आशेचा किरण ( भाग 3 )

About Hopes Of Life
सुषमाने पुन्हा सासरी जाऊ नये. व्यसनी मनुष्याकडून सुधारण्याची शक्यता कमी असते. हे त्यांना माहित होते. त्यामुळे सुषमाने माहेरीच राहवे. असे तिच्या आईवडिलांना व भावांना वाटत होते. पण सुषमाला वाटले, 'आपल्या वागणुकीचा,आपल्या चांगुलपणाचा नवऱ्यावर काहीतरी चांगला परिणाम झाला आणि तो सुधारला तर सर्व काही चांगले होईल आणि सासूसासरे ही आहेतच आपल्या मदतीला. '
या चांगल्या व सकारात्मक विचाराने ती माहेरच्यांची नाराजी स्विकारत सासरी गेली.

संजयच्या व्यसनामुळे आता सुषमा सासरी पुन्हा येणार नाही. असे तिच्या सासरच्या लोकांना वाटले होते. पण सुषमा घरी आलेली पाहून संजयला व सर्वांनाच खूप आनंद झाला.
'आपल्या मुलाचा संसार सुखाचा होऊ दे.' अशी प्रार्थना संजयचे आईवडील देवाला करू लागले.

सुषमा व संजयचा संसार सुरू झाला. संजयला त्याच्या आईवडिलांनी समजावून सांगितले. "आता जे झाले ते सर्व विसर, सुषमासारखी चांगली बायको मिळाली त्यामुळे देवाचे आभार मानून तू ही चांगला रहा. जबाबदारीने वाग.स्वतः ही सुखात रहा व आम्हांला सर्वांनाही सुखात ठेव."

आईवडिलांच्या बोलण्याचा संजयवर परिणाम झाला व तो चांगला राहू लागला.घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सुषमाच्या माहेरच्यांनाही समाधान वाटले.


असेचं छान दिवस जात होते. सुषमा आपल्या संसारात चांगली रूळली होती. आणि आता आई होण्याची चाहूलही तिला लागलेली होती.
'आपल्या संजयचा संसार बहरत चालला आहे.' या विचाराने त्याचे आईवडील खूप समाधानी होते.

पण सुषमाच्या नशिबात सुखी संसार नसावा.
तिने आपल्या सुखी संसाराचे रंगवलेले चित्र पुसल्यासारखे वाटू लागले..जेव्हा संजय पुन्हा रोजचं दारू पिऊन घरी येऊ लागला.
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेचं.. त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडेचं राहते.

संजयसारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना कितीही समजावून सांगितले तरी काहीही उपयोग नसतो.
फार कमी लोक असतात ..जे व्यसनातून आपली सुटका करून घेतात. पण त्यासाठी त्यांना आपल्या मनाची खूप तयारी करावी लागते.
व्यसन लागायला वेळ लागत नाही. पण ते सोडण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाताना विचार करावा.
व्यसनामुळे स्वतः बरोबर आपण इतरांचेही आयुष्य उध्वस्त करत असतो. याचाही विचार करावा.

संजय दिसायला सुंदर होता. शिक्षण, नोकरी सर्व चांगले होते. सर्व कसे अगदी छान होते. पण व्यसनामुळे त्याच्या शरीराचे नुकसान तर होतच होते पण त्याच्या व्यसनामुळे घरातील सर्वांनाचं खूप त्रास होत होता.

संजय मनाने खूप चांगला होता. तो सुषमावर खूप प्रेम करायचा पण दारू पिऊन आला की राक्षस बनायचा. शिव्या देणे, जोरजोरात ओरडणे, सुषमाला मारणे. यामुळे त्याचे हे अमानवीय रूप कोणालाच आवडत नव्हते.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all