एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-28

Inspiring story of a young wandering girl in search of her destination. Thank you

एक उनाड वाट भाग 28

बघता बघता मे महिना आला. बर्फ बऱ्यापैकी नाहीशी झाली. तापमान 20 अंश च्या वर जाऊ लागलं. शाळेच्या आवारात सुंदर रंगीं बेरंगी फुलं फुलून आली. त्यांना उगवतांना पाहणं म्हणजे एक पर्वणीच. इंदिरा उठल्या बरोबर गार्डनचा चक्कर मारून यायची मग अभ्यासाला बसायची. हॉस्टेलचे दहावी, बारावीचे दीडशेच्या आसपास विद्यार्थी सोडून बाकी सर्व सुट्ट्या लागल्या म्हणून घरी गेले. रोजचं एकट दुकट यात्री माउंट हेरमो बघायला तिथे यायचे. खरंच ही जागा किती सुंदर आहे आणि हा प्रदेशही. आपल्या देशातील एक वाटतच नाही. लहानपणी लोकांचं विदेशाचं वेड पाहून इंदिराला वाटायचं आपल्या देशात काहीच नाही. एखाद्या NRI शी लग्न झालं तर बरं. प्रियाही म्हणायची आपण खूप पैसे कमवू आणि कॅनडा किंवा फ्रांस, जर्मनीला राहायला जाऊ, स्वित्झर्लंड फिरू. कारण आपला देश इतका सुंदर आहे हे सांगणारं त्यांना कधी कोणी भेटलंच नाही.

इंदिरा तशी तुटणाऱ्यांमधून नव्हती. पण तिला कधी कधी खूप एकाकी वाटे. दहा बारा दिवसांनी तिने नागपूर सोडला तो दिवसही येणार होता. तेव्हा आई बाबाला सोडून तिला एक वर्ष पूर्ण व्हायला येणार होतं. तिला होम सिकनेस होऊ लागलं. दरवर्षी लाखो करोडो मुलं MPSC सारखी स्पर्धा परीक्षा देतात. त्यातील काही हजारच पास होतात. मी त्या हजारात नाही आली तर? तिला डिप्रेशनमधे जाण्याची भीती वाटू लागली. अभ्यासाची गती घटू लागली. एका दुपारी, 

"MPSC प्री चे फॉर्म निघालेत. दोन महिन्यांनी प्री आहे. ती पास झाल्यावर दोन तीन महिन्यांनी मेन्स होईल. आता अभ्यासाचा स्पीड वाढव." इंदिराच्या ऑनलाईन इंग्रजी विषयाच्या टीचरने तिला सांगितलं.

इंदिराला जाम टेंशन आलं. फक्त दोनच महिने. दोन महिन्यात काय काय करणार? अजून एकाही विषयाची रिव्हिजन नीट झाली नाही आहे. गणित तर कट्टर शत्रू आहे. कसं करायचं?  इतक्या लवकर परीक्षा?

"मी आताची परीक्षा नाही देणार." तिनं व्हिडीओ कॉल वर अनुभवला सांगितलं.

"का? तब्येत ठीक नाही वाटत का?"

"तब्येत ठीक आहे. माझं प्रिपरेशन नाही झालं पूर्ण."

"ते कधीच होणार नाही."

"तुम्ही प्लीज समजून घ्या. मला खूप टेंशन येतेय."
"टेंशन घेऊन काय होणार आहे? तुला अभ्यास करायचा आहे तेच कर मन लावून. परीक्षा दे. पास फेल रिझल्ट आल्यावर बघू."
"मी फेलच होणार."
"ठीक आहे मग तयार राहा आणखी एक दिड वर्ष सगळ्यांपासून दूर राहायला."

"तशी ही जागा खूप छान आहे. माणूस जन्मभर आनंदानं राहू शकतो इथे. माझं MA कम्प्लिट झालं आहे. तर मला काही ना काही जॉब मिळूनच जाईल इथे."

"अच्छा !''
"हो गर्ल्स हॉस्टेलची वॉर्डन मिस श्रेया तर मला म्हाणालीही क्लार्कचा जॉब करशील का शाळेत. कारण आधीचे क्लार्क रिटायर होत आहेत."

"बरं. आणखी."
"आणखी मला इथले मोमोज खूपच आवडतात आणि केक तर अप्रतिम बनवतात इथे. शेफची बोटं खाऊन घ्यायची इच्छा होते मला तर."

"खाऊन घे मग." अनुभव काहीतरी वाचत शांततेत बोलला. 

"आणि तुम्हाला माहितेय इकडली मुलं दिसायला भारी चिकनी आहेत. ते मुलींना खूपच चांगल्याने ट्रीट करतात. मला तर वाटतंय आता इथेच घर बसवून घ्यावं एखाद्या सोबत ." ती अनुभवला जळवण्यासाठी म्हणाली.

"ओके !" तो थंडच. त्याच्यावर काही परिणामच होईना.

"तुम्हाला काहीच हरकत नाही." तिनं चिडून विचारलं.

"नाही. तुझी लाईफ, तुला जे वाटतं ते कर."

"उम्म्म.... " तिला वाटलं ते लॅपटॉप उचलून फेकून द्यावं, "काय माणूस आहे. प्रेयसी दुसऱ्या कोणाशी लग्न करून घर बसवायचं म्हणते आणि याला काही फरकच नाही पडत."

"हा हा... " तो तोंडावर हात ठेऊन हसू लागला.

"तुम्ही गे तर नाही ना?" तिनं विचारलं. 

"काय?"

"गे, ज्याला मुलांमध्येच इंटरेस्ट असतो तो."

"मला माहित आहे गं बाई !" अनुभव पोट धरून हसू लागला, "इंदिरा बस झालं. माझं पोट दुखेल आता. तु जा अभ्यास करायला."

"नाही जाणार."

"इंदू बाळ मी गंम्मत घेत होतो तुझी. मला माहितेय तूझ्या मनात फक्त मीच आहे आणि तु फक्त मी तुला इथे परत बोलवावं म्हणून असं बोलतेय. पण आपली ध्येयपूर्ती होईपर्यंत मी तुला इथे बोलावणार नाही."

"हुम्म्म !" ती तोंड लटकवून म्हणाली.

"चला आज चर्चा रोजपेक्षा जास्त वेळ झाली आहे. बाय बाय !"

"बाय !"

लॅपटॉप बंद करून ती उशीत डोकं खुपसून रडू लागली. उद्या सहा मे. तिचा वाढदिवस. पहिल्यांदाच ती एकटीच राहणार होती तिच्या वाढदिवसाला. तिला खूप भरून आलं. अनुभवही वाढदिवसाबद्दल काही बोलला नाही. त्याच्या लक्षातच नसेल. आपण सांगितलं तरीही काय वेगळं होणार? तो तिचं काहीच ऐकणार नाही. तो तिच्यावर सायकोलॉजीची टोकन पद्धत वापरत होता. प्री पास झाल्यावर तिला आई बाबा आणि प्रियासोबत आठ दिवस राहायला मिळणार होते. मेन पास झाल्यावर लग्नाची डेट फिक्स आणि अनुभव सोबत कॅण्डल लाईट डिनर. मुलाखत पास झाल्यावर लग्न.

"असं कोणी आपल्या प्रेयसीला त्रास देतं का? गजबच माणूस आहे हा. कसं करावं याचं? दगड ! असंही नाही विचारलं मला की बर्थडेला तुला काही हवं का? खडूस, मी का इतकं प्रेम करते याच्यावर?" ती स्वतःशीच बडबड करत होती.

"काय झालं?" मिस श्रेया तिथून जात असतांना तिने इंदिराचा रडण्याचा आवाज ऐकला, "घरची आठवण येतेय."

"हो पण त्यांना अजिबात नाही येत माझी."

