कानामागून आली अन् तिखट झाली - ३ ( जलद कथामालिका स्पर्धा)

प्रस्तुत कथेत मी एक आधुनिक मुलगी लग्न झाल्यावर रूढी परंपरांना नम्रपणे नकार देत,त्यामुळे होणारा वाद सहन करते.मग आपोआप कुटुंबात नवा बदल कसा घडतो हे सांगितले आहे.


दुसऱ्या दिवशी स्वयंपाक घरात मिक्सरचा खूप आवाज येतो. श्रद्धा मिक्सर मध्ये मसाला वाटून भाजी बनवण्याचा बेत आखते.

" अगं अगं काय हे श्रद्धा? तुला माहित आहे का, या घरात मिक्सर मध्ये वाटलेल्या मसाल्याची भाजी कोणी खात नाही . तू कोणाला विचारून हे मिक्सर मसाला वाटण्यासाठी घेतलेस?"

" अहो सासूबाई त्यात काय विचारायचं. तुम्ही माझ्या हातची पनीर मसाला भाजी खाऊन तर बघा. अहो वाटण मिक्सर मधील असो नाही तर पाटा वरवंटातील. आपण जो मेन मसाला टाकतो ना त्यावर खरी चव असते."

आताही श्रद्धा च्या सासूबाईंचा रागाने तीळ पापड होतो आणि तनफन करत त्या तिथून निघून जातात.

श्रद्धा ने केलेली पनीर मसाला भाजी घरातील सर्वजण आवडीने खातात.

दुसऱ्या दिवशी इडलीचा बेत असतो. श्रद्धा छान इडली बनवून सर्वांसाठी नाष्टा टेबलवर वाढते. पण तिला डोसा खावासा वाटतो म्हणून स्वतःच्या ताटात मात्र तीन डोसे बनवून घेते. हे पाहून गणेश चे वडील मात्र चिडतात,

" श्रद्धा हे काय? आम्ही सर्वजण इडली खात असताना तू स्वतःसाठी डोसे कसे काय बनवले?"

"बाबा आज मला डोसे खायचे होते म्हणून मी माझ्यासाठी डोसे बनवले."

" अगं पण या घरात सर्वांसाठी जे जेवण बनवले जाते, तेच घरातील स्त्रीने सुद्धा खायचे. किंबहुना पुरुषाचे उष्टे जेवण देखील तिने विना तक्रार प्राशन करायचे, असा नियम आहे."

" बाबा जर मी लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर मला माफ करा. पण स्त्री ही अन्नपूर्णा असते. ती कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेत स्वतःकडे मात्र हेळसांड करते. म्हणून तिनेही स्वतःच्या आवडीनिवडी जपायला हव्यात अशा विचारांची मी आहे. म्हणूनच मला जे आवडते ते कधीही कुठल्याही वेळी करून मी खाणार."

गणेश चे बाबा गप्प बसतात व रागाने श्रद्धाकडे एक कटाक्ष टाकून तिथून निघून जातात.

गणेशला मात्र आपल्याच आई-वडिलांचे श्रद्धा शी असे वागणे खटकते. श्रद्धाला एकदा तो विचारतो

"श्रद्धा तुला चिकन लॉलीपॉप खायला यायचे का?"

" अरे गणेश तुला माहित नाही का? आपल्या घरात नॉनव्हेज खाल्लेले चालत नाही. खरं तर मला खूप आवडतात चिकन लॉलीपॉप. आधीच तुझे आई बाबा माझ्यावर खूप रागवलेत . म्हणून मला नको."

" अगं चल तू माझ्याबरोबर. आपण बाहेर जाऊन खाणार आहोत. कोणाला कळणार आहे तू चिकन लॉलीपॉप खाल्लस ते? चल आवर लवकर नाहीतर मला राग येईल."

" बर बाबा ठीक आहे आवरते मी."

गणेश व श्रद्धा बाहेर जाऊन चिकन लॉलीपॉप खाऊन येतात.

थोड्याच वेळात श्रद्धा च्या सासुबाई थोड्या किंचाळतच

गणेश आणि श्रद्धाला बैठक खोलीत बोलवतात.

" काय ग श्रद्धा तुम्ही आता बाहेर काय खायला गेला होतात?"

श्रद्धा गणेशकडे बघते.

तेवढ्यात गणेश उत्तर देत म्हणतो,

" चिकन लॉलीपॉप."

गणेशचे वडील बैठक खोलीत बसलेले असतात.

" बघितलं का गणेशचे बाबा तुम्ही? आपला गणेश कधीही असे नॉनव्हेज बाहेर जाऊन खात नव्हता. पण आल्या आल्या या बाईसाहेबांनी याला ताटाखालचा मांजर बनवले आणि घेऊन गेली याला बाहेर नॉनव्हेज खायला. मी तिथेच बाजूला भाजी बाजार करायला आले होते तेव्हा मला हे दोघे तिथे दिसले. जेव्हापासून ही श्रद्धा घरात आली आहे तेव्हापासून ती स्वतःच्या मनमर्जीचा कारभार करते आहे. कानामागून आली अन तिखट झाली."

क्रमशः 

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

नाशिक

🎭 Series Post

View all