आभास की वास्तव? (भाग - १०)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा सत्य आणि असत्याचा शोध घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव?

भाग - १०


संकर्षण लागोपाठ प्रश्न विचारत असताना त्याला मध्येच थांबवून ती तरुणी म्हणाली, " मी आधी याच गावात राहत होते. माझे स्वतःचे घरही होते. मी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याने सगळ्यांच्या द्वेषाला बळी ठरली. कालांतराने सगळं ठीक होईल असे वाटत असतानाच माझ्या पतीचे अपघाती निधन झाले. माझ्या आईवडिलांना माझी कीव आली व त्यांनी मला परत माहेरी नेले पण सहा महिन्याच्या आत त्यांचेही निधन झाले. त्यांचा मृत्यू माझ्या पायगुणाने झाला असे बोलून व माझ्यावर नानाविध आरोप करून चुलत भावंडांनी माझ्याकडून माझी संपत्ती हिरावून घेतली व मला बेघर केले. 


                माझ्याकडे राहण्याची व्यवस्था नव्हती. हे घर पडीक आहे, हे ठाऊक असल्याने मी तेव्हापासून इथेच राहतेय. मी इथेच राहत असल्याची खबर कोणत्याच गावकऱ्याला नाही कारण ह्या परिसरात सहसा कुणी फिरकत नाही. त्यामुळे जर कुणाला माहीत पडले की, मी इथे राहते तर नक्कीच मला गावाबाहेर काढण्यात येईल. म्हणून प्लिज, येथून बाहेर पडल्यावर कुणालाही माझ्याबद्दल काहीच सांगू नका. " ती विनवणी करत होती. 


                त्या दोघांनीही तिच्याकडे पाहिले. भूतकाळ आठवून तिच्या डोळ्यात लगेच पाणी दाटले होते पण तिने एक थेंबही बाहेर पडू दिला नाही. तिचा भूतकाळ ऐकून ते दोघेही सुन्न झाले होते. संकर्षणला तिच्याप्रती सहानुभूती वाटत होती. युग मात्र संकटांना सामोरे जाण्याचे तिचे कौशल्य पाहून भारावून गेला होता.


                युग तिचे सावकाश निरिक्षण करत होता अन् संकर्षण तिच्याशी बोलत होता. त्याने थोडे अवघडूनच परत एकदा त्यांची मुक्कामाची अडचण सांगितली व काही दिवसांकरिता त्या ठिकाणी राहण्याची परवानगी मागितली. त्या तरुणीने सहज परवानगी दिली कारण नकार द्यायला तिच्याकडे त्या घराची ना मालकी होती ना तिला तो अधिकार होता. म्हणून काहीही न बोलता ती घराच्या आत जायला वळली. एव्हाना पावसाची रीपरीपही सुरू झाली होती. 


                पावसाचा वाढता रोष पाहता तिने लगेच त्या दोघांना घराच्या आत बोलावले. ते दोघे तिच्या मागोमाग घरात शिरले. नंतर तिने त्या दोघांना वेगवेगळ्या रुम राहायला दिल्या पण त्या दोघांनीही एकच खोली पुरेशी असल्याचे सांगितले. त्यानंतर ती तिच्या पैंजणांचा रुणझुण आवाज करत तिच्या खोलीत जात असताना संकर्षणने तिला मागून हाक मारली व तिचे नाव विचारले. तिने तिचे नाव 'धरा' सांगितले. 


त्यानंतर ती जेवणाची सोय करण्यासाठी माजघरात जात होती तेव्हा परत संकर्षणने तिला हाक मारली. तिने मागे वळून पाहताच तो म्हणाला, " मिस. धरा, आमची मदत केल्याबद्दल खूप खूप आभार आणि काळजी करू नका. आम्ही कुणालाच सांगणार नाही की, तुम्ही या घरात राहत आहात. " 


                संकर्षणने दिलेल्या आश्वासनावर धरा फक्त मंद हसली व माजघरात गेली. दुसरीकडे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून संकर्षण मनोमन तिच्या सौंदर्याचं कौतुक करू लागला पण तिच्या भूतकाळाबद्दल जाणून घेतल्यावर तो थोडा उदास झाला होता. त्याला धरासाठी खूप वाईट वाटत होते. संकर्षण तिचाच विचार करत असताना तो धराकडे एकटक पाहत असल्याचे युगला दिसले. युग ते पाहून अलगद गालातल्या गालात हसला. 


" काय बघत आहात महाशय त्या मुलीकडे? " युगने ओठातलं हसू दाबत एक भुवई उंचावून संकर्षणला विचारले. 


" कुठे काय... काहीच तर नाही. ते मी सहज... हे घर भारी आहे ना! " संकर्षण ततपप करू लागला. 


" ह्म्म! घर तर भारी आहेच पण घरात राहणारीही काही कमी नाही, हो ना? " युग मिश्किल हसून बोलला. 


" हो ना! " संकर्षण त्याच्या नकळत ओशाळून बोलून गेला पण त्याच्या बोलण्यावर युग हसू लागला व त्याची लागोपाठ छेड काढू लागला. 


                संकर्षणनेही लगेच कबूल केले की, तो धराला पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडला होता. खरंतर, युगची अवस्था काही वेगळी नव्हती पण त्याला धराकडे पाहून एक अनामिक हुरहुर अन् आपलेपणाची भावना जाणवायची आणि ते आकर्षणापलिकडे होतं. 


              धराच्या सौंदर्यापुढे युग निःसंशय नमला होताच पण तिचा भूतकाळ वगैरे ऐकता त्याला तिच्याबद्दल जाणून घेण्याची अनामिक अशी ओढ निर्माण झाली होती... पण युगने हे संकर्षणला सांगणे टाळले व संकर्षणचे ओशाळणे अन् लाजणे वगैरे पाहून युगने संकर्षणला धराशी आणखी ओळख वाढवण्याचा सल्ला दिला. 


                लव्ह ऍट फर्स्ट साईटचा शिकार झालेल्या संकर्षणलाही युगचे म्हणणे पटले. म्हणून लगेच खोलीत जाऊन थोडा फ्रेश होऊन तो माजघरात गेला व धराबरोबर निरंतर बडबड करू लागला. युग हॉलमधून त्याची गंमत बघत होता. तेवढ्यात संकर्षण माजघराबाहेर आला कारण मुळात धरा शांत स्वभावाची असल्याने संकर्षणशी ती काही बोलतच नव्हती. 

        

                काही वेळानंतर जेवण बनवून झाल्यानंतर तिघांनीही जेवण केले व तिघेही झोपायला गेले. औषध घेताच युग झोपला. संकर्षण तर खोलीत येताच बेडवर पडून क्षणार्धात झोपेच्या स्वाधीन झाला होता पण मध्यरात्री कधीतरी त्याला जाग आली. घशाला थोडी कोरड पडल्याने नजीकच्या जारमधून पाणी पिऊन तो परत बेडवर आडवा झाला. 


                तेवढ्यात अचानक खिडकी जोरदार आवाज करून उघडल्या गेली. संकर्षण दचकला पण प्रसंगावधान साधून तो खिडकी लावायला उठला. तो खिडकी लावणार तेवढ्यात त्याला धरा अंगणातल्या फुलझाडांजवळ उभी दिसली. त्याला जरा विचित्र वाटलं म्हणून त्याने आधी खिडकी लावून घेतली. नंतर तो खोलीबाहेर आला व जिथे धरा उभी होती, त्या दिशेने जाऊ लागला.


                संकर्षण अंगणात पोहोचला तेव्हा धरा तिथेच त्या फुलझाडांच्या दिशेने उभी होती. त्याने तिला हाक मारली पण तिने प्रतिसाद दिला नाही. कदाचित तिला ऐकू गेले नसावे, असा विचार करून त्याने थोडे कचरतच परत एकदा तिला हाक मारली. दोनदा हाक मारूनही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. म्हणून मग त्याने थोडे अवघडूनच तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती थोडी घाबरली. ती एक पाऊल मागे घेऊन वळली आणि संकर्षणकडे पाहू लागली. 


                दोघांचीही नजरानजर होताच संकर्षण तिला पाहून नखशिखांत हादरून गेला कारण तिचे डोळे अगदी रक्ताने माखलेले होते. एवढेच नव्हे तर, सायंकाळी निळसर असणारे धराचे बुबुळ आता त्याला अगदी काळेकुट्ट दिसत होते. 


               तो घाबरून एक पाऊल मागे सरकला व त्याने लगेच तिच्या खांद्यावरून हात झटकला व घाईघाईत त्याने डोळ्यांना चोळून डोळ्यांची उघडझाप केली. नंतर संकर्षणने लगेच धराकडे पाहिले. ती अजूनही तिथेच उभी होती पण आता तिचे डोळे अगदी पूर्ववत दिसत होते. ते पाहून संकर्षणच्या जीवात जीव आला. 


" कदाचित कमी झोप झाल्याने मला भास झाला असावा. धराचे डोळे तर अगदी साधारणच दिसत आहेत. मी पण ना... युगची काळजी करता करता स्वतःच अति विचार करायला लागलोय. नाहीतर, कोण एवढ्या सुंदर डोळ्यांना असं विद्रुप रुपात पाहील बरे! संकर्षण राजे, कमी विचार करा जरा! " संकर्षण मनातल्या मनात स्वतःशीच बोलला. 


" ह्म्म! हे सगळं तर ठीक आहे पण एवढ्या रात्री धरा इथे अंगणात काय करत असावी? तिलाच विचारायला हवं. " संकर्षण स्वतःशीच मनोमन बोलत होता. 


धरा मात्र त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. त्याने परत एकदा तिच्याकडे पाहिले व तिला म्हणाला, " मिस. धरा, तुम्ही एवढ्या रात्री बाहेर अंगणात काय करत आहात? तुम्हाला झोप येत नाहीये का? "


" ह्म्म! मला झोप येत नाहीये. " धरा म्हणाली. 


" अच्छा! पण तरीही मला वाटतं तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करायला हवा. एवढ्या रात्री अपरात्री जागरण करणे बरे नव्हे! " संकर्षण म्हणाला. 


" ह्म्म! जाते मी. " धरा असे बोलून तिच्या खोलीत निघून गेली. 


                 धरा तिच्या खोलीत जाताच संकर्षणही त्याच्या खोलीत आला आणि युगशेजारी बेडवर झोपला. डोळे मिटताच परत त्याला अंगणातला प्रसंग आठवला. तेच रक्ताने माखलेले डोळे, तोच भयावह प्रसंग त्याच्या डोळ्यापुढे रेंगाळत होता पण त्याने मनातले विचार लगेच झटकून दिले व तो झोपेच्या स्वाधीन झाला. 

             

क्रमशः

________________________________________


सेजल पुंजे. 

१४-०८-२०२२.

टीम नागपूर. 



🎭 Series Post

View all