आभास हा, छळतो मला..

खेळ भास आभासाचा


आभास हा, छळतो मला..


" बोल, काय हवे आहे तुला?" धुनीबाबांनी विचारले..
" बाबा, मला वशीकरण करायचे आहे.." समरने सांगितले.
" वशीकरण? त्याच्यासाठी खूप पैसे लागतील. आहे तयारी?"
" हो बाबा.. वाटेल ते करायची माझी तयारी आहे.."
" एकदा पुढे आलास की मागे हटायचे नाही. कबूल?"
" हो बाबा.."

"मग हा मंत्र लिहून घे. रोज रात्री बारा वाजता ओलेत्या अंगाने ज्याला वश करायचे आहे त्याचा फोटो किंवा एखादी वस्तू समोर ठेवून म्हणायचा.. आठ दिवसातच तुला परिणाम दिसून येईल.." हे ऐकून खुश झालेल्या समरने घसघशीत दक्षिणा बाबांसमोर ठेवली, ती बघून बाबाही खुश झाले. समर त्याच्या फ्लॅटवर आला आणि दिवास्वप्ने पाहू लागला.. निशा त्याची स्वप्नसुंदरी.. दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. ती बोलण्यात सडेतोड थोडीशी फटकळ.. दिसायला सुंदर पण तरिही स्वभावामुळे तिच्याशी बोलायला मुले घाबरायची.. त्यात समर हा ऑफिसमध्ये नवीन लागलेला. थोडासा शामळू. मनात कितीही बोलायचे असले तरी निशा समोर आल्यावर मात्र त्याचे शब्द विरघळून जायचे.. काय करावे हेच त्याला सुचत नव्हते. अशातच एकदा ट्रेनने प्रवास करताना त्याला धुनीबाबांची जाहिरात दिसली. मनाचा हिय्या करून त्याने ती लिहून घेतली. आणि आता तिथे पोहचला होता. त्याच्या सुदैवाने त्याचा फ्लॅटमेट महिनाभरासाठी गावी गेला होता. समरने या संधीचा फायदा उचलायचा ठरवला.. दैव त्याला अनुकूल दिसत होते.. त्या दिवशी बोलता बोलता निशा रुमाल विसरून चहा प्यायला गेली असता त्याने तो रुमाल ढापला.. त्याच दिवसापासून त्याने तो मंत्रजप करायला सुरुवात केली. हळूहळू निशा ऑफिसमध्ये त्याच्याशी बोलू लागली होती, हसू लागली होती हे त्याला जाणवत होते.. मंत्राचाच प्रभाव पडू लागला आहे हे त्याने ओळखले.
पंधरा दिवस पूर्ण झाले. निशा पूर्ण वश झाली की नाही हे आज कळणार होते. कितीतरी दिवसांनी समर सुखाने झोपला.
" उठायचे ना आता?" निशाचा गोड आवाज त्याच्या कानावर आला.. पाठोपाठ पाण्याचे थेंब त्याच्या तोंडावर उडाले.. समरने डोळे उघडले. त्याच्या आवडत्या रंगाची साडी नेसून सुस्नात निशा समोर उभी होती. उठवताना बहुतेक तिच्या ओल्या केसांवरचे तुषार त्याच्या चेहर्‍यावर उडाले होते.. निशाला समोर बघून समर ताडकन उठला. आपण खूप कमी कपड्यांमध्ये आहोत हे आठवून लाजला..
" तू? तू इथे कशी आलीस?"
" कशी म्हणजे? तूच बोलावलेस ना?"
" पण तू आत कशी आलीस?"
" तूच बाहेर असलेल्या दिव्यात किल्ली ठेवली होतीस ना?" निशाने लाडाने विचारले..
" अरे हो.. विसरलो होतो.." समर जीभ चावत म्हणाला.
" तुला मी आलेले आवडले नाही का?" निशाने गाल फुगवून विचारले..
" असे नाही ग.. खरेतर मी तुझी किती वाट पहात होतो कसे सांगू तुला.. पण तू अशी अचानक येशील असे वाटले नव्हते म्हणून.."
" अरे व्वा.. इथेतर खूप बोलतो आहेस. ऑफिसमध्ये तर शब्दही निघत नाही तुझ्या तोंडून.."
" तिथे तुझी भिती वाटते.."
" आणि इथे?"
" सांगू?"
" हो.."
" रागावणार नाहीस ना?"
" अंहं.."
" इथे तुला जवळ घ्यावेसे वाटते.. खूप जवळ.." समर उठत म्हणाला..
" चल चावट.." निशा तिथून निघाली.
समरने पटकन तिचा हात धरून तिला जवळ घेतले. तिनेही त्याच्या छातीवर डोके ठेवले..
" चला आवरून घ्या.. नाहीतर तुला ऑफिसला जायला उशीर होईल."
" तुला म्हणजे? तू नाही येणार?"
" येणार ना? पण तिथे कोणाला मी आलेले सांगू नकोस हं. आणि तुझा नाश्ता मी तयार ठेवला आहे. करून घे.." समर अंघोळ करून येईपर्यंत निशा गेली होती.. समरने नाश्ता केला आणि ऑफिसला पोहोचला.. आज ऑफिसला गेल्या गेल्या त्याला कडकडून भूक लागली होती. तो तसाच कॅन्टीन मध्ये गेला. पोटभर खाऊन तो ऑफिसमध्ये गेला. वर निशा होती पण तिने सकाळची काहीच ओळख दाखवली नाही. तोही मग पुढे गेला नाही. ऑफिस संपल्यावर समर घरी गेला. संध्याकाळी निशा घरी आली..
" तू आलीस?"
"मग.. तुझ्यासाठी काही पण."
" तू ऑफिसमध्ये का नाही बोललीस?"
" तुला सांगितले ना कोणाला काही सांगायचे नाही. आता भांडण्यात वेळ घालवणार का?" निशा बोलत होती. समर त्या बोलण्यात हरवून जात होता. आठ दिवस असेच गेले. अचानक निशाने ऑफिसमध्ये येणे बंद केले. कोणी समरला कारणही सांगेना. त्याने घरी आल्यावर निशाला विचारायचे ठरवले.. पण घरी त्याचा मित्र परत आला होता..
" अरे ऋषी, तू लवकर आलास." समरच्या आवाजात निराशा होती.
" हो रे. कंटाळा आला गावी रहायचा. सांगितले काही कारण आणि निघालो. पण तू खुश दिसत नाहीस माझ्या येण्याने."
"असे काही नाही. खूप बरे वाटले तू आलास ते. दमलो आहे रे जरा म्हणून तुला असे वाटत असेल. थोडा चहा घेतल्यावर बरे वाटेल." समर आत गेला. हा असताना निशा येईल का, हाच विचार त्याच्या डोक्यात होता. आवरून तो बाहेर आला. ऋषी टीव्ही बघत होता. समोर बातमी चालू होती. "लोकांना मूर्ख बनविणाऱ्या धुनीबाबाचा पडदा फाश. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघड केले त्याचे रहस्य.. उत्तरेकडच्या राज्यातून पळून आलेला तरुण. अनेकांना लुबाडले असल्याचा संशय."
समरच्या हातातला चहा खाली पडला.
" हा ढोंगी होता.. मग निशा?"
ऋषीने त्याचे शब्द ऐकले. दोघे बाजूच्या ऑफिसमध्येच काम करत असल्याने तो निशाला ओळखत होता.
" निशा.. अरे तिचे दोन दिवसांनी लग्न आहे. तिचा फोन आला होता मला."
" निशाचे लग्न? ती मला काहीच बोलली नाही." समरला धक्का बसला होता.
" अरे सगळ्यांना माहीत होते तुला ती आवडते ते. म्हणून तिला तुला सांगायला ऑकवर्ड वाटत होते." ऋषीने स्पष्टीकरण दिले.
" निशाचे लग्न ठरले होते मग रोज सकाळ संध्याकाळी येणारी ती कोण होती?" समर विचारात पडला होता..
" ती निशा होती की तिचा आभास?" त्याला काही कळेना..



कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई