एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-24

Story of a young passionate girl who is wandering in search of her destination. Thankyou

एक उनाड वाट भाग 24

जेवणं झाल्यावर सर्व बोलत बसले. आजी औषधं घेऊन झोपायला गेली. शोभा दिपक सोबत घरच्या मंडळी बाबत चर्चा करत होती. ओशिन अनुभव आणि सुबोधला सोशल मीडिया वरील अनुभवच्या अकाउंट बद्दल काही महत्वाचं सांगत होती. तर ओम, मिनू आणि इंदिरा सहजच गप्पा करत होते. तोच मिनुच्या मोबाईलवर एक व्हायरल व्हिडीओ आला. तिचा पडलेला चेहरा पाहुन इंदिराला समजलं काहीतरी गडबड आहे. तिने मिनुच्या हातचा मोबाईल झटकन घेतला. 
"अगं असाच व्हिडीओ आहे. दुसरं काही नाही. दे मोबाईल. "
"तु शांत रहा. मी बघते अन देते तुला परत."
इंदिरानी आवाज मोठा करून व्हिडीओवर क्लिक केलं.

'जसं कि तुम्ही पाहु शकता आम्ही आलो आहोत रातोरात सुपरस्टार अनुभवची हिरोईन बनलेल्या इंदिराच्या घरी. चला जाणून घेऊ या तिच्या फॅमिलीची प्रतिक्रिया. त्यांना काय वाटतं त्यांच्या मुलीच्या अचिव्हमेंट बद्दल.' एका न्यूज चॅनेलचा पत्रकार चक्क सकाळी सकाळी इंदिराच्या घरी गेला. त्यांनी दाराची बेल वाजवली. तिच्या आईनं दार उघडलं. पत्रकारानी तो कोण, कशासाठी आला काहीच न सांगता प्रश्न विचारणं सुरु केलं, 
"मॅडम तुम्हाला तुमच्या रातोरात स्टार झालेल्या मुलीबद्दल काय वाटतं? तुम्ही खुश आहे, नाराज आहे? तिच्या चित्रपट सृष्टीतील भविष्याबद्दल काय वाटतं?" आईला असं अचानक पत्रकारांना पाहुन शॉक बसला. प्रिया काय झालं ते बघायला आली. 
"तुम्ही इंदिराच्या लहान बहीण. इंदिरापेक्षा सुंदर आहे तुम्ही. तुमचाही चित्रपट सृष्टीत जाण्याचा विचार आहे का? "
"What?  Are you mad or what?" प्रिया संतापली. "आम्हाला फक्त एकच मुलगी आहे. इंदिरा कोण, कुठली आम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही जा इथून." इंदिराच्या बाबांनी त्या पत्रकारासमोर हात जोडले आणि आईला आत घेऊन दार लावलं. 
पत्रकार बोलतच होता. ओहो म्हणजे इंदिराला घरून सपोर्ट नाही. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्कीच सांगा आमच्या चॅनेलला मॅसेज करून.'

इंदिराचे डोळे भरून आले. ती धावतच तिच्या खोलीत गेली आणि बेडवर उशीत डोकं खुपसून रडू लागली. तिथेच बसलेल्या अनुभवनंही तो व्हिडीओ ऐकला. सर्व अपसेट झाले. थोड्यावेळाने सर्वांच्या व्हाट्सअपवर, फेसबुकवर तो व्हिडीओ दिसून आला. 

"इंदिरा !" अनुभव तिच्याजवळ गेला. 
"प्लीज लिव्ह मी अलोन अनुभव. प्लीज... "

"मी कितीही माफी मागितली तरीही मी केलेली चूक बदलणार नाही. पण असं काहीतरी करावं लागेल ज्यानं ती आनंदी होईल." तो हॉलमधे येऊन सुबोधला म्हणाला. 

