दातृत्वाचे दाणे

A grain of charity


दातृत्वाचे दाणे
विषय - सुखाची परिभाषा


दुष्काळी वादळ येथे, "आ" वासूनी होते
पेरलेले दाणेही, आशेने पाहत होते

सुगी ऋतूंच्या सारी , घशात गेली होती
बापाच्या डोळ्यांभोवती , अंधारी आली होती

लेकीच्या दप्तरी त्यानं, फोटो पाहिला होता
फासावर जाण्याचा निर्णय, त्यानं टाळला होता

पाणी नव्हते शेतीला, अंकूर हिरमुसले होते
मह्या बापाने घामामधूनी, बांध भिजवला होता

टिळा लाविता मातीचा, सूर गवसला होता
बीजांच्या पोटी अंकूर ,उगवूनी आला होता

आशा आकांशी धागे, जुळूनी आले होते
मातीच्या स्पर्शालाही, देवत्व लाभले होते

शेतांमधूनी पिवळे सोने, दिसू लागले होते
समाधान हे चेहऱ्यावरती, नाचू लागले होते

ठसठसणाऱ्या दुःखाने, खपली धरली होती
रापलेल्या चेहऱ्यावरती, हास्य बहरले होते

ओंजळीतले हे दाणे, सोनेरी चमकत होते
स्पर्शामध्ये या दाण्याला, दातृत्व लाभले होते
स्पर्शामध्ये या दाण्याला, दातृत्व लाभले होते

सुशांत भालेराव
विभाग - ठाणे
◆◆◆