Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

संसाराची गाडी...भाग ३

Read Later
संसाराची गाडी...भाग ३


मागील भागात आपण बघितले…


दोघींचे खाऊन होईपर्यंत सगळे शांत बसले होते. चहा नाष्टा झाल्यावर स्नेहल सगळं आत घेऊन गेली. नंतर टेबल स्वच्छ केला आणि सॉफ्यात जाऊन बसली.


"आई-बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे." थोडीशी चाचरत आणि गंभीर आवाजात स्नेहल बोलली.आता पुढे…"बोल बेटा. मनमोकळेपणाने बोल." रविराज तिच्या आवाजातील चाचारतेपणा हेरत बोलला.


"ती काय बोलेल! मीच बोलतो. बाबा हिला माझ्या सोबत राहायचे नाहीये." केतन रागाने बोलला.


"केतन तुला विचारल्यावर तू बोल. स्नेहल तू बोल आधी. आम्ही ऐकतो आहोत." कुसुम जरा दटावट बोलली."आई! खरंतर आज मला ऑफिस मधून निघायला उशीर झाला नव्हता. मी वेळेवरच निघाले होते. पण केतनशी सकाळी ऑफीसला जाताना भांडण झाले होते. ऑफिस मधून निघाल्यावर मी केतनला भेटले देखील होते आणि संध्याकाळी आम्ही परत भांडलो. त्याच रागात मी आईकडे जायला निघाले पण, आई खरंच सांगते अर्धा रस्ता गेल्यावर मला तुमचा चेहरा आठवला आणि पावलं आपोआप घराकडे वळली." स्नेहल कुसुमकडे बघून बोलली."खोटारडी. असं बोलून तुला हेच सिद्ध करायचे आहे ना की, तू किती चांगली आहेस. पण असं होऊ देणार नाही मी." केतन परत बोलला.


"केतन गप्प बस. आम्हाला सांगा हा हाय प्रकार आहे सगळा?" रविराज गंभीर होत बोलले.


"तू बोललास की, तिला तुझ्या सोबत राहायचे नाहीये. म्हणजे तुम्हाला आमच्यामुळे काही त्रास होत असेल तर तसं सांगा." कुसुमने सरळ प्रश्न केला.


"नाही! तिला तुमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये तिला माझाच प्रॉब्लेम आहे." केतन बोलला.


"म्हणजे? आणि कधीपासून चालू आहे तुमचं हे भांडण?" कुसुम बोलली.


"आई मला तुमचा किंवा बाबांचा काहीच त्रास नाही. उलट मी नशीबवान आहे की, तुमच्या सारखे चांगले सासू सासरे मला मिळालेत."


"अगं मग कसला त्रास आहे ते तरी सांग." कुसुम बोलली.


"हे बघ स्नेहल आणि केतन तुम्ही दोघांनी तुमच्या मनात काय असेल ते बोला. आपण मार्ग शिधू. समस्यांचे समाधान काढायचे असते. पळून जायचं नसतं हे दोघांनी नेहमी लक्षात ठेवा." रविराज वडिलांच्या भूमिकेतून बोलत होते.


"आधी मला बोलायचे आहे." केतन बोलला.


"बरं बोल. स्नेहल तू त्याचे बोलणे होईपर्यंत मध्ये बोलायचे नाही आणि केतन तू स्नेहल बोलत असेल तेव्हा मध्ये बोलायचे नाही. समजलं दोघांना?" रविराज बोलला.
तशा दोघांनी माना डोलावल्या."तिला असे वाटते की, मी तिच्या इच्छा पूर्ण करत नाही. मी तिला फिरायला नेत नाही. पिक्चरला घेऊन जात नाही. शॉपिंगला नेत नाही." केतन इतकेच बोलून गप्पा बसला.


"अजून काही?" रविराज बोलला.


"तिलाच विचार आता बाकी, तिचं सांगेल." केतन स्नेहलकडे बघत बोलला.


"बाबा, केतन बोलला ते खरं आहे. मी नेहमी नाही म्हणत पण, महिन्यातून एकदा तरी त्याने बाहेर घेऊन जावं. एकांतात दोघांनी वेळ घालवावा. कधी पिक्चरला तर, कधी शॉपिंगला घेऊन गेला तर तितकाच निवांत वेळ एकमेकांसोबत घालवता येईल अशी माझी इच्छा असते. त्यात वाईट तरी काय आहे? पण ह्याला कधीही काही बोलले की, काही ना काही कारण सांगतो. आज काय तर पाठच दुखते आहे, नंतर काय तर कंटाळाच आला आहे, आईला काय वाटेल? बाबा काय म्हणतील? अशी कारणं तयार असतात. सगळी कारणं संपली तर आता मला म्हणतो. \"मला हे असले लाड पुरवणे जमणार नाही. मला पैसे खर्च करायला आवडतं नाही. कारण तोच पैसा जपावून मला त्यातून आपल्यासाठी मोठे घर घ्यायचे आहे.\"


मी त्याला बोलले की, मी पण नोकरी करते आपण दोघं मिळून घेऊ की घर. तर म्हणतो, \"तुझा पैसा नको उद्या भांडणं झाली तर, तू आमचं घर हिरावून घेशील आमच्याकडून."
बोलता बोलता स्नेहलच्या डोळ्यात पटकन पाण्याचे थेंब जमा झाले. त्यांना कशीतरी आवर घालत ती पुढे बोलू लागली.


"आई बाबा! बाकी सगळ्या बाबतीत मी तडजोड केली असती, पण त्याचे हेच बोलणे माझ्या मनाला लागले. आमचे घर म्हणजे काय? मी ह्या घराचा भाग नाही का?
आज मला म्हणाला, \"तू घरात काय काम करतेस? सगळं आईचं करते. तू नवीन घराला पैसा लावशील तर अजूनच रुबाब करशील.\" माझ्या मनात पण नाही आलं कधी असं ज्याचा विचार केतन करतो. हेच माझ्या मनाला सलत आहे. आई-बाबा कुठे चुकले मी? मान्य आहे घरातील कामात माझा सहभाग कमीच असतो. पण सुट्टीच्या दिवशी मी आवडीने सगळं करतेच की. आपलं घर म्हणून करते. पण केतनने तर मला एकदम परकच केलं." आता मात्र स्नेहालच्या डोळ्यांनी इतकावेळ अडवलेले अश्रू घळाघळा वाहू लागले.स्नेहलच्या बोलण्याने कुसुम आणि रविराज तिच्या बद्दल काय विचार करतील? ते मुलाची बाजू घेतली की, सूनेची? कारण सून ही शेवटी सूनच असते. नाही का? वाचत रहा संसाराची गाडी.क्रमशः
©वर्षाराज
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//