एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-18

This is a story of a young sweet, witty & lovely girl. Who is wandering in search of her destination. Thankyou

एक उनाड वाट भाग 18

ऑपेरा हाऊस जवळ मायरा, मिनू आणि ओम यांचे काही सीन घ्यायचे होते आणि मायरा नीट काम नव्हती करत म्हणून अनुभवच्या डोक्यात शिरली होती. त्यामुळे त्यानं डायरेक्टर प्रोड्युसरला तो यांचे त्याच्या शिवायचे सीन शूट झाल्यावर ऑस्ट्रेलियाला येईल हे सांगितलं होतं.

इंदिरानी तिचे कपडे, फर्स्ट एड किट, MPSC ठोकळा (ज्याचं उदघाट्न अजून झालं नव्हतं ) असं महत्वाचं सामान पॅक केलं. तिचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अनुभव जवळच होते. ते त्यानं इंदिराला तिचे तिच्याजवळ ठेवायला दिले. ओशिनला माहित होतं अनुभव आउट ऑफ इंडिया जातांना काय काय नेतो. म्हणून अनुभवची बॅग तिने पॅक करतांना तिने इंदिराला मदत केली. शूटिंगच्या आणि गरम कपड्यांनीच अनुभवची मोठी ट्रॅव्हल बॅग भरली. डॉक्युमेंट्स आणि इतर काही कपडे ठेवण्यासाठी म्हणून कपाटावर ठेवलेली बॅग काढायला ती स्टूलवर उभी झाली. ती बॅग खूप भारी होती. काही सामान ठेवलं असेल त्यात. बरेच दिवसांपासून काढलेली दिसत नव्हती. ती ओढताच त्यावर बसलेल्या धुळीनं इंदिराला जोरात ठसका आला आणि तिचा तोल गेला. अनुभवनी तिला सांभाळलं. 
"काय करत आहेस तु?" अनुभवनी तिचा हात पकडून तिला खाली उतरवलं, "घरात कमी लोकं आहेत का? कि हातपाय तोडून घ्यायचे आहेत? मी इथे गॅलरीत बसून लॅपटॉपवर काही काम करत होतो मला आवाज द्यायचा. पण काहीतरी उपद्व्याप करायलाच हवे दिवसातून एकदा."
अनुभवचा रागवण्याचा आवाज ऐकून शोभा आणि ओशिन दोघीही तिथं आल्या. इंदिरानं बॅग स्वच्छ करायला शोभाच्या हातात दिली आणि आसू पुसतच ती तिच्या खोलीत निघून गेली.
"सर, ही फाईल."
"ठेव टेबलवर."
"तुम्ही इंदिरावर जास्तच रागावले. खालीही आवाज आला." ओशिन त्याला म्हणाली.
"अरे पडली असती तर हातात नाहीतर पायात फॅक्चर लावून बसावं लागलं असतं दोन महिन्यासाठी. मी इथेच होतो. तु फाईल घेऊन येणारच होती पाच मिनिटात. शोभाला आवाज द्यायचा नाहीतर. 40-45 किलोची अंडरवेट मुलगी काय ती पुस्तकं ठेवलेली बॅग तोलणार तिला."

दुपारी बाराची फ्लाईट असल्याने सकाळी दोन तास अगोदर दहालाच ते एअरपोर्टसाठी घरून निघाले. इंदिरानं अनुभव सोबत कधीच बोलायचं नाही असं ठरवलेलं दिसत होतं. अनुभवनेही तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही. आजीनं पूजा अर्चना करून दोघांना प्रसाद दिला, दोघांची नजर काढून मगच त्यांना जाऊ दिलं.

मुंबई वरून कतार एअरवेजच्या फ्लाईटमधे बोर्डिंग पास घेऊन ते बसायला गेले. एअरपोर्टच्या खिडकीतुन मोठ मोठे विमान उडतांना आणि उतरतांना दिसत होते. इंदिराला त्यांचं अवाढव्य रूप आणि तो कर्कश आवाज ऐकूनच घाम सुटला. 

एका सुंदर स्मित हास्य चेहऱ्यावर असलेल्या एअर होस्टेसने त्यांना बिजनेस क्लासमध्ये त्यांच्या सीट दाखवल्या. त्या सीट तिला शिवशाही बस च्या सीट सारख्या भासल्या. प्रत्येक सीट समोर स्लिपर लक्झरी कोचमधे असतात तशा छोट्या टीव्ही स्क्रीन लावलेल्या होत्या. सर्व पॅसेंजर कंफर्टेबली बसल्यावर एयर होस्टेसने सेफ्टी मेझर्स, प्लेन उडताना कसं बसायचं? सेफ्टी जॅकेट कसं घालायचं वगैरे आणि प्लेनमधे काय काय सुविधा आहेत याबाबत सूचना दिल्या. प्लेनने आकाशात भरारी घेतली तशी इंदिरा घाबरली. तिचा जीव वर खाली होऊ लागला.
"तु ठीक आहेस?" तिचा घाबरलेला चेहरा पाहुन अनुभवनी विचारलं.
"....... " अजूनही राग गेलेला नसल्याने ती काहीच बोलली नाही. डोळे घट्ट मिटून बस मनोमन गायत्री मंत्र जप करू लागली.
"छान आयडिया आहे. पण जो स्वतःला सांभाळू शकत नाही त्याला देव कुठपर्यंत सांभाळणार? हे मी आधीही तुला बोललो आहे आणि आताही बोलतोय."
".... " इंदिरानं एक डोळा उघडून अनुभवकडे बघितलं आणि परत मंत्रजप करू लागली.
दुसरी एक उंचपुरी, नितळ गोऱ्या कांतीची, पोपटाच्या चोची सारखं सरळ तरतरीत नाकाची, अरेबियन सौंदर्य ठासून भरलेली एअरहोस्टेस ऑर्डर घ्यायला आली. अनुभवला बघताच तिने तिच्या हातावर त्याचा ऑटोग्राफ मागितला आणि अनुभवसोबत सेल्फी घेतली.
"तु खूपच सुंदर आहेस. माझ्या सिनेमाची हिरोईन व्हायला हवं तु. कधी विचार झाला हिंदी सिनेमात काम करायचा तर भेट मला. हे माझं कार्ड आहे."

 इंदिराचं लक्ष टेक ऑफ मुळे होणाऱ्या आवाजावरून दूर व्हावं म्हणून अनुभवही त्या एअरहोस्टेसशी गंम्मतच फ्लर्ट करू लागला.
"आजीचा नातू फक्त आजीसमोरच भिष्म पिता बनून फिरतो आणि आजीच्या मागे दुर्योधनाचा अवतार बनतो." इंदिरा स्वतःशीच बडबडली.
"तु काही म्हटलं का?" अनुभवनं तिला विचारलं. पण ती काहीच बोलली नाही. अनुभव गालातच हसला. एअरहोस्टेस नी इंदिराला काही ऑर्डर करायचं का म्हणून विचारलं.
"तिचा आज उपास आहे." ती उत्तर द्यायच्या आधीच अनुभव बोलला. इंदिरानं रागाचा एक कटाक्ष त्याच्यावर टाकला. त्यानं बघून न बघितल्यासारखं केलं.
थोड्या वेळाने त्यानं ऑर्डर केलेली पाईन ऍप्पल पेस्ट्री, फ्रुट सॅलड, आणि फ्रेंच फ्राय सगळं आलं. इंदिरानी पूर्ण ट्रे स्वतः समोर घेऊन घेतला.
"स्वतः रात्री माझ्यावर आग ओकुनही ठासून जेवले, नाश्ता केला. मी बिचारी काहीच खाऊ नाही शकली व्यवस्थित.
आता यातलं काहीच खाऊ नाही देणार मी तुम्हाला."
"ओके ! तु खा पोटभरून."
"हो आता तर असंच म्हणणार ना तुम्ही. त्या चिकण्या एअरहोस्टेस सोबत फ्लर्ट करून पोट भरलं असेल तुमचं."
अनुभव तोंडावर हात ठेऊन हसू लागला. इंदिरानी ट्रे उचलून त्याच्यासमोर ठेऊन दिला. हातांची घडी मारून बसली.
"सॉरी इंदिरा, बघ बाई कान पकडतो."
"याची काही गरज नाही. फक्त स्वतःला जरा कंट्रोल करायला शिका. मी मानते कि मी काल मूर्खपणा केला पण तुम्ही कसं रागावलं मला. आणि फक्त तेव्हाच नाही नेहमीच असे रागावता."
"यापुढे नाही रागावणार."
"....... " इंदिरा काहीच बोलली नाही.
"अंग ते ढग बघ."
"ढग !" इंदिरानं खिडकी बाहेर नजर टाकली, "आपण ढगात कधी आलो? बापरे किती छान दिसतंय हे दृश्य." वेगवेगळ्या आकारांचे ढग पाहुन ती मोहरून गेली. साडे तिन तासांनी दोहाला प्लेन लँडिंगची घोषणा झाली. प्लेन लँडिंग होतांना पाळायच्या सूचनांची लिस्ट द्यायला ती दुसरी एअरहोस्टेस समोर आली.
"ही खरंच खूप सुंदर आहे. आजीला पाठवू का हिचा फोटो काढून." इंदिरा तिला पाहुन म्हणाली.
"ए असं काही करू नको मस्करी करत होतो मी." अनुभव सफाई देऊ लागला.
"मी कुठे खरंच पाठ्वतेय. मी फक्त मन बघत होती तुमचं." ती मनोमन म्हणाली.

ढग जाऊन वाळवंट दिसु लागला. रेतीचे पहाड नजरेस पडले. लँडिंग सुरु झाली तसं इंदिराला छातीवर दडपण आल्यासारखं वाटू लागलं. खिडकीतुन बाहेर बघितलं तर विमान स्पीडनी खाली जातांना दिसत होतं. इंदिरानं परत गायत्री मंत्र जप सुरु केला.
"तु इतकी का घाबरतेय?"
"कारण मी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करतेय."
"काय? मग तिन वर्ष आधीपासून पासपोर्ट कशाला काढून ठेवलं?"
"असंच म्हटलं नवरा विदेशात जॉब करणारा मिळाला तर प्रॉब्लेम नको."
"रियली?"
"गंम्मत करतेय. प्रियानं बनवायला लावलं. तिला फिरायची भारी हौस.  खूप पैसे कमवून विदेशात फिरायला जाऊ असं  म्हणायची ती. म्हणूनच तिला लग्नात मला पैसे द्यायचे होते. पण बाबा आताच काहीच नको देऊ म्हणाले. आधी नाव कमव. काहीतरी बन मग सन्मानाने घरी ये आणि ज्याला जे द्यायचं ते दे म्हणाले."
"ओके ! मी प्रयत्न करेल तुला लवकरच चांगल्या सिनेमात एक चांगला रोल मिळवून द्यायचा."
"मला सिनेमात........ " ती त्याला सांगणारच होती कि तिला फिल्म इंडस्ट्रीत रस नाही तोच फ्लाईट लँड झाली. 

दोहाला चार तासांचा ले ओव्हर मग दुसरी फ्लाईट डायरेक्ट सिडनीला जाणार होती. चार तास काय करायचं? तसं दोहा खूप छान टुरिस्ट डेस्टिनेशन. पण अर्धा अर्धा तास तर एअरपोर्ट फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यातच जातील. तिन तासात कुठे जाऊन येणार त्यापेक्षा इंदिराला एअरपोर्ट दाखवायचं अनुभवनी ठरवलं होतं. हमद इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आत पाय ठेवताच तिला दुसऱ्याच जगात आल्या सारखं वाटलं. तिथंलं इंटिरियर, शॉपिंग स्टोर्स, रेस्टॉरंट, मधोमध ठेवलेला एक मोठासा पिवळा टेडी, त्याच्या बाजूलाच एक मोठी स्क्रीन,  जागोजागी स्मित हास्य करत मदतीला तत्पर एअरहॉस्टेसेस, फ्लाईट स्टुअर्ट सगळं अप्रतिम वाटत होतं. अनुभवनी तिचे काही फोटो काढून दिले. मग एका रेस्टॉरंटमधे बसून तिथल्या पॉप्युलर डिश टेस्ट केल्या. अजून फ्लाईटला दिड तास वेळ होता. इंदिरा सहज म्हणून शॉप्समधे फिरू लागली. काही छान आणि अफोर्डेबल मिळालं तर घ्यायचं तिने विचार केला. फिरता फिरता एका डायमंड ज्वेलरी शॉपमधे ती आली. तिला व्हाईट, पिकॉक ग्रीन आणि मॅजेंटा असं हिऱ्यांचं कॉम्बिनेशन असलेला एक कानातल्यांचा जोड (स्टड ) खूप आवडला. त्याला लागलेल्या टॅग वर किंमत डॉलर मधे लिहिली असल्यामुळे तिनं इंडियन रुपीजमधे किंमत विचारली.
"वन लॅख अँड सिक्सटी थौझंड ओन्ली."
"ओके!"
"सो आई पॅक इट फॉर यु?"
"नो नो, थँक्यू !"
इंदिरा जाऊन स्क्रीन समोर बसली. 'शर्टच्या बटन एवढ्या कानातल्याची किंमत एक लाख, साठ हजार का तर ते हिरेजडित आहे म्हणून. नको बाबा. पण किती छान कॉम्बिनेशन ना आणि एकदा कानात घातले कि काढायचं काम नाही. इंदिराचं मनातल्या मनात विचार चक्र सुरु होतं. थोड्या वेळाने अनुभवही तिच्या बाजूला येऊन बसला.
"घे !" अनुभव तिला हात पुढे करून म्हणाला. त्याच्या हातात एक छोटीशी डब्बी होती.
"काय आहे यात?"
"तूच बघ ना उघडून."
तिनं उघडून बघितलं त्या डब्बीत तेच तिला आवडलेले स्टड होते. ते पाहुन आधी तिला खूप आनंद झाला. पण काही सेकंदातच तिच्या चेहऱ्यावरून तो मावळलाही.
"मला नको प्लीज." इंदिरानी डबी बंद करून अनुभवला परत केली.
"अग पण का?"
"कारण इतकं महाग घ्यायची माझी ऐपत नाही."
"गिफ्ट देतोय."
"मग तर अजिबात नको. आधी रागवायचं आणि मग कम्पेन्सेशन म्हणून गिफ्ट द्यायचं. असं नाही चालत अनुभव साहेब. तुम्ही स्वतःच्या रागावर थोडं कंट्रोल ठेवायला शिका ना त्यापेक्षा."

अनुभवचा चेहरा पडला.
"आणि त्यापेक्षाही महत्वाचं मला माझ्या सवयी नाही बदलायच्या. मागे पार्टी साठी म्हणून विस हजाराचा ड्रेस घेऊन दिला. राहणं, बाहेर जाणं येणं सगळं फाईव्ह स्टार. बस झालं आता. हे माझं नाही हे माहित असतांना आभासी जगात जगणं मला येत नाही आणि  ज्यावर माझा हक्क नाही, ते मी घेत नाही."

आठ वाजता फ्लाईट अनाऊन्समेंट झाली तसे दोघेही उठून फ्लाईट कडे गेले. ही बोईंग तर आधीच्या विमानापेक्षाही मोठी दिसत होती.
"इतकं मोठ विमान आकाशातून खाली पडलं तर....?" तिच्याच विचारानं तिला छातीत धस्स झालं. होस्टेसनी त्यांना त्यांचा सूट दाखवला. ऑफिसमधे असतात तसं ते चेम्बर  दिसत होतं. दोन एकाला एक जोडून कम्फर्टेबल लक्झरी चेयर. चेयर वर बसून पाय लांब करून समोरच्या छोट्या कॅबिनेटमधे पाय ठेवायचे. बाजूला असलेलं क्लच दाबलं कि सीट खाली खाली जाऊन त्याचा बेड बनणार एअर होस्टेसनी समजावून सांगितलं. समोरच टीव्ही स्क्रीन, त्याच्याखाली ड्रॉवर, त्यात वाचायला मॅगझीन, खायला चॉकोलेटस, त्याच्या बाजूलाच कॉर्नर टेबल, त्यावर वेलकम ड्रिंक आणि वॉटर बॉटल ठेवलेली. ड्रिंक अल्कोहोल आहे कि नॉन अल्कोहोल हे विचारायला तिनं अनुभवकडे बघितलं तर तो चेयरचा बेड बनवून चेहऱ्यावर मास्क शिट लावून डोळे मिटून  पडलेला.
"काही विचारायचं आहे का?"
"नाही म्हणजे हो, हे ड्रिंक मी पिऊ शकते का?"
"मी पिलं, मला तर अजून काहीच झालं नाही. म्हणजे तु पिऊ शकते."
"ओके !"
तरीही तिला धाकधूक वाटतच होती. चेंबर लावलेलं. कोणीच पॅसेंजर एकमेकांना दिसत नाही. त्यात हिनीही चेयरला बेड मधे कन्व्हर्ट केलं तर तिचा बेड आणि अनुभवचा बेड जुळतील आणि डबल बेड तयार होईल. अजब गजब सिस्टीम आहे ही. लाईट्सही ऑफ झाले.
"बेड बनवून छान झोपून टीव्ही बघ. पंधरा तास लागतील सिडनीला जायला."
"नको मी बसूनच ठीक आहे."
"तुला भीती वाटतेय का कशाची?"
"नाही, म्हणजे हो म्हणजे आपण झोपीत असतांना विमान खाली पडलं तर?"
"तर आपण वर जाऊ. जागी असलो तरीही तु किंवा मी पडणारं विमान झेलू तर नाही ना. काहीही विचार करतेस." यांची बडबड ऐकून कोणीतरी पॅसेंजर खोकलला म्हणून अनुभव तिच्या कानाशी जाऊन हळूच बोलला, " बेड लाव आणि झोप. सर्व पॅसेंजर झोपलेत. आपण डिस्टरब करतोय त्यांना."
"आता याला कसं सांगू कि मला याच्या शेजारीच झोपायची भीती वाटतेय. मी कधी एकटी एखाद्या मुलाच्या बाजूला नाही झोपली." ती स्वतःशीच पुटपुटली. तिचं असं पुटपुटणं पाहुन अनुभव तिला म्हणाला,
"माझ्या शेजारीच झोपावं लागेल म्हणून तर तु बेड नाही लावायचा म्हणतेस? पण जेव्हा आपल्याला काही आकर्षणच नाही एकमेकांबद्दल तर मग कशाची भीती? उगाच चौदा तास बसून राहून पाठ अकडवून घेशील आणि तिथे शूटिंगला जाऊन बिमार पडशील." तो परत जाऊन बेडवर झोपला.
"हो बाबा, लावते बेड." ती म्हणाली अन त्याच्याकडे पाहुन स्वतःशीच हसली, हा सुपरस्टार, याला नसेल वाटत आकर्षण माझं. पण मला वाटतं ना आकर्षण, तेही भयंकर. तिनं बेड लावला आणि डोळे मिटताच ती झोपी गेली.

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार