मायबाई (भाग 4)
वेगानं पसरत चाललेल्या अफवांमुळे लोकांचं शोभाबद्दल कुतूहल जागृत झालं होतं. शोभाच्या शरीरात मात्र तारुण्यसुलभ बदल दिसू लागले होते. हल्ली ती रात्र रात्र जागीच असते.. स्वतःशीच हसते.. स्वतःशीच बोलते.. अन् शेतात काम करणाऱ्या अर्धउघड्या गड्यांकडे आसुसलेल्या नजरेनं बघते हे उषाच्या नजरेतून तर काय पण तिच्या नवऱ्याच्या नजरेतून देखील सुटलं नव्हतं. आता नमीदेखील वयात येऊ घातली होती.
एक दिवस शेतातला भीमागडी कुणाची नजर नाही हे बघून सरळ शोभाला भेटायला तिच्या घरात शिरला. त्याची उघडी छाती बघून शोभा हरखली. तो शोभाशी चाळे करू लागला. ते शोभाला आवडू लागलं. त्यांच्या हालचालींमुळे का काय.. पण भितीवरची कुऱ्हाड सरळ भीमाच्या खांद्यावर पडली.. पाटाप्रमाणे रक्त वाहू लागलं. लोक धावून येतील म्हणून भीमा किंचाळू देखील शकला नाही. पकडलं जायला नको म्हणून एका हातानं जखमी खांदा दाबत त्यानं बाहेर पळ काढला. शोभा मात्र घाबरून मोठमोठ्याने ओरडू लागली.
लोक जमा झाले.. शोभा हातवारे करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागली.
"भीमाने शोभावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.. शोभाच्या रक्षणार्थ भिंतीवरची कुऱ्हाड आपोआप त्याच्या खांद्यावर येऊन पडली. "
"शोभाच्या अंगात दैवी शक्ती आहे.. "
"सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू तिच्या आज्ञेत आहेत आणि तिचं रक्षण करायला समर्थ आहेत."
गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शोभाच्या दैवत्वाबद्दल चर्चा सुरू झाली.
हल्ली शोभा रात्री जागीच असते.. मोठमोठ्याने अगम्य भाषेत कुणाशी तरी वाद घालत असते ही बातमी देखील कर्णोपकर्णी प्रसिद्ध झाली.
"शोभाचं लगीन करायला हवं!" उषाच्या नवऱ्यानं एक दिवस विषय काढला.
"ही अशी अर्धवट मुलगी कुणाच्या गळ्यात बांधणार आपण! कोण सांभाळणार तिला जन्मभर! वासनांधांच्या वासनेला बळी पडून नको ते घडलं तर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल." उषाने समजूतदारपणे दुसरी बाजू मांडली.
"अशा मुलींची एखादी संस्था असेल तर तिथे शोभाला पाठवू या आपण!' उषानं मनात विचार केला. तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र वेगळंच काही शिजू लागलं. त्यांनी लागलीच शोभाच्या भावाला, रमेशला बोलावणं धाडलं.
हल्ली शोभाचं काहीतरी वेगळं चाललंय.. तिच्या बद्दल बऱ्याच गोष्टी कानावर येत आहेत .. ती कुणी सामान्य मुलगी नसून देवीचा अवतार आहे अशा गोष्टी रमेशच्या कानावर पडल्याच होत्या. त्यानं सरळ वडिलांचा हात धरत उषाचं गाव गाठलं.
रात्री जेवणं झाल्यावर उषा, नमी आणि शोभा ह्यांनी घरात अंथरूणं घातली तर तिघं पुरूष बाहेर खाटांवर आडवे झाले. उषाच्या नवऱ्यानं विषयाला हात घातला.
"शोभाबद्दल गावातील लोक काय म्हणतात हे ठावं असंल तुम्हाला!" त्यानं रमेशला अन् त्याच्या वडिलांना उद्देशून विचारलं.
"व्हय.. तसं कानावर आलंय आमच्या!" वडिलांनी मान डोलावली. "पर ती अर्धवट पोर हाय. ती पाच सात वरसांची आसताना शहरातील डॉक्टरले दाखवलं व्हतं. अशा मुलांची येगळी शाळा असती म्हनं.. तिथं तिला ठेवा म्हणत होते. औषधगिवशध घ्यावं लागतं म्हणे.. आपल्या जवळ कुठला पैका तेव्हढा! त्या मायबाईची मर्जी म्हणलं अन् पोरीला गावी घिउन आलो." पांडूनं जुनी गोष्ट आठवून सांगितली.
"मामाजी, आता तुमचं बी वय झालंया! आमाला बी आमचा संसार हाय. भैनीच्या जबाबदारीपायी लग्नाला सहा वरस झाले तरी उषानं पोरबाळ होऊ दिलं नाही. माही आई बी नातासाठी तरसतीया!" आमी इथं शेतावर राह्यला आलोय तर आई तिकडं एकली राह्यते.. तिचं बी म्हातारपण हाय की आमाला!" जावयानं स्वतःची बाजू मांडली.
"माजं बी लगीन ठरंना झालंय!" रमेशनं उसासा सोडला. "एक पोरगी लग्नाला व्हय म्हणतीय.. पर तुमची भैन सांभाळणार नाही असं सांगितलंय. आता मला लग्न करायला पायजेल.. किती दिवस घरात भाकरी बडवू मी!"
"जावई, तुमच्या मनात काय हाय ते सपष्ट सांगा. माझी ल्येक मला जड न्हाई. मायबाईचा परसाद हाय ती! मी तिला सांभाळू शकतो." पांडूनं पहिल्यांदाच कडक धोरण अवलंबलं.
जावई सांगत होता.. बापलेक कान देऊन ऐकत होते. "बघा, शोभाची जलमाची सोय होऊन जाईल. तसाही तिचा सौंसार होनं कठीण! एकली आपल्यावर ओझं बनून राह्यल्यापेक्षा हे काय वाईट हाय?"
जावयाच्या बोलण्यावर विचार करत तिघांनाही झोप लागली.
क्रमशः
© कल्याणी पाठक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा