धडा... सामाजिक स्पर्धात्मक लघुकथा

अनघा ताई म्हणाल्या, इथेच तर चुकतो आपण, एकदा माफ करत करत कितीदा माफ करतो, आणि समोरचा त्याचा फायदा घेतो, त्याची हिम्मत वाढतं जाते. पहिली चूक झाली की तिथेच विरोध करायचा, लगेच इलाज करायचा म्हणजे पुन्हा हिंमतच होत नाही असं काही करायची.

दीपा... अगं किती उशीर केलास यायल? तुला माहितीये ना की मला वेळेत पोहोचाव लागतं ऑफिसला. रोज रोज असं नाही ग चालणारं. सकाळी मुलांची पण शाळेची तयारी करायची असते मला. त्यात तू असा उशीर केलास की माझी तारांबळ उडते बघ.

आरती किचन मध्ये टिफीन पॅक करत बोलतं असते. हे बघ मी माझा आणि शेखरचा डब्बा बनवला आहे, तू बकीच्यांच जेवणाच बघून घे, आणि उद्यापासून वेळेवर ये, असं म्हणत आरती ने दीपा कडे बघितलं.

काय ग काय झालं अशी तोंडावर पदर घेऊन काय उभी आहेस? तितक्यात आरतीची सासु म्हणजे अनघा ताई बाहेर आल्या. त्यांना सगळे ताईच म्हणतं. त्या सुध्दा दीपा कडे बघत होत्या. दीपा काहीच बोलली नाही, पण आरती आणि अनघा ताई यांना काहीतरी विचित्र वाटलं. त्यानी तिला परत विचारले. तेव्हा तिने तोंडावरून पदर बाजूला केला.

दीपाचा चेहेरा पूर्ण सुजलेला होता, डाव्या डोळ्यावर चांगलाच मार लागून काळा निळा पडला होता. हातावर पण चटक्यांचे व्रण होते. ते बघून दोघी सासुसूना घाबरल्याच. त्यानी दीपाला खुर्चीत बसवलं, तिला पाणी आणि चहा दिला. कसा घडलं हे अस विचारलं.

दीपा आधी सांगायलाच तयार नव्हती पण अनघा ताईंनी तिला बोलायला भाग पाडलं.

ताई साहेब काल माझ्या नवऱ्यानं लाई मारलं मला. त्याला दारू आणि सट्या साठी पैसे हवे होते, जे म्ह्या नाय दिले. म्हणून मारुंनमारून ही हलत केली. पोरीला बी मारली. लेकरू लई रडत व्हतं बघा.

अगं पण तुझा नवरा तर असा नव्हता ना ? आरती विचारू लागली

व्हय असा नव्हता त्यो, पण कारखाना बंद पडला, नोकरी गेली, अन् नवीन काम बी मिळणा, त्यामुळं असा वाईट वळणाला लागला. म्या खूप समजावलं त्याला पण काही सुधारायला तयार न्हाई. सकाळी म्हणतो आज पिणार न्हाय अन् संध्याकाळी पिऊन येतो. काल अजून प्यायची होती, पैसे संपले म्हणून घरी मागायला आला, म्या न्हाय दिले तर मारलं, पोरगी मध्ये आली तर तिला बी मारलं.

बिचारी दीपा रडत होती.

आरती ने ऑफिसला येणार नसल्याचे कळवले. दीपाला घेऊन हॉस्पिटलला गेली . तिची मलमपट्टी करून औषध घेऊन घरी परत आली. अनघा ताईंनी स्वयंपाक करून ठेवला होता. जेऊन आराम कर असा दीपाला बजावून सांगितले. कामाचा आम्ही बघतो.

त्यानंतर अनघा ताई दीपाच्या घरी गेल्या, घरात तिचा नवरा नशेत धुत पडलेला होता. मुलगी बिचारी एका कोपऱ्यात बसलेली होती.

त्याच्या कमरेत एक जोरात लाथ पडली आणि तो पलंगावरून खाली पडला. तसं तो शुध्दीवर आला. समोर अनघा ताई पोलिसांन सोबत उभ्या होत्या. त्यानी त्याला फरफटत पोलिस स्टेशनला नेले. त्याच्यावर गुन्हा नोंदवला. मुलीला त्यांच्या घरी आरती कडे पाठऊन दिले.

पोलिसांचे ४-५ दांडे पडल्यावर तिचा नवरा गयावाया करू लागला. परत असा नाही वागणार आता सोडा अशी विनवणी सुरू झाली.

पोलिसांनी त्याच्याकडून तसं लिहून घेतलं, आणि अनघा ताईंच्या सांगण्यावरून त्याची सुटका केली, पण अनघा ताई इतक्यावरच थांबल्या नाहीत. त्यानी त्याला नोकरी दिली, आणि नीट सुधारतं नाही तोपर्यंत बायको दीपा आणि मुलगी आमच्याकडेच राहतील असं बजावलं. तुझ्यावर माझी नजर आहे लक्षात ठेव असा कडकं शब्दात सांगितले.

घरी आल्यावर अनघा ताईंनी दीपाला सगळे संगितले, त्यावर दीपा म्हणाली... ताई पहिल्यांदाच असं वागला तो, तुम्ही असं कराल म्हणूनच मी सांगत नव्ह्ते काही, मला ठाव हाय की तुम्ही मोठ्या समाज सेविका आहात, स्त्री शक्ती करण का काय म्हणतात ते करता तुम्ही. आजही तुमच्या शब्दाला मान हाय. एकदा माफ करायचं व्हतं त्याला.

अनघा ताई म्हणाल्या, इथेच तर चुकतो आपण, एकदा माफ करत करत कितीदा माफ करतो, आणि समोरचा त्याचा फायदा घेतो, त्याची हिम्मत वाढतं जाते. पहिली चूक झाली की तिथेच विरोध करायचा, लगेच इलाज करायचा म्हणजे पुन्हा हिंमतच होत नाही असं काही करायची. काल त्यानी मारलं उद्या जीव घेईल .. असं करत तुझ आयुष्य उद्ध्वस्त होईल, त्यापेक्षा आत्ताच खंबीर रहायचं. त्याला चांगला धडा शिकवला आहे मी, आता परत असं वागणार नाही, आणि वागलाच तर लगेच सांग. एक लक्षात ठेव अन्याय करणारा जसा दोषी असतो तसाच तो सहन करणारा त्याहून अधिक दोषी असतो.


त्यानंतर दिपाचा नवरा सुधारला तो कायमचा...



धन्यवाद..