आभास हा....!!! - भाग 1

Suspense Story writing compition

आभास हा....


" हाच का तो भूत बंगला...?? " खांद्याला सॅक अडकवलेली एक तेवीस चोवीस वर्षाची मुलगी बंगला न्याहाळत होती. 


" व्हय. लई वर्स झाली कोन बी राहत न्हाय इकडं. रात्रीची भुतं दिसत्यात. म्हनून कोन यायला मागत न्हाय इकडं. समदी घाबरतात..." शिवा त्या मुलीला माहिती देत होता. बाकीची मुलं डोंगर आणि आजूबाजूची जागा बघण्यात दंग होती. 


" ए इशू , चल इकडे काय बघतेस....?? " मिनू तिच्या जवळ येत म्हणाली. 

" अरे यार.... हाच तो भूत बंगला. सिद सांगत होता ना तोच. मी जाम एक्साईट आहे हा आतुन बघायला. मस्त हॉरर फिल्म सारखं....."  ती हातवारे करत म्हणाली. 


" गप गं. एकतर आपल्याला इकडंच काय माहीत नाही. चल जाऊ आपण. मला भीती वाटते.. " मिनू 


" हे हे हे...... घाबरट. तेरे साथ ये ईश्वरी राऊत है। तुझे कुछ नहीं होने देगी। ही हा हा....." असं म्हणून इशू तिच्या अंगावर धावुन गेली आणि जोरात हसू लागली. 


" हेय .... तुम्ही दोघी इकडे काय करताय. चला आपण मळा बघायला जाऊया. सगळे थांबलेत तुमच्यासाठी..." सिद परत येत म्हणाला


" अरे आम्ही येतच होतो. पण या मॅडम इथून हलतील तेव्हा ना..? भुताला आता भुतं दिसायला लागली आहेत..." असं म्हणून मिनू जोरात हसली. इशूने एक रागीट कटाक्ष मिनूकडे टाकला आणि ती सिदकडे वळली. 

" सिद मला जायचं आहे या भूत बंगल्यात. तू प्लिज तुझ्या डॅडींची परमिशन काढ ना.... प्लिज यार प्लिज.. तुला माहितेय ना मला हॉरर स्टोरीज असलेल्या जागा बघायला फार आवडतात. प्लिज प्लिज माझ्यासाठी....!!! " इशू  एवढुस तोंड करत म्हणाली. 


" Ok, I will try.... " सिद म्हणाला तशी ती खुश झाली. " पण आता चला नाहीतर आपल्याला पुन्हा यायला उशीर होईल. दादा ओरडतील..."  मग सिद , इशू आणि मिनू त्यांच्या बाकीच्या फ्रेंड्सना जॉईन झाले. 

..............................

सोलापूरजवळच्या एका खेडेगावातील दादासाहेब म्हणजेच यशवंतराव पाटील हे एक बडं प्रस्थ होतं. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती. दादासाहेबांचं घराणं परंपरा आणि रीतिरिवाज जपणारं होतं. घराण्याची पत आणि घराण्याचा मान त्यांना आपल्या जीवपेक्षाही मोठा होता. त्यांचा मोठा मुलगा संग्राम याने शेतकीची पदवी घेतली होती आणि तो दादासाहेबांना त्यांच्या कामात , शेती व्यवसायात मदत करायचा. दुसरा मुलगा म्हणजे सिद्धार्थ. तो पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत होता. अभ्यासात हुशार होताच पण तितकच उत्तम व्यवहारज्ञान त्याला होतं. आणि म्हणूनच दादासाहेबांनी त्याला शिकायला बाहेर पाठवलं. तो शिकून आल्यानंतर आपल्या गावातल्या लोकांच्या भल्यासाठी त्याच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा अशी दादांची इच्छा होती. आणि सगळ्यात धाकटं शेंडेफळ...!! म्हणजे अवनी...!!! ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. दादासाहेबांच्या पत्नी शारदाताई तर अत्यंत प्रेमळ आणि आपुलकीने वागणाऱ्या होत्या. आपल्या पतीचा शब्द त्या कधीही खाली पडू देत नसत. पाटलांच्या घरात दादासाहेबांचा शब्द अखेरचा होता. पण असं असलं तरीही ते कोणताही निर्णय घेताना सगळ्या बाजुनी विचार करून मगचं आपला निर्णय सांगायचे. दादासाहेब हे नव्या आणि जुन्या गोष्टींची सांगड होते. जितकं त्यांनी आधुनिक जगातल्या गोष्टी अंगिकारल्या होत्या तिथे त्यांनी परंपरा आणि रीती रिवाज अजूनही राखुन ठेवले होते. दादासाहेबांचा मुलगा सिद्धार्थ हा त्याच्या मित्र मैत्रिणींना घेऊन आपल्या घरी आला. कॉलेजला सुट्टी पडली होती त्यामुळे बाहेर फिरायला जाण्यापेक्षा आमच्या गावी जाऊ असं सिद्धार्थने सुचवलं आणि सगळ्यांना ते आवडलं देखील. त्याने त्याच्या गावातल्या कितीतरी गोष्टी आपल्या मित्रांना सांगित्या त्यामुळे सगळ्यांना इथे येण्याची चांगलीच ओढ लागली. बाकीच्या गोष्टींप्रमाणेच त्याने सगळ्यांना गावाच्या टोकाला असणाऱ्या भूत बंगल्याविषयी देखील सांगितले. ते ऐकल्यापासून तर सिद्धार्थची मैत्रीण ईश्वरीला कधी एकदा गावी येतो असं झालं होतं.  

