एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-20

Story of a young girl who is wandering in search of her destination. Thankyou

एक उनाड वाट भाग 19 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचा. http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-19_6245

एक उनाड वाट भाग 20
अनुभवला असं गळ्यातली चैन काढून इंदिराच्या गळ्यात टाकतांना पाहुन मायराला खूप राग आला. ती शूटिंग सोडून हॉटेलमधे परत निघून गेली. हिरोईनच निघून गेल्यावर काय चित्रीकरण करायचं म्हणून पॅकअप सुरु झालं.

तिकडे मिनूनं इंदिराला अनुभवच्या नावानं चिडवून हैराण करून सोडलं आणि इकडे मायराच्या जागी इंदिरा आता फिल्मची हिरोईन आहे ही गोष्ट डायरेक्टर कोहलीने त्यांच्या मित्राशी बोलून झाल्यावरच सर्वांना सांगायची, इंदिरालाही असं अनुभवला सांगितलं.

सर्व हॉटेलमधे परतले. अनुभवच्या खोलीचं दार वाजलं. "कोण?"
"मी !"
त्यानं दार उघडलं, "बोल."
"मी ऐकलं मायराला मी तुमच्या सोबत तो सीन करून दाखवला म्हणून खूप राग आला आणि ती आता चित्रीकरण सोडून जायचं म्हणतेय."
"हम्म !"
"मी जाऊन माफी मागू का तिला? मला वाटतं मी सॉरी म्हटलं की ती तयार होईल शूटिंगसाठी. उगाच माझ्यामुळे तुम्हा लोकांचं नुकसान नको व्हायला."
"बस !" अनुभवच्या मनात आलं तिला सरळ सांगून द्यावं की तूच आता हिरोईन आहेस बाई चित्रपटाची. तुलाच सगळी शूटिंग करायची आहे माझ्यासोबत. पण डायरेक्टर कोहलींनी  सांगायचं नाही म्हटल्यावर वाट पाहण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय नव्हता.
"आम्ही बघून घेऊ. तू जा आराम कर."
"तुम्हाला राग आला माझा?"
"इंदिरा, तू प्लीज तूझ्या छोट्याशा मेंदूला जास्त त्रास नको देऊ. मला शांततेत आराम करू दे. जा आता." तो इरिटेट होऊन तिला म्हणाला. 
"चैन... "
"पळून चाललीस कुठे?"
"नाही."
"मग मागेल तेव्हा दे. जा... "

अनुभवला चांगलं नाही वाटलं इंदिराशी असं रूडली बोललेलं. पण इंदिराला त्याला आताच काही कळूही द्यायचं नव्हतं.

मायरा, तिची आई, डायरेक्टर कोहली आणि अनुभव सोडून बाकी सर्व मंडळ सिडनीची नाईट लाईफ बघायला गेले. सिडनी हार्बर ब्रिज फिरले, लुना पार्कचा रात्रीचा नजरा तर अप्रतिम. चायना टाउनमधे चायनीज पदार्थांवर ताव मारण्यात आला. सर्व खूप एंजॉय करत होते पण इंदिराचं मन तिथे नव्हतंच जणू. तिला अनुभवची काळजी वाटत होती. त्याचं वागणं तिला कळत नव्हतं. तो तिला टाळायचा प्रयत्न करत होता इतकंच तिला समजलं.

"काय झालं? तू नाराज दिसतेस? चैन परत करायला गेली होतीस. दिली नाही?" मिनूनं एका दमात तिच्या मनातील सर्व प्रश्न विचारून घेतले. इंदिरानं घडलेलं सांगितलं.
"अगं टेंशन आलं असेल त्याला. त्यात तू नको तिथे जिद्दीपणा करतेस. कधी कधी काही गोष्टी एकदम नाही सांगता येत समोरच्याला. मूड ठीक झाला की बोलेल तो तुझ्याशी."
"जाऊदे त्या आधी मी उद्याच चालली जाते भारतात परत.''
"अच्छा, तुला काय ऑस्ट्रेलिया भारत, मुंबई नागपूर सारखं वाटलं. भारतापासून आठ हजार किलोमीटर दूर आलो आहे आपण. आठशे नाही. प्री बुकिंग केलं तेव्हा एकीकडून दिड लाखाच्या जवळपास तिकीट झालं. तु तर अनुभव सोबत बिजनेस क्लासमधे आली. त्याचं तिकीट दोन लाख विस हजार होतं."
"काय?"
"मग. उद्याच्या उद्या तु काय पंखा लावून जाणार."
"मग आता मी काय करू?"
"गोड गोड अमेरिकन चॉप्सी खा, चिकन तंदुरीवर ताव मार आणि काही खायचं असेल तर सांग. हास थोडी, एंजॉय कर म्हणजे मलाही एंजॉय करता येईल."
"ही तर आईपेक्षाही जास्त हिटलरगिरी करतेय माझ्यावर." इंदिराच्या मनात आलं पण तिला मिनूचं बोलणंही पटलं. जे होईल ते बघून घेऊ या विचारानं ती शांत झाली.

रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान फिरायला गेलेलं मंडळ हॉटेलमधे परतलं. मायरा तणतण करत डायरेक्टर कोहलींच्या खोलीतून निघाली, तिच्यामागे तिची आई, बेबी बेबी करत निघाली. मायरा इंदिराला जाऊन धडकली.
"सॉरी." इंदिरानं म्हटलं.
"यु शुड बी सॉरी." मायराचा गोरापान चेहरा रागानं लाल भडक झाला, "तुला काय वाटतं एक फिल्म काय मिळाली तुला तु जिंकलीस. फक्त एक वर्ष. एका वर्षानं मी सज्ज होऊन येते तुला टफ कॉम्पिटिशन द्यायला. तु आज माझा एक चित्रपट हिरावून घेतलास. मी काळजी घेईल की तुला साईड रोलही मिळणार नाही याची."
"बेबी हिच्यावर तुझा वेळ नको घालवू, चार दिन की चांदणी आहे हिच्यासाठी हे सगळं. बाकी बॉलिवूड तुझंच आहे." मायराची आई बोलली आणि त्या दोघी तणतण करत हॉटेलच्या बाहेर पडल्या.

यांनी मला का असं सुनावलं जसं काही मी मायराचा रोल चोरला. मला अनुभव सर सोबत बोलावंच लागेल. इंदिराच्या मनात आलं. ती अनुभवच्या खोलीकडे जाउ लागली. पण अनुभव तिला हॉटेलच्या कॉरिडॉरमधेच मिळाला.
"मला तुमच्याशी काही बोलायचं आहे."
"हो मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणूनच मी तूझ्या खोलीत येत होतो."
"बोला."
"इथे नाही. सर्व झोपलेत. तूझ्या खोलीत जाऊन बोलु."

दोघं इंदिराच्या खोलीत गेले. अनुभवनी तिला डायरेक्टर कोहलीने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं.
"मला वाटलंच नव्हतं हा दिवस इतक्या लवकर येईल. पण मी खूप आनंदी आहे तूझ्यासाठी. तसंही माझ्यावर ऋण आहे तुझं, तु आजीला मुंबईला यायला तयार केलं त्याचं."
इंदिराला चांगलाच शॉक बसला. तो काय बोलतोय काय करतोय इंदिराला कशाचंच भान नव्हतं. अनुभवला वाटलं तिला आनंदाचा शॉक बसला आहे. त्यानं तिला पाणी दिलं. थोडंस गंमतीनं तिच्या चेहऱ्यावर उडवलंही.

"अगं खरंच आहे हे. स्वप्नात नाहीस तु."
"मला नाही करायचं सिनेमात काम."
"का नाही करायचं? आधी तर ऑडिशन द्यायला फिरत होतीस, त्याच एरियात राहत होतीस आणि आता अचानक काय झालं? असं तर नाही की माझ्या सोबत काम नाही करायचं आहे तुला? कारण मी माझ्या कामाला खूप सिरीयस घेतो. कामात असतांना मला कोणाचेही नखरे झेलणं आवडत नाही. भीती वाटतेय का मी खूप कष्ट करून घेईल तुझ्याकडून म्हणून." अनुभव तिच्या खांद्याला दोन्ही हातानं पकडून विचारू लागला.
" तुम्हाला कसं समजावू!" ती रडवल्या चेहऱ्यानं म्हणाली.
"ठीक आहे नको सांगू, मीच चुकलो. मला वाटलं तुला ऐकून आनंद होईल. तु मला थँक्यू म्हणशील आणि जीव ओतून काम करशील. माझंच चुकलं. करायची असली तर कर ही मुव्ही नाहीतर सकाळी सांग मला. मी परतीची तिकिट्स बुक करून देईल." तो रागातच तिच्या खोलीतून बाहेर पडला.

इंदिरानी मनोमन ठरवलं सकाळी सांगून द्यायचं नाही करायची मूवी म्हणून आणि भरतात परतून जायचं. तिथूनही कुठेतरी दूर निघून जायचं जिथं अनुभवशी आपली गाठ पडणार नाही.
'मायरा चित्रपटातून आऊट आणि इंदिरा इन' ही बातमी सर्व शूटिंग मेंबर्सला माहित झाली. मिनूचं डोकं चक्रावलं. नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न अशी गत तिच्या पहिल्याच चित्रपटाची झाली. पण म्हणून मैत्रिणीला त्रास नाही द्यायचा. तिचं जग वेगळं आहे, स्वप्न वेगळं आहे. असा विचार करत मिनू इंदिराला भेटायला रात्री एक वाजता आली.

"हे मी काय ऐकतेय. असो तु अनुभवला नाही म्हटलं की नाही. नसेल म्हटलं तर मी बोलते त्याच्याशी. मग त्यानं मला या चित्रपटातून काढलं तरी चालेल. पण तुला मी नको त्या वाटेवर चालु देणार नाही."
मिनूला समोर बघताच इंदिराचा ट्यूबलाईट जळला.
"मिनूचा तर मला विसरच पडला होता. तिच्यासाठी मला हा सिनेमा करावाच लागेल. अनुभवचं डोकं सरकलं तर तो सिनेमा सोडून देईल. लीड हिरो हिरोईन नाही म्हणून चित्रपट लांबणीवर जाईल. यांचं काय जाणार नाही. नुकसान मिनूचंच होईल." इंदिराची परिस्थिती अगदी इकडे आड तिकडे विहीर झाली.
"इंदिरा तु अजिबात घाबरू नकोस. मी बोलते डायरेक्टर आणि अनुभव सोबत."
"तु असं काहीच नाही करणार आहेस कारण मला हा चित्रपट  करायचा आहे. ते दिवस रात्र जागून अभ्यास करून, परीक्षा द्या, मग इंटरव्यू, तेही पहिल्याच प्रयत्नात पास होण्याची काही हमी नाही. आणि इतका आटा पिटा करून पगार किती मिळेल, जास्तीत जास्त 50-60 हजार महिन्याला. म्हणून ही आयती आलेली संधी मी सोडणार नाही."

"तु आता माझ्यासमोरही ऍक्टिंग करणार. तु माझ्यासाठी ते बनायला तयार झालीस जे तुला कधी बनायचं नव्हतं. गधे एक नॉर्मल आयुष्य जगायलाही नशीब लागतं. तुला ही संधी मिळाली आहे. जा हे सर्व सोडून. मी खरंच खूप मोठी चूक केली तुला मुंबईला बोलावून. मला माफ कर."

"मिनू असं नको म्हणू. मी खूप बेफिकीर आयुष्य जगले त्या लग्न मंडपात जाईपर्यंत. मला लहानपनापासून हवं ते सगळं मिळालं. बाबानं शब्द पडू नाही दिला माझा. हा आई थोडी हिटलरगिरी करायची पण प्रेमही भरपूर दिलं तिने. प्रिया तर लहान बहीण असून पाठ राखीन बनून राहिली माझ्या सोबत. उनाडक्या मी करायची बोलणे ती झेलायची. तूझ्या नशिबी यातलं काहीच नाही आलं. मला नेहमी वाटायचं माझ्या या मैत्रिणीला ते सर्व मिळावं जे मला मिळतंय."

"म्हणून तु तूझ्या वस्तू आईच्या चोरून मला द्यायची अन मग असं कसं हरवलं म्हणून तुझी आई तुला खूप रागवायची."

"दुसऱ्या दिवशी बाबा परत त्या वस्तू मला विकत आणून द्यायचे." मिनूचा हात हातात घेऊन, "असं समज हा चित्रपटासाठीचा वेळ मी आयुष्यातून चोरून तुला देतेय. तो मी माझा वेळ परतही मिळवून घेईल ."

"पण इंदिरा चित्रपट सृष्टी वाटते तितकी सरळ नाही."
"मला कोणतं आयुष्यभर राहायचं आहे चित्रपट सृष्टीत. हा माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट."

"नक्की? तु मोहात तर नाही पडणार ना या माया नगरीच्या?"

