संसाराची गाडी... भा ४

"मूळ विषय सोडून आई-बाबा बाईक, चटणी बद्दल काय बोलत आहेत? मुलाची बाजू सांभाळायची म्हणून विषय टाळत आहेत की काय? शेवटी मी सूनच. माझी बाजू का घेतील ते?" स्नेहल मनातच बोलली.


मागील भागात आपण बघितले…

माझ्या मनात पण नाही आलं कधी असं ज्याचा विचार केतन करतो. हेच माझ्या मनाला सलत आहे. आई बाबा कुठे चुकले मी? मान्य आहे घरातील कामात माझा सहभाग कमीच असतो. पण सुट्टीच्या दिवशी मी आवडीने सगळं करतेच की. आपलं घर म्हणून करते. पण केतन ने तर मला एकदम परकच केलं." आता मात्र स्नेहालच्या डोळ्यांनी इतकावेळ अडविलेले अश्रू घळाघळा वाहू लागले.


आता पुढे…



"आई-बाबा, तुम्हाला दोघांना बघते ना, मी तेव्हा मला असच वाटतं की, आमचा संसार पण तुमच्या सारखा व्हावा. तुमच्यात दोघांमध्ये किती समजदारपणा आहे, एकमेकांना किती छान सांभाळता तुम्ही. सून आणि मुलाच्या समोर, ह्या वयात देखील एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करता ते पण तुमच्या आणि आमच्या वयाची मर्यादा राखून. पण आमच्यात असे काहीच होत नाही. केतन तर मला कोणत्याच गोष्टी सांगत नाही. त्याच्या कोणत्याच निर्णयात त्याला माझे मत घेणे किंवा मला नुसतं सांगणं देखील गरजेचे वाटतं नाही. त्याच्या अशा वागण्याने मला असे वाटते की, मी त्याच्या आयुष्यात कुठेच नाहीये. फक्त नावाची अर्धांगी आहे. बाकी माझी किंमत शून्य आहे." स्नेहल बोलली.


"हम्म म्हणजे एकंदरीत बघितलं, तर विषय गंभीर आहे आणि नाही पण. खरं तर सुरुवातीला केतनने आणि तू जी कारणं सांगितली ती ऐकून मला हसायला येत होते." कुसुम बोलली.


"आई हसण्या सारखं काय आहे त्यात?" केतन कुसुमकडे बघत बोलला.


"हो, हसू नाहीतर काय? फिरायला, शॉपिंगला, पिक्चरला नेत नाही, ही काय कारणं झालीत काय, घर सोडून जायला? अरे तुम्ही दोघे काय कॉलेजमध्ये आहात का इतक्या शुल्लक कारणावरून भांडायला. वयानुसार समजदारपणा यायला हवा." कुसुम हसू दाबत बोलली.


"हे बघा तुम्ही दोघे जे जे बोललात त्यावरून हे लक्षात आले की, मुद्दा तसा काहीच नाही. मुद्दा आहे तो विश्वासाचा. बाळांनो तुमचं वय नाही त्याहून अधिक वर्ष झालीत आमच्या संसाराला. आयुष्यात अनेक चढ उतार बघितले आम्ही. त्यावर मात करत इथवर पोहोचलो. अनेक संकटांना तोंड देत आम्ही संसाराची गाडी रेटत आणली. आमच्यासोबत देखील असे अनेक प्रसंग घडले, ज्यातून आम्ही वेगळे होऊ शकत होतो. पण एकमेकांना थोडा वेळ देत, समजून घेत आम्ही एकमेकांचा हात कधीच सोडला नाही." कुसुम पुढे बोलली.


"केतन मला सांग तुझी बाईकमध्ये खराब झाली होती ना?" रविराजने केतनकडे बघत विचारले.


"हो. हो विशेष काही नाही, चाक पंक्चर झालं होतं. एक दिवस बंद होती बाईक. पण चाक दुरुस्त केल्यावर सुरू झाली परत."
\"बाबांनी इतक्या गंभीर विषय सुरू असताना मध्येच काय बाईकचा विषय काढला?\" अशा विचारात त्याने उत्तर दिले.
स्नेहल देखील प्रश्नार्थक नजरेने कुसुम आणि रविराजकडे बघत होती.


"अरे, एका चाकावर काम झालं असतं की तुझं. कशाला दुरुस्त केलं चाक? किंवा मग चाक नवीन घ्यायचे होते ना? नाहीतर बाईक बदलली असती." रविराज परत बोलले.


"काहीतरीच काय बाबा? एका चाकावर गाडी चालते का? नुसतं पंक्चर होतं चाक. ते काढलं की झालं. आता परवाच अजून मी ऑईलींग करून घेतले आहे बाईकला. आता एकदम स्मूथ चालते." केतन आता थोडा हसून बोलला.


"अरे, इतका खर्च कशाला केला? नसती केली ऑईलींग तरी काम सुरूच होते की तुझे." रविराजने परत प्रश्न केला.


"बाबा, अहो काळजी नाही घेतली तर गाडी नीट कशी चालेल? गाडी कोणतीही असली तरी, तिची काळजी घेतली की, ती चांगली चालते. बाबा तुम्हीच सांगता ना की, \"आपल्या वस्तूची काळजी आपणच घ्यायला हवी. तरच वस्तू जास्तं काळ टिकतात.\" गाड्या काय आपण रोज उठसूठ घेतो का? पण आता विषय वेगळा सुरू आहे. तुम्ही मध्येच का हे सगळं विचारताय? की मुद्दाम विषय बदलवत आहात तुम्ही?" केतनने उलट प्रश्न रविराजला केला.


केतनच्या बोलण्यावर इतक्यावेळ शांत बसून ऐकणारी कुसुम आणि रविराज दोघे एकदम हसले. त्यांना असे हसताना बघून केतन आणि स्नेहल थोडे भांभावले.


"अगं हो! स्नेहल विसरलेच सकाळी केलेली चटणी कशी होती गं?" कुसुम एकदम आठवून बोलली.


"खूप छान. आंबट, गोड, तिखट सगळी चव होती." स्नेहल बोलली.

"मूळ विषय सोडून आई-बाबा बाईक, चटणी बद्दल काय बोलत आहेत? मुलाची बाजू सांभाळायची म्हणून विषय टाळत आहेत की काय? शेवटी मी सूनच. माझी बाजू का घेतील ते?" स्नेहल मनातच बोलली.


पुढील भागात बघू खरंच स्नेहलच्या मनात शंका आली तसच असेल का? वाचत रहा संसाराची गाडी.


क्रमशः
©वर्षाराज

🎭 Series Post

View all