"असं नाही गं. काहीतरी चांगलं मिळावं म्हणून काहीतरी त्याग करावा लागतो." मिस श्रेया तिला समजावून सांगू लागली, "कोणत्याही वस्तूला सुंदर असा आकार मिळवण्यासाठी कितीतरी कठीण प्रक्रिया पार कराव्या लागतात. त्या प्रक्रियेतून जातांना जो तुटतो, फूटतो तो बाहेर होतो आणि जो टिकून राहतो तो चमकतो.

तुला तुटून बाहेर पडायचं आहे कि टिकून चमकायचं आहे? चॉईस इज युवर्स !"

"तुम्ही खूप छान बोलता. आता समजलं इतक्या लहान वयात कसं काय 300-400 मुलींना एकटं सांभाळता."

"त्यांचं सगळं त्याच बघतात. मी फक्त त्यांना बोलून योग्य ते करायला मोटिव्हेट करते. त्या मुलींनाच बघ सहा सहा महिने आईवडील दिसत नाहीत काहींना तर. तरीही आनंदी असतात कारण त्यांनी हे स्वीकारलं आहे. तुही स्वीकार. म्हणजे त्रास होणार नाही. आणि मी आहेच. येऊन बोलत जा माझ्याशी." तिशीतली श्रेया इंदिराच्या पाठीवर प्रेमाची  थपकी देऊन गेली.

"खरंच मी खूपच जास्त विचार करते. आतापर्यंत तर सर्व वाढदिवस फॅमिली सोबतच साजरे झाले थाटात. एखादा नाही केला साजरा फॅमिली सोबत तर काय होणार आहे. यापेक्षा अभ्यासात डोकं लावलेलं बरं. अभ्यास चांगला केला तर पेपर चांगला जाईल आणि पेपर चांगला गेला तर मी पास होऊन सर्वांना भेटू शकेल." डोळे पुसून, तोंड धुवून ती अभ्यास करायला बसली.

रात्री बारा वाजता तिच्या खोलीचे दार जोरात वाजलं. ती हडबडून उठली. डोळे चोळतच दाराजवळ गेली,
"कोण आहे कोण आहे?" तिने विचारलं.

"मी श्रेया आहे, इकडे खूप गडबड झाली आहे. दार उघड लवकर." त्या घाबरलेला आवाज काढून म्हणाल्या. 

"हो उघडते."

"हॅपी बर्थडे टू यु, हॅपी बर्थडे टू यु !" बर्थडे कॅप घातलेल्या श्रेयाने इंदिरावर चमकी उडवली. तिच्या सोबतच्या बारावीच्या सहा मुलींनी गायला सुरु केलं,

"बार बार दिन ये आये,
बार बार दिन ये जाये,
तुम जियो हजारो साल,
है यही आरजू !
हॅपी बर्थडे टू यु, हॅपी बर्थडे टू यु
हॅपी बर्थडे टू यु इंदिरा."

छोटासा केक कापला. इंदिरानं मिस श्रेयाला आणि त्यांनी  इंदिराला भरवला, मुलींना दिला. फोटोज काढले. इंदिराच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्यांना आलिंगन देऊन म्हणाली, 

"मॅम थँक्यू!"

"वेलकम डियर, पण थँक्यू मला नाही अनुभव सिन्हाला म्हण."

"काय?"

"हो, त्यांनीच मला तुझा बर्थडे आहे हे सांगितलं आणि  आठ दिवस आधीच प्रिन्सिपल मॅमशी बोलून तुझा बर्थडे सेलिब्रेट करायची परवानगी घेतली. हा ड्रेस आणि हे इतर काही गिफ्ट्स त्यांनीच पाठवले." ड्रेसचं मोठं पॅकेट तिच्या हातात देऊन तिला म्हणाल्या, "उद्या संध्याकाळी तु तयार होऊन कम्युनिटी हॉल मधे ये. तुझा बर्थडे सेलिब्रेट करू. अजून एक केक कापायचा आहे आपल्याला."

"हो." ती गोड हसत म्हणाली. 

"गुड नाईट. बाय बाय."

"बाय बाय मॅम !"

ड्रेस इंदिराला देऊन श्रेया आणि मुली आपापल्या खोलीत  गेल्या. इंदिराने अनुभवला फोन करायला मोबाईल हातात घेतला तर त्याचाच फोन आला.

"हॅपी बर्थडे !"

"तुम्ही खूप खराब आहे."

"हॅपी बर्थडेचा रिप्लाय दार्जिलिंगला असा देतात का?"

"मस्करी पुरे. आधी सांगा तुम्ही मला का नाही सांगितलं बर्थडे सेलिब्रेशन बद्दल."

"कारण मी ऐकलं आहे की मुलींना सरप्राईज आवडतात. म्हणून म्हटलं दयावे तुलाही सरप्राईज."

"पण मला वाटलं तुम्ही विसरले. मी मनोमन खूप चिडले तुमच्यावर आणि शिव्याही दिल्या."

"हो का. म्हणूनच जेवतांना ठसका बसला होता मला."

"खूप जोरात बसला." इंदिरानं काळजीच्या स्वरात विचारलं.

" नाही गं. तुझ्यासारखा हळूच बसला. जाऊदे ते ! तु गिफ्ट्स बघितले का?"

"नाही. केक कट करून मिस श्रेया आताच गेल्या."
"चल मग गिफ्ट्स बघ. सर्वांनी पाठवले आहेत वेगवेगळे. माझ्याकडून ड्रेस! घालून सांग आवडला की नाही?"

"हो हो लगेच."

इंदिरानं गिफ्ट्सचं पॅकेट खोलून बघितलं. आई बाबा आणि प्रियाने नागपुरी चिवडा, शंकरपाळी, ऑरेंज बर्फी, भुजिया शेव, बेसनचे लड्डु घरी बनवून पाठवली होती, 'आता अभ्यासाला जोर नक्कीच येईल.' तिच्या मनात आलं.

आजीनी शंकर पार्वतीच्या मांडीवर गणपती बाप्पा बसलेला फोटो पाठवला. त्याला हात जोडून म्हणाली, "ओम नमः शिवाय !"

ओम आणि मिनूनी 5000 एव्हरग्रीन गाणी रिकॉर्ड असलेला 'सारेगामा कारवा' रेडिओ दिला.

सुबोध आणि ओशिननी स्माईली असलेल्या चार पिलोचा सेट पाठवला.

अनुभवनी दिलेला ऑरेंज आणि पोपटी रंगाचं कॉम्बिनेशन असलेला, फुल्ल बाह्यांचा,फ्लोर लेंग्थ गाऊन तिच्या अंगावर खुलून आला.

दिवसभर शाळेतल्या सर्वांनी तिला फुलं देऊन वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी कम्युनिटी हॉलमधे प्रिन्सिपॉल मॅम आणि हजर स्टाफ व मुलांच्या उपस्थितीत बर्थडे सेलिब्रेट झाला. तिची सर्वांसोबत ओळख झाली. तिला आता बरं वाटू लागलं. मन लावून अभ्यास करायचा आणि पास व्हायचंच. दुसरा पर्यायच नको. तिने बारावीच्या विद्यार्थ्यांशी गट्टी केली. मिळून अभ्यासाला लायब्ररीत बसायचं ठरलं.

सकाळी चारला उठून सर्व मिळून ध्यान आणि योगासन, प्राणायाम करू लागले.
पाच ते सहा वाचन मनन.
सहा ते साडेसहा जॉगिंग,
मग सकाळचं अंघोळ वगैरे आवरून घ्यायचं.
ब्रेकफास्ट करून परत अभ्यासाला बसायचं.
इंदिराचे सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत ऑनलाईन कलासेस चालायचे. मग लंच करून ती एक तास झोपायची. चारला उठून मुलींना भेटायचं. एक तास काही खेळायचं, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या. तेच तेच खेळून कंटाळा आला म्हणून इंदिरानं त्यांना सागरगोटया, चांगष्टया खेळायला शिकवलं. स्व मनोरंजन झालं की पाच ते आठ परत अभ्यास.
आठला डिनर. डिनर झाल्यावर शतपावली करून परत अभ्यासाला बसायचं. सर्वात जास्त डोकं गणित खायचं. बाकी विषय तरी रट्टा मारून व्हायचे. पण गणिताला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नव्हता. म्हणून गणिताचा क्लास जास्त वेळ घेणं सुरु केला.

अखेर इंदिरा प्री पास झाली. आठ दिवस आईबाबा सोबत नागपूरला राहून झाल्यावर परत मेन्सची तयारी करायला परत दार्जिलिंगला गेली. तयारी जोरात सुरु झाली. आधी अनुभवनी तिला कॉल मेसेजेस करणं कमी केलं. हळू हळू बंदच झालं. इकडून इंदिरानं कॉल केला तर हाय, हॅल्लो, कशी आहेस, मी छान आहे. यापलीकडे संभाषण होत नसे. कधी कधी तर सर शूटिंगमधे बिझी आहेत असाच रिप्लाय येई. तिला वाटलं आपण अभ्यासात लक्ष द्यावं म्हणून तो असं करत असेल. मेन्स द्यायला ती मुंबईला गेली. आजी एकटीच घरी होती. अनुभव नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सिंगापुर गेलेला.

"मी त्याला म्हटलं होतं इंदिरा येतेय पेपर द्यायला. नको जाऊ तरीही गेला." आजी संतापून बोलली.

"आजी त्यांना महत्वाचे असेल जाने. जाऊद्या ! एकदा इथे आले की चांगली खबर घेते मी त्यांची." इंदिरा आजीला म्हणाली खरी पण अनुभवचं असं वागणं तिला खूप विचित्र वाटलं. तब्बल तीन महिन्यांनी ती मुंबईला परतली आणि तो तिला बेस्ट विशेस द्यायलाही थांबला नाही. ना मॅसेज केला. तिला वाटलं सुबोध आणि ओशिनला आडव्या हाताने घेऊन विचारावं पण तिनं स्वतःला थांबवलं,

"आधी परीक्षा नंतर हे सगळं. नंतर सर्वांची खबर घेते."

ती परीक्षा देऊन आली. सुबोध आणि ओशिन तिचीच वाट बघत होते.

"कसा गेला पेपर?" सुबोधनी इंदिराला विचारलं.

"छान ! अनुभवला फोन लावून द्या. मला बोलायचं आहे."

"त्यानं तुला परीक्षा झाल्यावर नागपूरला जायला सांगितलं आहे. हे प्लेनचं तिकीट आणि यात एक पत्र आहे तुझ्यासाठी ." सुबोध लिफाफा पुढे करून म्हणाला. 

"मला बोलायचं आहे त्यांच्याशी. कळत नाही तुम्हाला सुबोध."

"त्याला नाही बोलायचं आहे." सुबोध खाली मान घालून म्हणाला. 

"का?  मन भरलं माझ्यापासून? की कोणी दुसरी भेटली खेळायला?"

"आम्हाला नाही माहित इंदिरा मॅम. सर खूपच कमी असतात इथे आता." ओशिन सुबोधच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली.

"काहीतरी मोठ्ठा घोळ झाला आहे. अनुभव असा नाही." इंदिरा त्यांना म्हणाली, "परत कधी येणार आहे?"

"माहित नाही."

"असं कसं माहित नाही ओशिन. त्यांचं ट्रॅव्हलिंग शेड्युल, तिकीट बुकिंग तूच करत असतेस ना."

"यावेळी मी नाही केलं."

"मग कोणी केलं? सांग मी त्याला जाऊन विचारते."

"दिव्या !" ओशिन डोळे मिटून बोलली. तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं की तिला हे सांगतांना किती वाईट वाटत होतं ते. 

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all