"अजिबात नाही."

"मग ठीक आहे. मीही जीव ओतून काम करणार."

"गुड, चल आता मला त्या तुमच्या वेड्या वाकडया तोंड करायच्या एक्सरसाईज शिकव बाई."

"फेशियल एक्सरसाईज म्हणतात त्याला."

"हो गं तेच ते. उद्या चेहरा चांगला दिसायला हवा ना. अनुभवची हिरोईन शोभायला हवी मी."

"असं, तु आधीच आहेस त्याची हिरोईन. रियल लाईफची."

"काहीही मिनू."

वातावरणातला तणाव जाऊन ते हलकं फुलकं झालं 

सकाळ होताच इंदिरा अनुभवकडे गेली त्याला सांगायला की ती ह्या चित्रपटाची नायिका प्रेयसी बनायला तयार आहे म्हणून. पण तो मात्र वेगळ्याच मूडमधे होता. तो रात्रभर जागीच होता. पहिल्यांदा कोणीतरी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला तेही इंदिरा सारख्या नवख्या मुलीनं. जी त्याचीच असिस्टंट आहे. इतका इगो कशासाठी. त्याला समजत नव्हतं. त्याला तिचा खूप राग आलेला. ही सुद्धा त्या दिव्यासारखीच जी माझ्यासोबत राहिली, फिरली, काम केलं फक्त तिचे कॉन्टॅक्टस बिल्डअप होईपर्यंत. त्यानंतर मी कोण तु कोण. त्यानं ठरवलं नाही करायचं काम माझ्यासोबत तर नको करू इंदिरा, मीही परत तोंड नाही बघणार  तुझं. ओशिनला फोन करून तो तिकीटस बुकिंग बद्दल विचारणार होता तोच इंदिरानी दार वाजवलं. त्यानं फोन खाली ठेऊन दार उघडलं.
"इंदिरा, मला तुझ्याशी बोलायचं नाही. तिकिट्स बुकिंग झाले की आपण परत जाउ भरतात. तेव्हा पर्यंत तुला जे करायचं ते कर." इंदिराला त्याच्या बोलण्यातून त्याचा राग दिसून आला म्हणून आजूबाजूचं न बोलता ती सरळ मुद्द्यावर आली.
"मला करायचं आहे चित्रपटात काम तुमच्यासोबत."

"का? एका रात्रीत निर्णयात बदल. भीती वाटली का माझी की मी तुला कुठेच काम मिळू देणार नाही म्हणून." त्यानी तिच्या डोळ्यात डोळे टाकून विचारलं.

"तुम्ही रात्रभर झोपले नाही असं दिसतं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. त्याबद्दल सॉरी." त्याचे लाल डोळे पाहुन ती बोलली.
"उगाच माझी तुला खूप काळजी असल्या सारखं दाखवू नकोस. कारण माझ्यासोबत चित्रपटात काम करणाऱ्याचं मी फक्त काम बघतो बाकी काहीच नाही. तेव्हा परत एकदा विचार करून घे. होऊ शकतं दुपारपर्यंत तुझा निर्णय परत बदलेलं."
"नाही आता असं नाही होणार. मी खरंच काम करायला तयार आहे. रात्री जरा घाबरली होती असं अचानक कॅमेरा फेस करायचं म्हटलं म्हणून."
"माझा विश्वास नाही आता तुझ्यावर. पण तरीही कोहलीसाठी मी विश्वास ठेवतोय तुझ्यावर. कारण त्या माणसाने खूप मदत केली आहे माझी संकटात."
"थँक्यू!"
"जा इथून."
"कशी जाउ?"
"पायांनी चालत."
"मागे सोफा आहे, दोन्ही बाजूला दोन चेयर आणि समोर तुम्ही उभे." इंदिरा भीत भीत बोलली.
"तुला सरळ नाही म्हणता येत का मग, बाजूला व्हा म्हणून." अनुभव तिच्या समोरून बाजूला होऊन म्हणाला. "ब्रेकफास्टमधे फक्त सॅलड खा आणि ज्यूस पी. नो पेस्ट्री ओके. त्यानं माणूस सुस्त होतो. तुझ्यासारखा !"
"हो !"
"वेलकम टू  बॉलिवूड."
"थँक्यू !"

क्रमश :

धन्यवाद 
©®अर्चना सोनाग्रे वसतकार