एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-22

Story of a young wandering girl in search of her destination. Thank you

भाग 21 वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part_6274

एक उनाड वाट भाग 22

पहाटे चार वाजताच्या सुमारास अनुभव शुद्धीवर आला.
"कसं वाटत आहे? ठीक आहेस?" त्याची शुद्धीत येण्याची वाट बघत तिथेच थांबलेल्या सुबोधनी त्याला विचारलं.

"ठीक आहे मी. तु पड बेडवर. आराम कर. नाहीतर घरी जाऊन झोप." सुबोधचे चोळून चोळून लाल झालेले डोळे बघून अनुभव त्याला म्हणाला.

"ते मी करेलच. तु आधी सांग इंदिरा सोबत का भांडलास?" "नाव नको घेऊ तिचं. माझ्याशी काम संपलं तिचं आता. हिरोईन व्हायचं होत तिला. झाली ती. एक चित्रपट काय मिळाला खूप मोठ्ठी हिरोईन झाल्यागत इगो आलाय तिच्यात."
"तुला कोणी सांगितलं तिला हिरोईन व्हायचं होतं म्हणून? ती कधी बोलली तसं?"
"डायरेक्ट नाही बोलली पण तिच्या कृतीवरून तसंच दिसून आलं. एकदा ती मला ऑडिशनच्या स्टुडिओत दिसली, दुसऱ्यांदा त्याच एरियात फिरतांना भेटली. याचा अर्थ काय?"
"योगायोग !"
"सुबोध सरळ बोल म्हणायचं काय आहे ते?"
" इंदिरा रात्री पासून घरी आली नाही."
"असेल कुठेही. मला काही नाही करायचं तिचं. दहा लाख आहेत तिच्या अकाउंटमधे. तिला हवं तिथे जाऊन हवं ते करू शकते ती."
"अच्छा ! मोबाईल, ATM, क्रेडिट कार्ड शिवायही अकाउंट मधल्या पैशांचा वापर करता येतो का?"
"सुबोध तु कोड्यात बोलणं बंद कर." अनुभव वैतागला.
"इंदिरा तिची पर्स, त्यात ATM, मोबाईल व इतर सर्व सामान तसंच गाडीत ठेऊन निघून गेली.  " सुबोधनी त्याला उठवलं, "चल आता तिच्या खोलीत."
"कशाला?"
"योगायोग समजून घ्यायला."

ते इंदिराच्या खोलीत गेले. सुबोधनी तिच्या टेबलवर ठेवलेली  MPSC ची पुस्तकं त्याला दाखवली.

"पुस्तकं? ती आली तेव्हा तिच्याकडे काहीच सामान नव्हतं."
"हो, ही पुस्तकं मी तिला आणून दिली होती." सुबोधनी त्याला त्यांची पहिल्या भेटीची पूर्ण गोष्ट सांगितली आणि मिनू बद्दलही सांगितलं.

"पण ती मला कधीच बोलली नाही असं काही."
"होऊ शकतं तिने प्रयत्न केला पण तु ऐकून घेतलं नाही."
अनुभवला आठवलं जेव्हाही तो तिला, 'हिरोईन' म्हणायचा ती उदास व्हायची किंवा तिचा चेहरा त्रासदायक व्हायचा.  दोहाला जेव्हा प्लेन लँड झालं तेव्हाही ती काहीतरी म्हणत होती पण प्लेन लँड झालं आणि एयर होस्टेसच्या सूचना सुरु झाल्या म्हणून ती गप झाली होती.

"तसही तु कोणाचं ऐकतो का? लहानपणापासून ओळखतो तुला. बरोबर नाही केलंस तु. रात्री दहा अकरा वाजता भर पावसात  मुंबईच्या सुनसान रस्त्यावर एका तरुण मुलीला असं एकटं सोडून आलास."

"हे काय करून बसलोय मी रागाच्या भरात. तेव्हा डोकं चाललंच नाही." अनुभवनी घड्याळात बघितलं, "पाच वाजलेत. चल आपण आम्ही गाडीच्या बाहेर उतरलो होतो त्या एरियात जाऊन इंदिराचा शोध घेऊ." अनुभव उठून बाहेर पडायला तयार झाला.

"हो मी तिच्या मैत्रिणीला, मिनूला रात्रीच सांगितलं इंदिरा जिथे जिथे जाउ शकते त्यांना कॉन्टॅक्ट करायला."

"हो बरं केलं. मीही मुर्खा सारखा दारू पीत पाडून होतो रस्त्यावर. तु पोलिसांना कळवलं?"

"हो. मी माझ्या पोलीस कॉन्टॅक्टस मार्फत त्यांच्या खबरीकडून इंदिराचा शोध घ्यायला सांगितलं आहे." सुबोधला काहीतरी आठवलं, "तु हे लाव आधी. मग आपणही जाउ तिकडे." सुबोधनी साईड टेबलवर ठेवलेली नकली दाढी मिशी त्याला लावायला दिली.

"हे कशाला आता."

"एका खबरीने खबर दिली की रात्री अकराच्या दरम्यान एक इंदिरा सारखीच मुलगी अंधेरीच्या मेन रोडवरून धारावीकडे जातांना दिसली. तेव्हा त्याच टर्न वरून आपण धारावीत जातोय. त्यात तुमचा कालचा प्रतापी इंटरव्यू काल रात्रीच टीव्हीवर झळकला. आज सहा सात वाजता सर्व वर्तमान पत्रांची आजची ताजा खबर असेल."

"हो बरोबर आहे तुझं. उगाच लोकांचा गराडा भोवती जमायचा आणि गोंधळ वाढायचा."

अनुभवनी दाढी मिशी लावली आणि ते दोघं धारावीत इंदिराला शोधायला दाखल झाले. सोबतीला दोन पोलीस कॉन्स्टेबल घेऊन गाडी मेन रोडवर ठेऊन ते पायीच चालून लोकांना इंदिराचा फोटो दाखवून, 'कुठे बघितलं का?' म्हणून विचारू लागले. एकाला एक खचाखच लागून असलेली घरं वजा झोपड्या, जागोजागी कचरा निवडत बसलेली म्हातारी, कुठे रस्त्याच्या कडेलाच शी करायला बसलेली लहान मुलं. घाण, वास, रस्त्यावर वाहणारं सांडपाणी.. अनुभवला कशाचंच भान नव्हतं. फक्त इंदिराला शोधायची धून त्याच्यावर सवार होती.

गणेश उत्सवाचा दुसरा दिवस म्हणून काही घरी गणपतीच्या आरतीचे आवाजही येत होते. थोडं आत गेल्यावर एका चौकात जराशी मोकळी जागा दिसली. तिथे गणपतीचा पेंडॉल होता आणि गणपती पूजेची रेलचेल सुरु होती.

"अनुभव आरती सुरु होतेय बहुतेक. चल आरती करू आणि  दर्शन घेऊ बाप्पाचं." सुबोध अनुभवला म्हणाला.

"सुबोध इथे आपण आरती करायला नाही आलो."

"हो पण बाप्पाची आरती सोडून जाणंही योग्य नाही."

"मग तु जा सुबोध. मला नाही यायचं. तुला माहितेय ना माझं भांडण आहे बाप्पा सोबत."

"होऊ शकतं आज ते मिटून जाईल."

" परत कधीच न येण्यासाठी मला सोडून गेलेली आई येणार नाही, त्यामुळे बाप्पाचं अन माझं भांडणही कधीच मिटणार नाही."
"चला या लवकर, आरतीची वेळ झाली." एक पन्नास पंचावन्न वर्षाची काकू सर्वांना आरतीला बोलवू लागली.

"अनुभव इंदिरासाठी प्रार्थना करायला तर ये."

"ठीक आहे. पण मी पंडालच्या बाहेरच उभा राहणार."

"चालेल."

आरती सुरु झाली,
"सुखकर्ता दुःखहर्ता
वार्ता विघ्नाची....."

अनुभव विचार करू लागला, लवकरात लवकर आरती संपो आणि आम्ही परत इंदिराला शोधणं सुरु करो. आरती संपली.  रिमझिम पाऊस सुरु झाला तसं सुबोधनी अनुभवला बाप्पाच्या पंडालात खेचलं.

"सुबोध काय हे?" अनुभव त्याला रागानेच बोलला. पाऊसही इतक्या जोरात सुरु झाला की समोरचं काहीच दिसेना. अनुभवनी रागातच बाप्पाच्या मूर्तीला बघितलं. जणू बाप्पाला म्हणत होता,
"आणखी काय काय हिरावणार माझं. आधी बाबा मला व आईला सोडून वेगळे झाले, मग आईलाही तु... इतकं कमी नव्हतं की आजीचे पाय अधू केले आणि आज..... "

त्याची नजर बापाच्या मूर्तीच्या पायाजवळ घडी करून ठेवलेल्या कापडावर गेली. त्यानं जाऊन तो कपडा बघितला. 
"अनुभव, अनुभव पाऊस थांबला. चल." सुबोधनी त्याला आवाज दिला.
"सुबोध ही ओढणी आहे इंदिराची. काल तिच्या अंगावर हिच ओढणी होती."
"जय श्री गणेश. मी म्हटलं होतं ना यावेळी तुझं बाप्पा सोबतच भांडण मिटेल."
"हो सुबोध."
"बाप्पा इंदिरा सुखरूप मिळू दे. पुढल्यावर्षी तुला वाजत गाजत घरी नेईल." अनुभव बाप्पाच्या मूर्तीच्या पाया पडून म्हणाला.
त्यांनी ओढणीबद्दल विचारपूस केली तेव्हा आरतीसाठी बोलवणाऱ्या काकूंनी सांगितलं,
"काल रात्री जागरण होतं आमच्या महिला मंडळाचं. एक तरुण मुलगी कशी कुठून आली माहित नाही. बसली बसली, दर्शन घ्यायला बाप्पाच्या पायाजवळ गेली अन पडली तिथंच. तेव्हाच ही ओढणी पडली. आता आरती साठी आवरतांना दिसली. मी घडी करून ठेवली."

"ती मुलगी कुठे आहे?"
 "त्या इथून दुसऱ्या गल्लीत कविताचं घर आहे. ती, अंबाबाई अन तिचा मुलगा, मुलगी घेऊन गेल्या होत्या त्या मुलीला घरी. बाकी त्यांनाच माहित. आज आरतीला बी आल्या नाही बगा काय झालं त?"
"हा फोटो पाहुन सांगा. हिच होती का ती मुलगी."
"जोरात पाऊस होता सुरु. लाईट कमीच होती. मला दिसतं बी कमीच. नाही सांगू शकत."

"सुबोध मला वाटतं ती इंदिराच आहे."
"हो मलाही वाटतंय. म्हणूनच बाप्पाने आरतीला थांबवलं आपल्याला. मी हवालदारांना गल्लीतल्या लोकांना इंदिराचा फोटो दाखवून विचारपूस करायला सांगतो."

"हो आपण डायरेक्ट त्या कविता आणि अंबाबाईच्या घरी जाउ."
सकाळचे नऊ वाजत आले. अनुभव आणि सुबोधनी कविता व अंबाबाईचं घर कोणतं हे गल्लीत दिसणाऱ्या पोरांना विचारलं तेव्हा समजलं फक्त लहान मुलंच घरी आहेत मोठी मंडळी कामं करायला घराबाहेर गेलीत. बायका घरकाम करायला तर माणसं कपडा मिल किंवा कचरा विलगीकरणाच्या कामाला गेलीत. दुपारी 1-2 शिवाय कोणी परतायचं नाही. आता कसं शोधायचं त्या बायांना आणि इंदिराला. अनुभवला एक अनामिक भीती वाटू लागली. मुंबईत तरुण मुलींची तस्करी मोठया प्रमाणात चालते. अशा एखाद्या रॅकेटमधे इंदिरा फसली तर?

"अनुभव काय झालं?" विचारात गुरफटलेल्या अनुभवला सुबोधनी विचारलं.
"काही नाही, बस भीती वाटतेय की इंदिरा वाईट हातात पडायला नको."
"आपण आहोत तोपर्यंत असं कधीच होणार नाही." तो अनुभवच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, "चल या गल्लीतच पुढे जाउ. काहीतरी सुगावा लागेलच."

ते गल्लीच्या दुसऱ्या टोकाला येऊन पोहोचले. सेंट्रल रेल्वेची लाईन तिथून गेली होती. तिथं रस्ता संपला. ढगाळ वातावरण जाऊन सूर्य बऱ्यापैकी डोकयावर येऊ लागला. अनुभवनी डोकयावर हात ठेऊन वर आकाशाकडे बघितलं.

"सुबोध त्या घराच्या छतावर बघ. ते वाळू घातलेले कपडे इंदिराचेच दिसत आहेत." शेजारच्या गल्लीतच थोडं चांगलं, दोन मजली घर त्यांना दिसलं.

"हो का. चल विचारू त्या घरी."

दोघेही इंदिराचे कपडे दिसले त्या घरी गेले. पण घराला कुलूप. त्यांना आत कोणीतरी असल्याचा भास झाला. सुबोधनी आजूबाजूला बघितलं एक छोटा दगड दिसला. त्यानं दोन तीन दणके कुलुपावर हाणले. कुलूप तुटलं. आत जाऊन बघतात तर बाजीवर एक जर्रर्र म्हातारा स्वतःशीच बडबड करतांना दिसला. अनुभवनी इंदिराला शोधलं. पण ती मिळाली नाही. पण कपडे तिचेच होते.

"हँड्सअप !"
"पोलीस? " यांना असं कुलूप तोडतांना बघून बाजूच्या झोपडीतल्या मुलांना वाटलं त्या घरात कोणी चोर घुसले म्हणून त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावलं.

सुबोधनी त्यांना समजावून सांगितलं की त्यांनी असं का केलं.  अनुभवनी त्याची दाढी मिशी काढून दाखवली आणि विचारपूस करत फिरणारे त्यांच्या सोबतचे दोन कॉन्स्टेबलही तिथे आले. तेव्हा पोलीस शांत झाले. मुलांना दाखवायला म्हणून अनुभव सोबत दोन तीन सेल्फी काढून पोलीस इन्स्पेक्टर कामाला लागले. ज्या मुलांनी पोलिसांना फोन केला त्यांनाच अंबाबाईलाही फोन करून बोलवायला सांगितलं. अंबाबाई घरी परतली काय झालं ते पाहायला.

"काय झालं साहेब? घराचं कुलूप कशापायी तोडलं?''
"दुसरं लावून मिळेल. तु सांग ही मुलगी कुठे आहे?" पोलिसांनी तिला विचारलं.

अंबाबाई गप्पच.
"काय बाई विकलं नाही ना पोरीला?" पोलीस डायरेक्ट मुद्द्यावर आला. त्यांच्या पेशात त्यांना रोजच अशा केसेस दिसत होत्या.
"तुम्ही असं काही केलं असेल ना. तर बघा तुमची खैर नाही." अनुभव मुठा आवळून तिला म्हणाला.
"अहो साहेब शांत व्हा. सकाळीच कामाला जातांना भेटली मी तिला. गरम गरम पोहा खाऊ घातला तिला."
"मग सांग ना कुठे आहे ती?" पोलीस साहेबांची सहनशक्ती संपत आली , "आम्हाला भरपूर कामं असतात. ही केस निपटली तर दुसरी जरा लवकर बघता येईल ना आम्हाला."

"हो ते ठीक आहे. पण त्या मुलीनं मला सांगितलं की तिला शोधायला दोन माणसं येतील. त्यांना अजिबात सांगायचं नाही ती कुठे आहे. म्हणून विचार करतेय."

"सुखरूप आहे ना." पोलिसांनी खात्री केली.

"हो साहेब. रात्री गणपतीपुढेच पडली ती. कोणीच बघायला तयार नव्हतं. मला माझ्या पोरीसारखीच वाटली. म्हणून मी व माझ्या मुलानं तिला घरी आणलं. माझ्या मुलीनं आणि मी तिचे कपडे बदलवून दिले. अर्ध्या रात्री फणफण ताप चढला म्हणून सदाभाऊच्या ऑटोनं दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरनी दवा पाणी देऊन सलाईन चढवली. माझी मुलगी अजून तिच्याजवळच आहे. मुलगा ज्युनियर आर्टिस्टच्या ऑडिशनला गेला आहे."

"काय भांडण वगैरे झालं होतं का साहेब?" पोलीस इन्स्पेक्टरनी अनुभवला विचारलं.

"हो ! झालं होतं थोडं. ती खूपच रागावली माझ्यावर आणि रागातच निघून गेली."

"दिसतच आहे. अंबाबाई जाऊदे ते. ती मुलगी रागात आहे. म्हणून म्हटली सांगू नको. पण तु किती दिवस ठेवणार तिला. एका मोठया चित्रपटाची हिरोईन आहे ती आणि साहेबही ऍक्टर अनुभव सिन्हा आहेत. काही झालं तर तुझ्यावर येईल सगळं. घेऊन जा मुलीकडे साहेबांना."

अंबाबाईनं अनुभवकडे लॉटरी लागल्यागत बघितलं, "ठीक आहे. चला साहेब."

"अनुभवजी तुम्ही बघा आता पुढचं. मी जातो पोलीस स्टेशनला. कॉन्स्टेबल आहेतच तुमच्या सोबत. काही मदत लागली तर करा फोन." इतकं बोलून पोलीस इन्स्पेक्टर तिथून निघून गेले.
"साहेब रागवणार नसाल तर काही सांगायचं होतं." अंबाबाई

"नाही रागवणार तो ! बोला." सुबोधनी हमी दिली.

"आमच्याकडे पैसे नव्हते डॉक्टरला द्यायला म्हणून तिचे कानातले विकले मी." ती भित भितच बोलली.

"ठीक आहे सोडवून घेऊ. पण तुम्ही ठेऊन घेतले असतील तर परत द्या. तुम्हाला तुमची पूर्ण भरपाई मिळेल. अजून काही?" सुबोधनी विचारलं. 

"माझ्या मुलीला आणि मुलाला ऍक्टिंग करायला खूपच आवडतं. काही काम.... "

"ऑडिशनला बोलवणार. अनुभव ती दाढी मिशी लाव बाबा परत तु." सुबोध त्याच्याकडे वळून म्हणाला.

"आता चालायचं दवाखान्यात?" अनुभवनी विचारलं.

"हो हो चला ना. मी कधी नाही म्हटलं. तुमचं माणूस तुम्हाला सुखरूप मिळालं इतक्यातच आनंद मला. बाकी काही नको. फक्त तेवढं माझ्या लेकरांच्या ऑडिशनचं बघाल हो." अंबाबाई सुबोध सोबत पुढे बडबड करत चालु लागली तर अनुभव त्यांच्या मागे चालत विचार करू लागला,
"इंदिराचं मन आमच्या सोबत घरी चालण्यासाठी कसं वळवायचं? असं काय बोलायचं की ती घरी यायला तयार होईल?" 

क्रमश :

©®अर्चना सोनाग्रे वसतकार