Feb 26, 2024
नारीवादी

आशेचा किरण ( अंतिम भाग )

Read Later
आशेचा किरण ( अंतिम भाग )
सुषमाचा संसार ऊनसावलीसारखा सुरू होता. संजय चांगला वागला की छान वाटायचे आणि मग सुषमाला आशेचा किरण दिसायचा. तेव्हा तिला वाटायचे,'आपण हळूहळू संजयचे व्यसन दूर करून त्याचे जीवन आणि आपलेही जीवन आनंदी करू.' पण जेव्हा संजय पुन्हा दारू पिऊन यायचा तेव्हा सुषमाला आपले भविष्य, आपला वर्तमानकाळ अंधारात दिसायचा.

कधी सुख तर कधी दुःख असे उपभोगत आणि आपल्या जीवनात काही तरी चांगले होईल या आशेवर सुषमा जीवन जगत होती.

पहिले बाळंतपण माहेरी करायचे म्हणून ती बाळंतपणासाठी माहेरी गेली.
बाळाच्या येण्याने तरी संजयमध्ये सुधारणा होईल असे सर्वांना वाटत होते.

सुषमाला छान व गोंडस असा मुलगा झाला. माहेरी व सासरी सर्वांना खूप आनंद झाला. संजयलाही वडिल झाल्याचा आनंद झाला आणि तो आनंद त्याने दारू पिऊन सेलीब्रेट केला.
नवरा आणि नंतर बाप या जबाबदारी येऊनही संजयमध्ये काही बदल होत नव्हता. बिचारी सुषमा कधी ना कधी संजय सुधारेल या आशेवर जगत होती.

तिची आशा ही फक्त आशाच राहिली. ती पूर्ण झाली च नाही. संजय दारूच्या नशेत असताना त्याचा अपघात होऊन तो जागीच मरतो.

सुषमाला तर काय करावे ? हेचं सूचत नव्हते.आईवडिलांचे ऐकून तेव्हाच माहेरी राहिले असते तर..आज नयनच्या आयुष्यात बाप नसण्याचे दुःख तरी आले नसते. बिचाऱ्या नयनला वडिल काय असतात हे कळायच्या आधीच वडिल नसल्याचे दुःख नशिबी आले.
मुलगा जाताच सासरच्यांनी सुषमाला त्यांचे गुण दाखवायला सुरूवात केली. संजय सुधारावा म्हणून सुषमाशी गोड गोड बोलणारे तेचं लोक आता तिला व नयनला घरात घ्यायला तयार नव्हते.

"नयन जरी संजयचा मुलगा असला तरी त्याला किंवा तुला आमच्या इस्टेटीतील काहीही मिळणार नाही.आमचा मुलगा गेला आता तुझा व आमचा काहीही संबंध नाही. तू कुठेही जायला मोकळी आहे."

या सासरच्या शब्दांनी सुषमा खूप दुखावली गेली.

स्वतःच्या जीवाचे काही बरेवाईट करून घ्यावे. असे तिला वाटू लागले पण छोट्या नयनचे काय होईल? या विचाराने तिला जगावेसे वाटू लागले.

आपल्या मुलीच्या नशिबात असे का असावे? या विचाराने सुषमाचे आईवडिल खूप दुःखी झाले. पण आता तिला आपलाच आधार आहे. त्यामुळे त्यांनी सर्वांनी सुषमाला जगण्याचा धीर दिला.
हळूहळू सुषमाही त्या दुःखातून बाहेर पडू लागली.

घरात तिच्या दुसऱ्या लग्नासंबंधी विषयही निघू लागला. पण ती तयार नव्हती.
"माझ्या आयुष्यात कदाचित संसाराचे सुख नसावे... म्हणून माझ्या आयुष्याचा असा खेळ झाला... आता मी फक्त नयनच्या सुखाचा विचार करणार आहे. "

तिने घरात असे सांगितल्यावर कोणीही दुसऱ्या लग्नाचा विषयही काढला नाही आणि तिला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. याची काळजी घेत राहिले. सर्व प्रकारे मदत करत गेले.
सुषमाच्या आईवडिलांचा तिला खूप आधार होता पण भाऊही चांगले होते आणि वहिनी सुद्धा चांगल्या होत्या.
याबाबतीत तिने देवाचे खूप खूप आभार मानले.
कोणाच्या चांगुलपणाचा फायदा घेणे. तिला आवडत नव्हते. माहेरचे चांगले आहेत म्हणून आपण आपला सर्व भार त्यांच्यावर टाकू नये. असे तिला वाटले. तिने नोकरी शोधली व नोकरी करू लागली. नयन दिसायला ही खूप छान होताच पण हुशारही खूप होता.
नयनचे सर्वजण खूप प्रेम करत होते,लाड करत होते. त्याची हौसमौज पूर्ण करत होते. फक्त बापाचे प्रेम मिळत नव्हते.
सुषमा घरातील आपले काम, नोकरी सर्व व्यवस्थित सांभाळत होती. नयनही शाळेत जाऊ लागला होता. सासच्यांकडून तर कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नव्हती.
आपल्या अशा कमनशिबी व अंधारमय आयुष्यात माहेरच्यांचा आधार आणि नयनच्या रूपात सुखाचा एक आशेचा किरण दिसू लागला आणि त्याच आधाराने ती आपल्या जीवनात सुखाचा,आनंदाचा प्रकाश शोधू लागली.

समाप्त

नलिनी बहाळकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//