Dec 01, 2023
नारीवादी

आशेचा किरण ... ( भाग 1 )

Read Later
आशेचा किरण ... ( भाग 1 )
आईवडिलांची लाडकी सुषमा दिसायला ही छान होती आणि गुणांनीही परिपूर्ण होती. दोन भावांची एकुलती एक बहिण. बहिणीचे भावांवर आणि भावांचे बहिणीवर अतोनात प्रेम होते.कुटुंबात आनंदच आनंद होता.

सुषमाचे शिक्षण सुरू असतानांच तिच्या लग्नासाठी स्थळे येऊ लागली.

पण आईवडिलांनी तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्न करायचे ठरवले.



"मुलीला इतके शिकविण्याची काय गरज ? घरातील कामे येतात ..खूप झाले."



अशी अनेक टोमणी सुषमाच्या आईवडिलांना नातेवाईक देऊ लागली. पण त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करत तिला शिकवले.आणि पुढे शिक्षण पूर्ण होताच घरात तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. नातेवाईकांनी,हितचिंतकांनी स्थळे सूचवायला सुरूवात केली.चांगली स्थळे शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. मगं जवळच्याचं.. अगदी विश्वासातील व्यक्तिने सूचविलेल्या मुलाशी सुषमाचे लग्न ठरवले. विश्वासातील व्यक्तिच्या शब्दांवर विश्वास ठेवून ,मुलाची जास्त चौकशी न करता सुषमाच्या घरातील मंडळींनी लग्नाला होकार दिला. मुलगा दिसायला चांगलाच होता आणि नोकरीही चांगली होती. त्यामुळे सुषमाच्या भविष्याचा विचार करून लग्न ठरवले. मुलाकडील लोकांना तर सुषमा खूप आवडली होती आणि त्यांना मुलाच्या लग्नाची खूप घाई झाली होती.

सुषमाच्या आईवडिलांनी सर्व मानपान करत लग्न छान थाटामाटात केले. आपल्या लाडक्या सुषमाला भरल्या डोळ्यांनी सुखी संसाराचा आशिर्वाद देत सासरी पाठवले. पण बिचाऱ्यांना पुढची काहीच कल्पना नव्हती. सुषमाच्या आयुष्यात पुढे काय होणार होते ? हे तिलाही माहित नव्हते. तीही सुखाच्या अपेक्षेने,आईवडिलांचा आशिर्वाद घेऊन सासरी गेली. सासरचे तर सर्व खुश होते. आपल्या मुलाचे लग्न झाले हे पाहून संजयचे आई-वडील आनंदी होते.आपण त्याचे लग्न लावून दिल्याने त्याच्या आयुष्यात नक्कीच चांगला परिणाम होईल व तो सुखाचा संसार करेल. असे ते विचार करू लागले.

पण त्यांना लवकरच एक धक्का बसला. संजय दुसऱ्या दिवशीच दारू पिऊन आला आणि नशेत बडबड करू लागला. ते पाहून त्याच्या आईवडीलांना त्याचा खूप राग आला.

सुषमाने तर यापूर्वी असे प्रसंग कधी पाहिलेले नव्हते. त्यामुळे संजयचा अवतार पाहून खूप घाबरली व रडायला लागली.तिचे अंग भीतीने थरथर कापायला लागले.तिची अशी स्थिती पाहून सासूसासरे तिला समजावू लागले, "सुषमा, घाबरू नकोस, संजय मनाने खूप चांगला आहे ,पण...फक्त त्याचे हे व्यसन..बाकी त्याचा काही त्रास नाही. आता तू आली आहेस ना त्याच्या जीवनात, मगं हे व्यसनही तो सोडून देईल. तू खंबीर रहा फक्त. आम्ही तुझ्या मदतीला आहोतच."



त्यांचे हे बोलणे ऐकून तिला काय बोलावे ? हे ही सूचत नव्हते. ती फक्त शांत बसून होती व आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. या विचाराने तिला मोठ्याने रडावेसे वाटत होते.







क्रमशः





नलिनी बहाळकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//