कृषी कन्येची आर्त हाक अंतिम भाग

Feelings Of A Farmers Daughter


मी कितीही बोलले तरी त्यांच्या कार्यापुढे माझे शब्द म्हणजे अगदीच क्षुल्लक. त्या दोघींची महती माझ्यासारख्या मुलीने तुम्हासारख्या मोठ्या लोकांसमोर सांगणे म्हणजे, दिव्याच्या ज्योतीने सूर्याला ओवाळणे, पाण्याच्या थेंबाने समुद्राला गवसणी घालणे, रात्रीच्या अंधाराने चंद्राची आरती करणे. पण तरीही आज मी बोलणार आहे.

जिजामातेने स्वराज्य, स्वधर्म स्थापला. आपल्या संस्काराने शिवबा सारखा नररत्न माझ्या महाराष्ट्राला दिला. जिजामातेचे वडील लखुजी जाधव आणि इतर भावांची दगाबाजीने बादशहाच्या दरबारात हत्या झाली होती. नवरा तिकडे कर्नाटकात मोहिमेवर होता, तेव्हा ही पणतीची ज्योत धगधगती मशाल झाली. अन शिवबासहित अवघा महाराष्ट्र तीने घडवला. सावित्री बाईंनी तर अठरापगड जातीच्या कधीही, कुठलीही ओळख नसलेल्या माझ्या सारख्या अनेक पणत्या तेजाळल्या.

पण आज माझ्यासारखी अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी उद्याची सुंदर स्वप्ने बघू शकत नाही. लग्न ठरेपर्यंत कॉलेजच्या    वेटिंग रूम मध्ये लग्नाच्या रेल्वेची वाट पाहायची आणि लग्न ठरलं की त्या रेल्वेत बसून निघून जायचं हे तर अगदी ठरलेलं. खरंतर आम्हालाही खूप शिकायचं असतं. मोठ-मोठाली पद भूषवायची असतात. पण घरून कुठलाच पाठिंबा नसतो. घरकाम तर असतंच, शिवाय शेतीतली काम पण करावी लागतात. लोड शेडिंगच्या काळात जागरण करून रात्री शेतातल्या पिकाला पाणी द्यावे लागते. पहाटे लवकर उठून सायकलीवर महाविद्यालयात धडपडत यावे लागते. गावातून कधी सायकल, तर कधी बसने महाविद्यालयात येणाऱ्या माझ्यासारख्या अनेक जणी आहेत.

या मुलींसमोर मोठं आव्हान आहे आई-वडिलांच्या   रोजच्या रोजीरोटीच्या कामधंद्यात त्यांना मदत करण्याच. घरकाम करून बस, सायकल, रेल्वे पकडून शहरात येऊन उतरायचं, आणि निदान एक-दोन किलोमीटर पायी चालत महाविद्यालय गाठायचं. थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा सर्व हवामानात रोज प्रवास करून येणे, बसच्या पैशांची जमवाजमव करणे, या गोष्टी आमच्यासारख्यांसाठी फार खडतर आहेत. सकाळी साडेसात आठ वाजता पहिल्या तासासाठी महाविद्यालयात सायकलवर पोहोचताना आम्ही उपाशी असतो, त्यामुळे चक्कर येऊन पडणं या गोष्टी नित्याच्याच.

बी.ए. , बी.कॉम. सारख्या डिगऱ्या अनेक जणींजवळ आहेत. दरवर्षी शेकडो मुली बी.ए., बी. कॉम. होतात, पण त्या भरोशावर आम्हाला कुठलीच चांगली नोकरी मिळण्याची शक्यता नाही. मिळून मिळाली तर इंग्रजी माध्यमाच्या प्रायव्हेट कॉन्व्हेंट मध्ये दोन-तीन हजाराची शिक्षिकेची नोकरी मिळते. दरवर्षी पास झाल्यावर मिळणारी शिष्यवृत्ती ही फारच तोकडी असते.

माझ्यासारख्या ग्रामीण भागातील मुलींनी उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्न पहायचीच नसतात का? इतर श्रीमंत, सुशिक्षित, उच्चभ्रू लोकांसारखं चांगल्या दर्जाचं जीवनमानची आम्ही कधीच अपेक्षा करायची नाही का? शेतकऱ्याच्या मुली म्हणून जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांच्या मुलींनी कधीही सुखी संसार, स्वतःच्या मुलांचे चांगले शिक्षण, उत्तम नोकरी आणि अर्थार्जनाच्या चांगल्या संधी यांची अपेक्षाच करायची नाही का? की शेतकऱ्याच्या घरी हातात तोंडाची मिळवणी करता करता बालपण, तारुण्य गेलं म्हणून लग्नानंतरचे आयुष्य ही तसेच काढायचं? का हा कुठला न्याय?

आम्हीही आमच्या वडिलांच्या लाडक्या असतो. पापाची परी आणि राजकन्या नसलो तरी त्यांच्या काळजाचा तुकडा नक्कीच असतो.

पिक विम्याचे 5 हजार भरल्यावर पन्नास रुपये परतावा मिळतो. स्वतःच्या घामाची, कष्टाची कमाई - शेतातलं पीक, शेतकरी उघड्यावर ठेवतो. कुणी अशी स्वतःची कमाई उघड्यावर ठेवत का? ओला-सुका दुष्काळ, सततची नापिकी, अतिवृष्टीने खरडून गेलेल्या शेत जमिनी, कर्जाचे डोंगर यातून शेतकऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची कधीच सुटका होणार नाही का?

मल्टिप्लेक्स मध्ये 200-300 रुपयांचे टिकीट काढून 300-400 चे पॉपकॉर्न घेताना तुम्हाला काहीच वाटत नाही! पण एखाद वर्षी कांद्याचा भाव पन्नास रुपये किलो झाला तर लगेच तुमच्या डोळ्यात पाणी येतं! टमाटे 40 रुपये किलो झाले की तुमचे गालही टमाट्यासारखे लाले लाल होतात!!कोथिंबीरची जूडी चाळीस रुपयाची झाली की, लगेच तुमचे धायमोकलून रडणे सुरू होते. अगदी त्याचवेळी पाचशे रुपयाचा पिझ्झा मागवताना तुम्ही मोबाईलवर अगदी सराईतपणे बोट फिरवता. तुम्हा उच्चभ्रू लोकांचे हे नक्राश्रु आणि अरण्यरुदन कधी थांबणार?

इथे उपस्थित मान्यवरांना माझी कळकळीची विनंती आहे, इतर उदासीन यंत्रणांप्रमाणे जर तुम्हीही उदासीन राहिलात तर, आज आजादी का अमृत महोत्सव साजरा करणारा भारत कदाचित आजादीचा शंभरावा वाढदिवस साजरा करु शकणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि इतर मूलभूत प्रश्न यंत्रणांनी सोडवले नाही तर भारत खरच महासत्ता बनेल का?

निशाने आपल्या भाषणातून मूळ प्रश्नांनाच हात घातला होता त्यामुळे, तिथे उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष यांनी महाविद्यालयातील मुलींना मोफत वह्या, पुस्तके देण्याचे आपल्या भाषणातून कबूल केले. तर प्राचार्यांनी विद्यार्थिनी \"प्रवास भत्ता\" योजनेची घोषणा केली. त्या अंतर्गत प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी अगदी शिपायापासून प्रत्येक जण यथाशक्ती दर महिन्याला पगारातून पन्नास रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत या योजनेसाठी जमा करणार आणि त्यातून विद्यार्थिनींसाठी बस पास आणि पोषक नाश्ता देण्यात येईल अशी हमी दिली.

तिथे उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी मॅडमनी विद्यार्थिनींसाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि इतर प्रशिक्षण म्हणजेच फॅशन डिझाईनिंग, ब्युटी पार्लर, कुकिंग, योगा यांचे मोफत शिक्षण प्रशिक्षण देण्याची तजवीज केली.

निशाच्या बोलण्याने निदान तिच्या महाविद्यालयातल्या तिच्या सारख्या अनेक विद्यार्थिनींना आशेचा एक नवा किरण दिसला होता.


समाप्त.


©® राखी भावसार भांडेकर.

फोटो साभार गुगल.

🎭 Series Post

View all