"मी बघते इंदिराला." मिनू इंदिराजवळ गेली. तिला पाणी दिलं. समजावलं आणि औषधं देऊन झोपवलं. अनुभव आणि सुबोधही थकला होता. अनुभव आंग टाकताच झोपला. सुबोध त्याच्या बाजूलाच आडवा झाला. त्यालाही जाम झोप आली होती. तो झोपून अर्धा तास होत नाही तो त्याचा मोबाईल वाजला. त्यानं कसतरी एक डोळा उघडून बघितलं कोणाचा फोन आहे ते.

"ओशिन, काय झालं?"
"खाली ये."
"आता नाही. मी खूप थकलोय आणि घरात सर्व आहेत आज."
"सुबोध मी त्यासाठी नाही बोलवत आहे."
"तु कॉल केला कि मला तर तेच आठवते."
"सुबोध बी सिरीयस."
"ओके राणी, सांग कशासाठी बोलवत आहेस."
"आजीच्या खोलीत सिक्रेट मिटिंग आहे. तुला बोलवलं आहे आजीनं."
"आजी झोपली नाही का आज?"
"नाही, मिटिंग झाल्यावर झोपेल. तु ये लवकर."
"मला काय भेटेल आल्यावर?"
"जे पाहिजे ते सर्व मिळेल, पण आता पटकन आजी समोर हजर नाही झाला तर आजी कान नक्की पिळेल तुझा."
"आलो आलो मी."

आजीच्या खोलीत ओम, ओशिन, मिनू, उषा, सुबोध, शोभा आणि त्याला परत न्यायला गाडी घेऊन आलेला दिपक सर्व जमा झाले.
"मला असं वाटतंय कि अनुभव आणि इंदिरा एकमेकांना आवडायला लागले आहेत. इतकंच नाही तर प्रेमही करायला लागलेत एकमेकांवर. याबाबत तुमचं सर्वांचं काय मत आहे?"

"खरं आहे." सुबोधनं त्याचं मत दिलं, "मला तर 100% शुअर आहे. बघा इतकं भांडण झाल्यावरही एकमेकांची किती काळजी घेत आहेत दोघं." शेवटचं वाक्य तो ओशिनकडे पाहुन म्हणाला.

"मला तर इंदिरानं केस तोडु नये म्हणून अनुभव सरांनी जेव्हा त्यांची सोन्याची चैन काढुन तिच्या गळ्यात टाकली तेव्हाच कन्फर्म झालं कि सर तिच्या प्रेमात आहेत. आणि इंदिरा तर सरांचा पहिला चित्रपट आला तेव्हापासून म्हणजे दहावी - बारावीला असेल तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमात आहे." मिनू बोलली.

"मलापण असंच वाटतं." ओम.

"हो मी बघितलं आहे इंदिरा मॅडमला अनुभव सर दिसले कि लाजून हसतांना." शोभा.

"हो मलाही असंच वाटतं." दिपक.

"बघ उषा लग्नाच्या आधीच जोरूचे गुलाम झालेत ही मुलं." ओम आणि दिपकला आजीनं टोमणा मारला, ''ओशिन तुला काय वाटते?"

"बायकोचं ऐकलं म्हणजे गुलाम थोडा नं होतो नवरा तिचा."

आजीला हसू आवरलं नाही. ती जोरात हसू लागली. "सर्व नग माझ्याच पदरी पडलेले दिसत आहेत."

"माझं काही चुकलं का आजी." ओशिननं घाबरून विचारलं.

"नाही पण मला अनुभव इंदिरा विषयी उत्तर हवं होतं. नवरा बायको विषयी नाही ओशिन."

"हो का, मला तर वाटतं कि इंदिरा पहिल्या भेटीतच सरांवर भाळली अन सरांच्याही मनात तिच्या विषयी जागा तयार झाली आहे."

"हो ना, अनुभव खूप काळजी घेतो इंदिराची." सुबोध म्हणाला.

"मग तुम्हाला नाही वाटत का त्यांनी आपलं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करावं यासाठी आपण त्यांना काही मदत करावी म्हणून?" आजीनं सर्वांना विचारलं.

"आजी अनुभवचा राग तर माहित आहे. त्याला मी असं काही  कांड रचलं असं माहित होताच तो माझ्याशी मैत्रि तोडेल."

"आणि मला जॉब वरून काढतील सर."

"आणि तुम्ही जास्त इमानदारी दाखवायच्या चक्कर मधे इथलं तिथं केलं तर मी ओशिन तुला नेपाळला परत पाठवेल अन सुबोध तूझ्या आईला सांगून देईल, 'तूझ्या मुलाचं लवकर लग्न लाव नाहीतर एक नेपाळी मुलगी सुन होईल तुझी."

"आजी.... " सुबोध आणि ओशिननी आश्चर्यचकित आजीला बघितलं.

"तुम्हाला काय वाटलं, आजीला स्वतः हून चालता फिरता येत नाही तर आजीला समजणार नाही कोणाचं काय सुरु आहे ते. असेच केस नाही पिकलेत आजीचे. काय दिपक बरोबर ना!"

"हो आजी."

"आम्ही अजिबात कोणालाच काहीच सांगणार नाही." सुबोध आणि ओशिन दोघेही एकसुरात म्हणाले.

"चला तर मग डोकं लावून सांगा काय करायचं ज्यानं अनुभव आणि इंदिरा त्यांचं प्रेम जग जाहीर करतील?" आजीनं ऑर्डर सोडली.

"त्यांना कँडल लाईट डिनरला पाठवू ताजमधे." शोभा.

"नाही, नो आऊटसाईड प्लान. अजून काही दिवस बाहेर जाणं तापदायक आहे त्यांच्यासाठी. मीडिया त्रास देईल."

"मग आपल्या गार्डनमधे लावून देऊ त्यांना कँडल लाईट डिनर."

"ते दोघं विचारतील आमच्यासाठीच का? मग काय सांगायचं?"

"आपण सर्व मिळून घरी टीव्हीवर एखादा रोमँटिक सिनेमा पाहु. आपण सर्व सोबत बसलेले असणार तर त्यांना शंकाही नाही होणार आपलं काही प्लॅनिंग आहे म्हणून."

"हे ठीक राहिल. तुमच्या आजोबाला देव आनंद खूप आवडायचा. आम्ही दोघांनी, "हरे रामा हरे कृष्णा" बघितला तेव्हा परत एकदा एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आम्ही." आजी लाजल्या.

"म्हणजे तुम्हाला चित्रपट पाहायला आवडायचे?" शोभा बोलली.

"हो, आता का नाही आवडत हे नको विचारू. चहा घेऊन ये बनवून सगळ्यांसाठी." आजीनं गोष्ट कापली, " चला कोणता चित्रपट बघायचा आपण रात्री बोला."

"फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे." ओशिन अति उत्साहात बोलली.

"तुला सुबोध सोबत एकट्यात बघायचा आहे असं दिसतंय? आपल्याला सर्व सोबत बसून बघू शकू असा फॅमिली वाला रोमँटिक चित्रपट हवा समजलं ओशिन.".

"हो." ओशिनला वाटलं ती थोडावेळ आणखी इथे थांबली तर नेपाळवारी पक्की. ती आजीला म्हणाली, " मी माझं थोडं पेपर वर्क आहे ते जाऊ का करायला?"

"जा."

"मैने प्यार किया!" ओम म्हणाला.
"हो." मिनू उडी मारून म्हणाली, "इंदिराचा फेव्हरेट सिनेमा आहे हा आणि यात गाणेही खूपच रोमँटिक आहेत."
"बस बस इथेच रहा. ओमच्या स्वप्नात जाऊ नको."
"हो !''
"सुबोध. सुबोध !" सुबोध खुर्चीवर बसल्या बसल्याच झोपला.
"आजी झोपु द्या त्यांना. मी मोबाईलमधे डाउनलोड करून ठेवतो मुव्ही." दिपक म्हणाला. 
"ठीक आहे. मिटिंग बरखास्त !"
"माझ्या शिवाय मिटिंग घेऊन बरखास्त पण केली." अनुभव त्यांना म्हणाला. त्याला बघताच सर्वांना झटका बसला.
"तु कधी आलास?"
"जेव्हा सुबोध आला तेव्हाच त्याच्या मागे मागे."
"मी त्याला काहीच नाही सांगितलं. प्लीज ओशिनला नेपाळला परत पाठवू नका." सुबोध खाडकन झोपेतून उठून म्हणाला.
"अरे हे कधी झालं? म्हणजे तीन तीन लग्न अटेंड करावे लागतील मला यावर्षी." अनुभव गंमतीनं म्हणाला.

"चार! स्वतःच्या लग्नाला विसरलास का?" आजी म्हणाली.

"आजी मला माहित आहे तुला काय हवं आहे. पण जो काही गोंधळ माझ्यामुळे इंदिराच्या आयुष्यात घडून आला ते बघता मला नाही वाटत कि मी तिच्यासाठी योग्य आहे."

"म्हणजे तुला इंदिरासोबत लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाही." आजी आनंदानं उसळून म्हणाली.

"नाही, तिच्याशी लग्न होणं माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर घटना असेल. पण तिलाही असं वाटायला हवं तेव्हाच मी तिच्याशी लग्नाला तयार होईल. मला आता तिच्यावर काहीच थोपवायचं नाही. म्हणून तुम्ही लोकही असं काही प्लॅनिंग करू नका ज्यानं तिला अनकंफर्टेबल वाटेल."

"ओके मुव्ही प्लॅन कॅन्सल. पण आपण तिच्यासाठी कपल डान्स तर करू शकतो ना." सुबोध म्हणाला.

"हो तिला मैने प्यार किया चित्रपटाची गाणी खूप आवडतात. आम्ही, मी व ओम, ओशिन व सुबोध आणि शोभा व दिपक छान कपडे वगैरे घालून एक एक डान्स परफॉर्म करू. आणि सर्वात शेवटी सर्व मिळून एक डान्स करू." मिनूनी आयडिया दिली.

"हो, मॅडमला डान्स करणं आवडतं, फार्म हाऊसवर कसला धमाल डान्स केला होता ना." शोभाने फार्म हाऊसची आठवण दिली.
"हो ना तिचा मूडही बदलेल. नको नको म्हणू प्लीज अनुभव डान्सला. वाटलंस तर तुही एखादा डान्स कर तिच्यासाठी". आजी कळवळून म्हणाली.

"ठीक आहे. करा प्रॅक्टिस सुरु. संध्याकाळ होतंच आहे." अनुभवनी डान्सला होकार दिला. सर्व प्रॅक्टिसला लागले.

इंदिराची तब्येत बरी नाही असं डायरेक्टर कोहलींना सांगून अनुभवनी शूटिंगला एक दिवस ब्रेक दिला.

तिच्या मनात आलं, रात्री सात वाजले तरी तिला कोणीच विचारायला, बघायला आलं नाही. तिच्यामुळे टेंशनमधे असतील का? अनुभव तर आला होता मागे मागे. तिनेच त्याला एकटं सोड म्हटलं होतं. जे झालं ते बदलवू नाही शकत मी, आता जे सोबत आहेत तेच माझी फॅमिली आहेत. मग सोबतच्या सगळ्यांना का म्हणून टेंशन द्यायचं. फ्रेश होऊन, चेहऱ्यावर हसू घेऊन जाते भेटायला. इंदिरा तिच्या खोलीतील गणपती पुढे दिवा लावून, शुभमकरोति म्हणून हॉलमधे आली.

हॉलमधेही आज दिवा बत्ती झालेली दिसत होती. धूपचा सुगंध पूर्ण घरात दरवळला. गणपती बाप्पामुळे इंदिरा सापडली म्हणून अनुभवनी दिवाबत्ती करायला आज  परवानगी दिली. स्वत:ही गणपतीपूजन केले. 

दिपक व ओम डान्स शो साठी तिथे सोफा वगैरे हलवून जागा करत होते. तर सुबोध फुगवलेले फुगे आजूबाजूला लावून हॉल डेकोरेशन करत होता. अनुभव बसून त्यांना सुपरवाईज करत होता.

"हे सगळं काय सुरु आहे?" इंदिराने अनुभवला विचारलं.

"डेकोरेशन."

"ते मलाही दिसतेय हो. मी म्हटलं आज बर्थडे आहे का कोणाचा?"

"नाही, सहजच. सेल्फ रिलॅक्ससेशन साठी. ये बस. " त्याने उठून तिला खुर्चीत बसवलं, "बाहेर जाणं म्हणजे डोक्याला ताप लावून घेणं. म्हणून मग आजी & कंपनी म्हणाली घरी करू काहीतरी मिळून ज्यानं सर्वांना छान वाटेल. मनावरचा ताण तणावही दूर होईल."

"छान आयडिया आहे. काय कार्यक्रम आहे मग?"

"डान्स, मैने प्यार कियाच्या गाण्यांवर."

"खरंच!''

"हो. तु पण कर एखाद्या गाण्यावर डान्स."

"मला डान्स नाही फक्त उडया मारता येतात."

"चालेल. आपण आपल्या साठीच करतोय हे."

"बघते मग."

"तब्येत कशी आहे तुझी? थकवा नाही वाटत ना आता?"

"आराम झाला छान. ठीक आहे आता. मिनू वगैरे कुठे आहे?"

"तूझ्या मागे."

मिनू मस्त 'मैने प्यार किया' च्या भाग्यश्रीचा गेटअप करून आली. तसाच कुर्ता सलवार, दोन वेण्या.

"किती गोड दिसतेय तु!"

"हो ना, तुलाही गोड दिसायचं आहे. चल माझ्या सोबत."

"कुठे?"

"चेंज करायला. आजची थीम मैने प्यार किया आहे ना. सर्व त्यानुसारच कपडे घालणार. आता चल लवकर. मेकअप मॅन ला मग माणसांचा मेकअपही करायचा आहे." मिनू तिला हात पकडून घेऊन गेली. 

ओशिन बॅटमिंटनचा व्हाईट & ब्ल्यू वन पीस घालून मेकअप मॅन समोर बसली होती. तर शोभा पोपटी ब्लाउज आणि राणी कलरची साडी, कपाळावर सोनेरी मांग टीका, कानात मोठे झुमके, गळ्यातही सोन्याची माळ, नेकलेस, हातात बांगड्या, कमरबंध, पायात पैंजण अशी सोळा शृंगार घालून रेडी झाली. तिच्याकडे बघून इंदिरा म्हणाली,
"मी काय म्हणते मिनू आज लग्नच उरकावुन टाकलं तर?"
"होहो उत्तम आयडिया."
"ईश्श ! काहीही मॅडम." शोभा लाजली, "खाली जाऊन कुकनी स्वयंपाक कसा केला ते बघते."
"हो जा, पण त्या दिपकला एक झलक द्यायला नको विसरू." इंदिरा मागून बोलली. ती धावतच खाली गेली.

मिनूनी इंदिराला पिवळी साडी दिली.
"हे काय?"
"तू सुद्धा साडी घालणार आहेस."
"मिनू काही शिजत नाही आहे ना तुम्हा सर्वांच्या डोक्यात."
"नाही ना यार. सर्व कॉस्ट्यूम संपले. ये पगला है गाण्याची ही साडीच आहे आणि याचं ब्लाउज तुझ्याच फिटिंगच मिळालं. म्हणून म्हटलं तु हे घाल."
"ओके !"

आठ वाजता सर्व हॉलमधे हजर झाले. आजी आणि उषा रीमा लागूचा मेकअप करून आल्या. मस्त मेहफिल जमली. इंदिराची असं साडी घालून, केसात गजरा माळून अनुभव समोर जायची पहिलीच वेळ त्यामुळे तिला खूपच ऑकवर्ड वाटत होतं. त्यात त्या पिवळ्या रंगात तिचा गहूवर्ण जसा आणखीच उजळून निघाला. ती इतकी गोड दिसत होती कि अनुभवची नजर तिच्यावर गेली की हटतच नव्हती. म्हणून त्यानं तिच्याकडे पाहुन, तिच्याशी बोलणं टाळलं. तोही पिवळ्या फुल्ल बाह्यांच्या टी शर्ट आणि पांढऱ्या जिन्समधे एकदम चॉकलेट बॉय दिसत होता.

पहिला डान्स, शोभा आणि दिपकचा

"आते जाते हसते गाते
सोचा था मैने मन मे
कई बार.... "

दुसरा, ओशिन आणि सुबोधचा

"आजा शाम होने आइ,
मौसमने ली अंगडाई,
तो किस बात की है लडाई,
तू चल मैं आइ... "

या गाण्यावर झाला.

तिसरा, मिनू आणि ओमचा
"मेरे रंगमे रंगने वाली
परी हो या फिर
परियोकी राणी
या हो मेरी प्रेम कहाणी
मेरे सवालो का जवाब दो.. "

आता पाळी आली मेन हिरो हिरोईनची

दिपकनी गाणं लावलं, पण अनुभव किंवा इंदिरा दोघांपैकी एकही जागेवरून उठायला तयार नाही.
"इंदिरा उठ. तुमचा परफॉर्मन्स झाल्याशिवाय प्रोग्राम संपणार नाही आपला."
"अगं पण मी काहीच प्रॅक्टिस नाही केलेली."
"तू फक्त गाण्याचे बोल ऐकून जसं वाटलं तसं हालचाल कर. आम्ही नाचतो तूझ्या आजूबाजूला."

"अनुभव चल लवकर." सुबोधनी अनुभवला उठवलं

दोघेही एकमेकांसमोर येऊन उभे झाले.
गाण्याचे म्युझिक सुरु झाले.

"खूप सुंदर दिसत आहेस साडीमधे." तो तिला बघत मनाशीच बोलला, "असं वाटतं तूझ्या केसात मळलेल्या गजऱ्याचा सुगंध घेत तूझ्या कुशीत पडून राहावं."

"तुम्हीही एकदम रापचिक दिसताय या टी शर्टमधे. असंच समोर बसून बघतच राहायची इच्छा होतेय." तीही मनोमन विचार करून हसली.

"इतकी गोड पाहु नकोस बरं प्रेमात पडशील माझ्या."

"मी कधीचीच पडली आहे."

आपल्याच विचारात हरवलेले ते दोघे एकमेकांना एकटक बघत उभेच होते. सर्वांनी टाळ्या वाजवल्या तेव्हा ते भानावर आले.

"मला अजिबात डान्स येत नाही. तुम्हाला माहितेय ना." इंदिरा अनुभवला म्हणाली.
"ठीक आहे तुझा फार्म हाऊस वरचा धिंगाणाही चालेल."
"असं !"
"हो, मी सांभाळून घेईल." तो गोड हसून म्हणाला.

गाणं सुरु झालं, अनुभवनी तिचे दोन्हीही हात त्याच्या गळ्यात टाकले आणि स्वतः दोन्हीही हातांनी तिला कमरेला पकडून हवेत उचलले. एकमेकांच्या नजरेला नजर देत दोघेही डान्स करू लागले.

"दिल दिवाना बिन सजना के माने ना 
ये पगला है, समझनेसे समझे ना, 

धकधक बोले, इत उत डोले दिन रैना, 
ये पगला है, समझनेसे समझे ना."

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार