आभास की वास्तव? (भाग-१४)

आभास आणि वास्तवाच्या कचाट्यात गुंतलेली रहस्यकथा... सत्य आणि असत्याचा सुगावा घेणारी कथामालिका...

राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कथेचे शीर्षक - आभास की वास्तव? 

भाग - १४


                खरंतर, संकर्षणला धरावर शंका नव्हती पण गेल्या काही दिवसांत लागोपाठ आलेले अनुभव आठवून त्याने धराबद्दल पंडिताकडे चौकशी करणे सोयीचे मानले. संकर्षणला धराबद्दल त्या पंडिताला बरेच प्रश्न विचारायचे होते कदाचित हे सर्व त्या पंडिताच्या देखील लक्षात आले असावे म्हणून त्या पंडिताने त्याच्या झोळीतून दोन धागे काढले. त्यातला एक धागा संकर्षणला बांधला व नंतर जेथे संकर्षण आणि युग धरासोबत मुक्काम करत होते त्या घराकडे पाहायला सांगितले.


                संकर्षणने घराकडे पाहिले आणि अक्षरशः त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला कारण ते घर खूप भयानक दिसत होतं. सर्वत्र काळाकुट्ट अंधार दिसत होता. बागेतली फुलझाडे कोमेजलेली दिसत होती. ठिकठिकाणी दुरूनसुध्दा कोळीष्टके लागलेली दिसत होती. त्या घराचे एवढे भयानक रूप पाहून तो पूर्णपणे भांबावून गेला. त्याला काहीच कळेनासे झाले होते पण धराच्या तावडीतून युगची सुटका करणे संकर्षणला गरजेचे वाटत होते म्हणून त्याने त्या पंडिताला मदत मागितली. 


                 त्या पंडिताने स्वतः मदत करायला नकार दिला कारण त्याच्यामागे त्याचं कुटुंब होतं. त्याला त्याच्या अख्ख्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता म्हणून त्याने एका सिध्दपुरुष महाराजांचा पत्ता संकर्षणला दिला आणि त्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला व तो पंडित पटापट पावले टाकत तेथून निघून गेला. 


                संकर्षणने परत एकदा त्या वाड्याकडे पाहिले. त्या घराकडे पाहताच भीतीने त्याच्या पोटात गोळा आला आणि अंगावर काटाही उभा राहिला. म्हणूनच त्याने खोल श्वास घेतला व नंतर परत मागे वळून पाहिलेच नाही आणि तेथून पळ काढला. हनुमान चालीसा म्हणतच अगदी थोड्या वेळात संकर्षणने पंडिताने दिलेला पत्ता गाठला. 


                तो ज्या पत्त्यावर आला तिथे एक लहानसं घर होतं. तिथे जाताच त्याला पॉझिटिव्ह वाइब्ज आल्या. तो घाईगडबडीतच त्या घराजवळ गेला आणि त्याने दार ठोठावले. दुसऱ्याच क्षणी एका वयस्कर व्यक्तीने दार उघडले. त्या व्यक्तीने हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. तसेच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज पसरलेलं होतं. त्या व्यक्तीने संकर्षणला थोड्या वेळ बाहेरच थांबवले आणि तो व्यक्ती आत गेला व त्या व्यक्तिने आतून गोमूत्र आणले. नंतर त्या व्यक्तीने संकर्षणवर गोमूत्राचा शिरकाव केला. 


                संकर्षणला त्या व्यक्तीशी बोलायचे होते अन् त्यासाठीच त्याची धडपड सुरू होती. तो काही बोलणार त्याआधीच त्या व्यक्तीने अर्थात सिध्दपुरुष महाराजांनी सगळंच ओळखून घेतले होते. त्यांनी संकर्षणला आधी धीर दिला व निश्चिंत राहायला सांगितले. 


त्या सिद्धपुरुष महाराजांनी संकर्षणला त्या घरातून युगची सुटका करण्याची हामी भरली. सिद्धपुरुष महाराजांनी आश्वासन देताच संकर्षणला थोडे हायसे वाटले. त्याने थोडा सुस्कारा सोडला व म्हणाला, " खूप खूप आभार महाराज! तुमचे खूप उपकार होईल. तुमची मदत खूप अमूल्य आहे माझ्यासाठी... चला, तुम्ही लवकर माझ्यासोबत या! युगला सगळे कळायला हवे. "


" ह्म्म! " सिद्धपुरुष महाराज विचारात हरवले होते म्हणून त्यांनी फक्त हुंकार भरला. 


तेवढ्यातच त्या सिध्दपुरुष महाराजांना काहीतरी आठवले व ते संकर्षणला उद्देशून म्हणाले, " काहीही करून आजच्या आजच युगची त्या घरातून सुटका करायला हवी कारण आज पौर्णिमा आणि चंद्रग्रहण आहे. त्यामुळे आज धराच्या सर्व आसुरी शक्तीत वाढ होईल आणि ती सहजरित्या तिचा मूळ हेतू साध्य करण्यास समर्थ होईल. तिला तिचा प्रतिशोध घ्यायचा आहे. तिला तिने मरण्यापूर्वी घेतलेली अतूट शपथ पूर्ण करायची आहे. तिला सूड घ्यायचा आहे. तिला युगचा जीव घ्यायचा आहे आणि हिच तर तिची शपथ होती. तिची शपथ पूर्ण होता कामा नये. तिचे उद्दिष्ट साध्य व्हायला नको. जर तिला यश मिळाले तर... तर युग... नाही! आपण युगची रक्षा करायला हवी! " 


                आतापर्यंत संकर्षणला वाटत होतं की, धराचा खरा टारगेट तो असावा पण असे नव्हते. धराला केवळ युगशी सूड घ्यायचा होता. संकर्षण केवळ तिच्या मार्गातला अडथळा होता. सिद्धपुरुष महाराजांनी केलेला हा खुलासा संकर्षणसाठी खूप धक्कादायक होता. हे कळताच संकर्षणला युगची काळजी वाटू लागली. 


संकर्षण अगदी गोंधळून गेला होता. तो सिद्धपुरुष महाराजांना म्हणाला, " पण महाराज! धराचे युगशी काय वैर आहे? तो कुणाचेच अहित चिंतणाऱ्यांपैकी नाही मग धरा का त्याच्या जीवावर उठली आहे? युग... युग खरंच खूप साधा आहे आणि धरासोबत तर तो कधीच काही आक्षेपार्ह वागताना दिसला नाही... मग धरा का युगच्या मागे लागली आहे? "


" हेच प्रश्न माझ्याही मनात आहेत. युगची आणि माझी भेट झालेली नाहीये. तरीही मला युगचा स्वभाव कळलेला आहे. मुळात तो कधीच कुणालाही हानी करणार नाही, याची शाश्वती मला त्याच्या सभोवताली असणाऱ्या ऊर्जेतून जाणवतंय. आता फक्त धराचा भूतकाळ जाणणे गरजेचे आहे. जर मी तिच्याकडून तिचा भूतकाळ जाणून घेतला तर कदाचित हाती काही निदान लागेल. " ते सिद्धपुरुष महाराज हातात एक माळ जपत होते आणि डोळे मिटून संकर्षणसोबत बोलत होते. 


" धराचा भूतकाळ मला माहिती आहे. तिनेच मला आणि युगला सांगितला होता पण तिच्या भूतकाळात युगची कोणतीच भूमिका नव्हती. मग तरीही तिचा शिकार युग कसा असू शकतो? " संकर्षण आवेगाने केसातून हात फिरवत म्हणाला. 


" ज्याअर्थी धराने मुखवटा धारण केला होता. त्याअर्थी संकर्षण तुला वाटतं का की, तिने तिचा खरा भूतकाळ सांगितला असेल... किंबहुना कशावरून धरा हे तिचे खरे नाव असावे? महत्त्वाचे म्हणजे तिने तुम्हाला फक्त तिचे नाव सांगितले. तिने तिचे आडनावही तुम्हाला सांगितलेले नाहीये म्हणजे आधीपासून ती तिची ओळख लपवत आलीय. म्हणून असं म्हणताच येणार नाही की, धराचा खरा भूतकाळ वा धराची खरी ओळख आपल्याला माहिती आहे. " सिद्धपुरुष महाराज म्हणाले. 


