आभास : अंत एका पर्वाचा

.
" बलवंतराव वामोरीकर , ही चिठ्ठी सवाई माधवरावांपर्यंत पोहोचवा. "

" पण नाना ?"

" अहो तुम्ही नानांना का एवढे घाबरता ? एकदा आम्ही मसनदीवर आलो तर तुम्हाला मोठी जहागिरी देऊ. " वीस वर्षाचे दुसरे बाजीराव मिशीला ताव देत म्हणाले.

उठून त्यांनी एक पेटी उघडली. त्यात कितीतरी सुवर्णनाणी लखलखत होती.

" आताही नाही पोहोचवणार का चिठ्ठी ?" दुसरे बाजीराव यांनी विचारले.

" काम जोखमीचे आहे. पण करू. " बलवंतराव कुत्सितपणे हसत म्हणाले.

त्यांची नजर त्या सुवर्णनाण्यांकडे रोखली गेली होती.

***

गणेशमहालातील दरबार आटपून श्रीमंत सवाई माधवराव पेशवे आपल्या कक्षात आले. बैठकीवर बसले. दासी पंखा देऊ लागली. श्रीमंत वामकुक्षी घेणार इतक्यात एक सेवक आला.

" श्रीमंत , बलवंतराव भेटायला आले आहेत. " सेवक मुजरा करत म्हणाला.

" बोलवा त्यांना आत. " श्रीमंत सवाई माधवराव पेशवे म्हणाले.

बलवंतराव आत आले. त्यांनी आदराने मुजरा केला.

" श्रीमंत , हा गुप्त खलिता आहे. "

" कुणाचा ? नानाकाकांना काही खबर ?" श्रीमंत सवाई माधवराव पेशवे म्हणाले.

" हा खलिता फक्त तुमच्यासाठी आहे. "

" तुम्ही जा. आम्ही पाहतो. " श्रीमंत सवाई माधवराव पेशवे म्हणाले.

बळवंतराव निघून जाताच पेशव्यांनी तो खलिता उघडला.

त्यातला मजकूर काहीसा असा होता ,

" श्रीमंत , आपण एका रक्ताचे! मागचं सगळं विसरुन बारभाईच्या कुबड्या झुगारुन, शेफारलेल्या नानांना हळुहळु दूर करुन आपण नेटानं राज्य चालवू. यातच आपल्या दोघांचं व स्वराज्याचे हित आहे. "

श्रीमंत सवाई माधवराव पेशवे विचारात पडले. पुढे जुन्नरवरून वेळोवेळी खलिते येत गेले. इंग्रजांनी डायरीत काय लिहिलंय ही माहितीदेखील हेरणारे हेरखाते असलेल्या नाना फडणीसांपासून ही बातमी लपणे अशक्य होते. ते श्रीमंतांच्या दालनाकडे निघाले. दालनात पोहोचताच त्यांनी पेशव्यांना आदराने मुजरा केला.

" श्रीमंत , आम्ही काय ऐकत आहोत ? ज्या द्वितीय बाजीरावाच्या पित्याने तुमच्या पित्याची हत्या करवली त्या बाजीरावाचे खलिते तुम्हाला येतात ? हा बाजीराव सभ्य इसम नव्हे. त्याच्याशी संधान बांधू नका. खुप कष्टाने ही दौलत सावरली आहे. तिचा ऱ्हास होईल ऐसे वागू नका. " नाना फडणीस खडसावून म्हणाले.

" थांबा नानाकाका. कुणाशी संधान बांधायचे आणि कुणाशी तोडायचे हे कळण्याइतपत आम्हाला निश्चितच समज आहे. पेशव्यांच्या मसनदीवर आम्ही विराजमान आहोत , तुम्ही नाही. त्यामुळे आम्हाला निश्चितच स्वातंत्र्य आहे. तुम्ही बारभाईने कारभार करून दौलत सावरली हे सत्य असले तरी त्याची किंमतही तुम्ही पुरेपूर वसूल केली. " श्रीमंत सवाई माधवराव पेशवे म्हणाले.

" श्रीमंत , तुम्हाला राज्य करायची इच्छा असेल तर खुशाल राज्य करा. आम्ही चाकर आहोत हे अद्याप आम्ही विसरलो नाही. फक्त घरभेदी बाजीरावास शनिवारवाड्यात येऊ नका देऊ. नष्ट होईल ही दौलत. येतो. " नाना फडणीस मुजरा करून निघून गेले.

***

त्या दिवसानंतर श्रीमंतांची तब्येत दिवसेंदिवस खंगत जाऊ लागली. त्यांच्यावर कुणितरी चेटूक केले आहे ही अफवा पुण्यात सर्वत्र पसरली. ते वेड्यासारखे बोलू लागले. दसऱ्याच्या मेळाव्यात तर त्यांनी हत्तीवरून उडी मारली. त्यांना ज्वर चढू लागला. प्रकृती ढासळू लागली. एकेरात्री ते स्वतःशीच बडबड करू लागले.

" श्रीमंत सवाई माधवराव पेशवे..लोकांना वाटते किती सुखी मनुष्य असेल. पण पेशवाईचा काटेरी राजमुकुट डोके कसे रक्तबंबाळ करतो हे दस्तुरखुद्द पेशव्यालाच ठाऊक. जन्म घेऊन चाळीस दिवस झाल्यावर आम्हाला मसनदीवर बसवले. आमच्या फक्त अस्तित्वाचा फायदा करवून घेतला कारभाऱ्यांनी. कधी आईचे प्रेम भेटले नाही , कधी पित्याची सावली गवसली नाही , कधी खांद्यावर हात ठेवणारा कुणी मित्र भेटला नाही. आम्ही पुरेपूर अडकलो या सोन्याच्या पिंजऱ्यात. आम्ही फक्त नावाला पेशवे. एक कठपुतली , ज्याच्या दोऱ्या बारभाईच्या हातात. क्षमा करा आम्हास माधवकाका , तुमच्या नावाला साजेसे कर्तृत्व गाजवू शकलो नाही. " श्रीमंत सवाई माधवराव पेशवे म्हणाले.

" श्रीमंत , या. आम्हाला मिठी मारा. तुमचे कार्य संपले. प्रत्येक साम्राज्याचा जेव्हा उदय होतो तेव्हाच त्याचा अंतही निश्चित झालेला असतो. मराठी दौलतीचा अंतही जवळ आला आहे. मला मिठी मारून तुम्ही मुक्त होऊन जा जबाबदारीपासून." एक भारदस्त आवाज दरवाजातून आला.

" कोण बोलत आहे ?" श्रीमंत सवाई माधवराव पेशवे म्हणाले.

" मी कारंजा. "

सवाई माधवराव उठले. गणेश महालाच्या बाल्कनीत आले. ते आठ कारंजे त्यांना बोलवू लागले.

" ये बाळा , आम्हाला मिठी मारून मुक्त हो या जबाबदारीतून. तुझे कार्य संपले. उडी मार. उडी मार. " कारंजे हाक देऊ लागले.

तापाच्या वातीत सवाई माधवरावांनी उडी मारली आणि आठ कारंजे रक्ताने माखले.

***

राघोबादादांनी गारदीकरवी जेव्हा नारायण राव पेशव्यांची हत्या करवली तेव्हा नारायण पेशव्यांची पत्नी गंगाबाई गर्भवती होती. पुरंदरावर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. या बाळास गादीवर बसवून नाना फडणीस आणि त्यांचे अकरा सहकारी ( बारभाई ) यांनी कारभार केला. महादजी शिंदे यांनी सेनापतीपद भूषविले. राघोबादादा इंग्रजांना जाऊन मिळाले. पहिल्या आंग्लमराठा संग्रामात मराठ्यांनी जय मिळवला. मध्यंतरी " फडणीस-शिंदे यांची युती वीस वर्षे टिकली" हा मेसेज घुमत होता ती हीच युती. खर्ड्याच्या लढाईत मराठे एकजुटीने लढले. एकीने लढलेली ती शेवटची लढाई ठरली. श्रीमंत पेशवे सवाई माधवराव यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची एकी संपली. पुन्हा मराठे कधीच एकत्र येऊ शकले नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर , तुकोजी होळकर , महादजी शिंदे ही महान इसमेही कालवश झाली होती. द्वितीय बाजीराव पेशवे गादीवर बसले. नाना फडणीस यांच्या मृत्यूबरोबर मराठेशाहीतील शहाणपण लयास गेले आणि वीस-बावीस वर्षात मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.

©® पार्थ धवन

🎭 Series Post

View all