Aug 18, 2022
General

तिला भेटलेला पुरुष

Read Later
तिला भेटलेला पुरुष

तिला भेटलेला पुरुष

श्रीधर व रमा यांच्या लग्नाला आता वीसेक वर्ष होत आली होती. रमा ग्रुहिणी. श्रीधर एका कंपनीत कामाला होता. त्याच्या प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावामुळे तो यशाच्या पायऱ्या चढत होता. 

लग्नानंतर चारेक वर्षांत त्यांना मुलगी झाली. दोघांच्या नावातली अक्षरं जोडून मेधा नाव ठेवलेलं मुलीचं. मेधाचं बालपणही श्रीला धडसं आठवत नसेल इतका तो त्याच्या कामाच्या व्यापात गुंतला होता. जसजशी प्रमोशन मिळत गेली तसतसं त्याच्या वागण्याबोलण्यात एक अहंपणा दाटून आला होता. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन तो रमाला ओरडायचा. कधी अक्कलशून्य म्हणायचा तर कधी बावळट. रमालाही राग यायचा मग तीही भांडायची पण श्रीधरच्या पुढे तीचा टिकाव लागत नव्हता. 

श्रीधरला वाटायचं तिने त्याच्यासोबत पार्टीजना यावं,आधुनिक वेशभूषा करावी. त्याच्या कलिग्जच्या बायकांसोबत किटी पार्टीत जावं. रमाने श्रीला बरं वाटावं म्हणून तसं वागण्याचा प्रयत्न केला पण काही दिवसांतच तो पार्टीतला दिखावूपणा,भडकपणा तिला आवडेनासा झाला. हाय सोसायटीतल्या बायकांशी तिचे धागेदोरे जुळेनात. 

ती श्रीला त्याच्या सोबत पार्टीला जाण्यास नकार देऊ लागली. श्री दातओठ चावत तिच्याकडे पहायचा. शिकून तुझा उपयोग काय असं म्हणायचा. 

श्रीधर व रमाची लेक मेधा अभ्यासात हुशार होती,चुणचुणीत होती. नेहमी पहिल्या तीन नंबरांत असायची. तिचाही स्वभाव श्रीधरसारखाच होता. घरी श्रीधर व लेकीच्या गप्पा रंगायच्या. रमा बाजुला बसली आहे हे त्यांच्या गावातच नसायचं. मेधा बारावी पास झाल्यावर मेडीकलला गेली. आता घरात दोघंच उरले. 

सततच्या कामाच्या ताणामुळे श्रीधरला उच्च रक्तदाब,मधुमेह या व्याधींनी ग्रासले होते. रमा तीच्या परिने श्रीधरच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवत होती. श्रीधर आता पन्नाशीकडे झुकला होता. कधी त्याची तब्येत नरमगरम असली की रमाचा डोळ्याला डोळा लागत नसे. 

श्रीला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी जर्मनीला पाठवायचं कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने ठरवलं. रमालाही सोबत न्हेणार होता तो पण रमा नाही म्हणाली. मेधा होस्टेलला रहात असली तरी अधनामधना घरी यायची. घर बंद म्हंटल्यावर पोर कुठे जाणार म्हणत रमाने श्रीसोबत जाण्याला नकार दिला पण श्रीची कपडे,बेग्सची सगळी तयारी केली तिने. तिथे खाण्यासाठी काही साठवणीचे घरगुती पदार्थही करुन दिले. श्री गेल्यानंतर मात्र तिच्याकडे वेळच वेळ होता. काही दिवस घर आवरण्यात घालवले. तीही आता चाळीशीच्या पुढची झाली होती. बाजारात गेली की पेरु,चिकू विकणारे तिला सहज आंटी म्हणू लागले होते.

समोरचे शर्मा कुटुंबिय ब्लॉक रिकामा करुन गावी रहाण्यासाठी गेले. बाजुच्या ब्लॉकमधली तर रात्री नऊसाडेनऊपर्यंत यायची कामावरुन. आता रमाला वाटू लागलं,जायला हवं होतं जर्मनीला श्रीसोबत.

 एकटीच टेरेसमधे खालची येजा पहात,पक्ष्यांची किलबिल ऐकत बसली असताना तिला दाराच्या बेलचा आवाज आला. रमाने दार उघडलं. दारात एक पस्तीशीदरम्यानचा तरुण उभा होता. अतिशय रुबाबदार,बिन बाह्याच्या बनियनमधून त्याचे कमावलेले दंड शोभून दिसत होते. तो हसला तेव्हा त्याच्या पांढऱ्याशुभ्र दंतपंक्ती चमकल्या.

'हेलो मिस'

'रमा'

'रमा,अगं मी सकाळी पाणी भरायला विसरलो नि आता बाथरुमला पाणी नाही. केन आय युज युअर बाथरुम प्लीज?'

रमा मनात म्हणाली..अरे वेडाय का हा. पाणी नै तर दोन बादल्या भरुन न्हे की नि कर तुझ्या बाथरुममधे अंघोळ. असा दुसऱ्याचा बाथरुम वापरायचा म्हणजे.. पण हे सगळं तिच्या ओठांतच राहिलं. तिच्या मौनाला होकार समजून तो लगेच त्याचं टॉवेल,कपडे,शाम्पू,साबण घेऊन आला.

रमाने दार उघडंच ठेवलं नि आता आलाच आहे तर कॉफी देऊया म्हणत दूध उकळत ठेवलं. बाथरुमधून गाण्याचा आवाज येत होता. कोणतं ते कळतं नव्हतं. अगदी सळसळता उत्साह,उमेद प्रथमच पहात होती रमा. तिला आठवण झाली तिच्या पहिल्या प्रेमाची अभिजीतची. अभिजीतही असाच होता हसरा,बोलका..जिथे जाईल त्या जागेत चैतन्य आणणारा. आणि त्याचं गाणं. नेहमी कॉलेजमधे एखादं फंक्शन असलं की त्याचं गाणं नि हिचा डान्स ठरलेला. दोघांनी कितीतरी वेळा लेक्चर बंक करुन कँटीनमध्ये गप्पागोष्टी केल्या होत्या. पुढे त्या मैत्रीचं कधी प्रेमात रुपांतरण झालं ते त्यांना कळलंच नाही. कॉलेजमधे तर त्यांना कपलच म्हणायचे. पण अभिजीतशी लग्न होऊ शकलं नाही. अभि तिच्या वडिलांच्या नजरेत डाऊन मार्केट ठरला. आज या मुलाच्या येण्याने तिला अभिजीत भेटल्यासारखं वाटलं. तिने कॉफी मगमधे घेतली आणि ट्रे घेऊन वळली तोच साबणाचा,शँपूचा एक मस्त गंध खोलीत भिनला. नुकताच न्हालेला टाइट लाल टिशर्ट नि व्हाइट शॉर्ट्स घातलेला तो टॉवेलने त्याचे ओलेते केस चोळत होता. 

समोर कॉफी बघताच तो, 'ओ रमा थँक्यू सो मच' म्हणाला. 

त्याच्या लांब तंगड्या,त्याची लांबलचक पावलं..छे! रमाने लक्ष दुसरीकडे करण्यासाठी त्याला नाव विचारलं.

'अरे हो नाव राहिलच सांगायचं. मी जॉन.'

'मग मगाशी तर मराठी गाणं गात होतास!
फार सुरेख गातोस तू.'

'ओ थँक्स. ती माझ्या बाबांची क्रुपा. ते मराठी आहेत. मि. निनाद रोकडे. माझी मॉम ख्रिश्चन आहे. सो मला दोन्ही भाषांतली गाणी येतात. मला इंग्लिश व मराठी दोन्ही भाषा आवडतात. रमा,तू कॉफी फार छान बनवलीस. इट्स सुपर्ब.'

'ओ थँक्यू जॉन. तुझे आईवडील कुठे असतात?'

'ते आता लंडनमधे स्थायिक झालेत पण मला या भारतीय संस्क्रुतीचं आकर्षण सो मी काही महिन्यांसाठी रहायला आलोय इथे. इथलं कल्चर पहायला,अनुभवायला.'

'अरे,बरंच मराठी बोलतोस तू. इथल्या मुलांनाही एवढं जमत नसेल.'

'रमा मला तू इंडियन डिशेस शिकवशील?'

'हो शिकवेन नं,
नक्की शिकवेन.  तुला भावंड?'

'नाही गं मी एकटाच. माझं गाव,आजीआजोबा नाही फक्त आईबाबा तेही सतत भांडत असतात सो वयाच्या अठरा वर्षापासून मी वेगळा राहू लागलो. तू छान दिसतेस,छान बोलतेस रमा. चल बरं येतो मी. तू संध्याकाळी ये माझ्याकडे,मी तुझ्यासाठी पेस्ट्री बनवेन.'

रमा हो म्हणाली. जॉन एखाद्या थंड वाऱ्याच्या झुळुकीसारखा आला नि गेला. खोलीत त्याच्या देहाचा मत्त सुगंध दरवळत राहिला. रमाने तो सुगंध श्वास भरभरून घेतला. इतक्यात श्रीचा फोन आला. त्याला काही पर्सनल डिटेल्स हवे होते. रमाने त्याच्या ड्रॉव्हरमधली डायरी काढली आणि त्याला हवी ती माहिती दिली. श्रीने तिला कशी आहेस,काय खाल्लंस काही विचारलं नाही. काम होताच फोन ठेवला. रमाला मात्र यावेळी त्याचं वाईट वाटलं नाही कारण तिला आनंद गवसला होता जॉनच्या रुपात. 

संध्याकाळी ती जॉनकडे जाणार होती. काय बरं घालू? ती विचारात पडली. तिच्या आवडीचा गुलबक्षी रंगाचा ड्रेस तिने घातला. केस वरती बांधले. हलकासा मेकअप, कानात गुलबक्षी रंगाचे स्टड्स,गळ्यात बारीकसं मंगळसूत्र. तिने स्वतःला आरशात पाहिलं नि चक्क लाजली. जॉनसाठी तिने लिंबाच्या लोणच्याची बरणी घेतली सोबत. तिने बेल वाजवली तसा जॉनने दरवाजा उघडला. तिला अलिंगन दिलं. रमा थोडी संकोचली पण त्याचं अलिंगन इतकं स्वाभाविक, निर्मळ होतं की त्यात कोठेही वासनेचा लवलेश नव्हता. 

जॉनने तिच्यासाठी गाणं म्हंटलं तेही मराठी.. त्याच्या गाण्याने वेडावलं रमाला. जॉनने मग तिच्यासाठी बनवलेला पिझ्झा आणि पेस्ट्री बाहेर आणली. सोबत कोल्ड्रिंकही. पिझ्झ्याच्या एका घासाबरोबर रमाला कळलं कि जॉन उत्तम बल्लवाचार्य आहे. पेस्ट्रीतर अफलातून होती. जॉन तिला प्रेमाने आग्रह करत होता.

 त्याच्या फ्युचर प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देत होता. त्याला इथल्या माणसांचे स्वभाव जाणून घ्यायचे होते. त्यासाठी तो बसने,रेल्वेने प्रवास करणार होता. रमाने त्याला लोणच्याची बरणी दिली. जॉनचे डोळे लकाकले. तो म्हणाला,'रमा,विकत सगळं मिळतं गं पण असं कोणी प्रेमाने देतं ना ते प्रेशिअस असतं.'

 रमा त्याचा निरोप घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी तो बसने प्रवास करणार होता दादरपर्यंत. रमा त्याला कंपनी द्यायला तयार झाली. तिने लिंबूकलरचा टॉप व जीन्स घातली होती. मेचिंग नेकलेस,ब्रेसलेट,इयररिंग्स सगळंच. कुरळे केस मोकळेच सोडले होते. जॉनने तिला पाहिल्याबरोबर तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं.

 बीएसटीच्या बसमधे जॉन तिच्या बाजुला बसला होता. एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिला असंख्य प्रश्न विचारत होता. रमाही त्याच्या प्रत्येक प्रश्नाला तितक्याच आतुरतेने उत्तर देत होती. रमाने त्याला सिद्धीविनायक मंदिरात न्हेलं. दादरचं फुल मार्केट,भाजी मार्केट दाखवलं. जॉन तिथल्या विक्रेत्यांशी बोलत होता. त्यांच्या व्यवसायाची चौकशी करत होता,त्यांचे फोटो काढून घेत होता. दोघांनी मिळून जेवण केलं,बर्फाचे गोळे खाल्ले. चोपाटीवर सुर्यास्त बघितला नि मग जेवुनच घरी आले.

 रमाच्या मोबाईलवर लेकीचे मिस्ड कॉल आले होते. रमाने तिला फोन केला तर ती सुट्टीत मैत्रिणीच्या घरी रहायला जातेय म्हणाली. कशी आहेस,काय करतेस आई..कसलीही चौकशी नाही पण रमाला आता वाईट वाटत नव्हतं. जॉनने तिला स्वतःवर नव्याने प्रेम करायला शिकवलं होतं. जॉन आपल्या घरात गेला. ती तिच्या.

 आठवडाभरात रमाने त्याला जवळपासची सगळी ठिकाणं दाखवली. अगदी धारावीतल्या झोपडपट्टीतही घेऊन गेली ती त्याला. रमाला जॉनमधला माणूस आवडला. माणूस.. स्वत:बरोबर इतरांना समजून घेणारा,सामाजिक भान असलेला,दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणारा,त्यांना मान देणारा. जॉनला रमाने बरेच मराठी पदार्थ शिकवले. उकडीचे मोदक, बाकरवडी,मिसळ,डोसे,उत्तपा,सुधारस,पन्हं..असे बरेच. जॉननेही सगळ्या पाकक्रुती नोट डाऊन करुन घेतल्या. पुरणपोळी नि कटाची आमटी तर त्याला विशेष आवडली. जॉनच्या सहवासात महिना कधी गेला रमाला कळलच नाही.

जॉनच्या वडिलांचा कॉल आला होता. त्याची मम्मा त्यांना सोडून दुसऱ्यासोबत रहायला गेली होती. जॉनचे वडील खूप डिस्टर्ब होते. 

जॉन दुसऱ्या दिवशी निघणार होता. त्या रात्री रमाने त्याला जेवायला बोलावलं. जॉन थोडंच जेवला. तोही भावूक झाला होता. रमा जॉनमधे तिला कधीही न मिळालेला असा पुरुष शोधत होती जो तिच्या स्त्रीत्वाचा आदर करत होता. 

 जॉनने हात धुतले व सोफ्यावर येऊन बसला. रमा त्याच्या  बाजुला बसली. तिने त्याच्या हाताच्या बोटांत तिची बोटं गुंफली नि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. कितीतरी वेळ ती त्याच्या ओठांचं चुंबन घेत होती. दोन शरीरं एकमेकांना बिलगली,वस्त्रांची अडसरं दूर झाली.

 रमेने जॉनमधला पुरुष अंगोपांगी शोषून घेतला. रात्रभर जॉन तिच्या मोरपिसी देहावरून त्याचे ओठ,हात फिरवत होता. तिचे उरोज कुरवाळत होता. रमाला सुखाचं अंतिम टोक मिळालं होतं. पुढे काय होईल,आपण करतोय ते सामाजिक द्रुष्ट्या योग्य कि अयोग्य हे कसलेही प्रश्न तिच्या डोक्यात नव्हते.

 कितीतरी वर्ष कोंडून ठेवलेल्या इच्छा ती जॉनकडून पुर्ण करुन घेत होती. असं नव्हतं की श्री याबाबत उदासीन होता पण त्याचं तंत्र वेगळं होतं. त्याला हवं ते मिळालं कि तो घोरत पडायचा. पाचेक मिनिटांत त्याचा खेळ उरकायचा नि रमा मग एकटीच स्वतःच्या देहाला थंड करत रहायची. जॉनचं तसं नव्हतं. त्याचं सगळं वेगळंच होतं गुलाबी गुलाबी तिला हवं तसं. तिच्या मनातल्या इच्छा तो तिच्या मौनातूनही जाणून घेत होता. तिला खुलवत होता,गंधाळत होता. 

सकाळी जॉनने रमाचा निरोप घेतला. रमाने त्याला फोन नंबर दिला नाही. काल जे झालं ते तेवढ्यापुरतच ठेवुया जॉन,हेच आपल्या दोघांसाठी भल्याचं आहे असं म्हणाली. जॉनने तिला अलिंगन दिलं. त्या अलिंगनात खात्री होती,विश्वास होता एकमेकांवरचा.

दुसऱ्या दिवशी रमाची लेक घरी आली. आईला इतक्या खुललेल्या रुपात पाहून तिला साहजिकच आश्चर्य वाटलं. ती म्हणाली,"यु नो मम्मा,तू खूप क्युट दिसतैस. एक ग्लो आलाय तुझ्यावर. अशीच हसत रहा नेहमी." रमा मंद हसली. 

काही महिन्यांत श्रीही घरी परतला. तोही रमाचं हे नवं बदललेलं निडर रुप पाहून आश्चर्यचकित झाला. रमा आता स्वत:साठी जगू लागली होती. जॉनने तिच्या देहात अत्तराची कुपी सांडली होती जी ती कणकण वापरत होती. 

तिचं हे नवं रुप पाहून श्रीलाही ती हवीहवीशी वाटू लागली. कितीतरी महिन्यांनी त्यांचा प्रणय रंगला होता. श्री खूप खूप खुश होता. पहाटे त्याला जाग आली तशी त्याने रमाला आपल्या कवेत घेतलं. अर्धवट झोपेत त्याच्या छातीवरच्या कुरळ्या केसांत बोटं फिरवत ती जॉनचं नाव घेत होती. रमाच्या मुखातून जॉनचं नाव ऐकताच श्री नखशिखांत हादरला. पहाटेच्या गारव्यातही त्याला घाम फुटला. 

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now