"बरोबर ओळखलं हो तुम्ही. कोथिंबीरीच्या वड्या आणि सोबत जरा बटाट्याचे भजे करते आहे. स्नेहलला आवडतात ना म्हणून करते आहे. आज शनिवार लवकर येतील दोघे म्हणून चहा सोबतचा मेन्यू करू असा विचार आला." कुसुम रविराज समोर गरमागरम कोथिंबीरच्या वड्या काढलेले ताट धरत बोलली.
तसा रविराजने एक दीर्घ श्वास घेत वड्यांचा सुवास नाकात भरला आणि त्यातील एक वडी उचलून पटकन तोंडात टाकली, तर दुसरी वडी अर्धी करून कुसुमला भरवली.
"अच्छा म्हणजे सूनेचे लाड करते आहे सासूबाई. आता लक्षात आलं.
वाह क्या बात है! तुझ्या हाताला काही न्यारीच चव आहे बघ कुसुम. चला स्नेहलच्या निमित्ताने आम्हाला पण मेजवानी. आल्यावर थँक्यू म्हणावं लागेल तिला." कुसुमचा हात हातात घेत रविराज बोलला.
"इश्श! तुमचं आपलं काहीतरीच आणि काय हो, सूनेचे लाड करण्यात वाईटच काय आहे? ती पण कोणाची तरी मुलगी आहेच की. केले कधी तिचे लाड तर काय बिघडलं. पोर तशी चांगली आहे. चला सोडा आता मुलं येतीलच इतक्यात." कुसुम लाजत बोलली.
तिचे वाक्य पूर्ण होताच दाराची घंटी वाजली.
"कार्टी नेहमी नाको त्या वेळी येतात." रविराजच्या बोलण्यावर दोघेही हसले.
"थांबा मीच उघडते दार." म्हणत पदराला हात पुसत कुसुम दार उघडायला गेली.
"केतन बरं झालं आलात. तुमचीच वाट बघत होतो आम्ही." कुसुम केतनकडे बघत बोलली.
"ह्मम." म्हणतं केतन घरात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसत होते.
"अरे देवा, आज स्नेहलला उशीर होणार की काय? केतन सोबत आली नाही ती." कुसुम डोक्याला हात मारत रविराजला बोलली.
"दिसतं तर तसच आहे. पण ह्याच्या चेहऱ्यावर का बारा वाजले?" रविराज केतनच्या खोलीकडे बघत बोलले.
"काय माहित? आल्यावर विचारू आपण. तोपर्यंत मी चहा टाकते." म्हणत कुसुमने दार बंद केले आणि स्वयंपाकघरात निघून गेली.
थोड्यावेळात केतन फ्रेश होऊन बाहेर आला आणि सोफ्यात जाऊन बसला.
रविराज खुर्चीत बसून केतनच्या हावभावावरून काय झाले असेल ह्याचा अंदाज घेत होते. तोपर्यंत कुसुम चहा, कोथिंबीर वड्या आणि बटाट्याची भजी घेऊन बाहेर आली.
"घ्या, मस्त आल्याचा चहा सोबतीला वड्या आणि भजी. तुम्ही खा, मी स्नेहलला फोन करून बघते किती वेळ लागेल तिला ते." म्हणत कुसुमने फोन हातात घेतला.
"काही करू नकोस फोन आई. ती येणार नाहीये. ती तिच्या आईकडे गेली." केतन वैतागून बोलला.
"आईकडे सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे ती अशी न सांगता कधी जात नाही. म्हणून विचारलं." रविराजकडे प्रश्नार्थक नजरेने बघत कुसुम बोलली.
"सगळं ठीक आहे तिथे. ती परत न येण्यासाठी गेली आहे. जाऊदे जाते तर, मला पण गरज नाही तिची." केतन रागात बोलत होता.
त्याच्या ह्या बोलण्यावर रविराज आणि कुसुमला समजेना की, नक्की काय झाले आहे.?
पुढील भागात बघू स्नेहल का गेली असेल अशी न सांगता? काय झालं असेल?
वाचत रहा संसाराची गाडी.
वाचत रहा संसाराची गाडी.
क्रमशः
©वर्षाराज
©वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा