कृषी कन्येची आर्त हाक भाग दोन

Feelings Of A Farmers Daughter


सकाळी लवकर उठून, रात्रीची भाकरी घेऊन निशाची आई सखा पाटलाच्या शेतात निंदन करण्यासाठी निघून गेली. निशानेही मग भरभर झाड-सारवण केलं. लहान भाऊ आणि वडिलांचे चहापाणी करून, निशाने स्वयंपाक केला. तोपर्यंत घड्याळात सात वाजले होते. बाहेर वृंदा कॉलेजमध्ये जाण्यासाठी निशाला बोलवत होती.

वृंदा -"निशा ये निशा! अग सात इथेच वाजले. चल लवकर!"

निशा -"हो आली आली."

सकाळच्या बोचर्या थंडीत वृंदा-निशा सायकल चालवत,गावापासून सहा ते सात किलोमीटर दुर असलेल्या कॉलेजचा रस्ता संपवत अन् धापा टाकत मराठे मॅडमच्या इतिहासाच्या पहिल्या तासाला त्या पोहोचल्या. तरी त्यांना तब्बल 15 मिनिटे उशीर झालाच होता.

मराठे मॅडम इतिहास फार छान शिकवत. इतिहासातल्या एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना मॅडम केवळ शब्दांच्या सहाय्याने इतिहासातला तो प्रसंग अगदी हुबेहूब जिवंत करत म्हणूनच त्यांच्या तासाला इतर सर्व विषयांपेक्षा जास्त गर्दी असे.

इतिहासासोबतच मराठे मॅडम कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षाही होत्या, त्यामुळे उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन आणि चर्चा वर्गात सुरू होती. वर्गाच्या दारात निशा आणि वृंदाला बघून मॅडमने त्यांना आत येण्याचा इशारा केला.


मॅडम -"निशा आजही उशीर? अग उद्याच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरु आहे. निदान उद्या तरी वेळेवर कॉलेजला ये!"

निशाने चेहऱ्यावरचा घाम पूसत,धापा टाकत तिने मानेनेच हो म्हटले. त्यानंतर कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी होणाऱ्या जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची तयारी आणि मुख्य कार्यक्रमाची तयारी करण्यात आली. जिथे कार्यक्रम होणार होता, त्या हॉलमध्ये जिजामाता आणि सावित्रीबाई फुलेंचे फोटो एका खुर्चीवर ठेवण्यात आले. बाजूलाच दीपप्रज्वलांना करिता एक उंच पितळी समयी ठेवण्यात आली. दोन-तीन वाजता कॉलेज संपल्यावर सगळ्या विद्यार्थिनी आपापल्या घरी गेल्या. पण नेमकी निशाची सायकल गावात पोहोचल्यावर पंक्चर झाली. निशाला दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचण्याची काळजी वाटायला लागली, पण विचार करायला तिच्याजवळ वेळच नव्हता. घरी जाऊन तिला तिच्या बाबांना औषध द्यायचं होते. निशाचे बाबा दम्याच्या व्याधीने ग्रस्त होते. थंडीत दम्याचा जोर जास्तच वाढे. लहान भावाच्या शाळेचा गृहपाठही करून घ्यायचा होता. शिवाय रात्रीच्या जेवणाची तयारी. सकाळचे स्वयंपाकाचे भांडे आणि कपडेही धुवायचे होते. निशा घरी आली, तिने आधी वडिलांना औषध देऊन जेवणाचे ताट वाढून दिले. तोपर्यंत निशाचा भाऊ प्रकाशही घरी आला. मग दोघे भाऊ-बहीण एकत्रच जेवले. जेवता जेवता प्रकाश निशाला सांगत होता…


प्रकाश -"तायडे उद्या साळत वनभोजनाचा कार्यक्रम हाय."

निशा -"अरे साळत काय म्हणतो? शाळेत म्हण."

प्रकाश -"बर बर, शाळेत मला डब्यात काय देशील? वर्गातली पोरं खूप चांगलं चुंगलं आणतात. चिवडा, चकली, इडली, ढोकळा, पनीरची भाजी, सँडविच, भेळ, नूडल्स अजून काय काय?"


निशा -"प्रकाश घरात तुला देण्यासारखं काहीच नाही."


प्रकाश समजूतदारीच्या सुराने -"ताई माझ्या मराठीच्या बाईंना माझ्या डब्यातली ठेचा भाकर खूप आवडते. रोज त्या माझा डबा खातात आणि त्यांचा डबा मला देतात. उद्या पण तु मला ठेचा भाकरच दे!"

प्रकाशच्या बोलण्यावरून प्रकाशच्या बाई फार छान आणि कनवाळू आहेत एवढं मात्र निशाच्या लक्षात आलं. निशाने जेवणाचे भांडे घासले, कपडे धुतले आणि ती दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी, स्वतःच्या एकपात्री प्रयोगाची तयारी करू लागली.


संध्याकाळी आई घरी आल्यावर निशाने तिला हात पाय धुवायला कोमट पाणी दिले. थंडीच थंडगार पाणी भेगालेल्या पायांना आणि घट्टे पडलेल्या हातांना चराचरा झोंबते हे तिला माहीत होतं. रोजंदारीच्या पैशाने आईने स्वयंपाकाच सामान- तिखट, मीठ, तेल, डाळ, तांदूळ आणि दोन किलो गहू आणले.

निशने ते गहू चक्कीवरून पटकन दळून आणले. रोजच्या सारखाच निशाच्या अन तिच्या कुटुंबाच्या आयुष्यातला एक दिवस संपला होता.


©® राखी भावसार भांडेकर.

🎭 Series Post

View all