" महाराज! मग आता... पुढे काय करायचं महाराज? युग? युगचा जीव धोक्यात आहे महाराज... त्याला वाचवावे लागेल महाराज! युगची सुटका करावी लागेल! "


" ह्म्म! सुटका करणे तर गरजेचे आहे व धराचा भूतकाळ जाणून घेणेही गरजेचे आहे... आणि तिचा भूतकाळ आपल्याला आता तिच्याकडूनच वदवून घ्यावा लागेल. आपल्याला तिला यंत्रात बंदिस्त करावे लागेल. आधी तिच्या अतृप्त आत्म्याला वश मध्ये करावे लागेल. मग ती स्वतःच तिचा भूतकाळ सांगणार! चला! आता त्या घरी जायलाच हवे! धराची भेट घ्यायची वेळ झालीये आणि युगची सुटका करण्याचीही एकच संधी हातात आहे. चला! " सिध्दपुरुष महाराज निर्धारानिशी म्हणाले. त्यावर संकर्षणने हुंकार भरला. 


                मग ते दोघेही त्या घराकडे जायला निघाले. तत्पूर्वी सिध्दपुरुष महाराजांनी त्यांना आजच्या पुजाविधीत लागणारे सर्व साहित्य बरोबर घेतले. त्यांनी एक रुद्राक्षमाळ संकर्षणला दिली, ज्यात त्रिशूळ आणि ॐ हे चिन्ह असलेलं लॉकेट होतं. तशीच एक माळ त्या सिद्धपुरुष महाराजांनी संकर्षणला त्याच्याकडे ठेवायला सांगितली व वेळ मिळताच ती युगला आठवणीने द्यायला सांगितले. संकर्षणने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एक माळ स्वतःच्या गळ्यात घालून घेतली आणि दुसरी माळ खिशात सांभाळून ठेवली. 


                काही वेळातच सिध्दपुरुष आणि संकर्षण प्रचंड मोठा असलेल्या वाड्याजवळ आले. वाड्याचे फाटक उघडताच पहिल्यांदा कित्येक वटवाघळांचा थवा संकर्षण आणि सिध्दपुरुष महाराजांच्या अंगाभोवती आला. ती वटवाघळे त्या दोघांवरही लागोपाठ प्रहार करून ओरखडे मारत होते. त्यामुळे संकर्षण बराच जखमी झाला होता. सिध्दपुरुष महाराजांना मात्र जास्त इजा झाली नव्हती. त्या वटवाघळांचा थवा निघून जाताच दुसऱ्याच क्षणाला कित्येक मधमाशांचा थवा आला आणि त्या मधमाशांनी त्या दोघांभोवती फिरून एक वर्तुळ केले व त्यात दोघांना जखडून टाकले.


                दुसरीकडे सिध्दपुरूष महाराज लागोपाठ मंत्रोच्चार करत होते. संकर्षणही तुटकच का होईना पण हनुमान चालीसा उच्चारत होता म्हणूनच काही वेळाने तो मधमाशांचा थवाही निघून गेला. वाड्यात पाऊल ठेवताच आलेल्या या अनुभवांनी संकर्षण नखशिखांत हादरून गेला होता. वाड्याच्या आत काहीही होऊ शकते याची जाणीव संकर्षणला झाली होती म्हणून भीतीचा एक आवंढा गिळून संकर्षण वाड्याच्या दारात उभा राहिला. त्याची जरा देखील हिंमत होईना पण तेवढ्यात त्याला आतमध्ये युग असल्याचे आठवले आणि तो मोठ्या निर्धारानेच दार उघडण्यासाठी पुढे सरसावला.



क्रमशः


_______________________________________


©®

सेजल पुंजे. 

१८-०८-२०२२.

टीम नागपूर. 




🎭 Series Post

View all