प्रति,
कविता,
काव्यसंग्रह ,
काव्यनगर.
विषय: विस्मृतीत गेलेल्या सखीच्या (कवितेच्या) पुनर्भेटीबाबत
प्रिय कविता,
सप्रेम नमस्कार.
आज पत्र लिहिण्यास कारण हे की आज प्रथमच मला उमगलाय तुझ्या नावाचा (शब्दाचा )अर्थ! कविता म्हणजे कणखर विचारांनी समर्थपणे पेललेले मानवी जीवनातील तारतम्य! तुझ्या द्वारे प्रत्येक कवीला आपल्या प्रतिभेची मेजवानी इतरांना द्यावयास मिळते. तुझ्या द्वारे त्यांना आपली एखाद्या विषयावरील अभिव्यक्ती सादर करता येते. आपले प्रगट विचार दर्शवता येतात व त्याद्वारे समाजप्रबोधन करता येते. तुझ्यामुळे आपली बौद्धिक कौशल्ये पणाला लावून जीवनाला योग्य दिशा व वाटचाल मिळून आयुष्याच्या गणिताचे कोडे, तारतम्य व कौशल्य बाळगून उकलण्यास मदत होते. आपल्यातला स्वाभिमान जागा होऊन कणखर व बाणेदारपणा अंगी येतो. मी फक्त तुझा उदो उदो किंवा स्तुती करायची म्हणून हे सांगत नाही तर मी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.
खरंतर तू माझी महाविद्यालयीन मैत्रीण.काळाच्या ओघात आपल्या भेटीगाठी लुप्त झाल्या, पण आता पुनश्च तुझ्या संगतीने आयुष्य भरभरून अनुभवायचे आहे . तुझ्या द्वारे मला कणाकणाने प्रगट होण्याची संधी मिळते याहून सुदैव ते काय? तू मला शब्दांच्या कुंचल्यांनी आयुष्य रंगवण्यास शिकवले. माझ्यातल्या प्रतिभेची मलाच नव्याने जाणीव करून दिलीस. अशा माझ्या प्रिय सखीच्या भेटीसाठी मन आतुरलेय गं! म्हणून हा सर्व खटाटोप!
आणि हो तू मला स्वार्थी , अहंकारी समजू नकोस. कारण तुझ्याशी माझे नाते ज्याप्रमाणे बाळाचे आपल्या आईच्या नाळेशी असते त्याप्रमाणे आहे. तू माझी सखी सोबती आधीही होतीस, आताही आहेस व सदैव राहशील .शब्दसुमनांनी प्रत्येकाचे जीवन आनंदी, अर्थपूर्ण करण्याचा वसा तू मला दिलास. निसर्गातल्या विविध गोष्टींचे ,पैलूंचे वर्णनात्मक गुणगान गाण्यास शिकवले ;म्हणून मी तुला कधीही अंतर देणार नाही. तू दिलेल्या सदगुणांची शिदोरी माझ्या कायम स्मरणात राहील .त्याबद्दल मी तुझी मनापासून ऋणी आहे!
कळावे,
तुझीच मुक्त सखी,
प्रियंका
प्रेषक
सौ प्रियंका कुणाल शिंदे
साहित्य सदन,
कवयित्री कट्ट्याजवळ,
पत्रलेखन नगर
वाचकहो ,प्रत्येक भाषेतल्या साहित्यामध्ये कविता ही साहित्याची अलंकारिकता वाढवते. म्हणूनच मी माझ्या प्रिय कवितेस हे एक काल्पनिक पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आवडले असेल तर नक्की कळवा.
धन्यवाद..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
फोटो : साभार गूगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा