Login

एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-11

Story of a wandering, energetic & witty yong girl. Who wants to live her life herself. Thank you

एक उनाड वाट भाग 11



इंदिराला शोभाने संपूर्ण वाडा दाखवला. घरातील सर्व वस्तू नैसर्गिकच दिसत होत्या. वाड्यात कुठेही टाईल्स न बसवता दगडी फरशी बसवलेली. स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर फक्त एमर्जंसीसाठी. बाकी स्वयंपाक हा चुलीवरच होणार. आजीला आपलं पारंपरिक आवडायचं. वाड्यात एकूण सहा खोल्या. दोन वरच्या मजल्यावर आणि चार खाली. दोन न्हानीघर आणि संडास. आजीच्या खोलीला एक न्हानीघर आणि संडास लागून बांधलेला. वाड्याच्या मधोमध बसा उठायला, वाळवण टाकायला चांगली जागा सोडलेली. मागच्या बाजूला गाईचा गोठा. इंदिराला याची अपेक्षाच नव्हती. गोठ्यात दोन गाई आणि त्यांची दोन बछडं होती. गोठयातून पुढे गेलं की हिरवंगार रान. अर्ध्या एकरात माळी दादानं लावलेला भाजीपाला डोलत होता. वांगी, टमाटर, मिर्ची, भेंडी, पालक, मेथी, फुलगोबी. पुढे पर्वतांची माळ !प्यायच्या पाण्यासाठी मोठ मोठे रांजण (माठ) स्वयंपाक घराच्या शेजारी ठेवलेले. माठात वाळा टाकून ठेवलेला. इंदिरानी माठातलं एक ग्लास थंडगार पाणी पिलं.

"तुम्हाला खूप आवडलेला दिसतोय हा वाडा." इंदिराच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन विशीतली शोभा म्हणाली. "हो!मला असं निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप आवडतं."



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"ते सर्वांनाच आवडतं पण त्यासोबत ती तानाशाहपन आहे ना."

"काय? तु आजीला तानाशाह म्हटलं."

"सांगू नका त्यांना प्लीज !" शोभा कान पकडून म्हणाली. "नाही सांगणार. पण एका अधू माणसाचा इतका त्रागा करणं बरं नाही."

"नवीन ना तुम्ही, म्हणून असं म्हणताय. उद्या सकाळ पर्यंत तुम्हालाही ती तेच वाटेल."

"काय?"

"तानाशा..." जीभ दाताखाली दाबून, "सॉरी !" इंदिराला शोभावर जाम हसू आलं.

"खोली दाखवली का इंदिराला मॅडमला त्यांची?" स्वयंपाकी काकांनी शोभाला विचारलं.

"हो, दाखवते. त्या मागे आहेत."

"दाखव लवकर नाहीतर आजीबाई वाट लावतील तुझी. हे काय हातात?"

"त्यांचं सामान."

"इतकंच !" इंदिराची छोटीशी कपड्यांची बॅग पाहुन त्यांनी विचारलं, "त्या दिपकसोबत बोलायच्या नादात अर्ध सामान गाडीतच ठेवलं वाटतं."

"नाही इतकंच होतं."

"मुलगी खरंच खूप साधी आहे की असल्याचं नाटक करतेय."

"माहित नाही, पण छान आहे."

"काय सुरु आहे काका?" आजी नर्स उषा सोबत आल्या आल्या,"रात्रीच्या जेवणाचं पाहा."

"हो हो !''

"इंदिराला फ्रेश होऊन माझ्या खोलीत पाठव. आमचं जेवणही तिथंच घेऊन ये."

"हो."



इंदिरा हातपाय धुवून आजीच्या खोलीत गेली. तिची नजर आत जाताच भल्या मोठया पुस्तकांच्या कपाटावर पडली. दोनशे ते तीनशे पुस्तकं नक्कीच असतील.

"इतकी पुस्तकं कोणाची?"

"ही खोली कोणाची?" आजीनं उलट प्रश्न विचारला. इंदिरा समजून गेली की पुस्तकं आजीचीच आहेत.



"वाचन आवडतं का?"



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"कधी कधी वाचते."

"आजपासून रोज रात्री मला झोप येइपर्यंत पुस्तक वाचून मला ऐकवायचं."

इंदिरानं होकारार्थी मान हलवली.

"मला नंदी बैलासारखी मान डोलवणारी लोकं आवडत नाही. हो किंवा नाही म्हणायचं."

"हो."

शोभा जेवण घेऊन आली. नर्स उषाने आजीसाठी बेडवर जेवायचा टेबल लावला. त्यावर ताट ठेवलं.

"जेव! भूक लागली असेल ना तुला."

इंदिराला समजलं की आजी फक्त वरवर तापड आहे बाकी आत तिच्याही एक कोमल हृदय आहे. पण ज्या वयात आपल्या लोकांची साथ सर्वात जास्त महत्वाची असते त्याच वयात त्यांना एकटेपणा झेलावा लागतोय, ही त्यांची सर्वात मोठी व्यथा इंदिराला कळून चुकली. ती जास्तीत जास्त आजीला व्यस्त ठेवायचा प्रयत्न करू लागली.

सकाळी उठून आजीला कर्जतच्या निसर्ग रम्य वातावरणात फिरायला न्यायचं, चिमण्यांची चिव चिव टिव टिव, हवेतील गारवा, फुलांचा सडा वेचून त्यांच्या हातात द्यायची. स्वतःच्या त्यांच्या आणि शोभाच्या केसातही गजरा माळायची. त्यांचा सुवास सगळं सगळं ती आजीला अनुभवायला लावायची. नर्स फिजिओ थेरेपी द्यायची, आजीला कंटाळा यायचा म्हणून, इंदिरा स्वतः सुद्धा फिजिओ थेरेपि सुरु असतांना व्यायाम करायची.



जून अर्धा संपला. पाऊस आपल्या पाऊलखुणा देऊ लागला.

एका रात्री आजी झोपल्यावर इंदिराने मिनूला फोन केला, "बापरे मला वाटलं करोडपती आजीनं दत्तक घेतलं की काय तुला?"

"नाही गं!"

"मग इतके दिवस फोन का नाही केला? तु भेट चांगली ठोकते तुला."

"बरं बाई ! शूटिंग कशी सुरु आहे तुझी, ओमची?"

"काहीच विचारू नको. सिनेमा शूटिंग पूर्ण होणार का याची शाश्वती नाही आता."

"असं काय झालं? नक्कीच अनुभव सिन्हा जास्त इगो दाखवत असेल."

"नाही गं ! प्रॉब्लेम मायरा मॅडमचा आहे. तिच्या आईनं डायरेक्टरला आणि स्क्रिप्ट सुपरवायझरला तर वेडं करून टाकलंच पण बाकी शूटिंग युनिटला प्रचंड त्रास देतेय ती बाई."

"असं काय करतेय ती?"

"एकतर उशिरा येते शूटिंगला. आल्यावर मेकअप करते की काय करते लवकर व्हॅनिटीतुन बाहेर येत नाही. आली की अशी नाही अशीच बसेल, उभी होईल, हा डायलॉग नको, इथे खूप उकडतेय, हायजिन नाही, बापरे काय सांगू तुला. तिनं डायरेक्टरने सांगितलं तसा तर एकही शॉट दिला नाही आतापर्यंत."

त्या अनुभवला राग नाही येत का? तसा तर मोठा अँग्री यंग मॅन बनून फिरतो."

"येतो ना, त्याचा तर चेहरा रागानं लाल होतो. पण बिचारा डायरेक्टर हात जोडतो आणि फिल्म इंडस्ट्रीत पहिला ब्रेक अनुभवला त्यांनीच दिला आहे. म्हणून तो मायराला काहीच म्हणत नाही. पण मी उडती बातमी ऐकली की अनुभव हा सिनेमा सोडणार आहे. बघू आता काय होतं ते. पहिला ब्रेक मिळाला, थोडा चांगला रोल मिळाला आणि बघ हे काय झालं?"

"काळजी नको करू. सिनेमा शूटिंग पूर्ण होऊन सिनेमा घरात येणं महत्वाचं. मला वाटतं होईल पूर्ण हा सिनेमा."

"तेरे मुह मे घी शक्कर !"

"धन्यवाद बालिके. मी झोपते आता. आजीला सकाळी लवकर उठून फिरायला नेत असते."

"व्यवस्थित आहे ना तिकडे सगळं."

"हो गं ! एकदम छान आहे. चल झोप."



दिवस छान जाउ लागले. आजीही इंदिरा सोबत मोकळ्या राहू लागल्या. एका दुपारी इंदिराला आजीचा जोरात रागवण्याचा आवाज आला.

