अनोखे सरप्राईझ

प्रस्तुत कथेमध्ये मी एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आलेली दिवाळी दर्शवली आहे.

"रेखाताई ,तुम्ही या दिवाळीत बिलकुल सुट्टी घ्यायची नाही बर का! माझी खूप धांदल उडते.दिवाळीच्या दिवशीची सर्व तयारी करता करता माझा दिवस कसा जातो कळत नाही.त्यात दरवेळी तुम्ही दिवाळीच्या दिवसापासून सुट्टी घेता.तुम्हाला तर माहीतच आहे की मला दुसऱ्या दिवशी माहेरी जायचे असते,म्हणून यावेळी माझ्या नवऱ्याची म्हणजे विकासची आणि माझ्या घराची काळजी तुम्ही घ्यायची,बर का!"

" अहो,वहिनी तुमचं सर्व खरं आहे,पण मला पण तर भाऊबीज असतेच ना! म्हणून मी जाते हो दरवर्षी! मला पण दिवाळी ,भाऊबीज आपल्या कुटुंबासोबत साजरी करावी वाटते.मलाही माझ्या घरातली खूप कामे असतात दिवाळीच्या दिवशी,म्हणूनच तर सुट्टी घेते ना मी.माझा मुलगा राघव त्याच दिवशी शहरातून घरी येतो.माझी लेक माहेरी आल्यावर मला खूप आनंद होतो.मग आम्ही दोघी माझ्या माहेरी जाऊन येतो, म्हणजे माझं सर्वांना भेटण होतं,चार सुखाच्या, आपुलकीच्या गोष्टी बोलता येतात."

" हे बघा रेखाताई मी तुम्हाला एकच सांगते, तुम्ही सुट्टी घेतली तर तुमची नोकरी जाईल आणि मी दुसरी बाई कामावर ठेवणार!"

" नका हो वहिनी अस करू.बर मी नाही जात माहेरी.थांबते इथेच आणि करेल सर्व कामे.थोडी लवकर उठून माझ्या घरचं आवरून घेईल.तुम्ही बिनधास्त रहा.पण मला नोकरीवरून काढून टाकू नका."

" बर बर ठीक आहे."

दिवाळीच्या दिवशी अचानक दार वाजते,

" रेखाताई कोण आहे बघा जरा, मी कामात आहे."

" हो हो वहिनी बघते मी."

" अरे राघव तू? कधी आलास तू? इकडे कशाला आलास?"

" अहो रेखाताई मीच बोलवले आहे त्याला. दिवाळी हा नात्यांचा उत्सव असतो. माझे आणि तुमचे नाते म्हणजे सख्ख्या बहिणींप्रमाणे आहे.म्हणूनच यावेळी आपण दोन्ही कुटुंब एकत्र दिवाळी साजरी करूया. आपण आधी तुमच्या घरी जावून पूजा करू मग माझ्या घरी येऊन करू.मग नैवेद्य सुग्रास बनवून एकत्र जेवण करू आणि हो तुमच्या मुलीला म्हणजे दीपालीला मी यावेळी माझ्याकडेच माहेरपणाला बोलवणार आहे .कारण तुमचे आई वडील ,माझे आई वडील, भाऊ आपण सर्व मिळून भाऊबीज करणार आहोत.म्हणजे तुमचे आणि माझे माहेर एकत्र येऊन हा दीपोत्सव अगदी छान सेलिब्रेट होईल . हो ना?मग कसे वाटले हे माझे सरप्राइझ?"

" खूप खूप छान आणि अनोखे सरप्राईझ दिलेत तुम्ही मला ,वहिनी !! तुम्ही खरच माझा ताण हलका करून माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी जी योजना आखली आहे त्यासाठी खूप खुप धन्यवाद!!"

" माझ्या या लाडक्या बहिणीसाठी मी एवढे देखील करू शकत नाही का ताई? चला लवकर मिळून कामे करूया आणि आपल्या नात्यांची आपुलकी अशीच टिकून राहू दे अशी देवाकडे प्रार्थना करूया."


 ©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

#गोष्ट छोटी डोंगराएवढी _ दिवाळी उत्सव नात्यांचा