दिदूला कावळा शिवला!

Untouchability during that days

दिदूला कावळा शिवला!

दर्शना इयत्ता आठवीतली मुलगी. सगळ्या विषयांत अगदी हुशार. शास्त्र विषय तर अगदी आवडीचा. सातवीची स्कॉलरशीपही मिळवली पठ्ठीने. 

घाटपांडे बाई व मुख्याध्यापक सावंत सर स्वतः तिच्या घरी पुष्पगुच्छ व पेढे घेऊन गेले. घरात पाहुणेमंडळींची वर्दळ होती. हो, सण होता घरात.. गौरीगणपती विराजमान होते. किती रोषणाई केलेली! शिवाय आजुबाजूला रेती पसरुन त्यात मेथी पेरली होती. त्या मेथीचे कोवळे हिरवेगार रोप बाप्पाच्या सजावटीत भर घालत होते. बाप्पाच्या मागील बाजूस कमळाचे चित्र रेखाटले होते. 

सर व बाईंनी हातपाय धुवून गणपतीला व गौराईला नमस्कार केला. कालच सत्यनारायणाची पूजा झाली होती. दर्शनाच्या वडिलांनी दोघांनाही तीर्थप्रसाद दिला. सर बाई दोघंही स्थानापन्न झाले. 

दर्शनाच्या वडिलांनी दर्शनाच्या आजीस, सरांची व बाईंची ओळख करुन दिली. घाटपांडे बाईंनी दर्शनाचे कौतुक केले. "तुमची दर्शना म्हणजे कोहिनूर हिरा आहे हो. अगदी प्रांजळ,सालस,मनमिळावू विद्यार्थिनी..साऱ्या स्टाफची लाडकी. अक्षर तर मोत्याला लाजवेल असं. भाषण,न्रुत्य..सगळ्यात पुढे."

आजी म्हणाली,"होय तर आहेच माझी नात गुणाची. घरातलीबी समदी कामं करती. निसती पुस्तका घिऊन बसीत नाय. चपात्या काय भाजती पटापटा. कपडेसुदी येकदम लख्ख धुती. पोरीच्या जातीनं तसंच आसलं पायजे मग सासरी गेल्यावर बापाच्या कुळाचा उद्धार व्हत नाही."

इतक्यात दर्शनाची आई करंज्या,लाडू,सरबत घेऊन आली. तिने सरांना व बाईंना नमस्कार केला. बाईंनी दर्शनाच्या आईस दर्शना शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल आल्याचं सांगितलं. त्या माऊलीने गणरायापुढे हात जोडून नमस्कार केला.

"अहो,पण आहे कुठे दर्शना," सरांनी विचारलं त्याबरोबर
आजी म्हणाली,"कालपासना बायची तब्येत बिघाडलीया म्हनून आराम करतीया."

 दर्शनाचा छोटा भाऊ देवेन पुढे झाला व म्हणाला,"नाही सर आजी खोटं बोलत आहे. दर्शु दिदीने एवढं सगळं डेकोरेशन केलं. रात्ररात्र जागली यासाठी. ही हिरवीगार रोपंसुद्धा तिला पहायला मिळाली नाहीत. आजीने मागीलदारच्या खोलीत ठेवलय तिला. आम्हालाही हात लावू देत नाही. दिदूला म्हणे कावळा शिवला. असा कसा शिवेल कावळा? कावळ्याची नि दिदूची छान मैत्री आहे. ती रोज त्याला चपातीचे तुकडे करुन घालते. कावळ्यांशी बोलतेही ती. ती बऱ्याच पक्ष्यांशी बोलते. कावळा तर ग्रीलमधे येऊन दिदूला साद घालत होता पोळीसाठी.. आणि म्हणे दिदूला कावळा शिवला.

सरांनी देवेनला जवळ घेतलं व म्हणाले,"चल बरं तुझ्या दिदूकडे."

आता मात्र आजी,आई इरेस पेटल्या,"नका हो तिकडे जाऊ. देव बसलाय घरात. घरभर शिवाशिव व्हायची. उगा अनर्थ होईल."

घाटपांडे बाई म्हणाल्या,"आजी असं काही होत नाही हो. तिला खेळूबागडू द्या. नका बरं असं कोंडून ठेवू. शाळेतल्या विज्ञानात मुलगी एवढी हुशार आणि घरी मात्र सणादिवशी अडगळीच्या खोलीत का तर तिला पाळी आली म्हणून! मग उपयोगच काय त्या पुस्तकी शिक्षणाचा. आपले आचारविचारही बदलले पाहिजेत.

आता मात्र दर्शनाचे वडील पुढे आले व म्हणाले,"या दोघी बायका ऐकत नाहीत हो. दर्शनाच्या आईनेही मेडीकलमधल्या गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलली. दर्शनाची ही पहिलीच वेळ नाहीतर तिलाही यांनी त्या गोळ्या चालू केल्या असत्या."

"दर्शनाची आई,परत असं करु नका. पाळी पुढेमागे करायच्या गोळ्या घेऊन निसर्गदेवतेच्या विरुद्ध जाऊन स्वतःच्या जीवाची वाताहात करुन घेऊ नका. तुम्हाला या दिवसात पाळी आली म्हणून देव तुमच्यावर रागे भरणार नाही. शिवाय दर्शनालाही असं वेगळं पाडू नका. आजी,अहो देवानेच निर्मिली मुलीची जात. तिला मात्रुत्वाचं वरदान देवानेच दिलं आणि तुम्ही तिला पाळी आली की घराच्या कोपऱ्यात बसवून ठेवलात व देवाला,गौराईला कितीही छानछान नैवेद्य करुन घातलात तरी देवाला,गौरीला ते गोड लागतील का? बघा विचार करा. अजुनही वेळ गेली नाही",सरांनी सुनावले.

सरांचे बोलणे दर्शनाच्या आईस पटले. दर्शनाची आई दर्शनाला बाहेर घेऊन आली व गणरायाला नमस्कार करायला सांगितले. दर्शना खूपच आनंदी झाली. कालपासून तिने तिच्या गणोबाचं दर्शन घेतलं नव्हतं. ही बारीक,लुसलुशीत हिरवीगार मेथी पाहिली नव्हती. अनिमिष नेत्राने ती गणरायाकडे,गौराईकडे पहात राहिली. सर म्हणाले,"दर्शनाचे बाबा,दर्शनाला कालचा तीर्थप्रसाद द्या."

दर्शनाच्या वडिलांनी दर्शनाला तीर्थप्रसाद दिला. सरांनी तिला पुष्पगुच्छ दिला व तिचं कौतुक केलं. घाटपांडे बाईंनी तिला पेढा भरवला.

तेवढ्यात  खिडकीत दर्शुचा कावळा काव काव करु लागला. ताटातली करंजी दर्शुने त्याला नेऊन दिली. 

देवेन म्हणाला,"अगं दिदू,लांबून दे. तो कावळा शिवला तर परत तुला एकटीला कोपऱ्यातल्या खोलीत बसावं लागेल."

देवेनच्या या बोलण्यावर सारेच हसले.

********

खरंच गरज आहे काही जुन्या रिती बदलण्याची,स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्याची. 

---सौ.गीता गजानन गरुड.