Feb 28, 2024
प्रेम

प्रेमाचा अंकुर ( भाग ३)

Read Later
प्रेमाचा अंकुर ( भाग ३)


प्रेमाचा अंकुर
भाग - 3

वडिलांची खाजगी नोकरी आणि थोडीशी शेती होती. खुप गरीब ही नाही आणि खुप श्रीमंत ही नाही,असे मध्यमवर्गीय कुटुंब होते. मुलाच्या आशेने तीन मुली झाल्या व नंतर चौथा मुलगा झाला. वंशाला वारस म्हणून मुलगा हवा होता.
तीन मुलीनंतर झालेल्या मुलाचे कौतुक,लाड होत होतेचं,पण मुलींचे ही लाड व्हायचे. आईवडिलांकडून सर्वांचे कौतुक, लाड होत असे. तिघीही मुली ही दिसायल्या चांगल्या आणि गुणी होत्या. घरातील परिस्थितीची जाणीव ठेवून वागणाऱ्या होत्या. तिघींमध्ये मोठी जास्त समजूतदार होती. दुसऱ्यांचा विचार करणारी होती.
पहिली मुलगी झाली म्हणून आईवडिलांना आनंद झाला,पण आजी वगैरे लोकांना मुलाची अपेक्षा होती. त्यामुळे ते थोडेसे नाराज होते,पण आईवडिलांनी कधी तसे जाणवू दिले नाही. त्यांचे आपल्या सर्व मुलांवर सारखे प्रेम होते. आपल्या परीने ते मुलांना सुख देण्याचा प्रयत्न करीत होते. मुलांचे ही आपल्या आईबाबांवर आणि एकमेकांवर खुप प्रेम होते.
आपली मुले अभ्यासात हुशार आहेत,आपल्या आज्ञेत आहेत. आपली मुले खुप चांगली आहेत,याचा आईबाबांना आनंद ही होता आणि अभिमान ही होता. ते आपल्या गुणांनी आपले नाव काढतील ,आपल्याला त्रास होईल असे ते वागणार नाही, असे त्यांना वाटत होते. आपण आईवडील म्हणून आपली कर्तव्ये पार पाडीत आहोत,मग ते ही मुले म्हणून त्यांची कर्तव्ये पार पाडतीलचं,असा विश्वास त्यांना होता.
आईबाबांचे आपल्या मुलांवर प्रेम होते,पण तितकेच रूढी-परंपरा यांना धरुन चालणारे होते. जे पूर्वीपासून सुरू आहे त्याचं विचारांनी आपण वागायला हवे. समाजात राहायचे तर समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहिले पाहिजे,असे त्यांना वाटायचे. आणि अशाच विचारांनी ते आपल्या मुलांना वाढवित होते. साहजिकच मुलांवर ही तसाच परिणाम होत होता. मुलांची शिक्षणात प्रगती चांगली होती. गावातील वातावरण असते तसेचं सर्व राहत होते. मुलींनी शाळेत किंवा बाहेर कुठल्याही मुलांशी बोलू नये, मैत्री करु नये. आपले घर, आपला अभ्यास आणि आपले संस्कार हे विसरू नये.

असेचं जीवन सुरू होते.
मोठी मुलगी म्हणजे संध्या ही अभ्यासात हुशार,दिसायला खुप सुंदर नाही पण छान ,देखणी. स्वभावाने खुप मनमिळाऊ, आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशी. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी जाण्याचे ठरविले. वडिलांची नोकरीही तालुक्याच्या गावी होती,त्यामुळे तेथेचं राहणे सोपे होईल. या उद्देशाने संध्या आणि तिचे कुटुंब गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेले.
संध्या दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पुढे कॉलेजचे शिक्षण सुरू झाले. कॉलेज,नव्या मैत्रिणी, नवे जीवन यात संध्या गुंतून गेली. पण शाळेला,शाळेतील मित्रमैत्रीणींना, शाळेतील आठवणींना विसरली नाही. अनेकदा सर्वचं गोष्टींची आठवण येत असे.
गाव,शाळा असे सर्व आठवायचे,पण मनाला एक वेगळीचं हुरहुर लागत असे. असे काही तरी आहे ज्यामुळे आपले मन जुन्या आठवणींकडे धाव घेते. जे क्षण आठवून कधी आपल्याला आनंद होतो,तर कधी ते क्षण त्रासही देतात. का आपले मन त्याचं गोष्टींकडे धावते ज्या आपण विसरण्याचा प्रयत्न करत आहोत? जी स्वप्नं कधी पूर्ण होणार नाहीत ती स्वप्नं तरी का बघायची ? का त्यांच्यात गुंतायचे. वेड्या मनाला कितीही समजावले तरी ते थोडीचं ऐकते. आपण जितके त्याला त्या गोष्टीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो,ते तितके जास्त त्याचं गोष्टीत रमते.

जे कधी दिसत नाही असे असते मन,
जे कधी स्थिर नसते ते असते मन,
ज्याचा वेग कधी मोजता येत नाही असे असते मन,
ज्याला आवर घालणे अवघड असते असे असते भरकटणारे मन.

