Login

गोष्ट प्रेमाची भाग १

लोक म्हणतात की पहिलं प्रेम मिळत नाही!! यावर तुम्हाला काय वाटतं?? पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ते प्रेम आपल्याला मिळतच मिळतं.

कथेचे नाव- गोष्ट प्रेमाची

कॅटेगरी- राज्यस्तरीय करंडक

विषय- प्रेमकथा

लोक म्हणतात की पहिलं प्रेम मिळत नाही!! यावर तुम्हाला काय वाटतं?? पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ते प्रेम आपल्याला मिळतच मिळतं. अशीच एक गोष्ट प्रेमाची... अखेर पाच वर्षांच्या प्रेमानंतर राकेश आणि स्नेहाच्या प्रेमाला लग्नाचं नाव मिळालं होतं. लग्नाचे सगळे विधी आटोपले. राकेश आणि स्नेहाचं निर्विघ्नपणे लग्न पार पडलं होतं.

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी ते दोघे त्यांच्या खोलीत गप्पा मारत बसले होते. मध्येच स्नेहा राकेश ला म्हणाली, खरच आपण लग्नाच्या बंधनात अडकलो आहोत का? त्यावर राकेश स्नेहाच्या डोळ्यात बघू लागला आणि स्नेहा तिच्या जुन्या आठवणी सांगू लागली.

स्नेहा म्हणाली, ज्याप्रमाणे सगळ्यांनाच कॉलेजला जाण्याची उत्सुकता असते तशी मलाही खूप उत्सुकता होती. कॉलेजचा तो पहिला दिवस होता. कॉलेजमधले सगळे जण छान तयार होऊन आले होते. सगळेजण एकमेकांसाठी नवीनच होते. त्यातच माझी नजर तुझ्यावर गेली ज्याने त्याच्या डाव्या कानात बाळी घातली होती. खरंतर बाळी घालणारी मुले ही नेहमीच मला वाया गेलेली किंवा टुकार वाटत होती पण तु काहीतरी वेगळाच होता. तुझ्या कानातली बाळी तुला उठून दिसत होती. असेच कॉलेजचे हे चार-पाच दिवस गेल्यानंतर माझी आणि तुझी भेट लॅब मध्ये झाली. न राहून शेवटी मी विचारले, तू कानामध्ये बाळी का घातली आहेस? त्यावर तु आश्चर्यचकित होऊन माझ्या तोंडाकडेच बघायला लागला... आणि चटकन तुझ्या डोळ्यात पाणी आले. मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचा प्रश्न विचारला आहे. त्या दरम्यान काही न बोलताच तु तिथून निघून गेला. पण माझ्या मनात तो प्रश्न तसाच राहिला.
दुसऱ्या दिवशी तु माझ्याकडे आला आणि म्हणाला मला माफ कर, काल तू मला काहीतरी विचारलं आणि मी काही न बोलताच तिथून निघून गेलो. पण ही बाळी माझ्या भावाची शेवटची आठवण आहे. पंधरा दिवसांपूर्वीच माझा भाऊ मला सोडून गेला आणि अचानक तू मला असं विचारल्यामुळे मी खूप भावुक झालो आणि म्हणूनच तिथून निघून गेलो होतो. त्या तुझ्या उत्तराने मला खूप भरून आलं. त्यावर मीच तुझी माफी मागितली. आणि म्हणाले की तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता पण तुझ्या कानामधील बाळी खूप छान दिसत होती म्हणून मी विचारलं. अशाच गप्पांमध्ये आपण एकमेकांचं नाव विचारलंच नाही. दुसऱ्या दिवशी तु मला कुठेही दिसला नाही. आणि कुणाला तुझ्याबद्दल विचाराव तर तुझ नावही मला माहित नव्हतं. अखेर जेवणाच्या सुट्टीमध्ये मला तु दिसला. आणि मी तुला तुझं नाव विचारले. तु म्हणाला राकेश. अशीच तुझ्या आणि माझ्या मैत्रीला सुरुवात झाली. आठवतंय ना तुला राकेश? त्यावर राकेश म्हणाला "होय, कॉलेजच्या पहिल्या दिवशी आपली झालेली मैत्री ते आजपर्यंतचा प्रवास मला चांगलाच आठवतो आहे". दोघेही जुन्या आठवणींमध्ये रमून गेले होते.


तेवढ्यात राकेशच्या आईने आवाज दिला राकेश आणि स्नेहा लवकर या तुम्हाला भेटायला कुणीतरी आलं आहे. (दोघांच बोलन बंद झाल आणि ते बाहेर आले). आणि बघतात तर काय त्यांचा खूप जुना कॉलेजचा मित्र आला होता. मित्राला पाहताच राकेश आणि स्नेहा दोघे खूप आनंदी झाले. राकेश आईला म्हणाला, अग आई हा माझा कॉलेजचा मित्र आहे तू याला ओळखलं नाहीस का हाच तो सिद्धू ज्याच्याबद्दल मी तुला नेहमीच सांगत असतो. त्यावर राकेशची आई सिद्धूला म्हणाली, हो तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे मी, नेहमीच राकेश तुझ्याबद्दल भरभरून बोलत असतो. नक्की हा सिद्धू कोण आहे हे बघायची मलाही उत्सुकता होती आणि आज तू आलास". सिद्धू राकेश आणि स्नेहाकडे बघून गालातल्या गालात हसू लागला आणि म्हणाला, "आय एम सॉरी, मी लग्नाला येऊ शकलो नाही पण वेळात वेळ काढून मी आज आलो आहे". त्यावर राकेश म्हणाला तू आता कारण देऊ नकोस तो राग तर आमच्या मनात आहेच. स्नेहा म्हणाली सगळ्या गप्पा तुम्ही दरवाजातच मारणार आहात का? असं बोलून त्यांना आत घेऊन आली. स्नेहाने सिद्धूला पाणी दिले आणि विचारले कसा आहेस सिद्धू? आता सांग तू आमच्या लग्नाला का आला नाहीस? तू तर आता काही बोलूच नकोस तुझ्याही लग्नाला आता आम्ही दोघे येणार नाही". त्यावर राकेश म्हणाला त्याच्या लग्नाला तर जायचं नाही आपण पण ते सगळं नंतर बघू सिद्धू पहिले हे सांग तू आम्हाला गिफ्ट काय घेऊन आलास? हे ऐकून राकेशची आई त्याला ओरडली आणि म्हणाली अरे असं कोणी विचारता का? त्यावर राकेश म्हणाला अगं आई हा आमचा हक्काचा मित्र आहे ज्याला आम्ही काहीही बोलू शकतो हा तेव्हापासून आमच्या सोबत आहे जेव्हापासून स्नेहा आणि माझ्या मैत्रीला सुरुवात झाली होती. आज स्नेहा आणि माझं लग्न झालं आणि आम्ही एकत्र आहोत यामध्ये सिद्धूचा खूप मोठा वाटा आहे. हे ऐकून सिद्धू म्हणाला की मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, आणि काळजी करू नका तुमच्यासाठी गिफ्ट मी घेऊन आलो आहे असं बोलून सिद्धू ने त्याच्या बॅगमधून गिफ्ट काढून स्नेहाच्या हातामध्ये दिले आणि म्हणाला उघडून बघ तुमच्यासाठी सरप्राईज आहे. स्नेहा आणि राकेश दोघे एक्साईटेड होऊन ते गिफ्ट खोलू लागले. आईचे यांच्या बोलण्याकडे लक्ष होतं आई देखील ते गिफ्ट काय आहे ते बघू लागली. गिफ्ट खोलून बघतात तर काय त्यामध्ये राकेश आणि स्नेहाचे खूप जुने जुने पाच वर्षा-पासूनचे फोटो होते. हे सगळे फोटोज बघून राकेश आणि स्नेहाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता. आई देखील त्यांचे हे सगळे जुने फोटो बघून खूप खुश झाली. सिद्धू ने विचारले कसा आहे गिफ्ट आवडलं का तुम्हाला?? स्नेहा म्हणाली प्रश्नच नाही खूप सुंदर गिफ्ट आहे आमच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आई म्हणााली, आता बोलणं राहू द्या तुम्ही पहिले हात पाय धुऊन जेवून घ्या आणि निवांत गप्पा मारत बसा. सगळेजण हातपाय धुवून जेवायला निघून गेले.

लेखिका-दामिनी नलावडे 

जिल्हा- पुणे






🎭 Series Post

View all