एक उनाड वाट पर्व दुसरे #मराठी_कादंबरी भाग-4

Thank you

एक उनाड वाट पर्व दुसरे भाग 4
इंदिराला जाग आली तसा अनुभव उठून उभा झाला.

"अरे वा, फूड पॉइझन मला झालं, बिमार मी, तु पाहायला मला आलीस आणि स्वतःच झोपून गेली. खूपच छान." अनुभव तिला चिडून म्हणाला.

"मिस्टर अनुभव इतकं चिडण्यासारखं काय त्यात. थकली होती मी म्हणून लागली झोप." तीही चिडली, "तुम्हाला काय माहित किती ताप झाला माझ्या डोक्याला तुमच्यामुळे. पचत नाही तर खाल्ली कशाला सावजी?"

इंदिराने चौकशी केली तेव्हा तिला समजून आलं कि अनुभवनी रात्री बाहेरून एक हंडी सावजी मागवली होती आणि रागारागात पूर्ण खाल्ली. ज्याने त्याचं पोट खराब झालं, रात्रभर तो खरंच टॉयलेटला गेला आणि पहाटे पहाटे उलटी झाली तेव्हा त्याला कळलं कि आता डॉक्टरला दाखवल्या शिवाय पर्याय नाही.

"माझी इच्छा झाली खायची, खाल्ली मी. तुला काय करायचं?"

"मला काही करायचं नाही. पण त्यामुळे मला सकाळी सकाळी यावं लागलं ना इथे टोले घेत."

"ओहो खूप त्रास झालेला दिसतोय तुला माझ्यामुळे. आता ठणठणीत बरा झालोय आणि उद्याच फ्लाईटनी निघून जाईल मुंबईला." दार उघडून तिला म्हणाला, "तेव्हा तु जाऊ शकतेस इथून."

इंदिरा तिथेच थबकली. तिला वाटलं सकाळी पडलेल्या स्वप्ना बद्दल त्याला सांगावं आणि काळजी घे म्हणावं का? पण तिला जागेवरच उभी पाहून अनुभवनी तिला दोन्ही हातानी उचलून घेतलं.

"तुला हॉटेलच्या दारापर्यंत सोडून येतो." तो म्हणाला. रूमच्या बाहेर पडणार तोच नमन त्यांच्या समोर आला.

"आय एम सॉरी. मला वाटतं मी चुकीच्या वेळी आलो." तो अनुभवची विचारपूस करायला आणि इंदिराला भेटायला आला होता. इंदिराला अनुभवनी असं उचलून घेतलेलं पाहून त्याला वेगळंच वाटलं. तो जाण्यासाठी वळला पण इंदिरानी त्याला थांबवलं.

"नमन थांब. तू अगदी बरोबर वेळेवर आलास." तो थांबला. अनुभवला खुम्बा मारून ती म्हणाली, " सोड मला."

अनुभवनी तिला सोडून दिलं. ती धबकन खाली पडली.

"आ SSS" ती ओरडली. नमननी जाऊन तिला उभं व्हायला मदत केली. त्याला समजलं यांच्यात काहीतरी बिनसलं.

"नमन तूझ्या रूमची चाबी दे."

"इंदिरा तुला माझ्या रूमची चाबी कशाला हवी?"

"हा माणूस मला इथे रूममधे राहू देणार नाही. घरी मी जाणार नाही कारण गेली तर आई बाबा माझं डोकं खातील. सकाळ पासुन पिस्या सारख्या अवतारात फिरतेय  मी. मला फ्रेश व्हायचं आहे."

अनुभव दारातच उभा राहुन त्यांना बघत होता. नमनला काही समजत नव्हतं इंदिराला काय म्हणावं. तो अनुभवकडे बघत तसाच उभा आहे हे पाहून इंदिराला आणखी जास्त राग आला.

"ओके मी हॉटेलच्या समोर जाऊन बसते. तुझं विचार करून झालं कि सांग मला ." इतकं बोलून इंदिरा पटपट हॉटेलच्या मेन गेट कडे जाऊ लागली.

"इंदिरा, " नमनही तिच्या मागे जाऊ लागला, "इंदिरा थांब."

अनुभवला चांगलाच झटका बसला. त्याच्या मनात आलं, 

"इंदिराने तर कधीच सांगितलं नव्हतं तिचा कोणी नमन नावाचा मित्र आहे म्हणून. म्हणजे डिवोर्स फाईल केल्या बरोबर तिने तिच्यासाठी नवीन जोडीदारही शोधला कि हा भेटल्यावर तिच्या मनात आलं कि तिने चूक केली माझ्याशी लग्न करून आणि म्हणून माझ्या कडून डिवोर्स घ्यायच्या इतकी हात धुवून मागे लागली कि मागचा पुढचा विचार न करता सरळ कोर्टात केस टाकली? मला उत्तर मिळवण्यासाठी यांच्यावर नजर ठेवावी लागणार."

तोही त्यांच्या मागे मागे गेला. नमन इंदिराला समजावून त्याच्या खोलीत घेऊन जातांना दिसला. अनुभव दुसरीकडे तोंड करून उभा झाला.

"काय हा वेडेपणा इंदिरा? का अशी वागतेय?" नमन तिच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला.

"मग काय करू? तुला तर माहितेय ना मी लहानपणापासून कशी आहे ते?" इंदिरा रडत त्याला म्हणाली.

"लॉबीत असं रडणं बरं नाही. एम्प्लॉयी बघतील तर...  मी सिनियर मॅनेजर आहे ना हॉटेलचा."

"खोलीत जाऊन बोलु मग." ते नमनच्या खोलीत गेले.

अनुभवचा ट्यूबलाईट जळला, "ओहो म्हणजे ही लहानपणापासून याला ओळखते. म्हणजे हे लहानपणीचे मित्र मैत्रीण आहे. हे तर असं झालं कि अचानक खूप दिवसांनी गाठभेट झाली आणि बचपण का प्यार उमड आया. म्हणजे इंदिरा माझ्याशी हेतू पूर्वक भांडत होती का? मला सर्व माहित करावंच लागेल. आजी, सुबोध आणि तिच्या बाबालाही मीच जबाबदार वाटतोय आमच्यातील वादाला. कमीत कमी त्यांना तरी क्लियर करू शकेल मी जबाबदार नाही म्हणून. पण कसं?" तो त्याच्या खोलीत जाऊन विचार करू लागला की इंदिराच्या मनात नक्की नमन विषयी काय आहे हे जाणून घ्यायला त्याला इंदिरा सोबत नागपूरला राहणं जरुरी आहे. पण राहण्यासाठी बहाणा तर हवा.

"आता कसं वाटतंय?" नमनने इंदिराला पाणी प्यायला देऊन विचारलं.

"ठीक वाटतंय."

"काय झालं इंदिरा? सकाळी तर त्याला पाहायला माझ्यापुढे हात जोडत होतीस आणि आता चक्क त्याच्यासोबत तुला एका खोलीत राहायचंही नाही." नमनने तिला विचारलं.

"आमच्यात गैरसमज खूप टोकाला गेले आहेत. मला वाटतंय तो आता माझ्या सोबत कधीच आनंदी नाही राहू शकणार. म्हणून मी नागपूर फॅमिली कोर्टात डिवोर्स केस फाईल केली."

"काय? असं काय झालं तुमच्यात? जगात असे कोणतेच गैरसमज नाहीत जे दूर नाही होऊ शकत आणि तु तर मानसशास्त्राची विद्यार्थीनी होतीस. एखाद्या चांगल्या फॅमिली काऊन्सलर कडे जायचं होतं." तो कळवळून तिला म्हणाला. इतक्या वर्षांनी भेटल्यावर तिला असं त्रासलेलं पाहून त्याला खूप वाईट वाटलं.

"काही फायदा नाही रे. हे नातं आता काही टिकणार नाही." ती नॅपकिनने डोळे पुसत त्याला सांगू लागली,

"आम्ही खूप प्रेम करायचो एकमेकांवर. विश्वासही भरपुर होता आमचा. पण म्हणतात ना खरी कसोटी हनिमून पिरेड संपल्यावर नातं टिकवतांना सुरु होते. तसंच झालं आमचं.

मायरा त्यांच्या आयुष्यात परत आली. लंडनच्या फेमस ऍक्टिंग स्कुल मधून डिग्री तर घेऊनच आली पण कौन्सिलिंग घेऊन चार चौघात आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा कसा उमटावा याचेही प्रशिक्षण घेऊन आली.

डायरेक्टर कोहलींनी जेव्हा अनुभवची तिच्या सोबत भेट घडवून दिली. त्यांच्या नवीन प्रोजेक्ट साठी हिरोईन म्हणून तिचं ऑडिशन घेतलं त्यालाही शॉकच बसला. तिच्या बोलण्या चालण्या पासुन ते अभिनय करण्यात. सर्वच गोष्टीत सकारात्मक बदल झालेला दिसला आणि अनुभवनी तिच्यासोबत फिल्म करायला होकार दिला.

इंदिरा कधीच अनुभवच्या फिल्म करियरमधे हस्तक्षेप करत नव्हती. तो कोणत्या अभिनेत्री सोबत चित्रपट करतो, पार्टीला जातो तिला काहीच देणं घेणं नव्हतं. पण लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा नंतर एक दिवस अनुभवला सरप्राईज द्यायला त्याला न कळवता ती मुंबईला गेली. घरी जाऊन बघते तर मायरा अनुभव आणि इंदिराच्या बेडरूममधे त्यांच्या बेडवर तिची (अनुभवने लग्नाच्या पहिल्या ऍनिव्हरसरीला तिला भेट दिलेली) नाइटी घालून झोपलेली.

इंदिराच्या मनात आलं ड्रॉवरमधे ठेवलेला फळं कापायचा चाकू घेऊन तिच्या आरपार करावा. पण कसंतरी स्वतःवर ताबा ठेऊन तिने फक्त टेबलवर ठेवलेला पाण्याचा मग घेऊन मायराच्या तोंडावर ओतला.

"हां हां SSSS." मायरा खळबळून जागी झाली. नक्की काय होतंय हे न समजून भांबावली, "पागल आहेस तु? असं पाणी फेकतात का झोपलेल्याच्या तोंडावर?" ती इंदिराला संतापून म्हणाली.

उलटा चोर कोतवाल को डांटे. इंदिराही संतापली होती. तिने मायराच्या कानशिलात द्यायला हात उचलला. पण अनुभवनी तिचा हात पकडून तिला थांबवलं.

"मायरा तु जा घरी. तुझे कपडे बाथरूममधे आहेत." अनुभव मायराला म्हणाला.

मायरा निघून गेली. इंदिरा मात्र जाम संतापली होती. मायराने घातलेली नाइटी घरामागे नेऊन जाळून टाकली.

"इंदिरा, काय करतेय तु?" अनुभव तिला समजावून सांगू लागला, "अगं रात्री पार्टीत ती खूप जास्त पिली होती. तिला अजिबात शुद्ध नव्हती."

"म्हणून तु तिला घरी घेऊन आला. हेच म्हणायचं आहे  ना." त्याला मधेच तोडून इंदिरा बोलली, "हा बहाणा जुना झाला मिस्टर अनुभव."

"तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" अनुभवनी तिला विचारलं.

"आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. पण तिच्यावर नाही."

"अगं ती आता पहिल्या सारखी बालिश नाही राहिली. ती खूप समंजस झाली आहे. आमच्यात छान मैत्री झालीय शूटिंगच्या दरम्यान. तिचे आजोबा मुंबईत आहेत म्हणून तिने मला पार्टीत जायच्या आधीच सांगितलं होतं कि ती पिणार नाही. पण पार्टीत सर्वांनी तिला फोर्स केला आणि घेतली तिने."

"किती डिफेन्ड करताय तिला. खूपच खोलवर रुजलेली दिसतेय तुमची मैत्री." इंदिराचा राग अजूनच वाढला. ती तणतण करत बेडरूम मधे जाऊन तिचं सामान पॅक करू लागली.

"इंदिरा तुला गैरसमज होतोय." तो तिने बॅगेत ठेवलेला एक एक कपडा परत कपाटात ठेऊ लागला.

"मला गैरसमज होतोय हे दिसतंय तुम्हाला. पण ती आपल्यात फूट पडायचा प्रयत्न करतेय हे नाही दिसत आहे. माझ्या कपाटात इतके कपडे असूनही बरोबर तुम्ही दिलेली नाइटीच दिसली तिला घालायला?"

"मीच दिली होती. कारण माझ्या इतकं काही लक्षात नव्हतं आणि एका नाइटीशी तु इतकी अटॅच असणार असंही वाटलं नव्हतं."

"माणसाची जातच मेली खराब. सर्व एकाच माळेचे मनी. लग्नाच्या वाढदिवसाला दोन महिन्या पूर्वी दिलेली वस्तू तुमच्या लक्षात नाही."

"इंदिरा जगात लक्षात ठेवायला आणखीही खूप गोष्टी आहेत."

"पण ती बरोबर लक्ष ठेऊन होती असं दिसतेय ."

"आता तुला कसं समजाऊ. तिच्या मनात असं काहीच नाही. उलट 'प्यार एक एहसास' च्या शूटिंग दरम्यान जे काही झालं त्याची माफी मागितली तिने मला."

"म्हणजे फुल्ल प्रूफ प्लॅन करून आली आहे ती." इंदिरा बेडवरची बेडशीट काढून जमिनीवर फेकून म्हणाली.

अनुभव डोक्याला हात लावून बसला.

"मुंबईत अजून कोणी मित्र मैत्रीन नाही मिळाली तिला जायला किंवा तुम्ही तिला तिच्या एखाद्या मैत्रीनीकडे सोडायचं होतं किंवा एखाद्या हॉटेलात रूम बुक करून द्यायची होती. घरी का आणलं तेही मी नसतांना."

"तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं. बस ! आता या विषयावर मला एकही शब्द बोलायचा नाही." अनुभव संतापून निघून गेला, "तुही हा विषय परत न काढलेले बरे."

तिने मूड ठीक व्हावा म्हणून टीव्ही लावला तर बॉलिवूड खबरे नावाचा प्रोग्राम सुरु होता. त्यात अनुभव आणि मायरा बद्दल चर्चा सुरु होती. मायराने पार्टीत जायच्या आधीच एका पत्रकाराला पार्टी झाल्यावर तिला फॉलो करायला सांगितलं होतं. त्याने गुपचूप अनुभव पिऊन बेशुद्ध झालेल्या मायराला घरी घेऊन जाईपर्यंत फॉलो केलं आणि शूटिंगही घेतली. सकाळी त्याचीच एक मोठी बातमी बनून तयार झाली.

मायराला फक्त अनुभव आणि इंदिराला त्रास द्यायचा होता बाकी काहीच नाही. तिने आपलं काम केलं आणि पत्रकाराने त्याचं.

"अनुभव, अनुभव." इंदिरा त्याला जोरात आवाज देत स्टडीत गेली. तो तिथेच बसून होता.

"का ओरडतेस इंदिरा?" त्यानं शांततेत विचारलं.

"न्यूज बघितली, तुझ्या रात्रीच्या मोठेपणाची चर्चा रंगली आहे टीव्हीवर."

"मग काय करू? नेहमीचच आहे ते."

"पण आपण थोडं सांभाळून राहायचे ना. म्हणजे अशा न्यूजला हवा मिळणार नाही. आजी, माझे आई बाबा ही न्यूज बघतील तर काय वाटेल त्यांना?"

"इंदिरा मी एक स्टार आहे. माझं खाजगी आयुष्य माझं नाही. हे मी लग्नाच्या आधीच तुला सांगितलं होतं. तरीही तु माझ्याशी लग्न करायचा हट्ट केला. मला तर या सगळ्याची आधीच कल्पना होती म्हणून मी नकारही दिला होता लग्नाला. आठवतंय ना, तुला लग्न करायचं होतं माझ्याशी. मला नाही." अनुभव तिच्याकडे बघून बोलला.

"मग या लग्नाचा काहीच अर्थ नाही. कोर्टात भेटू." ती थंडपणे त्याला बोलली. 

"ओके !" त्यानं इंदिराला गांभीर्याने घेतलं नाही. त्याला वाटलं राग गेला कि ती येईल परत. पण ती आलीच नाही.

(वर्तमान काळ)

"नमन मला कधी वाटलंच नव्हतं अनुभव मला असं काही बोलेल. मला तर फक्त त्याला ते प्रेम द्यायचं होतं ज्याला तो त्याचे आजोबा, आई गेल्यावर मिस करत होता. पण त्याचं ते शेवटचं वाक्य ऐकून वाटलं मी फक्त त्याच्या रस्त्यात आली आणि अडथळा बनली. तो माझ्या सोबत आनंदी राहणं अशक्य. कारण मी माझ्या डोळ्यासमोर कोणी चुकीचं वागत आहे हे बघून न बघितल्यासारखं करणाऱ्यामधून नाही. तर त्याची चूक दाखवून ती त्याला दुरुस्त करायला लावणारी आहे. म्हणून मीच डिवोर्स फाईल केला."

नमनच्या मनात आशा निर्माण झाली. त्याला वाटलं तिचा हातात घेऊन तिला म्हणावं, "तु जशी आहेस तसंच मी तुला स्वीकारेल आणि कधीच काही गैरसमज करून घेणार नाही." पण त्यानं स्वतःला सावरलं.

"जाऊदे ते सगळं. तुला फ्रेश व्हायचं होतं ना. जा तु फ्रेश हो. मी हॉटेलच्या बुटीक मधून तूझ्यासाठी कपडे मागवतो. तुला आवडेल ते घालून घेशील."

"नको. मी याच कपड्यांमधे ठीक आहे." ती म्हणाली.

"हो तु ठीक आहेस. पण तुझा मूड नाही ना." तो तिला समजावू लागला, "खूप वेळा छान कपडेही आपला मूड बनवतात समजलं. म्हणून म्हणतोय."

"ठीक आहे मग."

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all