एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-25

Story of a young girl who is wandering in search of her destination. Thank you

भाग 24 खालील लिंकवर वाचा

http://www.irablogging.com/a-wandering-path-part-24_6333

एक उनाड वाट भाग 25

दिवाळीच्या मुहूर्तावर 'प्यार एक एहसास'चं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं. तेच गाणं जे ऑस्ट्रेलिया, सिडनीतील, लुना पार्कच्या, आकाश झुल्यात बसलेल्या  अनुभव आणि इंदिरावर चित्रित करण्यात आलं होतं. डायरेक्टर कोहली साहेबांनी अनुभव इंदिराच्या गळ्यात त्याची चैन टाकेपर्यंतचा पूर्ण सीन त्या गाण्यात घेतला. जो खूपच लोकप्रिय झाला. काही तासातच यु ट्यूबवर एक करोडच्यावर लोकांनी ते गाणं बघितलं. इंदिरा आणि अनुभव विषयी टीव्हीवर, वृत्तपत्रात रोजच नवनवीन,  वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. एका टीव्ही चॅनेलनं तर अनुभव आणि इंदिरानं गुपचूप कोर्ट मॅरेज केलं असा दावाही केला. पण अनुभवनी इंदिराला सांगितलं होतं. हे सर्व तेव्हा पर्यंतच चालेल जेव्हापर्यंत चॅनेल वाल्यांना दुसऱ्या एखाद्या स्टार हिरो हिरोईन किंवा क्रिकेटर बद्दल नवीन न्यूज नाही मिळत. तेव्हा टेंशन घ्यायचं नाही. 

दिवस जात होते तशा विविध उत्पादनांच्या जाहिरातीच्या, स्टेज शो च्या, नवीन चित्रपटांच्या ऑफर्सचा इंदिरावर वर्षाव होऊ लागला. पण अनुभवनी तिला काही चांगल्या प्रॉडक्ट्सच्या जाहिराती सोडून एकाही चित्रपटाची किंवा स्टेज शो वगैरेची ऑफर स्वीकारू दिली नाही. तिनेही का म्हणून विचारलं नाही. कारण तिला वाटलं,

" हा चित्रपट अजून सिनेमा घरात यायचा आहे. त्याचं प्रमोशन सुरु होईल तेव्हा मी बिझी असणं बरोबर नाही. अनुभव सोबत मला वेगवेगळ्या टीव्ही शोजला जावं लागेल, तिथे आम्ही धमाल करू. सर्वात जास्त मज्जा तारक मेहताका उलटा चष्मा च्या टिमसोबत येईल, भाभीजी घरपे है पण माझी फेव्हरेट आहे आणि साथ निभाना साथियाच्या कागडीला मी विसरलेच, कपिल शर्मा मग मला विचारेल,

"इंदिरा आपने कभी सोचा था कि आप इस शो मे यहा आयेगी, और मेरेसे बात करेगी?"

wow, किती मज्जा येईल तिथे. तो आम्हाला डान्स करायला लावेल, माझ्याशी फ्लर्ट करेल. मग अनुभव जळेल. अर्रर्रर्रर्र सो रोमँटिक. सर्वांसोबत मस्त फोटो सेशन करेल आणि अल्बम बनवून ठेवेल."

दिवाळी, न्यु इयर सेलिब्रेशन मजेत झालं. चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण झालं. एडिटिंग झाली आणि 'प्यार एक एहसास ' चित्रपट व्हॅलेंटाईन डे ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलीज करायचं ठरलं.

"पंधरा जानेवारीला अनुभवचा वाढदिवस आहे." इंदिरा सहज म्हणून विकिपीडियावर अनुभव विषयी काय लिहीलं आहे हे पाहायला गेली अन तिनं बघितलं,
"म्हणजे याच महिन्यात आहे वाढदिवस अगदी दोनच दिवसांनी. आजी, सुबोध, ओशिन कोणीच काही बोललं नाही ना काही तयारी नाही वाढदिवसाची."

इंदिरानं सरळ जाऊन आजीला विचारलं. तेव्हा कळलं कि अनुभवनी त्याचे आईबाबा विभक्त झाले तेव्हापासून वाढदिवस साजरा करणं सोडलं आहे.

आधी इंदिराच्या मनात आलं कि सरप्राईज पार्टी द्यावी. पण परत तिला अनुभव सोबत कसल्याच प्रकारचं भांडण नको होतं, ना समज गैरसमजाच्या खेळात परत अडकायचे होते. म्हणून ती त्याला जाऊन म्हणाली,

"आईबाबा विभक्त झाले हा त्यांचा निर्णय होता. सोबत राहून एकमेकांशी जन्मभर भांडत बसण्यापेक्षा वेगळं स्वतंत्र राहणं त्यांना चांगलं वाटलं, त्यांना त्यांच्या समस्येचे ते समाधान वाटलं. यात तुमची चूक काय? तुम्ही का खुश होणं, वाढदिवस सेलिब्रेट करणं सोडलं?" वाढदिवस सेलिब्रेट करायचा म्हणून ती अनुभवच्या मागे हात धुवून लागली.

"बरं बाई, कर पार्टी अरेंज, बोलव तुला ज्यांना बोलवायचं त्यांना. मी फक्त केक कापायला उभा राहणार."

"चालेल चालेल."

"पण तुला इतका आनंद का होतोय? वाढदिवस माझा आहे. तुझा नाही."

"तुमचं दुःख असो कि आनंद, सगळं माझंच तर आहे." तिच्या मनात विचार आला.
"काय?"
"असंच त्या निमित्ताने माझी सगळ्यांशी भेट होईल. चित्रीकरण संपलं तेव्हापासून मी खूप मिस करतेय सगळ्यांना."
"अच्छा मग तर तु तशीही पार्टी अरेंज करू शकते. माझा वाढदिवस कशाला?"

"तुम्ही जा तुमच्या जिमची वेळ होतेय. बाय बाय."
"अगं उत्तर तर दे प्रश्नाचं."

"वाढदिवसाच्या रात्री देईल."

"मीही तुला त्या रात्रीच एक सरप्राईज देईल." अनुभव स्वतःशीच बोलला.

इंदिरा पार्टीच्या तयारीत लागली. ओशिनला हाताशी घेऊन तिने अनुभवचे चांगले संबंध आहेत अशा लोकांची लिस्ट बनवली. लिस्ट मोठ्ठी होती. पण या ना त्या पॉईंटने कट कट करत शंभर ते दीडशे लोकांची लिस्ट फायनल झाली. पार्टी अरेंजमेंट खंडाळ्याच्या घनदाट जंगलात पहाडांनी घेरलेल्या शानदार डेल्ला रिसॉर्टमधे करण्यात आलं.

जानेवारीची हवी हवीशी वाटणारी गुलाबी थंडी, रात्र नशिली आणि वाढदिवसाची मेहफिल रंगली.

अनुभव इंदिराच्या चॉईसचा मिल्क व्हाईट टक्सिडो (सूट ) घालून पार्टीत आला तसं सर्वांच्या तोंडून निघालं, 

'Oh my god!"

तो एखाद्या प्रिन्स चार्मिंग सारखा भासत होता. तो सर्वांना हाय हॅल्लो, how are you बोलु लागला. त्याची नजर मात्र इंदिरालाच शोधत होती आणि इंदिरा आली. केसांचा फ्रेंच बन बनवलेली, दुधाळी रंगाच्या, व्ही नेकच्या, हातांच्या कोपरा पर्यंत बेल स्लीव्ह असलेल्या, प्यूर शिफॉनचा पायघोळ गाऊन घातलेली ती, आकाशातून त्याच्यासाठीच उतरून आलेल्या परीसारखी त्याला भासली.

जमलेली जनता अनुभवला सोडून इंदिराशी बोलायला जाऊ लागली. इंदिरानी सर्वांचं हात जोडून अभिवादन केलं. ओशिननी केक कापायची घोषणा केली. केक कट झाला. पहिला केकचा तुकडा आजीच्या तोंडात आणि दुसरा इंदिराच्या. सिद्धीही आली.
"खूपच सुंदर दिसत आहेस तु. Simple yet beautiful."
"थँक्यू !"
"एक बोलु?"
"हो बोला ना."
"तुला खूप ऑफर येऊनही तु एकही चित्रपट साइन नाही केला असं ऐकलं मी." सिद्धी इंदिराला म्हणाली.

"हो मी त्याबाबत अजून काही विचार नाही केला."
"मग कधी करणार जेव्हा इंडस्ट्रीचे लोकं तुला घमंडी समजून चित्रपट ऑफर करणं सोडून देतील तेव्हा... हे बघ कोणतीही इंडस्ट्री असो एकदा नाव खराब झालं कि खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तेव्हा लवकर निर्णय घे."
"हो."
"अनुभव नाही म्हणतोय का?"
"नाही, माझ्याच मनात भीती आहे कि त्यांना सोडून मी इतर कोणत्या हिरोसोबत कंफर्टेबली काम करू शकणार का?"
"काही नाही गं त्यात. तु सुरवात तर कर एकदा. मग हळू हळू सगळंच सवयीचं होतं .''
"हो नक्कीच."

ती गेली तसं मिनूनं इंदिराला पकडलं.
"सिद्धी म्हणाली ते काही चुकीचं नाही. तु विचारच अनुभवला आज रात्रीच सर्व गेल्यावर कि त्याच्या मनात सुरु काय आहे? तो का बरे तुला चित्रपट साइन नाही करू देत आहे."

"मी विचारेल. तू काळजी नको करू."

"इंदू तसा अनुभव छान आहे. पण तुला असं गुलाम बनवून ठेवल्यागत वागवणंही योग्य नाही."

"मिनू तू जास्त विचार करतेय. मी म्हटलं ना मी बोलते त्याच्याशी. तू सांग तूझ्या नवीन चित्रपटाची शूटिंग कशी सुरु आहे. यात तू मेन हिरोईन आहेस ना."

"हो गं. सगळं छान आहे आणि तेही तुझ्यामुळे. म्हणून तूझ्या सोबत कोणी कपटी वागलेलं पाहवत नाही मला."
"तू खा पी बरं पोटभर." इंदिरा तिला डिनर बुफेजवळ घेऊन गेली.

इंदिरा त्रासली. पार्टीत सर्वांच्या तोंडी हाच विषय होता कि इंदिरा नवीन चित्रपट साइन का करत नाहीये? तीही दिव्या सारखी अनुभवला सोडून जाईल अशी त्याला भीती वाटतेय का? तिला स्वतंत्र जगू द्यायची भीती वाटतेय का अनुभवला?
ही सर्व कुजबुज ऐकून इंदिराला वाटलं, उगाच पार्टी ठेवली.

रात्री बाराला पार्टी संपली. आजी आणि उषा दहा वाजताच त्यांच्या खोलीत निघून गेल्या होत्या. शोभा तिच्या माहेरी लग्नाच्या खरेदीला गेली होती. ओम आणि मिनूही लवकरच जाऊन झोपले. पहाटे लवकर उठून त्यांना शूटिंगला परत मुंबईला जायचं होतं. सुबोध आणि ओशिन सर्व पाहुण्यांना निरोप देईपर्यंत इंदिरा व अनुभवच्या सोबत होते.

"तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे." इंदिरा अनुभवला म्हणाली, "ही पट्टी डोळयांवर बांधा."

इंदिरा अनुभवला रिसॉर्टमधे व्हॅली व्यू असलेल्या बाजूला घेऊन गेली. तिथे एक आकाशी आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचे डेकोरेशन केलेली आणि लाइटिंग लावलेली कॅनोपी (canopy - beautifully decorated luxury tent for some celebration ) होती. त्यात पांढरी शुभ्र गादी, त्यावर चार लोड लावलेले होते. सुंदर, शांत, मंजुळ असं ताण दूर करून रिलॅक्स करणारं संगीत कमी आवाजात सुरु होतं. ते दोघे जाऊन कॅनोपीत बसले. वेटरने बोनफायर जळवून दिला. बाजूलाच एक शेफ बार्बेक्यू वर चिकन बनवत होता तर दुसरा एक वेटर  स्वीट ऍप्पल वाईन घेऊन आला. पार्टीत पाहुण्यांसोबत त्यांनी काहीच नीट खाल्लं नव्हतं. आता छान शांततेत वाईन घेत तंदुरी चिकन टिक्का व तंदुरी ब्रोकोलीवर ताव मारला.
खाऊन पिऊन झाल्यावर दोघेही लोडवर डोकं टेकवून आकाशाला बघत आडवे झाले. बटलरनी त्यांना ब्लॅंकेट आणून दिले. अनुभवनी इंदिराला पांघरून दिले. बोनाफायर जळतच होतं त्यामुळे जास्त थंडी जाणवत नव्हती.

"इट्स अमेझिंग."
"तुम्हाला आवडलं?"
"हे काय विचारायची गोष्ट आहे का इंदिरा? मी स्वप्नातही विचार नव्हता केला कि कोणी माझ्यासाठी इतकं काही करेल."
"बस बस चढली मी हरभऱ्याच्या झाडावर."
"नाही गं. यु आर रियली ग्रेट डियर. आजोबा होते तेव्हा आम्ही नेहमीच फार्म हाऊसवर रात्रीचे असे बाजीवर पडायचो आणि ताऱ्यांनी जागा बदलली का? तारे कुठे आहेत? चांदण्या मोजायचो. कधी कधी टेलिस्कोपने ग्रह दिसतात का म्हणून आकाश बघतच बसायचो. मज्जा होती ते होते तेव्हा पर्यंत. ते गेल्यावर पहिल्यांदा अशा मोकळ्या आकाशा खाली असा निवांत पडलोय. नाहीतर या शूटिंग, ऑडिशन, मेकअप, बॉडीबिल्डिंग, स्क्रिप्टचा अभ्यास या सगळ्यात कुठे वेळ मिळतो. आणि मिळाला तरी तूझ्या सारखं कोणी सोबतीला नसतं."

"अच्छा, मी इतकी महत्वाची आहे तुमच्या आयुष्यात?"
"खूप."
"मग एक विचारू?"
"विचार आणि सरळ शब्दात विचार मी अजिबात रागवणार नाही."
"तुम्ही मला इतक्या ऑफर आल्यावरही त्यातला एकही चित्रपट का स्वीकारू देत नाही आहे?"
"हो आज पार्टीतही हाच चर्चेचा विषय होता."
"हो ना, तुम्हाला अशी भीती वाटतेय का की मी तुम्हाला विसरणार? किंवा मी चित्रपट सृष्टीत तुमच्यापेक्षा जास्त नाव कमावलं तर तुमची मला गरज राहणार नाही? मला पुढे जाऊ द्यायची इच्छा नाही का तुमची. तुम्हाला मला तुमच्या कंट्रोल मधे ठेवायचं आहे?"

"छान, तु तर प्रेस कॉन्फरन्सच्या पत्रकारांपेक्षाही उत्तम प्रश्न विचारत आहेस."

"तुम्ही रागावले बघा."

"नाही रागावलो गं. तु बोल आणखी तूझ्या मनात काय आहे ते सर्व बाहेर येऊ दे. मग मी माझं सांगतो."

"संपलं माझ्या मनातलं."

"बस इतकंच होतं?"

"हो. आता तुमची पाळी."

