रात्रीचा किर्र अंधार पडला होता. रात्री साडेआठ- नऊची वेळ पण लोडशेडिंग मुळे त्या खेडेगावात एकही दिवा जळत नव्हता. गावातल्या सगळ्या घरात मिणमिणत्या पणत्या, एखाद दुसरी मेणबत्ती आणि अगदीच तुरळक कोणा एखाद्याकडे चार्ज केलेली बॅटरी जळत होती. आता हे वीज कपात प्रकरण नेहमीचेच झाल्याने त्या खेडे गावातले ग्रामस्थ ही सवयीने आपापल्या घरात जेवण करून झोपायच्या तयारीत होते. तर काहीजण मात्र वीज आल्यावर शेतात पाणी द्यायचे म्हणून मोबाईल मध्ये काही बाही बघत होते.
त्याच गावात राहत होती निशा. निशा एक अल्पभूधारक शेतकऱ्याची हुशार मुलगी. घरातली मधली. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं आणि निशा चा लहान भाऊ सातव्या वर्गात शिकत होता. निशा बी.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी. बारावीला 65 टक्के गुण मिळाले म्हणून तिच्या वडिलांनी तिचं नाव गावापासून सहा सात किलोमीटर दूर असणाऱ्या शहरातल्या महिला महाविद्यालयात घातले होते. निशा नित्यनियमाने कॉलेजला जायची. कॉलेज सकाळचे असल्याने आणि दुपारी बारा-एक पर्यंत निशा परत येत असल्याने निशाच्या आईची तिच्या शिक्षणाबाबत तशी फार काही नाराजी नव्हती. पण पेरणीच्या हंगामात मात्र निशा तिच्या आईसोबत स्वतःच्या शेतात, तर कधी इतरांच्या शेतात कामाला जात होती. त्यावेळी निशाला कॉलेज इच्छा असूनही बुडवावे लागे. पण तिचा इलाज नव्हता. मोठ्या बहिणीच्या लग्नाकरिता तिच्या वडिलांनी सावकाराकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले होते, त्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी निशाचे बाबा-आई आणि निशा निढळाचा घाम गाळत होते.
आई -"निशा बुक वाचती का ग?"
निशा -"हो काय म्हणते?"
आई -"अग आज पाय खूप दुखायल, जरा खोबरेल तेल देत का?"
नीता -"हो देते."
निशाच्या हाताला आईच्या पायाला तेल लावताना टाचांची उललेली कातडी लागली.
निशा -"आई टाचा किती भेगाळल्या ग तुझ्या!"
आई -"अग आता रात-दिस माती, पाण्यात काम केल्यावर काय हुनार? तू फक्त पायाला तेवढा तेल लावून दे बाई."
निशा -"थांब तुझ्या पायात मेण पण भरून देते."
निशाने आईच्या पायात मेण भरून दिले.
आई -"निशा उद्या कालेज हाय का ग?"
निशा-"हो का ग? काही विशेष?"
आई - "अगं सखा पाटलाच्या वावरात निंदन हाय म्हटलं चलती का? चांगली रोजंदारी मिळल."
निशा -"आई उद्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाची रंगीत तालीम होणार आहे. मी त्या कार्यक्रमात एकपात्री प्रयोग करून, सावित्रीबाई फुले आणि जिजामातेचे कर्तुत्व सांगणार आहे. आई, जिजामाता नसती, तर स्वधर्म, स्वराज्य टिकलं नसतं आणि सावित्रीबाई फुले यांनी शेण-गोटे खाल्ले नसते, तर आज तुझी निशा कॉलेजात गेली नसती."
आई -"अग त्या दोघीजणी थोरा-मोठ्यांच्या लेकी सुना. त्यांच्यामागे भक्कम आधार. आपण गरीबाच्या पोरी-बाळी आपला वाली कोण? आपण आपलं पोटापुरतं कमवावं आणि गप गुमान जगावं! मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी आपल्या काही कामाच्या नाही!! झोप आता. उद्या सकाळी मी लवकर निघून जाईन. घरचं करून मग कालीजात जाशीन बाई!"
निशा -"हम्म".
रात्रभर निशा विचार करत होती, तिच्यासारख्या गरीब, सर्वसामान्य मुलींना आयुष्यात स्वप्न बघण्याचा, मोठा होण्याचा अधिकारच नाही का? विचार करता करता निशा कधी झोपली ते तिचे तिलाच कळले नाही.
©® राखी भावसार भांडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा