पुरुषासारखा पुरुष असून . . . ( भाग -२)

struggle of a young boy.


(पुरुषवादी कथामालिका स्पर्धा )

कथेचे शीर्षक - पुरूषासारखा पुरूष असून. . . !

लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी

(भाग -२)
कथा पुढे -

दिलीपने त्याला थोडा वेळ दिला.

त्याला चहा करून दिला व मग वाट पाहिली.

शोभित थोडा सामान्य झाला.

मग दिलीपने विचारलं, "बरा आहेस ना? तुला सांगावं वाटलं तर सांग नाहीतर ठीक आहे, भांडण कुठल्या नवरा बायकोत होत नाही. फक्त आम्ही बॅचलर ठरलो त्यामुळे तुला काही सल्ला देवू शकत नाही एवढंच!"

"दिल्या तुला माहिती नाही मी काय मनःस्थितीमधे इथे आलो होतो. पूर्ण बरबाद झाल्यागत पण हा एक तास मला मला खूप मानसिक शांति मिळाली यार! तू नसतास आज घरी तर मी तर जीवच दिला असता आज!"

शोभितचं हे बोलणं ऐकून दिलीपने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला व म्हणला, "फाल्तु बकबक नाय पायजे शोभ्या! दोस्त आहोत आपण ते काय फक्त पार्ट्या करायला का? तू सांग यार , तुझ्यासाठी कायपण! तू फक्त हे मरायचं वगैरे बोलू नको. किती हुशार आहेस यार मेरीट स्टुडंट आदर्श विद्यार्थी वगैरे. . . नेहमीच टॉपर. . . !"

"पण बघ ना आयुष्याचं काय होवून बसलंय?"

" अरे काय झालंय ? सगळं तर हेवा वाटण्यासारखंच आहे . मजेत रहा, शांत रहा. हे बायकांचे मूड सांभाळणं फार अवघड असतं असं म्हणतात बाबा लोकं. बरं काय झालं भांडलास का शर्वरी बरोबर ?"

"मी कशाला भांडेन तिच्याशी? मी तर तिचे लाड करतो आहे. म्हणेल तसं वागतोय , तिच्या तालावर नाचतोय . . . पण तरीही इतका राग काय यार?"

"राग कशाचा पण?"

"कशाचा काय? कशाचाही राग ! मुळात मीच तिला आवडत नाही असं वाटतंय , पण असं किती दिवस चालणार होतं. रात्रीपासून हाच प्रकार , आज ती बॅग घेवून निघून गेली. म्हटलं आईकडे का? तर म्हणते , मी कुठेही जाईन तुमचा काय संबंध?"

"अरे असं काय बोलते ती? पण कशामुळे राग ? तू तर नात्यात आहेस ना तिच्या ? मग काय प्रॉब्लेम !" दिलीपला हे मनातून खूप अवघड वाटत होतं .

"नातं ? कशाचं नातं अन काय? हे देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालेलं नातंच ती निभावत नाहीये तर अगोदरचं नातं काय ?"

"ओह माय गॉड. . म्हणजे काय शोभित? अरे कधीच बोलला नाहीस काही ? सहा महीने झालेत लग्नाला . . . आम्ही तर सगळं परफेक्ट चाललंय असं समजत होतो. म्हणजे चाललंय ना ?"
शोभित कुत्सित हसला मग स्वतः वरच दयेने हसला. दिलीप किती जवळचा असला तरीही त्याला सगळी व्यथा काय सांगणार? मित्र खूप आहेत पण हे प्रकरण कुणाला व कसं सांगणार? ते किती समजून घेतील ? शिवाय ते काय करतील? उलट टोमणे मारू शकतील. या विचारांनी तो विचारच करत होता.

"इतके दिवस का बोलला नाहीस? "

हाच प्रश्न सकाळी आईने विचारला होता पण त्यावेळी काय बोलणार होता.

सगळ्यांसारखी लग्न व बायकोची सुंदर स्वप्न तर त्यानेही रंगवली होती.
पण नवीन नवीन लग्नाचे दिवस कसे असतात ते त्याला तरी कुठं माहीत होतं . जे त्याच्यासोबत होत होतं ते सगळ्यांसोबतच होत असावं असं त्याला वाटलं.

त्याची काय चूक होती ? तो दिसायला अगदी सर्वसामान्य होता ही चूक की बायकौ शर्वरी सुंदर होती ही त्याची चूक!

पण त्या निरागस व सुंदर चेहर्‍याव्या मुलीच्या वागण्यात इतका निष्ठूरपणा किंवा विक्षिप्त पणा असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं .

ही मनमानी व उद्धटपणा होता जो पूर्वी कधीच दिसला नव्हता.

काय काय सांगावं ? कळतच नव्हतं , तो खूप विचलित झाला होता. डोकं जणु बंद पडलं होतं.
यातूनही रस्ता काय निघेल? बिलकुल कल्पना नव्हती. आयुष्याची दिशाच बदलून गेली होती.

क्रमशः


लेखिका ©® स्वाती बालूरकर , सखी


दिनांक  ११.११ .२२



🎭 Series Post

View all