...............................


सिद्धार्थ आणि त्याचे मित्र ऋषिकेश , मीना , ईश्वरी , पूजा आरुष ही सगळी मंडळी सिध्दार्थच्या घरी आली तेव्हा रात्रीचे दहा वाजत आले होते. सगळेजण गाडीतून खाली उतरले. घर कसलं मोठा वाडाच होता तो....!!! समोरच्या दगडी प्रवेशद्वारातून सगळे आत गेले तसं घरी काम करणारा शिवा पुढे आला त्याने सगळयांच्या हातातून बॅगा घेतल्या आणि तो आत गेला. चांगला मोठा चौसुपी वाडा होता. पूर्वीच्या काळातलं दगडी बांधकाम... मध्ये मोकळा पॅसेज सोडून त्याच्या तीन बाजूने आत जाण्यासाठी पायऱ्या... व्हरांडे... समोरच उभे असणारे मोठे मोठे खांब त्या वास्तूच्या अनुभवांची साक्ष देत उभे होते. सिध्दार्थचं  मित्रमंडळ  वाड्याच निरीक्षण करण्यात गुंतलं. समोरच्या व्हारांड्यातून झोपाळ्यावर बसलेले दादासाहेब खाली आले. तसा सिध्दार्थने पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. 


" काय... कसा झाला प्रवास मंडळी...?? " दादांनी विचारलं. 


" छान झाला...." सिद्धार्थ.

" wow यार सिद.. कसला भारी वाडा आहे तुझा. तू बोलला नाहीस कधी. एकदम पिक्चर मध्ये असतो तसा..." ऋषी म्हणाला. तस सिद्धार्थने हसून त्याच्याकडे पाहिलं. 


" आवं पावणं... प्रवासाचं आलायत तर दमला असाल. समद्यानी हात पाय धुवा. तोवर आमी जेवण वाढाया सांगतो..." दादासाहेब आत गेले. 


शिवाने मग सगळ्यांना मागच्या बाजूला नेले. सगळ्यांना हात पाय वगरे धुवायला सांगुन तो जेवणाची तयारी बघायला गेला. तोपर्यंत शारदा ताई आणि त्यांच्या सुनबाई म्हणजे संग्रामची बायको रोहिणीने जेवण वाढलं होतं.

" सिद बाबा... जेवन तयार हाय. मालकीण बाई बोलवत्यात चला...." शिवा म्हणाला तसे सगळे उठले. गावात येईपर्यंत दिसणाऱ्या गोष्टींवर त्यांची चर्चा चालू होती आणि पाटलांचा एवढा मोठा वाडा बघून तर त्यांच्या चर्चांना उधाण आलं होतं. 

.................................

ताट , वाटी , चौरंग आणि बसायला पाट अशी सगळी जेवणाची व्यवस्था केलेली होती. शहरात वाढलेल्या मुलांना या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. डायनींग टेबल आणि खुर्चीशिवाय न जेवणारी मुलं आज खाली पाटावर बसून पहिल्यांदाच जेवत होती. जेवण सुरू झालं तसं इशूने सिदला खाणाखुणा करायला सुरुवात केली. त्याच्या ते लक्षात आलं आणि त्याने मग विषय काढला. 

" दादा ते.... उद्या सगळ्यांना मळा बघायला जायचं होतं. मी यांना घेऊन जाऊ का....?? " सिद्धार्थने जेवता जेवता विचारलं. 


" उद्या लगेच....?? प्रवास करून आलाय इतका तर ऱ्हावा की निवांत मग जा दोन दिसांनी..." दादा म्हणाले. 

" हो. पण जास्त सुट्टी नाही ना.. म्हणून मग उद्याच जायचं चाललंय....जाऊ का...?? " सिदने जरा साशंक मनानेच विचारलं. 

" बरं. जावा. शिवा येईल तुम्हाला दाखवायला समदं. मळा बघून या समद्यानी..." असं म्हणून दादासाहेब झोपायला गेले. सगळ्यांची जेवणे आटोपली. उद्याच्या विचारातच सगळ्यांना गाढ झोप लागली. 

...........................

दुसऱ्या दिवशी मळ्याकडे जाताना सिदने मुद्दामच शिवा काकांना भूत बंगल्याच्या वाटेवरून न्यायला सांगितलं. ईश्वरीला तो बंगला बघायचा होता. त्यामुळे उद्या मळ्याकडे जाताना पाहता येईल यासाठी सिदने ही युक्ती लढवली होती. सगळेजण एकेक गोष्टी बघत पुढे जाऊ लागले. भूत बंगल्याजवळ मात्र ईश्वरी थांबली. तिला बोलवायला मग मिनू आणि सिद पण आले. बंगला बघून ती त्यांच्या सोबत जाऊ लागली पण तिचं मन मात्र त्या बंगल्याकडे ओढ घेत होतं. का कोण जाणे पण त्या जागेत गेल्यापासून कोणीतरी आपल्याला बोलवतंय असं तिला वाटायला लागलं......!!! 


क्रमशः......


ही कथा पूर्णतः काल्पनिक असून आपल्या ईराच्या रहस्यकथा लेखन स्पर्धेसाठी ही कथा मी लिहत आहे. रहस्यकथा म्हटल्यावर काही काही गोष्टींमध्ये साधर्म्य आढळू शकते पण तो निव्वळ योगायोग समजावा. सदर कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा इतरत्र आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

© सायली विवेक. 

🎭 Series Post

View all