एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-15

Story of a young, daring, witty & stubborn girl. Thankyou

एक उनाड वाट भाग 15

रात्रीचं जेवण शांततेत पार पडलं. इंदिरा आजीची विचारपुस करायला तिथंच थांबली. तिला शोभाला ते पाकीटही द्यायचं होतं. पण त्यांचं थोडं बोलणं झाल्यावर अनुभव तिला म्हणाला,
"मला वाटतं झोपायला हवं आता. आज सारखं उद्याही लेट व्हायचं आहे का रनिंगला?"
इंदिरा सर्वांना गुड नाईट म्हणून झोपायला गेली. पण तिच्या पायजम्याच्या खिशातून अर्ध बाहेर आलेलं पाकीट अनुभवच्या नजरेस पडलं.
"ही काय भानगड!" त्याचा मेंदू त्याला गप बसू देईना. म्हणून सर्व आपापल्या खोलीत गेल्यावर तो इंदिराच्या खोलीकडे गेला.

तिकडे इंदिरा झोपायच्या आधी वॉशरूमला गेली. जातांना खिशातलं पाकीट काढून ठेवायला विसरली. हात पुसतांना खाली पडलेला नॅपकिन उचलून ठेवायला ती जशी वाकली तसं ते पाकीट सटकन खाली ओल्या जागी पडलं. ग्रीटिंग खराब होऊ नये म्हणून इंदिरानं पाकिटातून ग्रीटिंग बाहेर काढलं. त्याला लागलेला ओलावा जावा म्हणून फॅन ऑन करून कोरड्या नॅपकिनने पुसू लागली. पुसता पुसता ते ग्रीटिंग उघडल्या गेलं आणि दिपकचं रिकॉर्डिंग ऑन झालं,
"दोन वर्षांपूर्वी आजच माझ्या जीवनाची आस बनून तु माझ्या आयुष्यात आली. मला जीवन म्हणजे फक्त खा, पी, झोप यापुढेही खूप काही आहे याची जाणीव करून दिलीस. आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून लग्ना आधीच घरच्यांना विरोध करून माझ्यावर विश्वास ठेऊन हातभार लावायला इथे आलीस. मी खरंच खूप भाग्यवान आहे. बस अजून काहीच दिवस हा दुरावा. लवकरच आपण सात जन्माच्या बंधनात बांधलं जाऊ आणि मग नेहमीसाठी एकत्र राहू. Love you so much jaan, only yours.... "

इंदिराला पावलांचा आवाज आला. तिनं पटकन ग्रीटिंग बंद करून ठेऊन दिलं. पण तिचा चेहरा अगदी फुलासारखा खुलला ती व्हॉइस रिकॉर्डिंग ऐकून. शोभा खरंच जाम लकी आहे. ही आयडिया मिनुला सांगायला हवी. तिला कामात येईल पुढे. त्या खुशीतच तिनं मिनूला फोन केला. पूर्ण रामायण महाभारत सांगून साडे अकरा बाराला ती अलार्म लावून झोपली.

सकाळी बरोबर चार वाजून पन्नास मिनिटाला इंदिरा रनींगसाठी रेडी होऊन अनुभवला उठवायला गेली. इंदिराच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य, तिच्या डोळ्यातली चमक पाहुन अनुभवचं डोकं अधिकच ठणकलं. तिने ट्रॅक सूट आणि शूज साठी थँक्यू म्हटलं. पण अनुभवनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आपला नेहमी सारखा अँग्री यंग मॅनचा प्लेन कठोर चेहरा करून तो फुल्ल स्पीडने धावू लागला. 

इंदिरा त्याच्या सोबत धावण्याचा प्रयत्न करु लागली. पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावर ओलावा होता. ती पाय घसरून पडली. पण अनुभवनं अजिबात लक्ष दिलं नाही. त्याच्या मनात द्वंद्व सुरु होतं,
"कशी मुलगी आहे ही, जन्मदात्या आई वडिलांना, एका काहीच दिवस पूर्वी भेटलेल्या माणसासाठी सोडून आली. आणि आजी... आजी बिचारी तिच्याशी माझं लग्न करण्याच्या विचारात आहे. तिच्या सारखी मुलगी शोधून भेटणार नाही म्हणे. माझं जाऊदे. मला तिच्याशी काहीच करायचं नाही. पण निदान आजीला तरी खरं खरं सांगून द्यावं. आजीशी ती खोटी बोलली. आजीच्या भावनांशी खेळणाऱ्याला मी कधीच माफ नाही करणार. आजीचं मन दुखावलं म्हणून मी माझ्या बापाशी बोलणं सोडलं. तर ही मुलगी कोण? हिला चांगलाच धडा शिकवणार मी." तो त्याच्याच विचारात गुंग रनिंग करत घरी गेला. ती कशी बशी उठली आणि चालत चालत तिच्या खोलीत गेली.

"हा गजबच प्राणी आहे. काल स्वतःच छान ट्रॅक सूट, शूज पाठवले आणि आज एक शब्द उच्चरायलाही तयार नाही. आता माझं काय चुकलं?" या विचारतच ती शूटिंगला अनुभव सोबत जाण्यासाठी तयार झाली. ड्राइव्हरला गाडी काढायला    कॉल केला तर तो म्हणाला,
"आज सर स्वतःच गाडी घेऊन गेले. तुमचं आटोपलं की तुम्हाला घेऊन यायला सांगितलं मला."
इंदिराला वाटलं काल झालेल्या प्रकारामुळे अनुभव तिला नाश्ता करायला वेळ मिळावा म्हणून आधी गेला. आपण नाश्ता करून जाऊ. असं चक्कर येऊन पडणं बीडनं बरोबर नाही चार चौघात.
"बरं मी नाश्ता करून येते. तुम्ही गाडी काढून रेडी राहा."
"हो."

अनुभवच्या विचारात इंदिरा शोभाला पर्समधे ठेवलेलं ग्रीटिंग द्यायचं विसरली. शूटिंगला गेली तर तिला कळलं की आज अनुभव सिन्हा जो कोणत्याही शॉटला पूर्ण करायला जास्तीत जास्त दोन किंवा तीनच रिटेक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याने आज विस रिटेक घेऊनही एकही शॉट नीट दिला नाही.

"इंदिरा, अनुभवच्या घरी काही झालं का?" डायरेक्टरनी इंदिराला विचारलं.
"नाही तर. घरी सगळं टकाटक आहे."
"मग हा असं का करतोय? माझ्या माहिती प्रमाणे अनुभवच्या बाबतीत असं काही दिव्या जेव्हा त्याला सोडून गेली आणि मीडियानं याला अगदी व्हिलन दाखवलं तेव्हाच झालं होतं. त्यानंतर त्यानं स्वतःला सावरलं."
"हो मी न्युजमधे बघितलं होतं."
" परत कोणी आलं आहे का त्याच्या आयुष्यात?"
"काही कल्पना नाही."
"काय कल्पना नाही इंदिरा. तु त्याची पर्सनल असिस्टंट आहेस. त्याच्या घरी राहतेस. तुला हे सर्व माहित असायला हवं."

"मी सरळ त्यांना विचारतेच काय झालं काही टेंशन आहे का म्हणून."
"हो विचार, पण इतक्या सरळ नाही की शूटिंगचं पॅकअप करावं लागेल."
"ओके !"

इंदिरा अनुभवच्या व्हॅनिटीत गेली. तो चेयरवर बसून कसल्यातरी विचारात रममाण दिसत होता.
"याची समाधी भंग केली तर हा विश्वामित्र सारखा मला श्राप तर देणार नाही ना?" इंदिरा स्वतःशीच बडबडली. तिचा पाय रिकाम्या पाण्याच्या बॉटलवर पडला आणि कडकड आवाज झाला. त्या आवाजाने अनुभव विचारातून बाहेर आला.

