच्या रहिवासी आहात म्हणून इथल्या प्रत्येक ठिकाणांची चोख माहिती तुमच्याकडे असणार. जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर आम्हाला काही अडचण जाणार नाही. तुमच्याविना आम्ही इथे हरवलो तर? म्हणून प्लीज आमच्यासोबत या ना! तुमच्यामुळे आम्हाला येथील ठिकठिकाणची अगदी नीट माहिती मिळेल. सो प्लीज! " 


" तुम्ही हरवणार नाहीत. एवढे दिशाभूल करणारे महामार्ग नाही इकडे. फक्त साधी आडवळणाची पायवाट आहे. " धरा मंद हसून बोलली. 


" पण प्लीज, चला ना! तेवढीच आम्हाला तुमची कंपनी मिळेल आणि येथील प्रत्येक ठिकाणांची माहिती सहज मिळेल. हो ना युग? " संकर्षण म्हणाला. 


संकर्षण नजरेनेच युगला इशारा करत होता. संकर्षणचा इशारा कळताच युगने मनोमन कपाळावर हात मारून घेतला पण त्यालाही वाटत होते की, धराने त्यांच्यासोबत यावे म्हणून त्यानेही संकर्षणला दुजोरा दिला व म्हणाला, " ह्म्म, संकर्षण बरोबर बोलतोय. तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत! प्लीज! "


                आधी फक्त संकर्षण फोर्स करत होता पण नंतर युगनेही येण्यासाठी विनंती केली. आता त्या दोघांना नकार देणे तिला योग्य वाटले नाही म्हणून तिने होकार दिला. त्यानंतर ती तिच्या खोलीत आवरायला गेली असताना युग हाताची घडी घालून संकर्षणकडे एक भुवई उंचावून बघत होता. 


संकर्षणने युगकडे पाहूनही न पाहिल्यासारखे केले पण युग तरीही एकटक बघत होता. त्यामुळे संकर्षणने युगला काय म्हणून विचारले तेव्हा युग म्हणाला, " काय गरज होती एवढा फोर्स करण्याची? " 


" अरे तर त्यात काय एवढं? आपल्याला सोबत व्हावी म्हणून मी रिक्वेस्ट केली ना... " संकर्षण भोळा चेहरा करत म्हणाला. 


" ए गप हा! मला माहीत आहे तुला किती सोबत हवी होती तर... तू तिला सोबत घेतलंस कारण तुला तिच्यासोबत वेळ घालवायचा होता. त्यासाठीच तू सगळा खटाटोप केलास आणि त्यात मलाही सामील करून घेतलंस. " युग तक्रारीच्या सुरात बोलला. 


" ह्म्म, सो व्हॉट? माझ्यासाठी तू एवढं करूच शकतोस ना. आफ्टरऑल मीच तुझा आता एकमेव बालपणीचा जिवलग मित्र आहे. " संकर्षण हसून म्हणाला पण त्याने लगेच जीभ चावली. 


एकमेव बालपणीचा जिवलग मित्र हे शब्द युगच्या मनात खोलवर रुतले होते आणि हे संकर्षणलाही कळून गेले. थोडा वेळ तिथे वातावरण शांत झाले होते पण युगनेच संकर्षणने बोललेले शब्द दुर्लक्षित करून ती शांतता भंग केली व तो उगाच थोडा कुरकुर करत म्हणाला, " गप ए! " 


" सो स्वीट! तुला माहीत आहे युग तुझ्या नाकावर ना हल्ली राग खूप शोभून दिसतो. " संकर्षणही वातावरण हलके करण्यासाठी दात काढून बोलला. त्यावर युगने नकारार्थी मान हलवली. 


                काही वेळानंतर धरा बाहेर आली मग तिघेही घराबाहेर पडले. गावातील लोकसंख्या बरीच कमी होती, हे त्या तिघांनाही माहिती होते पण तरी वाटेत किंवा सभोवताली साधा एक व्यक्तीसुद्धा दिसत नव्हता. सबंध इलाखा अगदी सामसूम होता. हे जरा त्या दोघांना थोडे शंकास्पदच वाटले म्हणून मनातील शंका दूर करण्यासाठी संकर्षणने धराला त्याबद्दल विचारणा केली. त्यावर धराने सांगितले की, गावातील बहुतांश लोक दहा ते अकराच्या सुमारास शेतमळ्याच्या डोंगरभागात जातात. कदाचित म्हणून सगळीकडे एवढा शुकशुकाट असावा. धराने दिलेले उत्तर ऐकताच संकर्षण व युग यांची शंका दूर झाली. नंतर दोघांपैकी कुणीच काही विचारपूस केली नाही. 


                ते असेच पायी पायी जात होते. वेगवेगळ्या शेतमळ्यांची माहिती धरा त्या दोघांना सांगत होती. केळीच्या बागा दुरून दाखवत होती. सगळी माहिती पुरवत असतानाच वाटेत चालताना त्यांना चिंचेचे भलेमोठे झाड दिसले. त्या ठिकाणी ते तिघे विसावा घेण्यासाठी सावलीत बसले होते. काही वेळानंतर धराने दगड घेऊन चिंचेच्या झाडावर निशाणा साधून दगड मारला. क्षणात काही चिंचा खाली पडल्या. तिने काही चिंचा स्वतःकडे ठेवल्या तर काही चिंचा युग आणि संकर्षणला दिल्या. त्या चिंचा खात खात ते तिघेही वाटेने जात असताना त्यांना आंब्याचे झाड दिसले. त्या आंब्याच्या झाडाला बरेच आंबे लागले होते. धराला ते आंबे खायची इच्छा झाली म्हणून ती दगड मारून आंबे जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करत होती पण यश मिळत नव्हते. 


                संकर्षणने स्वतः छाती ठोकून पुढाकार तर घेतला पण त्यालाही जमले नाही. शेवटी युगने काही आंबे पाडले. नंतर त्या झाडाखालीच बसून त्यांनी ते आंबे खाल्ले. थोडा वेळ तिथेही त्यांनी थोडी विश्रांती घेतली.


                नंतर पुढे गेल्यावर वाटेत त्यांना एक महादेवाचे मंदिर दिसले. त्या मंदिराबद्दलही धराने बरीच माहिती त्या दोघांना सांगितली. त्या मंदिराची महती ऐकून ते दोघे दर्शन घेण्यासाठी आत जाऊ लागले पण धराने देवदर्शन करणे टाळले. 


देवदर्शन करण्यास नकार दिल्याबाबत संकर्षणने तिला विचारणा केली त्यावर ती म्हणाली, " त्या देवाने सगळंच तर हिरावून घेतलं माझं! आता कुणासाठी आणि काय मागावे मी त्याला? जेव्हा लाख विनवण्या केल्या तेव्हा तर ऐकले नाही माझे... आधी हाताची ओंजळ पसरूनही या तथाकथित देवाने माझी याचना ऐकून घेतली नाही तर आता का म्हणून मी यांच्यापुढे हात जोडू? आता तो माझ्यासाठी केवळ एक दगड आहे फक्त एक दगड... 


                लहानपणापासून माझं भलं - वाईट मी फक्त या पाषाणाला सांगायची पण त्याने काय केलं? शेवटी पाठ फिरवली... आधी त्याच्या आणि माझ्यामध्ये सौख्य होतं पण आता बरंच काही बिनसलंय. या पाषाणाचं तोंड पाहणार नाही अशी मी शपथ घेतली आहे आणि ती शपथ सहजासहजी तुटण्यासारखी नाही. म्हणून तुम्ही दोघे जा, घाला साकडे त्याच्यापुढे! कदाचित तुमची इच्छा तरी तो पूर्ण करेल, अशी अपेक्षा करते. " 


                 धरा शून्यात नजर घालून उभी होती. दुसरीकडे युग आणि संकर्षण मात्र सुन्न होऊन आळीपाळीने तिच्याकडे पाहत होते. 

क्रमशः

__________________________________


©®

सेजल पुंजे.

१५-०८-२०२२.

टीम नागपूर. 


🎭 Series Post

View all