आशेचा किरण ( भाग 2 )

About Hopes Of Life
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच आपला नवरा अशा रूपात दिसेल. याची तिने कधी कल्पनाही केलेली नव्हती. 'अजून आपण एकमेकांना नीट ओळखले नाही, समजून घेतलेले नाही. लग्न घाईत झाल्याने एकमेकांना समजून घेण्यास वेळही मिळाला नाही. आपल्या नशिबात हे काय लिहून ठेवलेले होते. लग्नाअगोदर यांच्या व्यसनाबद्दल आपल्याला का समजले नाही? भरवशाच्या व्यक्तिवर विश्वास ठेवला आणि जास्त चौकशी न करता लग्न केले..त्याचेच हे फळ आहे.
कुठून मला बुद्धी सूचली आणि मी पण होकार दिला. सर्व इतके पटकन झाले की, जास्त विचार करायला वेळ ही मिळाला नाही. आता तर लग्न होऊन मी त्यांची बायको म्हणून या घरात आले आहे. काय करू आता ? यांना सोडून कायमची माहेरी जाऊ की यांचे व्यसन सोडण्यास मदत करून सुखाचा संसार करू ?' असे अनेक विचार सुषमाच्या मनात येऊ लागले व या विचारांनी तिला रात्रभर झोप लागली नाही.

दोन दिवस शांततेत गेले. सुषमाला तर माहेरी केव्हा जाऊ ? असे झाले होते.
दुसऱ्या दिवशी तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचे काका आले होते. त्यांना तर कल्पनाच नव्हती की सुषमाच्या आयुष्यात असे काही असेल ? सुषमाच्या सासरच्यांनी काकांचे छान आदरातिथ्य केले. गप्पा गोष्टी झाल्या. तिचा नवराही आपण काही केलेच नाही. असे दाखवत वागत होता. घरातील आनंदाचे वातावरण पाहून काकांना समाधान वाटले. सासरच्यांनी आनंदाने सुषमाला माहेरी पाठवले. सुषमानेही आनंदाने सर्वांचा निरोप घेतला.
माहेरी आल्यावर सुषमा आपल्या आईला बिलगली आणि जोरजोरात रडायला लागली. सर्वांना वाटले लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली आणि सर्वांना भेटल्यामुळे रडत असावी. पण तिचे रडणे थांबतच नव्हते . त्यामुळे तिला रडण्याचे कारण विचारले. सुषमाने सासरी काय झाले ते सर्व सांगितले. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. आणि सर्वांना तिच्या नवऱ्याचा,सासरच्या मंडळींचा आणि हे स्थळ सूचविणाऱ्या व्यक्तिचा खूप राग आला .
आई वडिलांनी स्वतःला सावरत सुषमाला शांत केले. मुलांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणाले,
"आता जे झाले त्यातून काही मार्ग निघतो का ते पाहू ? सुषमा, तुझे म्हणणे काय आहे ? तू जो निर्णय घेणार तो चं ठरवू..तुला इकडे राहयचे तर रहा.. आपण तुझ्यासाठी दुसरा चांगला मुलगा शोधू . ओळखीतला,विश्वासातला पाहू. "

सुषमा म्हणाली "मी बघते प्रयत्न करून. त्यांचे व्यसन सोडविण्यात यश मिळाले तर होईल आमचा संसार सुखाचा ! नाहीतर शेवटी माझे नशीब! समजा.. दुसरे लग्न केले आणि त्यातही काही समस्या आली तर .. "

सुषमाचे हे उत्तम ऐकून आईवडिलांना, भावांना काय निर्णय घ्यावा हे सूचत नव्हते.

आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात, जेव्हा निर्णय घेणे अवघड होऊन जाते.
भविष्याचा विचार करून आताच्या वाईट परिस्थितीतून निघण्याचा निर्णय घेतो, काही वेळेस घेतलेला निर्णय चांगला ही ठरतो तर काही वेळेस आगीतून फोफाट्यात गेल्यासारखेही होते.

सुषमाच्या आईवडिलांची व भावांची ही अशीच मनस्थिती झाली होती.


क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all