Login

एक उनाड वाट लिहिण्यास कारण की

Thank you dear

कादंबरी लिहिण्याचा किंवा स्पर्धेत भाग घेण्याचा माझा अजिबात विचार नव्हता. पण एप्रिल महिन्यात 14 कि 15 एप्रिलला आठवत नाही, आपल्या योगिता टवलारे मॅम मला म्हणाल्या, "कादंबरी" लिही. छान लिहितेस तु. आधी तर मी नाहीच म्हटलं. पण जेव्हा त्यांनी सांगितलं कि 31 जुलै पर्यंत लिहू शकतेस. तेव्हा ठीक आहे म्हटलं लिहितेच.

मग काय जुन्या वह्या काढल्या दिवाणच्या आतल्या आणि मी 2010 साली लिहिलेली एक कथा मला ऑफिस सांभाळून जास्त ताण न येता लिहिण्याजोगी वाटली. हो 2010 ! तो काळ माझ्या लिखाणाचा, कल्पना विश्वात रमण्याचा सुवर्ण काळ होता. माझ्या डोक्यात कथांचा पूर यायचा आणि मी तो होईल तसं वहीच्या पानावर उतरवून ठेवायची. गंम्मत म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यावर स्क्रिप्ट राईटर व्हायचं भूत सवार झालं होतं. मी बुनियाद, शांती सारख्या जुन्या हिंदी मालिका पासुन तर एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की , क्योंकी सास भी कभी बहु थी सारख्या भयानक मालिका पाहून मोठी झालेली. त्यामुळे मला वाटायचं यांच्या पेक्षा चांगलं तर मीच लिहू शकते (त्या  वयात हवेत असतोच माणूस). मी त्या वर्षी चार पाच मोठया कादंबरी सारख्या स्क्रिप्ट लिहिल्या आणि दोन पोस्टाने वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसला पाठवून दिल्या. पण काही रिप्लाय आला नाही. येणार तरी कसा, आता जेव्हा मी ते लिखाण बघते तेव्हा समजतं की काही गोष्टी खूपच बालिश लिहिल्या होत्या. त्यातलीच एक कथा मागच्या लॉकडाऊनमधे मी मॉम्सप्रेससो ऍप्प वर लिहिली आहे, 
'स्वीकार ' पण ती तेरा भागातच संपवलेली. 

या स्पर्धेसाठी 30 भाग लिहिणं अनिवार्य. म्हणून मी 

'आपुलकी, एक प्यार का एहसास' 

130 पानांची चक्क हिंदीत लिहून काढलेली.  जिचा दूर दूर वास्तवाशी काहीच संबंध नाही. एका तरुण मुलीनं बघितलेलं दिवास्वप्न असं तुम्ही या कथेला म्हणू शकता. हिचंच मराठीत रूपांतर करून लिहिली 'एक उनाड वाट'.

माझं वाचन खूप प्रगल्भ आहे. संस्कृत कालिदास पासुन तर इंग्रजी द अल्केमिस्ट लिहिणारे पाउलो कोहेलो, द मॉंक व्हू सोल्ड हिज फेरारी लिहिणाऱ्या रॉबिन शर्मा ते शिवा ट्रिओलॉजी लिहिणाऱ्या आमिष सर्वांचे लेखन मला लिहायला आणि जीवन आनंदाने जगायला प्रेरित करतात. म्हणून मी एक उनाड वाट लिहितांना त्यात निसर्गवर्णन आणि प्रेरणादायी विचारांचा समावेश केला आहे, काही सामाजिक संदेश द्यायचा, व्यक्तिमत्व जडण घडण होताना लागणाऱ्या गोष्टींचा समावेश करायचा प्रयत्नही केला आहे.

मी अजिबात विचार नव्हता केलेला की इतका प्रचंड प्रतिसाद माझ्या या कादंबरीला मिळेल. कमेंट्स वाचल्या की मी परत माझंच लिहिलेलं वाचून काढते अन विचार करते, 
'खरंच इतकं चांगलं लिहीलं का?'

मग स्वतःवर हसते आणि आता याच्यापेक्षा चांगलं लिहावं लागेल म्हणून चिंताग्रस्तही होते. 

पण खरंच वाचकवर्ग तुम्हाला साष्टांग प्रणाम. तुम्ही लिहिण्याचा उत्साह द्विगुणित करता. आपण कोणीतरी मोठे लेखक असल्याचा भाव उगीच मनाला शिवून जातो अन मग स्वतःच स्वतःला सांगावं, 

"ए हरभऱ्याच्या झाडावरून खाली ये. अजून खूप काम करायचं आहे. खूप काही लिहायचं आहे."

एकूण हा प्रवास खूपच मजेदार. 

लिहितांना एकच विचार मनात होता. हलकं फुलकं लिहायचं. आधीच बाहेरचे वातावरण कोरोनामुळे गंभीर त्यात कथा गंभीर नको. लिहितांना मलाही हसू यावं आणि वाचकांच्याही चेहऱ्यावरही स्मित यावं. 

कमेंट्समधे खूप वाचकांनी लिहीलं, 
"इतक्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं."

मी थोडी फिल्मी आहे ना. म्हटलं बाकी बाते ब्रेक के बाद. म्हणूनच अंतिम भागात नेक्स्ट सिझन बद्दल विचारलं. आणि जसं मला अपेक्षित होतं जवळ जवळ सर्वच कमेंट, 

"नेक्स्ट सिझन हवाच !" या आशयाच्या आहेत. 

तर येतेय सोमवार पासुन परत तुम्हाला या उनाड वाटेवर फिरायला घेऊन जायला. 

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार