एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-5

This is the story of a young girl & her dreams. Thank you

जेवण बघून इंदिरा खूपच खुश झाली. साजूक तूप लावलेल्या पोळ्या, दाल तडका, भात आणि वांग्याची भाजी. डेझर्टमधे मँगो आईसक्रीम म्हणजे सोने पे सुहागा. पोट तंतोतंत भरेल इतकं जेवल्यावर तिला शांत वाटलं. तिनं परत एकदा मिनुला फोन केला. काहीच उत्तर नाही. औषधं घेतली, त्यांच्या हेवी  डोज मुळे तिला लवकरच झोप लागली.

सकाळी खिडकी उघडून बघितली तर इंदिराला ती एका प्रशस्त बंगल्यात असल्याचं समजलं. बंगल्याच्या आवारात गुलाब, पारिजात, चाफा आणि मोगरा अशी फुलझाडं लावली होती. उठल्या बरोबर फुलांचं दर्शन यापेक्षा सुंदर गोष्ट नाही जीवनात. तिच्या मनात आलं, ओंजळीत पारिजातचा सडा वेचून घ्यावा. पण लगेच तिनं मनाला सांगितलं, आपलं घर नाही हे फुलं वेचत बसायला.

"अरे वा ! आपण उठल्या लवकर. छान !" लिंबू रंगाचा शर्ट आणि हिरवा ट्राऊझर घातलेली ओशिन इंदिराला म्हणाली, "सर शूटला जायच्या आधी भेटायचं म्हणताहेत. तुमचे कपडे वॉश करून बाथरूममधे ठेवले आहेत. अंघोळ आणि ब्रेकफास्ट करून बंगल्याच्या हॉलमधे या."
"ठीक आहे. येते."

इंदिरा तयार होऊन हॉलमधे गेली. ती हॉल च्या सेंटरला असलेल्या झुंबरकडे बघतच बसली. असं झुंबर तिनं फक्त सिनेमात पाहिलं होतं. हॉल खूपच प्रशस्त होता. बसायला मॉडर्न स्टाईलचा सागवानचा सोफासेट, बाजूलाच डायनींग टेबल. 
"आपणही असंच घर सजवू आपलं. " ती स्वतःशीच पुटपुटली. 
"इंदिरा मॅम सर. " ओशिन तिला सरकडे घेऊन गेली. ओशिनचे सर फोनवर बोलत होते. फोन ठेऊन जसे ते इंदिराकडे पलटले. त्यांना पाहुन इंदिरा स्तब्ध झाली. मेणाचा पुतळा झाली. 'आ' वासून त्यांना पाहु लागली. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
"दिल क्यू ये मेरा शोर करे
दिल क्यू ये मेरा शोर करे 
इधर नही
उधर नही
तेरी ओर चले!" 
असंख्य व्हायोलिनवर हे गाणं तिच्या मनात वाजू लागलं. तिनं डोळे चोळून बघितलं तरीही तिच्या समोर अनुभव सिन्हाच उभा होता.
"अनुभव सिन्हा द ग्रेट ऍक्टर, मोस्ट एलिजिबल बॅचलर, मुलींच्या हृदयाची धडकन आज माझ्या पासून फक्त दोन पाऊल दूर आहे आणि माझ्याजवळ सेल्फी काढायला माझा स्मार्टफोन नाही. यापेक्षा मोठं दुःख काय असावं?" तिच्या मनात आलं. "ती श्वेता त्या कपिल शर्माचा ऑटोग्राफ आणि सेल्फी किती मिरवत होती आणि भाव खात होती. माझी अनुभव सोबत सेल्फी पाहुन जळून राख झाली असती तिची. पण आता मी कॉलेजच्या पोरींना सांगितलं कि मी अनुभव सिन्हाला भेटली, भेटलीच नाही तर त्यानं मला वाचवलं, रात्रभर त्याच्या घरी ठेवलं. असं कितीही डोकं आपटून सांगितलं तरीही माझ्यावर विश्वास ठेवणार का त्या? "
"झालं मला पाहुन? " अनुभव सिन्हानं तिला विचारलं. त्याला या सर्व गोष्टींची सवय झालेली. तिनं चक्क नकारार्थी मान हलवली.
"ओशिन पाणी दे तिला."
"इंदिरा मॅम पाणी."
"अं.. थँक्यू !" तिनं गटगट पाणी पिऊन घेतलं.
"तुमचे खूप खूप आभार सर. मला तेव्हा समजलंच नाही मी काय करतेय. माझ्या मागे दोन गुंड प्रवृत्तीची माणसं लागली होती. मी खूप भिऊन गेली होती. मागे पाहत धावली आणि तुमच्या गाडीवर येऊन धडकली."
"अजून काही? "
"बस इतकंच."
"घरून पळून आलीस ना तू?" अनुभवनी तिला विचारलं कि सांगितलं काही कळलं नाही. त्यात सगळ्यांना आपण घरून पळून आलोय असंच का वाटतंय? आपल्या चेहऱ्यावर लिहीलं आहे का तसं. स्वतःशीच पुटपुटत तिनं हातानं चेहरा चाचपडला. हात परत जखमेवर लागला. परत दुखलं,
"आई गं !"
"हे काय करत आहेस?"
"माझ्या चेहऱ्यावर कुठे लिहीलं आहे का कि मी घरून पळून आली ते पाहत आहे."
"यु आर इम्पॉसिबल. मला खूप कामं आहेत. पण तूझ्या कागदपत्रावरून दिसून आलं कि तू एका चांगल्या घरातील मुलगी आहेस. म्हणून तुला फक्त इतकंच समजावून सांगतोय. मुंबईत रोज लाखो तरुण मुली हिरोईन बनायला येतात. पण काहीच अगदी बोटावर मोजता येईल इतक्या मुली हिरोईन बनतात. त्याही कितीतरी कष्ट घेऊन अन नको त्या गोष्टींना सामोरं जाऊन. काहींचे अनुभव ऐकून अंगावर काटा येतो माझ्याही."
हिरोईन ! याला कोणी सांगितलं कि मी हिरोईन बनायला आली इथं? अनुभव बोलतच होता. "हे बघ तुझं शिक्षण छान झालं आहे. हे दहा हजार घे आणि आपल्या शहरी, आपल्या घरी परत जा. आईबाबा काही म्हणाले, रागावले तर ओशिनचा मोबाईल नंबर घेऊन ठेव. तिला कॉल करून सांग. मी बोलेल तूझ्या पेरेंट्स सोबत आणि समजावून सांगेन त्यांना सगळं."
"OMG! इतकं भाषण माझ्या बाबानंही मला कधी दिलं नाही. खूप कृपा झाली तुमची. मला तुमचे पैसे नको आणि मदतही नको. मी माझी माझी जाते मला कुठे जायचं ते!"
"ओके ! जशी तुझी इच्छा !" म्हणत अनुभवनं मोबाईलवर कॉल लावला आणि बोलण्यात बिझी झाला.

"अनुभव सिन्हाच्या घरी येऊन रात्रभर राहून, एक सेल्फी नाही काढली, ऑटोग्राफ तर घे !" इंदिराचं मन तिला म्हणालं.  तिनं मागे वळून बघितलं. अनुभव मोबाईलवर बिझी होता. मग तिनं मनी पर्स चेक केली. त्यात फक्त अठराशे रुपये होते. 
"मोठया तोऱ्यात मदत नाकारलीस पण आता जाणार कुठे? पैसे तरी घेऊन घ्यायचे, पहिला पगार हातात येताच देऊन द्यायचे होते परत." तिच्या मनानं तिला फटकारलं. बंगल्याच्या बाहेर निघाली तेव्हा तिला वाटलं जाऊन घेऊन घ्यावी मदत. हे मुंबई शहर खरंच खूप भयानक आहे. गिळून घेईल आपल्याला.ती तिथंच बंगल्या समोर घुटमळत उभी होती. अनुभव सिन्हाची आलिशान ब्लॅक लॅम्बर्गिनी बंगल्याच्या बाहेर निघाली. तिथंच थांबली गेट बाहेर. तिला वाटलं तिच्यासाठीच थांबवली आहे अनुभव सिन्हानं कार. पण आपण तर मदत नाकारली ना. मग आता कशाला त्याच्या कार मधे बसायचं. म्हणून ती विरुद्ध दिशेनं चालू लागली. "अरे पण या एरियातून बाहेर कसं निघायचं? "  म्हणून ती कारकडे धावली लिफ्ट मागायला तर कार क्षणात कुठच्या कुठे निघून गेली. हे सगळं मिनूमुळे झालं. मी म्हटलं होतं नाही येत मुंबईला. पण मला ये ये म्हणाली अन गायब झाली. तिची त.. नालायक हलकट. " मनातल्या मनात तिनं मिनुला खूप शिव्या दिल्या अन तिचा मोबाईल वाजला. मिनूचा कॉल होता.
"काय गं हलकट, नालायक, बेशरम ! आता चेव आला तुला होय. " बोलतांना इंदिराचा चेहरा रागानं लाल झाला, "मी मेली कि जिवंत आहे हेच बघायला फोन केला ना तु? तर मग ऐक  जिवंत आहे मी. मैत्रिणीच्या नावावर कलंक आहेस तु ! तुला काय वाटलं तु मला छत नाही दिलं तर मरेल मी?"
"तो माणूस मेला रात्री." मिनू अगदी थंड आवाजात बोलली.
" कोण माणूस? " इंदिरानं रागातच विचारलं.
"तोच ज्याचं नाव मला घ्यायचं नाही, ऐकायचं नाही, पण माझ्या आईच्या आणि माझ्या नावाला त्याचं नाव जोडलं गेलं आहे चोवीस वर्ष आधीच . "
"तुझे बाबा !"
"नाही गं, फक्त माझ्या आईचा नवरा."
"मिनू तु कुठे आहे सांग आधी. मी येते तूझ्या जवळ. "
"इंदू मी ठीक आहे आणि नागपूरला आहे. बघ तु इकडे यायला रेल्वेत बसली आणि आईचा फोन आला. सारखं एकच, नागपूरला ये, नागपूरला ये! कशाला तर त्या माणसाला मरतांना त्याच्या करणीची माफी मागायची होती म्हणून. मी नाहीच येत म्हटलं. अन बस आजी आजोबा, काका काकू, मामा, सर्व नातेवाईक असले माझ्या मागं लागले. ज्या माणसानं माझ्या आईची किम्मत नाही केली. दुध पित्या लेकरासोबत ओली बाळंतीण असतांना तिच्या अंगावर सवत आणली. तिला मारहाण केली. मोलकरीण बनवून ठेवलं तरीही कोणी त्याला काहीच बोललं नाही. पैसे मिळतील म्हणून मला एका म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधायला निघाला होता तो. आठवतं ना तुला आई नाही म्हटली तर आईला आणि मला कोंडलं होतं त्यानं घरात. दोन दिवस उपाशी ठेवलं. आईची तब्येत बिघडली. मी लग्नाला हो म्हटलं, नाक घासलं त्याच्या पायावर तेव्हा आईला डॉक्टरला दाखवलं त्यानं. फक्त दहावीतच होती ना मी तेव्हा. मलाही खूप शिकायचं होतं. नौकरी करायची होती आणि आईला एक चांगलं आयुष्य द्यायचं होतं. पण या नाराधामामुळे माझं शिक्षण सुटलं. तुम्ही मैत्रिणींनी पैसे जमा करून मला आणि आईला पळून जायला मदत केली म्हणून बरं नाहीतर त्या म्हातारड्यांनं नक्कीच विकलं असतं मला."
"झालं ते झालं बाळा. आता तर सर्व ठीक आहे ना."
"आहे गं ! पण चांगलं शिक्षण घेऊन जॉब करणं खूप वेगळं असतं. त्यात इंडस्ट्रीत कोणी ओळखीचं नसतांना जागा बनवायचा प्रयत्न करणं म्हणजे तुमचं तन मन सगळं भट्टीत जाळणं. पदोपदी तुमचा फायदा घ्यायला टपलेले, तुमच्या एका चुकीच्या पावलाची वाट पाहणारे बसून असतात. आता आयुष्य चांगलं चाललंय पण मला हे नको होतं. हे आयुष्य माझी चॉईस नव्हती तर मजबुरी होती तेव्हा. घरोघरी भांडे घासल्या पेक्षा इथं छोटे मोठे रोल करून राहणं योग्य वाटलं तेव्हा. माझ्या मनात ना थैमान मांडलं होतं या सर्व विचारांनी. मी केव्हा फोन भिंतीवर फेकून मारला अजूनही आठवत नाही मला. " मिनू बोलता बोलता अचानक रडू लागली, "I am very sorry यार. माझ्यामुळे तुला माहित नाही काय काय झेलावं लागलं असेल?  कुठे कशी ही रात्र काढावी लागली असेल तुला? "
मिनुला अनुभव सिन्हाची आठवण झाली. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण ज्याप्रकारे अनुभवला तिच्याबद्दल गैरसमज झालेत आणि त्यानं तिला परत घरी जा म्हटलं ते आठवून तिचं मन खट्टूही झालं.
"जाऊदे मिनू, जे व्हायचं ते झालं." चांगलं झालं कि वाईट, हा विचार करून काय होणार?  असं तिला वाटलं.
"हम्म !"
"तु नागपूरला कशी गेली ते सांग मला."
"माझा नंबर लागत नव्हता म्हणून आईनं ओमला, माझ्या रूम पार्टनरला कॉल केला. त्यानं मला समजावलं कि फक्त आईचं मन राखण्यासाठी तरी मी जायलाच हवं. त्यानं माझं काल सकाळचं विमानाचं तिकीट काढून दिलं आणि मी नागपूरला आली. पण खूप एकटं वाटतंय इथं ."
"मी पोहोचते उद्या सकाळ पर्यंत. मग नाही वाटणार एकटं."
"नको इंदू , तु अजिबात इथे येऊ नकोस. इथल्या बायकांना सध्या चघळायला दोनच विषय आहेत, एक तुझं लग्न आणि दुसरं माझं पळून जाणं. त्यात इथे वेगळाच सीन आहे. माझ्या सावत्र आईनं कधी मला किंवा आईला त्रास नाही दिला. पण सावत्र भाऊ अगदी त्या माणसावर गेलेला. त्याला वाटलं त्या माणसाच्या घरावर हक्क मागेल म्हणून तोही भांडतोय माझ्याशी. वेड लागल्या सारखं होतंय. म्हणून मी एक दोन दिवसात येतच आईला घेऊन तिकडे. "
"बरं ! पण मी कुठे जाऊ? "
"अगं तेच सांगायला फोन केला तुला आणि आपलीच कर्म सांगत बसली.""हम्म !"
"पण तु रात्री कुठे आणि कशी राहिली ते नाही सांगितलं."
"आपण भेटलो कि सांगते प्रत्यक्षात. मी थकली खूप. "
"मग माझ्या फ्लॅटवर जा, ओम चाबी घेऊन पोहोचला असेल.  तो तुला काही पैसे देईल. ते निसंकोच घे त्याच्याकडून."
"बरं जाते मी." सूर्य डोक्यावर आला होता. नशिबानं तिला एक टॅक्सी मिळाली. अंधेरीतच असल्यामुळे फ्लॅटवर जायला जास्त वेळ लागला नाही.
एक पंचवीस सव्वीस वर्षाचा, उंचपुरा, मध्यम बांध्याचा, गौर वर्णीय, आकाशी मंकी वॉश जीन्स आणि निळी टी शर्ट घातलेला ओम फ्लॅट समोर इंदिराची वाट पाहत मोबाईलवर क्रिकेट पाहत उभा दिसला.
"हाय ! मी इंदिरा."
"हा हाय !" क्रिकेट पाहणं बंद करून त्यानं फ्लॅटचं कुलूप उघडलं.
"हा हॉल आणि हे किचन, हे वॉशरूम !" त्यानं इंदिराला फ्लॅट दाखवला. "हे दोन हजार मिनूनं तुला द्यायला सांगितले. मी जातो. काही लागलं तर फोन करा मला." इतकं बोलून तो निघून गेला. इंदिरानं फ्लॅटचं निरीक्षण केलं. तिच्या नागपूरच्या घराच्या बाथरूम एवढं किचन आणि एक किंग साईज बेड मावेल एवढा हॉल. गॅलरीचा पत्ता नाही. त्या फ्लॅटचं भाडं पंधरा हजार. का तर तो अंधेरीत अशा एरियात आहे जिथं जास्तीत जास्त ऑडीशन घेतल्या जातात. ती जाम थकली होती. तिनं एकदा फ्लॅट नीट चाचपडला आणि झोपून गेली. उठली तेव्हा रात्र झालेली. बिल्डिंगमधे दणदण आवाज येउ लागले. कदाचित दिवसभर कामं करून सर्व मंडळी घरी परतली. मुला मुलींचे एकत्र हसण्याचे, बोलण्याचे आवाज, काचेच्या ग्लासांचे आवाज...
"ठक ठक ! ठक ठक !"
दारावर थाप पडली. इंदिराची फाटली. दाराला दुर्बीण पण नव्हती बाहेर कोण आहे ते पाहायला.
"हॅल्लो एंजेल दार उघड." एका मुलीचा आवाज आला. इंदिरानं भीत भीतच अर्धा दरवाजा उघडला.
"इथं कोणीच एंजेल नाही राहत." इंदू त्या दारूची बॉटल हातात धरून डोलणाऱ्य मुलीला म्हणाली.
"तु कोण, ओम कुठे आहे?"
ओमचं नाव बरोबर घेतलं म्हणजे मिनूनं नक्कीच आपलं टोपण नाव एंजेल ठेवलं असेल, हे इंदिराच्या लक्षात आलं.
"तु कोण?" त्या तिशीतल्या मुलीनं इंदूला विचारलं.
"मी इंदिरा, एंजेलची मैत्रिण. काम शोधायला आली आहे मुंबईला."
"ओह !" थोडा विचार करून ति इंदिराकडे वळली, "खरंच काम हवं का तुला? "
"हो. "
"बरं मी देईल मिळवून. पण हिरोईनचं नाही मिळणार."
परत हिरोईन? काय चाललंय काय? इंदिराचं डोकं तापलं. पण त्याला शांत ठेवून ति म्हणाली, "काहीच प्रॉब्लेम नाही. मला कॅमेराची भीती वाटते."
"ग्रेट ! सकाळी भेटू मग." ती बया आली तशी दारू पितच तिच्या फ्लॅटमधे गेली. इंदिरानंही तिचा दरवाजा लावून घेतला. शेवटी कालचे दोन गुंड तिला याच बिल्डिंगच्या आसपास भेटले होते ना.
"अरे ती आपल्याला काय काम देईल हे तर आपण तिला विचारलंच नाही." तिच्या डोक्यात आलं, "पण ति दारूच्या नशेत होती. तिला मी आठवणार तरी का सकाळी? जाऊ दे आपण उद्या नेट कॅफेवर जाऊन मॉन्स्टर, इन्डीड आणि माय नौकरी वर नोंदणी करून घेऊ आणि जॉब सर्च करू. आज पूर्ण आराम."

..................

मिनूच्या बाबतीत झालं तसं कितीतरी मुलींच्या बाबतीत होतं. केवळ मुलगा पाहिजे अशी सबब सांगून माणसं दुसरं लग्न करतात. आणि आपला समाजही त्याला मान्यता देतो. हे खरंच दुर्भाग्य आहे आपल्या समाजाचं.

इंदिराला तिचा उनाडपणा कुठे घेऊन जाईल? ती बाई तिला जॉब देईल का आणि दिला तर कोणत्या प्रकारचा देईल? हे आपण बघू पुढल्या भागात.

प्रिय वाचक मंडळी आपण मला खूप छान प्रतिसाद देत आहात. त्यानं माझा उत्साह द्विगुणित होतोय आणि मी अधिक हर्षोल्हासाने कथा लिहितेय. पात्र रंगवण्याचा प्रयत्न करतेय. असेच माझ्या सोबत राहा. हिच विनंती !

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all