Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

सांता ला पत्र

Read Later
सांता ला पत्र


प्रिय सांता,

आज पहिल्यांदाच तुला पत्र लिहिते आहे. हे पत्र लिहिताना माझ्या मनात खूप कुतूहल तर आहेच, पण एखाद्या लहान मुलाप्रमाणे अनेक प्रश्नही आहेत. म्हणजे बघ ना! तू एवढ्या लांब उत्तर ध्रुवावर राहतोस. तिथे म्हणे वर्षभर फक्त आणि फक्त बर्फ आणि थंडीच असते, मग एवढ्या थंडी तू दिवसभर काय करतोस? तू लहान असताना शाळेत जायचास का रे? तुलाही मित्र असतीलच ना! तुझे ते मित्र आता काय करतात? लहानपणी तुला पण गृहपाठ, पाठांतर, बे चे पाढे त्यांचा कंटाळा यायचा का रे? तुझी पण आई तुझ्या मागे अभ्यासासाठी तगादा लावायची का? जर तू लहान होता, तर मग नाताळच्या आदल्या रात्री तू ख्रिसमस ट्री खाली जे गिफ्ट ठेवतोस ना! ते तुझ्या ख्रिसमस ट्री खाली कोण ठेवत होते? गेली कित्येक वर्षे तू ती आनंदाची पोतडी घेऊन येतोस. तुला दरवर्षी यायचा कंटाळा नाही येत का रे, आणि ती पोतडी धरून धरून तू थकला नाहीस का रे?

सांता तू जर इतका मोठा म्हणजे वयोवृद्ध झालास तर तुझ्या या सर्व प्रवासात तू पृथ्वीवरचे सगळेच देश, प्रांत, शहर  बघितली असशीलच ना? सगळे छोट्यांना छान, छान खेळणी, पुस्तक, मिठाया आणि काय, काय दिल असशील! पण मग जी मुलं अनाथ, बेघर, गरीब, युद्धजन्य स्थितीत असतात त्यांच्यापर्यंत पण तू जातच असशील ना! तुला बघून त्यांना किती आनंद होत असेल हो ना?

तुला एक सांगू सांता, मी लहान असताना आमच्या शेजारी एक आंटी राहायच्या. त्या पण ख्रिस्ती होत्या. नाताळच्या सणाला घरावर रोषनाई, आकाश दिवा, फराळाचे विविध पदार्थ, केक, भगवान येशूच्या जन्माच्या वेळेचा देखावा, म्हणजे तो गाईंचा गोठा, मदर मेरी आणि इतर सगळे लोक असे सगळं त्या छान, छान सजवायच्या. म्हणजे लहानपणी जसा आम्ही किल्ला बनवायचो, मग त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्यांचे ते मावळे अगदी तसंच. त्यावेळी आंटिंकडचा तो देखावा बघून मला वाटायचं, \"मला पण सांतान एखादं खेळणं किंवा काही छान छान उपहार दिला तर?\"

मोठे झाल्यावर मग कळलं की, सांताच्या पाठीवरच्या झोळीत असतो आनंद, प्रेम, ममता, समता, उत्साह, चैतन्य, बाळ येशूसाठी देवाने पाठवलेला एक देवदूत म्हणजे तू सांता. मग पृथ्वीवर जी हजारो मुलं जन्म घेतात त्यांच्यासाठी पण देवाने देवदूत म्हणून आई-वडिलांना पाठवले असेल हो ना?

सांता आता यावर्षी पण तू घरोघरी गेला असशील, सगळ्या बाळ गोपाळांना खेळणी वाटली असशील, त्याचवेळी ख्रिसमसच्या झाडाखालच एप्पल पाय पण खाल्लं असशील, तेव्हा माझे छोटेसे काम करशील का तू? त्या लहानग्यांना खेळणी देताना, त्यांच्या आई-वडिलांना एक निरोप देशील? श्रीमंत लोकांना- गरीब, अनाथ, बेघर मुलांना, राष्ट्राच्या नव्हे संपूर्ण मानव जातीचे भविष्य असलेल्या या छोट्यांना जपण्याचा आग्रह करशील?

देशा देशांमध्ये जी युध्दये होत आहेत, त्यांना भगवान येशूचा शांततेचा, अहिंसेचा, प्रेमाचा विश्वबंधुत्वाचा, संदेश देशील? स्वार्थी आप्पलपोटे, धूर्त राजकारण्यांना सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा आग्रह करशील? मोठे, मोठे उद्योजक, कारखानदार यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी, कामगारांसाठी काही मूलभूत सुख सुविधा देण्याचा सुजाणपणा देशील?

सरकारी कर्मचारी, सरकारची धोरण आणि सरकार यांना शेतकऱ्यांसाठी भरीव काम करण्याचे, जगाच्या पोशिंद्यासाठी अधिक विकसित, उदार आणि प्रगत कल्याणकारी निर्णय घेऊन, त्याची अंमलबजावणी करण्याचा सुज्ञपणा देशील?

संता मला माहिती आहे, एवढी वर्षे तू वर्षभर लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीची खेळणी बनवतो. तुझ्या रेंडीयरच्या बर्फाच्या गाडीवरून हजार किलोमीटरचा प्रवास करतोस. थकून जात असशील ना रे तू? पण यावेळी मात्र एवढं नक्की कर, घरातल्या गृहिणीला, आईला अखंडपणे, अविश्रांत झटणाऱ्या माऊलीला, घरच्यांकडून चार शब्द प्रेमाचे आणि वागण्यातला आदर मिळेल अशी काहीतरी तजवीज नक्की कर!

बाकी आणखी काय लिहू? तुझा आमच्यावर लोभ आहेच, तो उत्तरोत्तर वाढत जावा आणि पाश्चात्त्यांच्या संस्कृतीचे अनुकरण करता करता आम्हा भारतीयांना स्वतःच्या संस्कृतीचा ही अभिमान वाटावा. या आशेसह पत्र संपवते.


तुझीच

उद्याच्या, अधिक चांगल्या जगाची कामना करणारी एक सर्व सामान्य स्त्री.©® राखी भावसार भांडेकर.


फोटो साभार गूगल.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//