पत्ररूपी भेट नवऱ्यासाठी

First time a letter to husband.

        पत्ररुपी भेट

खरे तर नवरा - बायकोच्या नात्याविषयी लिहिण्यासारखे खूप काही आहे.त्यातील थोडेसे लिहिण्याचा प्रयत्न...

प्रिय नवरोबा,

         खरे तर तुला पत्र लिहायची माझी पहिलीच वेळ.तुला पत्र लिहिण्याची वेळ कधी आलीच नाही. आज ती इच्छा मी पूर्ण करणार आहे.आपल लग्न ठरवून झालेलं.त्यामुळे, प्रेमविवाह झालेल्या जोडप्या प्रमाणे आपण जास्ती भेटलो नाही की हातात हात घालून फिरलो नाही.आपली खरी ओळख झाली ती आपल्या लग्ना नंतरच.
         खरे तर साखरपुडा झाल्यानंतर मी तुला विचारले होते की तुला अरे - तुरे करू की अहो - जाहो करू. त्यावेळी तू म्हणाला होतास आपण एकत्र कुटुंबात राहतो अहोच म्हण. झालं त्याच वेळी कळाल की आता काही आपले खरे नाही.पण तू प्रत्येक वेळी मला साथ दिलीस.मी नोकरी करत असताना पाठिंबा दिलास.मला आठवतंय आपल्या पहिल्या बाळाची चाहूल लागल्यावर तू कित्ती खुश झाला होतास.तेव्हा माझी हर प्रकारे तू काळजी घेतली होतीस.कित्येत वेळा माझे पायही चेपून दिले होतेस.आपल पाहिलं बाळ जन्माला आल्या नंतर तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेले मी पाहिले होते.तसेच आपल्या दुसऱ्या पिल्लूच्या वेळीही तू खूप भावूक झाला होतास.
         कधी आपल्या संसाराला अकरा वर्षे पूर्ण झाली हे कळलेच नाही.या अकरा वर्षात आपल्यात अनेक वेळा वाद झाले,वाद म्हणण्यापेक्षा भांडण झाले.पण प्रत्येक वेळी आपला अबोला कसा संपला ते आपल्यालाही कळायचे नाही.इतके आपण एकमेकांचच्यात गुंतत गेलो.जेव्हा कधी मी माहेरी जायचे किंवा गावाला जायचे तेव्हा तुला वाटायचे ही आता काही दिवस आपल्याला विसरणार.पण तुला काय सांगू तुझ्या पासून लांब असतानाही एकही क्षण तुझ्या पासून लांब नसायचे.प्रत्येक वेळी तू नाश्ता केला असशील का? तू ऑफिसला पोहोचला असशील का? घरी आला असशील का?असे तुझेच विचार डोक्यात येत राहायचे.
         खरे तर आपल्या आवडी - निवडी खूप वेगळ्या आहेत.त्यामुळे आपले विचारही कधी कधी जुळत नाहीत.बरेच वेळा मला असं तुला म्हणावसं वाटत.....
         सांग कधी कळणार तुला
         भाव माझ्या मनातला.....
         कारण प्रत्येक वेळी भावना बोलूनही दाखवता येत नसतात.तर कधी - कधी माझ्या भावना डोळ्यातून ओघळतात...
         पण तरीही मला तू हवा आहेस.माझ्या पिल्लांचा बाबा म्हणून,माझा नवरा,मित्र,प्रियकर म्हणून.आयुष्याचा जोडीदार म्हणून.
         तूच माझा मोहन
           तूच माझा राम
          आजन्म आपली साथ 
             मागते ईश्वरा आज......
          खरे तर लिहिण्यासाठी खूप काही आहे.भरभरून लिहावस वाटतही आहे.पण सध्या एवढेच पुरे उगाच प्रेमाचा ओव्हर डोस व्हायला नको, नाही का....
            
   तुझीच,   
       प्रिती