मागील भागात आपण बघितले…
"खूप छान. आंबट, गोड, तिखट सगळी चव होती." स्नेहल बोलली.
"मूळ विषय सोडून आई बाबा बाईक, चटणी बद्दल काय बोलत आहेत? मुलाची बाजू सांभाळायची म्हणून विषय टाळत आहेत की काय? शेवटी मी सूनच. माझी बाजू का घेतील ते?" स्नेहल मनातच बोलली.
आता पुढे…
"एक मिनिट. काय चालू आहे तुम्हा दोघांचे? विषय काय बदलवता तुम्ही?" केतन रागात बोलला.
"आम्ही कुठे विषय बदलवला? आम्ही विषयावरच बोलत आहोत." कुसुम बोलली.
"हे असं? बाईक आणि चटणी बद्दल बोलून?" केतन अजूनच वैतागला.
"केतन, तूच म्हणालास ना की, आपण आपल्या वस्तूची काळजी घेतली पाहिजे हे, मीच तुला शिकवले आहे. मग तू हे कसे विसरलास? की, आपण आपल्या माणसांची पण काळजी घेतली पाहिजे हे, देखील मी तुला शिकवले आहे." रविराज बोलला.
"जशी गाडी दोन चाकांशिवय चालू शकत नाही, तसच संसाराच पण आहे. नवरा बायको म्हणजे संसाराच्या गाडीची दोन चाकं. एक जरी खराब झालं तर गाडी बंद पडते." कुसुम बोलली.
"तू अगदी बरोबर बोललास की, गाडी काय आपण उठसूठ घेत नाही. मग लग्नं काय आपण उठसूठ करतो का?" रविराज बोलला.
"संसार म्हटल की, भांड्याला भांडं लागणारच म्हणून कोणी घर सोडून जातं का? अरे अजून एकच वर्ष झालं आहे तुमच्या लग्नाला. अजून तर खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. असं हार मानून पळून जाऊन कसं चालेल?"
"केतन आयुष्यात पैसा महत्त्वाचा असतोच. त्याचे नियोजन करा. पण ते करताना आयुष्य जगायला शिका. एकमेकांना वेळ द्या. फिरा, शॉपिंग करा पण जे घरजेचे आहे ते घ्या. अरे तुमचं हे वय आहे फिरण्या हिरण्याचे, एकदा मुलांची जबाबदारी अंगावर आली की, मग तुम्हाला त्यांना वेळ द्यावा लागेल. हे क्षण जागा. एकदा वेळ गेली की, परत येत नाही." रविराज बोलला.
"सगळ्यात महत्वाच तुझं माझं करणं सोडा. आज स्नेहल जॉब करते उद्या कदाचित करणार नाही. मग काय तू तिला घरातून काढून टाकशील का? घर सगळ्यांचे आहे. काम सगळ्यांची आहेत. एकमेकांवर विश्वास ठेवा. मग कोणी कोणावर हुकूम गाजवत नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून रहा. मी नोकरी करत नाही. म्हणून तुझ्या बाबांनी मला कधीच कमी लेखले नाही. त्यांनी मला तोच मान दिला जो घरातील स्त्रीला द्यायला हवा. आज पर्यंत कोणताही निर्णय त्यांनी माझ्यावर लादला नाही की, मला न सांगता, न विचारता, कोणतीही गोष्ट केली नाही." कुसुम बोलताना तिचे डोळे चकाकत होते.
"तुझ्या आईने देखील मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. प्रसंगी एखादी गोष्ट करण्यासाठी ठामपणे नकार पण दिला. पण मी तिच्या मताचा मान ठेवला. त्यावेळी निश्चित मला वाईट वाटले, पण नंतर ती का नाही म्हणाली हे समजले देखील. आम्ही पण भांडलो, रुसलो पण घर सोडून गेलो नाही. शांत झाल्यावर कधी एकमेकांशी बोलून विषय संपवले, तर कधी वेळेची वाट बघत वाद मागे टाकत गेलो, कधी प्रश्नांची उत्तरं शोधली तर, कधी प्रश्न बदलले." रविराज केतन आणि स्नेहलला समजावत होते.
"मुलांनो तुम्ही दोघे आम्हाला सारखेच आहात. एकमेकांवर विश्वास ठेवा. घरला घरपण माणसांच्या प्रेमाने येते, पैशाने नुसत्या भिंती उभारता येतात. केतन स्नेहलच्या इच्छा छोट्या आहेत. त्यात काही वावगे नाही. तू तिला वेळ देणार नाही तर, तुम्ही एकमेकांना कसे समजू शकणार? संसार चटणी सारखा असतो. त्यात गोड, आंबट, तिखट सगळ्या चवी असतात. त्यांचा अनुभव घ्या. त्यातून तुमचं नातं घट्ट होत जाईल." कुसुम केतनला समजावत होती.
कुसुम आणि रविराजच्या बोलण्याने स्नेहलच्या डोळ्यात पाणी आले. सूनेची बाजू घेणारे पहिलेच सासू सासरे ती बघत होती.
तितक्यात रविराज अतून एक पाकीट घेऊन आले आणि ते केतनच्या हातात दिले.
"हे काय?" केतनने प्रश्न केला.
"बघ. स्नेहल तू पण बघ." रविराज बोलला.
स्नेहल उठून केतनच्या शेजारी बसली. केतनने पाकीट उघडले आणि दोघे एकदम ओरडले.
"कायऽऽ."
"हो. आम्ही पुढच्या आठवड्यात तीन महिन्यांसाठी युरोपला जात आहोत. तिथून आम्ही मनात आलं तर, घरी येऊ नाही तर अजून कुठे फिरायला जाऊ." रविराज बोलला.
"पण का? नाही म्हणजे तुम्ही फिरायला जा पण तीन महिने? त्यात पण येणार की, नाही नक्की नाही म्हणत आहात. असं का?" स्नेहल बोलली.
"अगं, आमच्या वयात आम्हाला फिरता आलं नाही. परस्थिती नव्हती आमची तेव्हा. म्हणून आता तरी जातो फिरायला. तुम्हाला दोघांना पण एकमेकांसोबत वेळ मिळेल. आम्ही असलो म्हणजे नाही म्हटलं तरी बंधन येतच की. आम्ही आमची हौस पूर्ण करतो, तुम्ही तुमची करा. आमचा हा प्लॅन आधीच झालेला होता." कुसुम बोलली.
"आई अहो! मला तुमची काहीच अडचण नाही. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ." स्नेहलला आता अपराध्या सारखे वाटत होते.
"अगं तुझ्यावर राग नाहीच. आम्हाला खूप दिवसांपासून वाटतं होतं की, तुम्हां दोघांना निवांत वेळ मिळावा. खरं तर आम्हाला पण आमचा निवांत वेळ हवा आहे." रविराज स्नेहलची समजूत काढत बोलला.
"ठिक आहे पण माझी एक अट आहे." स्नेहल डोळे पुसत बोलली.
"काय?" रविराज आणि कुसुम एकदम बोलले.
"तीन महिन्यानंतर तुम्ही परत घरी या. मग जा परत कुठे फिरायला. पण घरी यावच लागेल. आम्हाला करमणार नाही तुम्ही नसलं तर." स्नेहल केतनकडे बघत बोलली.
"बरोबर बोलते आहे स्नेहल." केतन तिच्या बोलण्याला दुजोरा देत बोलला.
"आता आम्ही भांडणार नाही. समजून घेऊ एकमेकांना." स्नेहल बोलली.
"मी स्नेहल ची काळजी घेईल, तिच्या इच्छा पूर्ण करेल आणि तिला योग्य तो मान देईल. तुमच्या समोर मी तिला वचन देतो." केतन स्नेहलचा हात हातात घेत बोलला.
एक आठवड्यानंतर कुसुम आणि रविराज युरोपला निघून गेले. फोन वर सून आणि मुलाची खुशाली त्यांना समजत होती. केतन आणि स्नेहल एकमेकांसोबत जुळवून घेत होते. काळजी घेत होते. पण ही कथा इथेच संपली नाही. कारण तीन महिन्यांनी कुसुम आणि रविराज परत आल्यावर त्यांना दुसऱ्या टूरला जाता आलेच नाही.
स्नेहलने गोड बातमी दिली आणि दोघे येणाऱ्या नातवंडांच्या स्वागताच्या तयारीला लागले.
समाप्त.
संसारात तडजोड ही असतेच. दोघांनी एक एक पाऊल मागे घेतलं तर टक्कर होत नाही. कथा कशी वाटली नक्की सांग.
धन्यवाद..
©वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा