Feb 29, 2024
स्पर्धा

आभास हा....!!! - भाग 3

Read Later
आभास हा....!!! - भाग 3

आभास हा - भाग 3 


सिद्धार्थ आणि शिवा घाबरत घाबरतच बंगल्याच्या आवारात आले. दगडी पायऱ्या चढून ते वरती गेले. तर समोरच दरवाज्यात त्यांना ईश्वरी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. सिदने तिला उठवायचा प्रयत्न केला पण तिचा काहीच प्रतिसाद नव्हता. दोघेही मग तिला घेऊन घरी पोहचले. घरी आल्यावर सगळ्यांच्याच नजरा उंचावल्या. इशू अशा अवस्थेत घरी येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. सिदने तिला पूजा आणि मिनूच्या रूममध्ये नेऊन झोपवलं. तोपर्यंत संग्रामने डॉक्टरांना बोलवलं होतं ते देखील आले. सिदच्या पोटात गोळा आला. घरच्यांना इशू कुठे सापडली हे जर कळलं तर त्याचं काही खरं नव्हतं. कारण त्यानेच हे भूत बंगल्याचं पिल्लू तिच्या डोक्यात सोडलं होतं. त्यामुळे आता ती शुध्दीवर येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. घरातली सगळी माणसं एव्हाना खोलीत जमली. आपल्या घरी येऊन एखाद्या पाहुण्याला असं व्हावं असं दादासाहेबांना वाटतं नव्हतं. त्यांना इशुची काळजी वाटत होती.  डॉक्टरांनी इशूला तपासले. 


" डाक्टर..... काय झालंय यांना....??? समदं ठीक हाय ना...? " दादासाहेबांनी विचारलं. 


" काळजी करू नका दादा. घाबरल्यामुळे त्या अशा बेशुद्ध पडल्या आहेत. बाकी त्यांना काहीही झालेलं नाही. त्यांना आत्ता आरामाची गरज आहे. मी गोळ्या लिहून देतो. त्याने त्यांना आराम वाटेल.... " एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. 


पुजा , मिनू , शारदाताई आणि संग्रामची बायको रोहिणी अशा सगळ्याजणी इशू जवळ थांबल्या. दादासाहेबांनी सिदला बाहेर बोलावुन घेतलं. 


" या कुठं सापडल्या तुम्हाला.....??  आनी भीती वाटण्यासारखं काही झालंय का....?? " दादांनी त्याच्या खांद्यावर हात टाकत विचारलं. तसा तो गोंधळला. त्याला काय बोलावं सुचेना. 


" दादा..... ते.... इशू.... इशू.... " इशू भूत बंगल्याजवळ सापडली हे सांगायला त्याची जीभ रेटत नव्हती. 


" दादा.... त्ये त्या ताईसाब.... आपल्या मळ्याच्या हितं व्हत्या. सकाळी फिराया गेल्यात्या म्हनल्या पर मग त्यांना यायचा रस्ता गावना.. नि त्यांनी ह्यो भला थोरला साप बगीतला.... आनी म्हनूनशान चक्कर आली असनार बगा त्यासनी......"  बाजुलाच उभ्या असणाऱ्या शिवानं वेळ मारून नेली. 

 


सिदने सुटकेचा निःश्वास सोडला. कारण जर दादांना हे कळलं असतं तर त्याचं काही खरं नव्हतं. साधारण दोन एक तासांनी ईश्वरीला शुद्ध आली. पण तरीही तिचं डोकं जड झालं होतं. उठल्यावर देखील तिला मळमळत वगरे होतं. त्यामुळे घरातल्या आणि काम करणाऱ्या लोकांना वाटलं की हिला नक्किच भुतबाधा झाली असावी. दादांसमोर कोण बोलत नव्हतं. पण काम करणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली होती. 

 

...................................

 

संध्याकाळी सगळे फ्रेंड्स बाहेर गप्पा मारत होते. दादा आणि संग्राम देखील बाहेर गेले होते. हीच संधी साधुन सिदने ईश्वरीसोबत बोलायचं ठरवलं. ती बेडला टेकून पुस्तक वाचत होती. 

 

 

" काय मॅडम कसं वाटतंय आता....?? " तो तिच्या जवळ बसत म्हणाला. 

 


" एकदम फ्रेश......" ती हसून म्हणाली. 

 

 

" छान. सकाळी चांगलंच घाबरवलं होतंस आम्हाला..." असं म्हणून तो जरा तिच्या बाजूला सरकला आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत त्याने दबक्या आवाजात तिला विचारलं... ," कशाला गेली होतीस त्या बंगल्या जवळ ...?? दादांना उत्तरं देताना इकडे माझ्या तोंडाला फेस आला होता...." तो जरा रागीट लूक देत म्हणाला.

 


" एवढं काय घाबरतोस.. असंच बघायला गेले होते. सकाळची भुतं दिसतात का ते....!!! " ती जोरात हसली. 

 


" इशू... मारीन हा आता. किती घाबरलो होतो मी. काही झालं असतं तुला तर काय केलं असतं...." तो रागवत म्हणाला. 

 


 " काही होत नाही रे भिडू... जस्ट चिल.. तुला काय वाटलं मला भुताने बेशुद्ध केलं की काय....?? " इशू म्हणाली.

 


" छे गं.... तसं नाही. माझा नाही फार विश्वास या सगळ्यावर. आणि समजा असेलच एखादं भुत तर ते आपल्या माणसाला काही करणार नाही.... " एवढं बोलून तो जरा लांब सरकला. तोपर्यंत तो काय बोलतोय ते तिला समजलं तिने बाजुची उशी त्याला फेकून मारली. 

 


" सिद.... डुकऱ्या.... मारते बघ तुला आता.... " ती उठत होती. तिने मारलेली उशी त्याने चुकवली आणि दारातून आत येणाऱ्या ऋषीने पकडली. त्याच्या मागोमाग त्यांचा आवाज ऐकून बाकीचे फ्रेंड्स देखील आत खोलीत आले. 

 


" अरे , किती दंगा करता. तुमच्यापेक्षा गल्लीतली शेम्बडी पोरं बरी....." तो हसत म्हणाला. 

 


" मी काही करत नाही. हीच बघ. कोण म्हणेल हिला सकाळी पडली होती म्हणुन.... " सिदने पडण्याची ऍक्शन केली. तसे सगळेच हसले. 

 


" गपा रे. " मिनू येऊन इशूच्या बाजूला बसली. " इशू कसं वाटतंय आता...?? " तिने विचारलं. 


" फीलिंग बेटर...." इशू हसली. 

 

" उद्याच काय करायचं मग...?? " आरुषने विचारलं.


" काय उद्याच....?? " इशू 

 

" उद्या आम्ही सगळे ट्रेकिंगला जाणार होतो तुला टाकून. तू अशी नाजुक साजुक ना. कुठे धडपडलीस तर काय करायचं. म्हणून तुला न सांगताच जाणार होतो.. " आरुष म्हणाला.  तसं इशूने दुसरी उशी त्याला फेकून मारली आणि रागीट लूक देत त्याच्याकडे बघत होती. 

 


" ए ए .... कडकलक्ष्मी ... तुला घेतल्याशिवाय नाही जाणार कुठेच... डोन्ट वरी....." ऋषी हात जोडत म्हणाला. 

 


" कुठे चाललोय आपण ट्रेकिंगला.....?? " तिने उत्साहाने विचारलं. 

 


" इथे जवळच. डोंगरात एक देऊळ आहे. संग्राम दादा नेणार आहे आपल्या सगळ्यांना..." सिद म्हणाला. 

 


" आणि परत कधी यायचं....??? " इशू.

 

 

" लगेचच संध्याकाळी....." सिद म्हणाला.

 

 

" का.... राहायचं नाही का जंगलात... Am very excited....!!!  कसलं भारी थ्रिलिंग असतं त्यात...." ती म्हणाली. 

 


" ओ मॅडम.. राहायचं नावचं काढू नका.. उलट तू आज सकाळी गायब झालीस त्यावरून तर दादा कुठेच पाठवायला तयार नव्हते. पण सगळ्यांचा हिरमोड नको म्हणुन मग जा म्हणाले..." सिद 

 


" पण इशू.... तू कशाला गेलीस तिकडे. आम्ही किती घाबरलो होतो. तुला चक्कर कशी आली पण....?? " मिनूने विचारलं. 

 


" मी...... ते......" ती काही बोलणार इतक्यात खोलीच्या दारातून दादासाहेब आत आले. त्यांनी इशुच्या तब्येतीची चौकशी केली आणि ते बाहेर गेले. 


ते बाहेर गेल्यावर मग सगळ्यांनी उद्याच्या ट्रेकींगचे प्लॅन करायला सुरवात झाली. कसं जायचं... कुठे थांबायचं.. सोबत काय काय न्यायचं.. याची चर्चा सुरू झाली. पण इशुच मात्र या कशातच लक्ष नव्हतं. सिदने ते बरोबर हेरलं पण तो काहीच बोलला नाही.  तिच्या डोक्यात  मात्र उद्याच्या दिवसाचे वेगळेच विचार घोळत होते. 


क्रमशः..... 

 

 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//