"चला समाधी भंग झाली एकदाची." इंदिरा गमतीनं म्हणाली.
"तु कशाला इथे?" इंदिराला बघताच सापा सारखा अनुभव तिच्यावर फुत्कारला, "जा बाहेर आणि पॅकअप करायला सांग."
"आधी मला सांगा तुम्हाला काय झालं? कोणतं टेंशन आलंय तुमच्या डोक्यावर की एक शॉट देणं जमत नाहीये तुम्हाला?"
"त्याच्याशी तुला काय घेणं देणं? तु तुझे बॉण्डचे उरलेले दहा महिने मजेत घालव आणि जा."
"असं होय. बघा मग मी काय करते ते."
तिने व्हॅनिटीच्या दाराच्या लॅचला लागलेली चाबी काढली आणि दार जोरात ढकलून दिलं व चाबी तिच्या टी शर्टच्या आत टाकून दिली.
"इंदिरा आर यु क्रेझी? आपण पाच मिनिटात बाहेर नाही गेलो तर मीडिया मिर्च मसाला लावून याची एक चटपटीत बातमी बनवतील आणि आंबट शौकीन लोकं ती बातमी मिटक्या देत टीव्हीवर  बघतील, पेपरमधे वाचतील. या सगळ्यांची सवय आहे मला. पण तुला फार त्रासदायक होईल हे."
"ते माझं मी बघून घेईल."
"अरे हो, तुला तर हिरोईन बनायचं आहे ना. तुला वाटत असेल जितक्या लवकर पॉप्युलर होशील तितक्या लवकर तुला चांगलं काम मिळेल. पण असं नसतं समजलं!"
"मिस्टर अनुभव सिन्हा, मला काय समजायचं ते मी समजली. आधी सांगा तुम्ही असे का वागत आहे? एक साधा चार मिनिटचा फाईट सीन पूर्ण करायला दोन तास आणि विस रिटेक अनुभव सिन्हासाठी जास्त नाही झाले का? तुमचा चेहरा स्पष्ट सांगतोय की तुम्हाला काहीतरी टेंशन आहे. ज्यामुळे तुम्ही चिडचिड करत आहे. बरं याने जर फक्त तुम्हाला फरक पडत असेल तर हवं तितकं टेंशन घ्या, चिडचिड करा. काही प्रॉब्लेम नाही. पण इथे प्रश्न शूटिंगसाठी जमलेल्या डायरेक्टर पासून ते स्पॉट बॉय पर्यंत सगळ्यांचा आहे. हा जो बाहेर फाइटिंगसाठी सेट उभारला गेला आहे त्यात किती लोकांची मेहनत लागली आहे, किती पैसा लागला, त्याचं काय?"

"बापरे किती विचार करतेस तु सर्वांचा. तुझे पाय दाखव."
"कशाला?"
"डोकं टेकवायला."
"म्हणजे तुझ्यातला थोडा कपटीपणा माझ्यातही येईल."
"हे काय नवीन? मी काय कपटीपणा केला?"
"असं माझ्या आजीसोबत कपटीपणाने वागली नाहीस तु?"
"आता या माणसाला काय गैरसमज झाला माझ्याबद्दल?" डोक्यावर हात मारून ती स्वतःलाच म्हणाली. अनुभव पुराण सुरूच होतं,
"तु आजीला सांगितलं की तु घरी सर्वांना सांगून आलीस मुंबईला स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी पण कोणासाठी हे नाही सांगितलं. हेही नाही सांगितलं की दोन वर्षांपासून तु एका मुलासोबत एंगेज आहेस. मलाही वाटायला लागलं की तु एक साधी सरळ मुलगी आहेस जी चार जोडी कपड्यांमधेही खुश आहे, जिला जगायला स्मार्ट फोनची गरज नाही, या रंग बदलत्या जगात एक तु तरी रंगबदलू नाहीस आणि माझी आजी बिचारी तुला तिच्या घरची....... " सून हा शब्द श्रीमुखातून बाहेर पडणार तोच अनुभव थांबला.
"घरची काय?" इंदिराला आजीच्या डोक्यातली खुरापात आठवली.
"घरची मुलगी समजते. मला तिने तुझं लग्न करण्यासाठी सुबोध सारखा मुलगा शोधायला सांगितलं. जेव्हा की तुझं आधीच दुसरीकडे सूत जुळलं आहे."
"तुम्हाला कसं कळलं हे?"
"काल रात्री तु जेव्हा त्याचं व्हॉइस रिकॉर्डिंग ऐकत होतीस ना मी तिथेच होतो मला काही काम होतं तुझ्याकडे म्हणून. पण मॅडमचं तर सेकंड ऍनिव्हर्सरी सेलिब्रेशन सुरु होतं."
इंदिराला दिपकच्या ग्रीटिंगची आठवण झाली. तिने ते पर्स मधून काढून त्याला उघडून दाखवलं.
"हे असंच ऐकलं ना तुम्ही."
"हो ! सोबतच घेऊन फिरतेय तु? किती प्रेम."
"आधी शेवट ऐका !"
शेवटी दिपकनं म्हटलं होतं, "ओन्ली युअर दिपक, शोभाचा दिपक !"
"शोभाचा दिपक म्हणजे?"
"म्हणजे सुबोध सरांचा ड्रायव्हर दिपक आणि घरकाम करणारी शोभा. ग्रीटिंगवर नावं आहेत दोघांची. बघा डोळे उघडून नीट. आजीची भीती वाटते त्याला म्हणून त्यानं मला सांगितलं होतं द्यायला तिला. पण आजी समोर देता आलं नाही आणि तुम्ही मला झोपायला पाठवून दिलं." इंदिराने घडलेलं सगळं अनुभवला सांगितलं.
"आता बोलणार काही?" इंदिरानं अनुभवला विचारलं. तो तिला सॉरी म्हणणार होता तोच व्हॅनिटीचं दार वाजलं.
"हॅल्लो, आत सगळं ठीक आहे ना?" बाहेरून कोणीतरी विचारलं. दोघांनी एकमेकांकडे बघितलं 

इंदिरानी पटकन दार उघडलं.
"चाबी तुझ्या हातात कशी तु तर.... " अनुभवनी चमकून विचारलं.
"मी फक्त ऍक्शन केली होती." इंदिरा त्याला डोळा मारून खळखळून हसत म्हणाली, "लवकर या बाहेर. शॉट आजच पूर्ण झाला पाहिजे." इंदिरा धावतच बाहेर गेली. सर्व पॅकअप करण्याच्या तयारीत होते. पण अनुभवन पटकन बाहेर आला आणि शॉट द्यायला रेडी झाला.

डायरेक्टरनी दुरूनच गमतीने इंदिराला प्रणाम केला. इंदिरानेही त्यांना आशीर्वाद दिला. शॉट पूर्ण झाला एकदाचा. सर्वांना शांती मिळाली. काही टीका टिपणीही झाली. अनुभव सोबत काहींनी इंदिराचं नावंही जोडलं. पण इंडस्ट्रीत हे सगळं होतच असतं. म्हणून त्या दोघांनी तिकडे दुर्लक्ष केलं.
घरी जातांना अनुभव इंदिराला एका मोठया मोबाईल शॉपमधे घेऊन गेला.
"हे क्रेडिट कार्ड घे. तुला आवडेल तो ऍप्पलचा मोबाईल घेऊन ये." इंदिराला वाटलं कोणासाठी मोबाईल घ्यायचा असेल गिफ्ट द्यायला.
"गिफ्ट रॅप करून घेऊ?"
"तुला स्वतःला गिफ्ट द्यायचा असेल तर घे रॅप करून."
"मला?" तिच्या लक्षात आलं की तिच्यासाठी मोबाईल घे म्हणतोय अनुभव, "मला मोबाईलची गरज नाही. माझ्याजवळ आहे मोबाईल. गैरसमज होतंच राहतात. भरपाई म्हणून मला गिफ्ट वगैरे द्यायची काही गरज नाही. फक्त यापुढे असं काही झालं तर मला येऊन विचारा डायरेक्ट. मनातल्या मनात कुढत नका बसू. हार्टला प्रॉब्लेम होतो त्यानं." आपण इतकं बोलूनही अनुभव शांतच आहे हे लक्षात येताच ती चुप बसली.
"आणखी काही? तु तुझा छोटासा मेंदू खर्च का करतेस जास्त विचार करून? मी तुला आज मोबाईल घेऊन देणारच होतो ते माझ्या कामासाठी. कधी कधी महत्वाचे डॉक्यूमेंट व्हाट्सअपवर पाठवायचे असतात. ऑनलाईन कामं असतात. यासाठी स्मार्ट फोन तूझ्याकडे असणं खूप गरजेचं आहे. बॉण्ड संपला की परत देऊन देशील. समजलं!"
"हो. पण मला नाही सूचनार इतक्या मोठया शॉपमधे मी कोणता मोबाईलचं घ्यावा ते. तुम्हीच सांगा कोणता घेऊ."
"ऍप्पल 9 घेऊन ये !" अनुभवला बघताच गर्दी होईल म्हणून त्यानं शॉपमधे जाणं टाळलं.

इंदिराचे पाय हवेत उडले एकदम. ऍप्पल 9, लेटेस्ट वरझन ऑफ ऍप्पल मोबाईल. मोबाईलची पार्टी म्हणून घरी आजीची फेव्हरेट रसमलाई नेली. सर्वांनी नवीन मोबाईलमधे मनसोक्त  फोटोसेशन केलं. सकाळी आलेला सर्व ताण तणाव दूर झाला.
"हे खूळ खरंच जगावेगळं आहे. पण मस्त आहे." अनुभव इंदिराला पाहुन गालातल्या गालात गोड हसला. जणू इंदिरा आणि अनुभवच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरवात झाली.

क्रमश :

सुरवाती पासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ????

एक उनाड वाट सुरवात इंदिराच्या प्रवासाची

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार