एका स्त्रीचे मन हे न उमगण्याइतके कठीण सुद्धा नसते

एका स्त्री चे मन हे न उमगण्या इतके कठीण सुद्धा नसते ही मी इथे सादर केले आहे

    " काय गरज होती तेजलला ऑफिसला जायची? माझा मुलगा कमावतो ना चांगला! आली मोठी करिअरिस्टिक! अहो पण एकदा मूल झालं ना की त्याची जरा काळजी घ्यावी लागते,हे कसं कळत नाही या मुलींना?"

" हे बघ तू तुझी लेक्चरबाजी बंद कर. मी सासरा म्हणून नाही तर एक बाप म्हणून तिच्या भावना समजू शकतो.अग बाळ होण्याच्या आधी तेजलने पूर्ण ९ महिने काम केले. तिची तिच्या कामाप्रती असलेली प्रबळ निष्ठा एवढी स्फूर्तीदायक होती की तिने एवढ्या कठीण काळात सुद्धा बाळाला आणि स्वतःला खूप छान सांभाळले. या आयटी क्षेत्रात स्वतःला टिकवून ठेवणे किती अवघड आहे माहित आहे का तुला? पण कृष्णाचा जन्म झाला आणि आपले चिरंजीव सुमित यांनी मात्र तिच्या करिअर ला आडकाठी टाकली."तूच आपल्या बाळाला सांभाळ, तू त्याची आई आहेस. तुझ्या करिअर ची आता काय गरज? " असे बोलून तिला हिणवले आणि स्वतः मात्र सोपस्कररित्या नव्या बाळाच्या जबाबदाऱ्या निभावण्यापासून विलग झाले.शेवटी पुरुषी अहंकार एक कर्तृत्ववान स्त्रीला नमवल्याशिवाय शांत होत नाही."

" अहो तुम्ही सुमितवर सरळ सरळ आरोप करताय. आपला मुलगा आहे तो."

" हो आपला मुलगा आहे तो.पण एक चांगला नवरा होण्यासाठी त्याने कधी प्रयत्न केले? तेजल सतत कृष्णा झाल्यापासून घरात काम करत असते. तिला जरासुद्धा उसंत मिळत नाही.तू तर जसं काही तिला कामवाली बाईच बनवले होते. शेवटी सासुपणा तूसुद्धा दाखवलाच ना तिला. तिच्या मनातले दुःख माझ्यातल्या बापाने ओळखले आणि मीच तिला तू पुन्हा ऑफिस जॉईन कर असे म्हंटले."

" अहो पण लहान मूल आहे म्हणून मी तेजलला म्हणत होते ,ऑफिस ला जाऊ नको म्हणून !"

" अग काय बोलतेस तू ? कृष्णा आता ५ वर्षांचा झालाय. त्याला स्वतःचे बऱ्यापैकी सारे कळते,नव्हे कळायलाच हवे.त्यानेही आईशिवाय स्वतःचे जग असते हे समजून खेळायला हवे.म्हणून मी तिला या नव्या मातृत्वाच्या जबाबदारीतून जरा वेळ मुक्त होऊन जरा बाहेर पडून फ्रेश हो असं म्हंटल."

" हो हो तुम्ही तिचीच बाजू घ्याल नेहमीप्रमाणे!"

" वा रे वा! कालच तू आपल्या मुलीला म्हणजे प्रेक्षाला सासू सासरे आहे ना मग त्यांच्याकडे बाळाला देऊन थोड बाहेर पड,जॉब कर असे सांगत होतीस.अग तेजल सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे ना! तीही या नव्या आईपणाच्या जबाबदारीतून थोडा विसावा शोधत असेलच ना? "

" हो मला पटतय तुमचं ! पण तिला एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा ऑफिसला गेल्यामुळे जॉब जमेल करायला? "

" अगं तेजस्वी सूर्याला अचानक आलेल्या काळोख्या ढगांची कधीच भीती वाटत नाही. काही काळापुरते ते तेज झाकोळले गेले असले तरी थोड्या वेळातच सूर्य आपली शान असणारा तेजोमय प्रकाश सर्वत्र पसरवतो. अगदी त्याच प्रमाणे आपली तेजल एवढ्या दिवसानंतर सुद्धा तिचे आयटीक्षेत्रातील सर्व सॉफ्टवेअर अगदी व्यवस्थित हाताळेल याची मला पूर्ण गॅरंटी आहे."

" पण काय हो ,कृष्णाच्या आठवणीत तिचा जीव कळवळला आहे,हे तिच्या आतापर्यंत आलेल्या १० मेसेजेस करून नक्की कळते!"

" काय ? बापरे एवढे मेसेजेस कधी केले तेजल ने? अरे बापरे मोबाईल सायलेंट वर होता वाटत!"

  तेजलचे सासरे तिला फोन लावतात, 

" हॅलो "

" अहो बाबा,कृष्णा बरा आहे ना? रडत तर नाही ना? त्याने जेवण केले ना? त्रास तर नाही ना दिला तुम्हाला?"

"अग हो हो,किती प्रश्न विचारशील? अग तुझा लाडोबा मस्त आजोबा आणि आज्जी सोबत खेळतोय या लाडक्या स्वारी साठी मला घोडा बनून त्याला पाठीवर घ्यायचे आहे.तू काही काळजी करू नकोस."

" हो बाबा. पण एवढ्या दिवसात कृष्णाला पहिल्यांदा एवढ्या वेळ मी माझ्यापासून लांब केलंय.म्हणून काळजी वाटते त्याची."

 " अग तू बिनधास्त रहा.तो खूप छान खेळतोय.त्याला तुझी आठवण सुद्धा येऊ देत नाही मी.तू काम आटोपल्यावर निवांत घरी ये."

" हो बाबा."

    कृष्णा खूप खेळतो, आज्जी,आजोबा यांच्यासोबत खूप धमाल करतो.मस्त जेवण करतो, बागेत सुद्धा जाऊन येतो.मग घरी आल्यावर निवांत झोपतो.
   
        इकडे सासूबाई सुद्धा तेजलला आपण खरच आपली मुलगी मानायला हवे असा विचार करतात.ती सुद्धा थकत असेल,बोर झाली असेल घरात,तिची सुद्धा नव्या मातृत्वामुळे दमछाक होत असेल असा विचार करतात. अशात संध्याकाळ होते.तेजल हळूच दाराजवळ येऊन आपला कृष्णा काय करतोय याचा कानोसा घेते.

   तेवढ्यात कृष्णा तिला दारातच बघत धावत तिच्याकडे येतो,

" आई,आई.. तुला माहित आहे ,मी आणि आजोबांनी आज खूप मज्जा केली."

तेजल सुद्धा दाटून आलेले अश्रू पुसत थोड हसत हसत म्हणते,

" हो का रे बाळा! छान !"

" आई तू ना आता रोज बाहेर गेलीस तरी काही प्रोब्लेम नाही.आजोबा मला ना खूप छान खेळवतात.आजी सुद्धा खूप छान खाऊ देते मला. मी राहीन तुझ्याशिवाय!"

     एका आईच्या मनातले भाव ,एका स्त्रीचे भाव इतक्या लहान जीवाला अचूक उमगले होते. एका स्त्री चे मन हे न उमगण्याइतके कठीण सुद्धा नसते हे या बाळकृष्णरुपी बालकाने दाखवून दिले.

     थोड्याच वेळात सुमित ऑफिस वरून घरी आला.पुन्हा लहानग्या कृष्णाने मी आईशिवाय खूप छान राहिलो असे स्वतःच्या बाबांना अगदी पटवून सांगितले आणि  तेजलचे ऑफिसला जाणे चालू झाले. 

        वाचकहो, अशारीतीने तेजल ने हिंमत दाखवत सासऱ्यांचा तसेच कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळवला आणि बाहेर पडून स्वतःचे तसेच लहानग्या कृष्णाचे परावलंबित्व नष्ट केले.

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कॅटेगरी - लघुकथा ( स्त्रीला समजून घेणे खरच कठीण असते का)
जिल्हा_ नाशिक