वृंदा -"निशा अगं चल पटकन! आज लवकर पोहोचायचं कॉलेजमध्ये."
निशाने तिचा बऱ्यापैकी चांगला असलेला ड्रेस घातला आणि तिच्या एकदम लक्षात आलं तिची सायकल पंचर आहे.
निशा -"वृंदा माझी सायकल पंचर झाली आहे. आज तुझ्या सायकलवर जायचं का? मी तुला डबल सीट घेते."
वृंदा -"बर बर लवकर चल."
निशाने वृंदाला डबल सीट घेतलं. निशा थकली की, वृंदा सायकल चालवे आणि वृंदा थकली की निशा. असं करत दोघीजणी कशाबशा वेळेत कॉलेजमध्ये पोहोचल्या. निशा-वृंदा भर थंडीतही घामानं थबथबल्या होत्या. निशाच्या घशाला कोरड पडली होती. मराठे मॅडमने लगेच त्या दोघींना ग्लुकोज दिले कारण सकाळी सकाळी महाविद्यालय गाठताना उपाशीपोटी चक्कर येऊन मुलींचे खाली पडणे नित्याचेच होते. कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्या, जिल्हाधिकारी मॅडम असे सगळे मान्यवर जमले होते.
दीप प्रज्वलन आणि जिजामाता, सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण झाले. सुप्रिया मध्ये मध्ये चारोळ्या आणि शेरोशायरी म्हणून उत्तम प्रकारे संचलन करत होती. मुख्य कार्यक्रमात सारिका ने अगदी चार दोन संवादात जिजामातेची भूमिका मांडली.
सारिका -"बघ शिवबा हे परकियांकडून आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार बघ!आपल्या गरीब असाह्य मुलींना पळविणारे हे रावण बघ!! आपल्या माय बहिणींचे अब्रू लुटणारे हे दुर्योधन, दु:शासन बघ!!! यांचा नि:पात तुला करावयाचा आहे आणि तू तो करशील असा मला विश्वास वाटतो. तू राम हो मी तुला हनुमंता सारखी साथ देईन. तू अर्जुन हो मी तुझ्यासाठी श्रीकृष्ण बनेन."
सारिकाचे शब्द संपताच टाळ्यांचा गडगडात झाला. सुप्रियाने श्रावणीला मंचावर बोलावले. तिने तिच्या काव्यात्मक शब्दात सावित्रीबाईंना भावांजली वाहिली.
श्रावणी -"तुला शेण फेकून मारलं पण तू ते चंदन म्हणून स्वीकारलं. बहिष्कार केला लोकांनी तुझा, पण तू कधी कुणाचा तिरस्कार नाही केलास. धिंड काढली तूझी पण तू कधी तुझा पिंड नाही बदलू दिलास. तुझी प्रेत यात्रा काढली पण तुझी शिक्षणाची रथयात्रा कधी थांबवली नाहीस. दगड, गोटे मारले तुला, पण त्या बदल्यात नेहमीच तू वैचारिक फुलं दिलीस. म्हणून तू या देशाची खरी सावित्री माय झालीस. तुझ्या लुगड्यावर पडलेल्या शेणाचंच नव्हे तर देहाचही खत झालं आणि माझ्यासारख्या अनंत, असंख्य वेली फुलल्या आणि प्रत्येक मुलीचं फुल झालं."
त्यानंतर सुप्रियाने किमयाला मंचावर बोलावलं. किमयाने स्वतःच्या शब्दात जिजामातेला श्रद्धांजली वाहिली.
किमया -"जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस! जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरांचे कळस! जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले कुंकू सुवासिनींच्या भाळी, पतिव्रतांच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या रानोमाळी."
कार्यक्रमाच्या शेवटी सुप्रियाने निशाचे नाव घेतले आणि निशा माइक समोर उभी राहिली. खरंतर निशा सावित्रीबाई आणि जिजामाता यांच्यावर एकपात्री प्रयोग करणार होती, पण ऐनवेळी तिने विषय बदलला आणि भाषण सुरू केलं.
निशा-"आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि प्राचार्या सावित्रीबाई आणि जिजामाता या दोन राष्ट्र उभारणार्या विभूती. मी माझ्या पाच मिनिटांच्या भाषणात त्या दोघींविषयी काय बोलू आणि किती बोलू?