दिसतं तसं नसतं ( भाग - 24 )

dist-tas-nast-part24

पुर्वावलोकन


अनु नेहमीप्रमाणे यावेळेसही प्रथम आली आहे. पण वनवे काकूंच्या मुलाची नोकरी कुणीतरी पैसे खाऊ घालून बळकावली आहे. त्यामुळे ती सुन्न झाली आहे. तसेच तानिया देखील तिच्या आईबरोबर सहामाही परीक्षेचा निकाल घेण्यासाठी शाळेत गेलेली आहे.


आता पुढे


अनु घरी पोहोचली. तिची आई लगेच कामावर निघून गेली. तिचे बाबा देखील कामावर निघून गेले होते. तिने तिचं बक्षीस व प्रगतीपुस्तक बाजूला ठेवलं. ती गालावर हात टेकवून बसली होती. तिचा चेहरा स्थिर होता. तिच्या मनात वनवे काकूंचे ते शब्द फिरत होते. पैसे खाऊ घातले असतील! म्हणजे आपण एवढं हुशार असण्याचा काय फायदा? म्हणजे आपण नेहमी गरीबच राहणार? कधी चांगली नोकरी पण नाही मिळणार आपल्याला? तिच्या बालमनाला या गोष्टीने ढवळून टाकलं होतं. खरंच आपण जगात बऱ्याच विदारक गोष्टी होतांना बघतो. आपल्यालाही तुळतुळ वाटते. तिने तर असं काही पहिल्यांदाच ऐकलं होतं. खरंच आई बरोबर बोलते, दिसतं तसं नसतं. ती स्वतः लाच म्हणाली. ती नाराज होऊन बसली होती.


तानिया व तिची आई दोघी तानियाच्या शाळेत येऊन पोहोचल्या. सर्व पालक व मुलं एका हॉलमध्ये जमा झाले होते. तानिया तिच्या आईबरोबर हॉलमध्ये शिरली. तिला बघताच काही मुलंमुली कुजबुज लागली. ती थोडीशी घाबरली. तिने तिच्या आईचा हात घट्ट पकडला. तिच्या आईने तिला धीर दिला.


"चल तानिया."


ती चालू लागली. त्या दोघी खुर्चीवर येऊन बसल्या. थोडया वेळाने त्यांच्या मॅडम तेथे आल्या. सर्वजण त्यांना 'गुड मॉर्निंग ' म्हणाले. मॅडमनी पण 'गुड मॉर्निंग ' असं उत्तर दिलं. नंतर त्यांनी टॉपर चं नाव अनाउन्स केलं. नेहमीप्रमाणे या वेळेसही रिया शिंदे प्रथम आली होती. तिला एक छोटंसं गिफ्ट व पुष्पगुच्छ देण्यात आलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पहिल्या तीन क्रमांकाच्या विध्यार्थ्यांचं स्वागत झालं नंतर एकेक करून सर्वांना प्रगतीपत्रक देण्यात आलं.


तानियावर नेहमी जे दडपण असायचं ते आता नव्हतं. ती मोकळ्या मनाने रांगेत उभी होती. एकेक करत तानियाचा नंबर आला. तानिया व तिची आई मॅडमसमोर उभ्या राहिल्या.


"62% आलेत यावेळेस. हळूहळू प्रगती होत आहे. मागच्या वेळेस 54% होते ना?"


तिने मान हलवली. तिने आईवर नजर टाकली. त्या पण आनंदी दिसत होत्या. त्यांनी ग्रेड कार्ड घेतलं व त्या दोघी निघाल्या.


अनु तानियाच्या घरी येऊन पोहोचली. अजूनही तिचं मन प्रश्नांनी गच्च भरलेलं होतं. तिला तिची अभ्यासातील विदवत्ता, मेहनत, परिश्रम, क्रमांक, बक्षीस या गोष्टी फोल वाटू लागल्या. डोळ्यांत उदासी होती. का करतात लोक असं? का पैशासाठी कमी हुशार असलेल्यांना नोकरी मिळते? का हुशार असलेल्यांचा हक्क हिरावून घेतला जातो? पैसे इतके महत्वाचे असतात का? हो असतात तर खरं! ती तिच्याच प्रश्नांची उत्तरं स्वतः ला देऊ लागली. पैसे असले तर कायकाय नाही विकत घेता येत? थाट असतो पैसे असलेल्यांचा. जे हवं ते मिळतं. वरून कुणासमोर लाचार होण्याची गरज देखील नसते. खरंच जीवन मस्त असतं ना श्रीमंतांचं. काही समस्या नसते जीवनात. नेहमी सुखच सुख. तानियासारखं. तिच्या जीवनात काय दुःख असणार आहे?


ती विचारांतून बाहेर आली. ती तानियाच्या घरी पोहोचली होती. तिची आई तिच्यासमोर काम करत होती. आईने तिच्याकडे बघून स्मितहास्य केलं. ती देखील हसली.


"आई तानिया कुठे आहे? वरती आहे का?"


"अगं नाही, तानिया घरी नाहीए. ती व तिची आई तिच्या शाळेत गेले आहेत. निकाल आणण्यासाठी येतीलच थोड्या वेळाने."


"बरं. ठीक आहे."


तिने बघितलं आजही तिच्या आईची पाठ दुखत होती. त्यांनी पाठीला हात लावला व डोळे गच्च मिटवून त्या ताठ झाल्या. त्यावरून तिला आईच्या वेदना जाणवल्या. तरीही त्यांचं काम चालूच होतं. ती विचार करू लागली की आईला कधी आराम मिळेल? मी चांगल्या नोकरीला लागल्यावर? पण गरिबांना कुठं नोकरी मिळते? वनवे काकू तर म्हणत होत्या ना!


"काय झालं अनु? चेहरा का लटकवलाय?"


ती विचारांतून बाहेर आली. तिने आईकडे बघितलं.


"काही नाही. असंच."


"तुझा तर पहिला नंबर आला आहे ना? मंग तू तर खुश असायला हवं ना!"


"काय फायदा आहे पहिला नंबर येऊन?"


"अगं असं काय बोलतेय? किती चांगली गोष्ट आहे ही. सांग नक्की काय झालंय तुला?"


"नोकरी तर पैसे आणाऱ्यांनाच मिळते ना! आपल्याकडे कुठे पैसे आहेत?"


त्यांना ती काय म्हणू पहातेय ते समजायला थोडा वेळ लागला. त्या गोंधळल्या होत्या.


"कोण म्हणालं? हुशार असणाऱ्यांना मिळते ना नोकरी बाळा."


"त्या वनवे काकू तर म्हणत होत्या ना!"


आता त्यांना तिच्या मनातील तरंग जाणवले. त्यांनी तिला जवळ घेतलं.


"आई हे जग खूप वाईट आहे ना? असं नाही करायला पाहिजे ना?"


त्या तिच्या डोक्यावर हात फिरवू लागल्या. किती निरागस होती अनु!


"हो बाळा. जग वाईट तर आहे. जगात खूप चुकीच्या गोष्टी घडत असतात. तुला हळूहळू अजून काही गोष्टी कळतील. पण बाळा ज्याप्रमाणे जगात वाईट गोष्टी घडतात त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी देखील घडतात. सर्वच लोक काही वाईट नसतात ना! ईमानदार, कर्तव्यदक्ष, तत्व पाळणारे लोक देखील असतात जगामध्ये. त्यामुळे एका व्यक्तीमुळं सर्वांनाच चुकीचं समजणं योग्य ठरणार नाही ना. एके दिवशी तुला यश नक्कीच मिळेल."


ती डोळे मोठे करून आईचं बोलणं ऐकून घेत होती. आईच्या शब्दांनी तिच्या मनात सकारात्मकता भरली होती. आशा भरली होती. खरंच आशेविना सर्वकाही किती निरस वाटायला लागतं! अनुच्या चेहऱ्यावरचा आनंद परतला होता. जसं सर्वांना चांगलं समजणं मूर्खपणा ठरु शकतो तसंच सगळ्यांना वाईट समजणं देखील जीवनात विनाकारण समस्या आणू शकतं.


तानिया व तिची आई घराकडे निघाले होते. तिची आई आज आनंदी होती. तानियाला पण खूप बरं वाटत होतं. चालतांना त्यांच्या कानांवर काही शब्द पडले.


"तानियाने कॉपी केली होती म्हणे! बाई, आपल्या मुलींना तिच्यापासून दूर ठेवा नाहीतर........"


"हो ना. एकतर तिला अगोदरच कमी गुण येतात. त्यात असं."


तानियाला फार वाईट वाटलं. तिने मान खाली घातली. त्या घोळक्यामध्ये मिसेस शिंदे पण होत्या. तानियाच्या आईने ठरवलं की त्यांना आता सामोरं जावंच लागणार. त्या तानियाला घेऊन त्यांच्या दिशेने चालू लागल्या.


क्रमश 


#मोमेन्ट ऑफ द डे

ती विचार करू लागली की आईला कधी आराम मिळेल? मी चांगल्या नोकरीला लागल्यावर?


©Akash Gadhave 



🎭 Series Post

View all