"हो आता माझी पाळी, मीच वाजवेल टाळी."
"कविता नका म्हणू. मुद्द्याचा विसर पडतो."
"बरं मुद्दा हा कि तु लग्न का मोडलंस? घर का सोडलं होतंस? का मुंबईला आली होतीस?"
"पण ज्यांच्यासाठी आली ते मला स्विकारणार नाहीत." इंदिरा उठून बसली झाली.
"वा त्यांनी रागा रागात तसं म्हटलं तेही अचानक घरी जाऊन धडकलेल्या पत्रकारांना आणि तु तेच सत्य असं मान्यही केलं. कमाल आहे. उद्या तुझी मैत्रीण मिनू, आजी किंवा मी तुला तसं म्हटलं तर तु आम्हाला समजावण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाहीस." अनुभवही उठून मांडी घालून बसला.
"नक्कीच नाही. मी माझी बाजू मांडेल आणि मुद्दा क्लियर करेल."
"मग आईबाबा बहिणी बाबत इतका अविश्वास का?"
"आईला हे सिनेमा, हिरो हिरोईन अजिबात आवडत नाही. आणि माझं तर आता हेच विश्व आहे."
"कोण म्हणते कि तुझं हेच विश्व आहे म्हणून."
"म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचं आहे कि मी..."

"तु परीक्षा दे. तुझं चित्रपट व्यवसायात येणं हा केवळ एक अपघात होता. तुझं गोल नव्हतं ते नाही तुला इच्छा होती तशी. त्यातून निघ. बरी हो आणि तयारीला लाग."
"म्हणून तुम्ही मला नवीन चित्रपट स्वीकारू नाही दिले."
"हो."
"पण मला नाही वाटत आता माझ्याकडून अभ्यास होईल म्हणून. माझं चित्त नाही लागणार अभ्यासात. मला सवय झाली आहे शूटिंगची, फिरण्याची, स्वतःला दिवसातून हजारदा आरशात बघण्याची, जिमला जाऊन फिगर मेंटेन करायची. मला वाटतं माझ्या वाट्यातच असेल हे म्हणून नशीब माझ्याशी इतकं खेळलं."

"इंदिरा, नशीब आपल्या सोबत खेळतंय म्हणून आपण त्याच्यापुढे गुढघे टेकून त्याच्या हातातलं खेळणं बनून राहायचं नसतं. समजलं !" अनुभव उठून उभा झाला, "बंद कर हे रडगाणं कि होणार नाही, सवय झाली वगैरे वगैरे. तुला करायचं काय आहे? फक्त अभ्यासच ना. आता तर तुला हवे तितके पैसेही आहेत तूझ्या अकाउंटमधे. तूझ्यासाठी आपण चांगला कोच ठेऊन घेऊ. तो सर्व अभ्यास करवून घेईल आणि इथे राहून जर तुझा अभ्यास होत नसेल तर तुला बाहेर पाठवतो."

"मला तुम्हाला सोडून कुठेच नाही जायचं." इंदिरा जाऊन त्याला बिलगली, "I LOVE YOU, I LOVE YOU SO MUCH."

"मला माहित आहे."

"तरीही मला दूर पाठवायचं कारस्थान का रचताय? मी परीक्षा पास झाली तर माझी पोस्टिंग होईल तिथे मला जावं लागेल. मग कशी जगेल मी तुमच्या शिवाय."

"काहीच महिने अगोदर भेटलेल्या माझ्यासाठी आई बाबांना विसरू नकोस. प्रेमाला पायातली बेडी बनवू नकोस." अनुभव तिच्या केसांवरून हात फिरवत बोलत होता, "तुला दुसरा चान्स मिळतोय या जगाला दाखवायचा,  त्या BDO सारख्या मुलांना सांगायचा आणि तुझ्यासारख्या उनाड मुलींना प्रेरणा द्यायचा कि मनात आणलं तर सर्वच शक्य आहे फक्त प्रयत्नांची जोड हवी."

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार