सीड मदर : संघर्ष तिचा भाग ४

A Struggle Of Woman Who WasHonoured With Padmshree Award



क्रमशःसीडमदर : तिचा संघर्ष



टीप : खरं तर एरवी कथेच्या खाली टीप द्यायची पद्धत असते. पण लेखिका म्हणून मला जे मांडायचं आहे, ते मला आधीच सांगायची उर्मी स्वस्थ बसू देत नाहीये. ही कथा आहे एका जिद्दी स्त्रीच्या संघर्षाची. एक असा संघर्ष जो तिला थेट पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून गेला. ही कथा सत्य घटना, गोष्टी ह्यांवर आधारित असली, तरी काही ठिकाणी लेखन स्वातंत्र्य आणि कल्पनाशक्ती ह्यांचा संगम घडविणे मला आवश्यक वाटले. त्यामुळेच काही नावे, काही प्रसंग आणि काही स्थळे काल्पनिक असली, तरी जिची ही कथा आहे, ती स्त्री मात्र सत्यात आहे. १९६४ साली जन्माला आलेल्या ह्या स्त्रीची कहाणी आपण जाणून घ्यायला हवीच .



कथा : भाग ४



पाटील आणि सर्जा बाहेर आले. देवळाच्या बाहेरच्या बाजूला बळी द्यायचा दगड होता. तिथे जाऊन सर्जाने बळी द्यायची तयारी केली. बकरं तिथे आणून त्याच्या गळ्यात माळ, कुंकू लावून पाणी पाजले. आणि झोळीतून त्याने भला मोठा कोयता काढला. बकरं पुढे आणून त्याने कोयता उचलला. देवीचा जयघोष करत त्याने कोयता खाली आणला. बकऱ्याचं मुंडकं धडावेगळं होणार इतक्यात एक विचित्र घटना घडली. सर्जा अचानक कोयता टाकून किंचाळला.



त्याच्या पायाला काहीतरी जोरात चावलं. आणि तो खाली कोसळला. त्याच्या तोंडातून फेस यायला लागला, तो जोरात आचके द्यायला लागला. पाटील भांबावले. त्यांना सुचेना काय करावे ते! त्यांनी पटकन सर्जाजवळ धाव घेतली. पण तोपर्यंत सर्जाचा खेळ आटोपला होता. अचानक झालेल्या ह्या अशा गोष्टीने पाटील गांगरले.



त्यांनी जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली. देवळाच्या पाठीमागेच राहणारे देवीचे पुजारी धावत आले. त्यांनाही कळेना हे काय चाललंय. दोघांनी मिळून सर्जाला उचलून देवळाच्या कट्ट्यावर ठेवलं. आणि पाटील वैद्यबुवांकडे धावले.



पाटील तातडीने वैद्यबुवांना घेऊन आले. वैद्यांनी नाडी पाहिली आणि नकारार्थी मान हलवली. सगळंच संपलं होतं. पाटील डोक्याला हात लावून खाली बसले. आता काहीही समजायच्या पलीकडे त्यांची मनःस्थिती गेली होती. थोडा वेळ असाच गेला. वैद्यबुवा म्हणाले, " मी गावात परत जातो आणि बिरजूला निरोप देतो. आणि चार माणसांना पण पाठवतो. तुम्ही पुढचं बघून घ्या".



पाटील हो म्हणाले. वैद्यबुवा लगबगीने गावात गेले आणि त्यांनी बिरजू आणि चार माणसांना धाडून दिले. त्या चार माणसांनी डोली करून सर्जाला गावात आणले. पण ह्या गडबडीत बकरं तिथेच बांधलेलं राहिलं ह्याची साधी आठवण देखील कोणाला राहिली नाही. गावात पाटलांच्या घरासमोर ही गर्दी जमली होती. गावात ही बातमी पसरल्याने सगळं गाव तिथे गोळा झालं होतं.



तेवढ्यात दुर्गा आली. तिला ह्या सगळ्याचा पत्ताच नव्हता. तिने समोर पडलेल्या अचेतन सर्जाला पहिलं आणि एकच हंबरडा फोडला. तिचा करूण आक्रोश बघून माणसांचे काळीज गलबलून गेले. सर्जाची सगळी व्यवस्था बिरजूने केली. पंधरा दिवसानंतर दुर्गा पाटलांकडे परत आली आणि काम मागू लागली. झाल्या गोष्टी जरी पाटलांच्या हातात नव्हत्या तरी, त्यांनी सर्जाचा मृत्यू ही त्यांची जबाबदारी मानली आणि एक जमिनीचा तुकडा दुर्गाच्या नावे करून दिला. दुर्गाला गुप्तधन दिसतं असं सगळं म्हणायचे. पण ते कधीच तिच्यासाठी वापरू शकत नसे. असे मागे सर्जानेच त्यांना सांगितले होते. त्यासाठीच ते सर्जाच्या मागे लागले होते. म्हणूनच ते दुर्गाला बोलाव म्हणत होते. पण आता तिला अशी काही गळ घालायला पाटलांची हिम्मत होत नव्हती.



तिला पाटलांनी वाड्यावर बायजाच्या हाताखाली काम दिले आणि वर एक जमिनीचा तुकडा देखील. हळूहळू दुर्गा वाड्यावर रमली. तीन महिने गेले आणि अचानक सखूला उलट्या होऊ लागल्या. पाटील मनात आनंदले. त्यांनी सर्जाची वाणी कोणालाही सांगितली नव्हती. कारण ती वेळ तशी नव्हती. पण आता सांगायला हरकत नव्हती. सखूच्या उलट्या जशा थांबायचं नाव घेईनात तसं पाटलांनी वैद्यबुवांना बोलवलं. वैद्यबुवांनी नाडी परीक्षा करून ती गर्भवती असल्याचं सांगितलं आणि बायजाला कोण आनंद झाला. बिरजू खाली मान घालून बाहेर निघून गेला. पाटील देखील हसत हसत त्याच्या मागे गेले. बायजाने मीठ मोहऱ्या सखूवरून उतरून चुलीत टाकल्या. तिची दृष्ट काढून तिला माहेरची साडी चोळी देऊन तिची ओटी भरली. उदास असणारी दुर्गा देखील आनंदी झाली. ती स्वतः देखील तीन मुलांची आई होतीच.



सावकाश दिवस चालले होते. गर्भारशी असलेली सखू हळूहळू बाळाच्या चाहूलीत, त्याच्या स्वप्नात हरवू लागली होती. तिच्या चेहऱ्यावर आलेलं तेज आनंदाची साक्ष देत होतं. बायजाने तिचं सुरेख डोहाळजेवण केलं. स्वतःची मुलगी समजूनच बायजा तिचं सर्व करीत होती. दुष्काळ जणू फक्त पाटलांच्या आयुष्यातून हद्दपार झाला होता. सखूला मुलगी मानल्यामुळे आजोबा होण्याची स्वप्न ते देखील रंगवू लागले होते. आणि अखेर ती वेळ आलीच. एकोणिसशे चौसष्ट साली फेब्रुवारीच्या सुरुवातीस सखूला बाळंतवेणा सुरू झाल्या. सुईणीला बोलावणं धाडलं गेलं आणि रात्रीच्या वेळेस सखूच्या पोटी एक सुरेख इवलं इवलं नक्षत्र जन्माला आलं. ती चिमुकली मुलगी बघून पाटलांना सर्जाची फार आठवण झाली. सखूच्या पोटी आलेलं हे नक्षत्र सगळ्या जगाला एक सुरेख देणं देणार होतं. सगळं जग तिचं कौतुक करणार होतं. ह्याची त्यावेळी कोणालाच जाणीव नव्हती.



काय नाव ठेवलं त्या मुलीचं? काय असं करणार होती ती? ह्याची रंजक कथा पुढच्या भागात.



क्रमशः

🎭 Series Post

View all