असे संध्या विचार करायची पण मनातल्या गोष्टी कोणाला सांगत नव्हती. जिवलग मैत्रिणी होत्या,पण मनातले सांगून इतरांना टेंशन देवू नये,असे तिला वाटायचे. घरात तर कोणाला काही सांगू शकत नव्हती. आपल्या भावना, आपले विचार आपण आईवडील, भाऊबहीण यांच्याबरोबर शेअर करतो. पण आपण आपल्या मनातील त्यांना सांगितल्यानंतर घरातील चांगले वातावरण बिघडले तर? आईबाबांच्या भावना दुखावल्या गेल्या तर? आपल्या भावंडांना आपल्यामुळे त्रास झाला तर? अशा अनेक गोष्टींचा विचार करुन ती मनातील घालमेल मनातचं ठेवतं होती. सर्वांना ती खुप आनंदी दिसत असली तरी मनात तिची द्विधा सुरू असायची.
आपल्या मनाचा विचार करण्यापेक्षा इतरांच्या मनाचा विचार करण्याचा तिचा स्वभाव होता. म्हणून स्वतःच्या बाबतीत जास्त विचार न करता ती आपल्या कुटुंबाच्या आनंदात आपला आनंद मानू लागली. आपण शिकावे, मोठे व्हावे, आईबाबांना आनंद होईल असेच करत रहावे,असेचं तिने ठरविले.

दुसऱ्यांना आनंद देता देता,
कधीतरी दुःख ही पदरी पडतं,
इतरांना हसवता हसवता,
आपलं रडणं मात्र लपवावं लागतं.


खरचं मुली आपल्या आईबाबांची,भावाबहिणींची किती काळजी करतात ना?
आईबाबांचे दुःख जाणतात.
स्वतः च्या आनंदाचा त्याग करुन नाते निभावतं असतात.
स्त्री जातीचा हा जन्मजात गुणचं असतो. मग ती कोणत्याही रुपात असो.
मुलगी, बहीण,पत्नी, आई ,आजी ,मावशी ,
आत्या अशा कोणत्याही रूपात, नात्यात तिच्यातील प्रेम आणि त्याग नेहमीच दिसून येतो.
आज अनेक नाती,कुटुंब ही स्त्रीच्या निःस्वार्थ प्रेमामुळे,त्यागामुळे ,सहनशीलतेमुळे टिकून आहेत.
प्रत्येक स्त्रीने फक्त स्वतःपुरताचं विचार केला असता,तर तिलाही मनासारखे जगता आले असते. सर्व सुखांचा उपभोग घेता आला असता.


कॉलेज, अभ्यास, परीक्षा असे संध्याचे सत्र सुरू होते. कधीतरी प्रसंगाने जुन्या मैत्रिणी भेटायच्या. प्रत्येकजण आपले आयुष्य छान जगत आहेत असे तिला वाटत होते. काहींनी दहावीलाचं शाळा सोडली. कोणी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागले. तर काही मुलींची लग्ने झाली होती.

मुली म्हणजे आपली जबाबदारी असे पालक समजतात आणि एकदाचे लग्न करून सासरी गेली म्हणजे छातीवरचे ओझे कमी झाले असे त्यांना वाटत असते. एकापेक्षा जास्त मुली असतील,घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर पालक मुलींची लग्ने करून जबाबदारीतून मोकळे होण्याचा प्रयत्न करत असतात.
आणि मुलींनी ही आपल्या आईवडिलांनी सांगितले त्यानुसार वागले पाहिजे. यातचं तिचे भले असते असे सांगून तिच्या वयाचा,तिच्या मनाचा,भावनांचा कोणीही विचार करत नाही. जे आईने केले तसेचं मुलीने ही करावे आणि आपला संसार सुखाचा करावा.हाचं स्त्रीजन्माकडे बघण्याचा उद्देश!

पूर्वी तर मुलींना शिक्षणासाठी शाळा,कॉलेजमध्ये पाठवित नसतं, घर सांभाळू शकते एवढे गुण असले तरी भरपूर.
त्यामुळे मुलींनी शिक्षण घेऊन पुढे आपले स्वतःचे एक स्थान, एक स्त्री म्हणून स्वतः चे अस्तित्व निर्माण करावे असे वाटत नव्हते. खुप कमी पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देत असत.
आपल्या आईबाबांनी आपल्याला शाळा,कॉलेजमध्ये पाठवले त्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकलो,त्यामुळे संध्याला आईबाबांबद्दल आदर होता. प्रत्येक पालकाने आपल्या मुलींना शिक्षण दिलेचं पाहिजे असे तिला वाटायचे.


स्त्री शिक्षित असली तर ती आपल्या उपजत ज्ञानाने,बुद्धीने खुप काही चांगले करु शकते आणि त्यामुळे सगळ्यांनाचं त्याचा फायदा होत असतो.

संध्याला वाटायचे आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॉब करावा आणि आपल्या आईबाबांना आर्थिक जबाबदारीत थोडी मदत करावी. त्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट घेतले,आपण ही आपल्याला शक्य होईल तेवढे त्यांच्याकरीता काही तरी करून मदत करावी. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावा. संध्याची आपल्याबद्दलची तळमळ आईबाबांना दिसत होती. हे पाहून त्यांना खुप चांगले ही वाटत होते,आपल्या संध्याचे आपल्या वर किती प्रेम आहे आणि तिची आपल्या कुटुंबाबद्दलची जाणीव यामुळे संध्याचा त्यांना अभिमान वाटत होता.
पण संध्यानंतर अजून आपल्या दोन मुली लग्नाच्या आणि नंतर मुलाचे शिक्षण,नोकरी या जबाबदाऱ्या. वयानुसार शरीर ही थकते त्यामुळे जबाबदाऱ्या पूर्ण करणे शक्य होत नाही.
मुलींचे लग्न योग्य वयातचं केले तर बरे असते. असे सल्ला देणारे नातेवाईक, हितचिंतक होतेचं.
संध्याचे तारुण्यही छान बहरले होते. छान दिसत होती. गुणांनी ही चांगली होती म्हणून अनेकांच्या मनात भरत होती.
संध्याच्या आईबाबांकडे तिच्या लग्नासाठी स्थळे येऊ लागली होती.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण होताचं संध्याचे लग्न करण्याचे तिच्या आईबा बांनी ठरविले आणि संध्याला तशी कल्पना ही दिली.


क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//