सीमाच्या प्रसूतीच्या वेळी काही कारणाने थोडी गुंतागुंत निर्माण झाली.(डॉक्टरांनी सांगितलं होतं की सीमाला आता दुसरं मूल होणार नाही.) त्या वेळी तर सासरे देव पाण्यात ठेवून बसले होते. नितीनला विनू आणि जया धीर देत होते, राधा वहिनी आणि सासूने बाळाला सांभाळलं होतं. प्रसुतीनंतर जवळपास दहा बारा दिवसांनंतर सीमा बाळाला घेऊन घरी परतली, तेव्हा निमा, वरूण आणि लहान दिर दामू यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
बाळाला घरी आणल्यानंतर बाळाला न्हाऊ- माखु घालणं, त्याची धुनी, घुटी ,दुपटी धुणे, सारे जया ताई ने जातीनं केलं.( सीमाला त्या बाळंतपणात खूप अशक्तपणा आला होता, आणि डॉक्टरांनी सहा महिने आरामाची सक्ती केली होती). आणि जाताना नितीनला बाई लावायला सांगितलं, कारण राधा वहिनीच्या हाताचं कामं संपत नव्हतं, आणि आजी आईला सोडत नव्हती.
काही दिवसांनी सीमाचे वडील देवा घरी गेले. त्यावेळी सीमाच्या वहिनींनं सीमाला म्हटलं "तुझे वडील नसले तरी भाऊ आणि वहिनी आहे अजून." कालांतरानं सीमाची आई पण देवाजवळ निघून गेली, त्यावेळी सीमाची वहिनी काहीच बोलली नाही, फक्त सीमा जेव्हा तिच्या आई-वडिलांच्या खोलीबाहेर रिकाम्या पलंगाकडे बघत होती, तेव्हा वहिनींनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या हातातली ऊब आणि माया सीमाला लगेच जाणवून गेली.
सीमाच्या भावाची प्रायव्हेट नोकरी होती. मुलीच्या लग्नाचा खर्च जेव्हा आवाक्याबाहेर गेला, तेव्हा सीमाच्या मोठ्या बहिणीने रीमानं भावाला सढळ हाताने मदत केली. वडील गेले तेव्हा ही मोठी बहिण रीमा -भावाला आर्थिक मदत तर करत होतीच पण त्याचं मनोधैर्य ही वाढवत होती.
दामूच्या लग्नानंतर नवीन सुन- रिया ही पण मध्यम वर्गीय घरातलीच होती. शिकलेली होती. ती नोकरी करायची आहे, असा हट्ट धरून बसली होती. त्यावेळी जयाताई ने परत घरी सगळ्यांना समजावले ,"राधा वहिनीची तर गोष्टच वेगळी होती. तो काळही जुना होता , पण नितीनच्या स्वभावामुळे सीमा योग्यता असुनही नोकरी करू शकली नाही. आता जर दामुला वाटत असेल आणि रीयाची इच्छा असेल, तर आपण रियाला नोकरी करू द्यायला हवी.आणि मी पण नोकरी करतेच ना?" जयाच्या समजावण्याने घरी सगळेजण रीयाच्या नोकरी करण्याच्या निर्णयाला मानसिक रीत्या तयार झाले, आणि रिया तिच्या कामावर रुजू झाली.
©® राखी भावसार भांडेकर.
जय हिंद.