"इतकंच राहवत नाही त्याच्या शिवाय तर आली कशाला इथे? आताच्या आता चालती हो." आजी शोभाला रागवत होत्या, "चोरून चोरून त्या दिपकला व्हिडीओ कॉल लावून काय चाळे करते. त्याच्या जवळ जाऊनच जे करायचं ते कर. त्यानं विनंती केली म्हणून ठेवलं मी तुला इथे कामाला आणि तु..."



शोभाचे रडून रडून लाल झाले. इंदिरानं तिचे डोळे पुसले आणि तिथून जायला सांगितलं. झालं असं की उषा आजीला वाडयात सहज फिरवत होती तेव्हा त्यांना शोभा कोणाशी तरी बोलतांना दिसली. जवळ जाऊन बघितलं तर ती दिपकला व्हिडीओ कॉल लावून त्याच्याशी बोलत होती. वाडयात कोणालाच स्मार्टफोन वापरायची परवानगी नव्हती. शोभा आणि दिपकचं लग्न ठरलेलं होतं. संसाराला हातभार म्हणून काही पैसे जमवण्यासाठी त्यानं शोभाला इथे ठेवलं. आज त्याचा वाढदिवस म्हणून तिला त्याच्याशी विडिओवर बोलल्या शिवाय राहवलं नाही. इंदिरानं उषालाही तिथून जायला सांगितलं. ती आजीच्या पायाजवळ बसली. त्यांचा हात हातात घेऊन त्यांना विचारलं,



"आजी काय झालं? का स्वतःला असा त्रास करून घेताय?"

"कारण या फोननं माझा मुलगा तोडला माझ्यापासून."

"आजी ज्यानं कोणं या टेकनॉलॉजिचा शोध लावला त्यानं माणसाचं आयुष्य सुकर व्हावं हाच विचार केला होता. पण माणसांनी त्या टेकनॉलॉजितच आयुष्य शोधलं तर त्याला

तर त्यात त्या माणसाचा दोष. टेकनॉलॉजिचा नाही. मी तुमच्या मुलाला कधी भेटली नाही म्हणून त्यांच्याबद्दल मी काहीच टिपणी करणार नाही. पण शोभा सोबत एक महिन्यापासून राहतेय मी. तिनं जे केलं ते अयोग्य पण एखादेवेळी राहवत नाही अन चूक होते. माफ करा तिला. मी समजावून सांगेन. नाही करणार ती अशी चूक परत.



"तुला कधीच ते काय काय म्हणतात फेसबुक, व्हाट्सअप पाहावं नाही वाटत का?" आजीनं तिला विचारलं.

"आता नाही वाटत. पण माझं फेसबुक बघितलं तर तुम्ही म्हणाल, 'सौं चुहे खा के बिल्ली हज को चली !" इंदिरा गंमतीनं म्हणाली.

"मग का सोडलं सगळं असं अचानक?"

"काहीतरी स्ट्रॉंग करायचं आहे."

"म्हणजे?"

"म्हणजे त्या BDO  मुलाला BDO किंवा त्यापेक्षा मोठी पोस्ट मिळवून दाखवायचं आहे."

"अभ्यास कोण करणार?"

"करणार ना आता. पेमेंट झालं की पुस्तकं मागवणार आहे."

"अच्छा म्हणजे एका वर्षानं तु एकटं टाकून जाणार मला आणि मी उगाच जीव लावतेय तुला."

"जाईल, पण परीक्षा पास होताच तुम्हाला दत्तक घेऊन घेईल. "

"त्यापेक्षा माझ्या नातवा सोबत लग्न करून टाक."

"काय?" इंदिराला शॉक बसला. ती जोर जोरात हसू लागली.

"अगं हसू नको. सिरीयसली सांगतेय मी तुला. तुला माहित पडलं ना माझा नातू कोण आहे, तु उडया मारशील आनंदानं. "

"हो का ! सांगा मग कोण आहे तुमचा नातू?"

"अगं माझा नातू एक.... " आजी पुढे काही बोलणार तोच ढगांचा गडगडाट होऊ लागला. रिम झिम सरी जमिनीचं चुंबन घेऊ लागल्या.

"पाऊस येतोय. चला आत." उषा आजीची व्हिल चेयर  पकडून आत घेऊन गेली.

"इंदिरा तुला वेगळं सांगू का?" इंदिराला बाहेरच उभं पाहुन उषा म्हणाली.

"मी ना भिजणार आहे. सीजनचा पहिला पाऊस अंगावर घ्यायलाच हवा उषा मावशी. या तुम्हीपन."




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"उषा, काय उनाड कार्टी आहे ना ही." आजी उषाला म्हणाल्या पण पस्तिशी पार उषा कधीचीच भूतकाळात जाऊन भिजली. बेफिकीर तारुण्यात पाऊल चुकलं आणि बिन लग्नाची आई झाली. मूल जन्मताच अनाथाश्रमात गेलं. घरच्यांनी दुसरीकडे लग्न लावून दिलं तर तोही दारुडा, मार मार मारी एक दिवस ही सगळं सोडून पळून आली मुंबईला. तेव्हा एका समाज सेवकानं तिला महिला आश्रमात दाखल केलं. तिथं मुलींना, बायांना आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण दिलं जायचं.

नर्सिंगचं शिक्षण पूर्ण करून तिने काही दिवस हॉस्पिटलमधे जॉब केला. पण जवळ पैसे शिल्लक उरत नव्हते. म्हणून ति आजीच्या केयर टेकरचा जॉब करू लागली. पैसे जमा करून तिला तिच्या मुलाला अनाथाश्रमातुन परत मिळवायचं होतं.

"उषा, ऐकतेय ना तु मी काय म्हणतेय ते?" आजीनं विचारलं तशी उषा भूतकाळातुन वर्तमानात परतली.

"इंदिरा थंडी भरेल. चल आत." उषानं आवाज चढवून तिला आत बोलावलं.

कपडे बदलवून आजीजवळ परसदारात चहा घ्यायला बसली. काका वडापाव घेऊन आले. रिम झिम पावसाला पाहत चहा घ्यायची अन गरम वडापाव खायची मज्जाच काही ओर.

"शोभा, ये इकडे. बस माझ्या जवळ." आजीनं शोभाला बोलावलं.

"सॉरी आजी! हा मोबाईल तुम्ही ठेऊन द्या कपाटात." शोभा आजीला फोन देत म्हणाली.

"असू दे तुझ्याजवळ." इंदिराला पाहुन, "काही खेळायचं का?"

"हो आपण गाण्याच्या भेंडया खेळू. माझ्या टीममधे माळी दादा आणि उषा मावशी. तुमच्या टीममधे शोभा आणि काका." इंदिरानं माणसांची वाटणी केली,



"बैठे बैठे क्या करे,

करना है कुछ काम,

शुरु करे अंताक्षरी,

लेके प्रभू का नाम."



"म आला आपल्यावर." शोभा म्हणाली.

"गा मग."

"होहो,

मेरे नैना तेरे नैनोसे

मिठी मिठी बाते करते है |"

"तेरे नैना, असं आहे ते." शोभा म्हणाली. त्यांच्यात, हो नाही सुरु झालं. शेवटी इंदिरानं दुसरं गाणं म्हटलं म वरून. या सगळ्या गोंधळात टेबलवर ठेवलेला आजीचा फोन वाजला.

"उषा बघ कोण आहे ते?"

"नातू !"

"उचल."

"हॅलो !"

"आजीला द्या." नातू म्हणाला.

"त्याला म्हण, फोनवर चौकशी करू नको. ज्यांना खरंच काळजी वाटते ते येऊन भेटतात."

"ऐकलं मी, तुम्ही द्या आजीजवळ." नातू म्हणाला.

"तूझ्यावर थ आला इंदिरा." शोभा म्हणाली.

"आजी बोलून घ्या ना !" इंदिरा म्हणाली.

"इंदिरा, तु गप गाणं म्हण थ वरून. आणि उषा फोन ठेव तु." पण फोन तर केव्हाच कट झाला.

"त्यांनीच कट केला."

"करू दे. आपण आपला मूड खराब नाही करायचा."

अंताक्षरी परत सुरु झाली. पण आजीला आतून संताप होतोय हे इंदिरानी हेरलं. पण त्याला तिच्याजवळही काहीच इलाज नव्हता. मुलगा परदेशीं, सून कुठे माहित नाही, नातू फोनवरच विचारपूस करतो. परक्यांच्या आधारानं राहायचं. स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचं. आजीला रात्री गोळ्या घेऊनही बारा एक वाजेपर्यंत झोप लागली नाही. आपण आजीसाठी  काहीतरी करायला हवं, असं तिला वाटलं.

................



काय वाटतं? इंदिरा काय करेल?  आजीच्या नातूची भेट होईल पुढल्या भागात. तेव्हा वाट बघा उद्याची. प्रकाशित सर्व भाग (1 ते 11 ) वाचण्यासाठी मला www.irablogging.com वर फॉलो करा.



धन्यवाद !



©®अर्चना सोनाग्रे वसतकार


0

🎭 Series Post

View all